सप्तरंग

फैसला तेरा... तू ही सोच ले...

ज्या लोकांना आयुष्यात निर्णय घेता येत नाहीत अशा लोकांना आज मी चार शब्द सांगणार आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला ‘आयुष्यात अमुक करा, स्वतःला अशा पद्धतीनं सुधारा,’ असं अगदी प्रेमानं सांगत आलोय.

सकाळ वृत्तसेवा

ज्या लोकांना आयुष्यात निर्णय घेता येत नाहीत अशा लोकांना आज मी चार शब्द सांगणार आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला ‘आयुष्यात अमुक करा, स्वतःला अशा पद्धतीनं सुधारा,’ असं अगदी प्रेमानं सांगत आलोय.

- चेतन भगत chetanbhagat@gmail.com, @chetan_bhagat

नमस्कार मित्रांनो!

ज्या लोकांना आयुष्यात निर्णय घेता येत नाहीत अशा लोकांना आज मी चार शब्द सांगणार आहे. आत्तापर्यंत मी तुम्हाला ‘आयुष्यात अमुक करा, स्वतःला अशा पद्धतीनं सुधारा,’ असं अगदी प्रेमानं सांगत आलोय; पण जर आपण चुकीच्या मार्गानं जात असू तर काही वेळा चार गोष्टी सुनावणं हाच मार्ग असतो असं मला वाटतं. मी जेव्हा आयुष्यात भरकटलो होतो तेव्हा जर कुणी मला असं आपलं असतं आणि जर त्यांनी मला चार गोष्टी सुनावल्या असत्या तर मी थोडा लवकर वळणावर आलो असतो असं मला वाटतं. कधी कधी माणसाला कितीही प्रेमानं, कितीही समजुतीनं सांगा, त्याच्या ते डोक्‍यात शिरत नाही, अशा वेळी ही जुनी भारतीय पद्धत कामी येते!

तुमच्यापैकी ज्या लोकांना निर्णय घेता येत नाही त्यांच्यासाठी सांगतो, मित्रांनो, तुम्ही असं ‘इनडिसायसिव’ असून चालणार नाही.

हे ‘इनडिसायसिव’ म्हणजे काय तर, आपण काय करावं हे न कळणं.

आपलं आयुष्य कशानं घडतं?... तर ते कठोर मेहनत आणि निर्णय या गोष्टींमुळे घडतं. आपण कोणत्या दिशेनं मेहनत घ्यायची आहे, कोणता पर्याय निवडायचा आहे, कोणत्या शहरात जायचं आहे, कोणती नोकरी पत्करायची आहे, कुठला अभ्यासक्रम निवडायचा आहे, पैसे कसे मिळवायचे आहेत, बचत कशी करायची आहे...अशा सगळ्या गोष्टींबाबत आपल्याला काही ठरवावं लागतं, म्हणजेच निर्णय घ्यावा लागतो.

तुम्ही काम करता, ऑफिसला जाता, अभ्यास करता...ही सगळी मेहनत असते; पण मेहनत तर कष्टकरी मजूरसुद्धा करतात. म्हणून त्यांची ओढाताण कमी होत नाही. कारण, ते कुठले मोठे निर्णय घेत नाहीत. तुम्ही जितके मोठे निर्णय घेता, तितका तुम्हाला जास्त आर्थिक लाभ होतो.

कंपनीमध्ये सर्वांत जास्त पैसे कुणाला मिळतात, तर कंपनीच्या सीईओला मिळतात. त्यालाच का बरं मिळतात...? तुम्ही इतके ‘क्‍यूट’ असूनही तुम्हाला का मिळत नाहीत?

कारण, सीईओ सर्वाधिक निर्णय घेतो. तो मोठमोठे निर्णय घेतो आणि त्याचे निर्णय चुकीचे ठरले तर त्यां निर्णयांची जबाबदारी त्या सीईओवर असते. त्यामुळेच त्याला त्याच्या कामाचे जास्त पैसे मिळतात. निर्णयक्षमता, गोष्टींची निवड करता येणं - ज्याला ‘जजमेंट’ म्हणतात- या अत्यंत आवश्‍यक क्षमता आहेत. तुमच्यामध्ये निर्णयक्षमता विकसित होण्यासाठी तुम्ही आधी स्वतःच्या आयुष्यातले निर्णय घ्यायला तर शिका!

आयुष्य तुम्हाला कधी ‘परफेक्‍ट चॉईस’ देत नाही. समजा, एक चॉकलेट दहा रुपयांना आहे आणि दुसरं पाच रुपयांना आहे. ही दोन्ही चॉकलेट सारखीच आहेत, तर तुम्ही त्यांपैकी कुठलं चॉकलेट विकत घ्याल?

हा निर्णय घेणं अगदी सोपं आहे. साहजिकच तुम्ही पाच रुपयांचं चॉकलेट विकत घ्याल. कमी खर्चात काम भागवाल. हा निर्णय सोपा आहे; कारण, तो तर्कशुद्ध आहे, ‘रॅशनल’ आहे... ईझी सेट ऑफ चॉइसेस!

पण आयुष्य असं नसतं. ‘पाच रुपयांचं’ आणि ‘दहा रुपयांचं’ असे पर्याय आयुष्यात कधीच नसतात. आयुष्यात कशा प्रकारचे पर्याय निवडावे लागतात बघा : मी बिकारनेरला राहतो. मी नोकरीसाठी दिल्लीला जाऊ की नको? तिथं मला पगार दहा हजार रुपये जास्त मिळेल...पण...पण मला घरापासून दूर राहावं लागेल. अशा वेळी निर्णय घ्यावा लागतो आणि ते काम सोपं नसतं. अरे, जास्त‌ पैसे मिळणार आहेत...चल, जाऊ या दिल्लीला...असं म्हणता येत नाही...एवढं ते सहज-सोपं नसतं. कारण, प्रश्‍न केवळ पैशाचा नसतो. इकडे माझ्या कुटुंबाचं काय होईल, बाकीच्या गोष्टींचं काय...हा विचार करावा लागतो. अशा वेळी हा ‘जजमेंट कॉल’ बनतो आणि या गोष्टीचा तुम्हाला स्थिरचित्तानं विचार करावा लागतो.

मात्र, बरेच लोक निर्णय घेऊ शकत नाहीत. काय करावं ते त्यांना कळतच नाही. साधं रेस्टॉरंटमध्ये जायचं म्हटलं तरी त्यांना कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जावं हे कळत नाही. आपल्या आजूबाजूला इतकी रेस्टॉरंट्‌स असतात. गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला तुमच्या जवळपास असणारी पन्नास रेस्टॉरंट दिसतील. त्यापैकी कुणाचं ‘रेटिंग’ उत्तम आहे हे तुम्ही पाहू शकता; पण नाही! या लोकांना कुठं जावं हे नाही कळत! तुम्हाला सांगतो, आय ॲम सिक ऑफ सच पीपल!

जर अशी अवस्था असेल तर तुम्हाला कितीही ज्ञान असो...आयुष्यात पुढं कसं जायचं, ध्येय कसं ठरवायचं, मोटिव्हेशन, वेळेचं व्यवस्थापन, शिस्त वगैरे वगैरे सगळं तुम्हाला माहीत असलं तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही; कारण, तुम्हाला निर्णयच घेता येत नाही. आयुष्यात आपण काय करावं हे तुम्हाला कळत नाही.

पण मित्रांनो, निर्णय घ्यायला शिका. आधी छोटे छोटे निर्णय घ्या.

समजा, मी तुम्हाला सांगितलं की, ‘फिटनेसकडे लक्ष द्या, जिमला जायला सुरुवात करा...’ तर तुम्ही म्हणणार, ‘अरे, ते कसं सुरू करायचं? मग मी उद्या सकाळी काय करू?’

अरे बाबा, काहीही कर. सकाळी उठून धावायला जा. तोही एक निर्णयच आहे. तुम्ही झोपून राहायचं ठरवलंत तर तोही एक निर्णयच आहे; पण तो चुकीचा निर्णय आहे.

पण जर तुम्ही असा विचार केलात की ‘मला यातलं फारसं काही कळत नाही; पण मी उद्या सकाळी उठून अर्धा तास धावायला जाईन... मग दुसऱ्या दिवशी फक्त सिट-अप्स, पुश-अप्स करीन...’ ठीक आहे, असं काहीही ठरवा; पण काहीतरी करा आणि ते तुम्ही ठरवलंत तरच होईल.

फिटनेसचा विषय जरा बाजूला ठेवू या. रिलेशनशिपचा विषय पाहू या. काही जण गर्लफ्रेंडबरोबर ‘डेट’ ठरवतात...मग ‘कुठं जायचं?’ हा प्रश्‍न येतो, तेव्हा हे लोक म्हणतात, ‘तू जिथं म्हणशील तिथं जाऊ या.’

अरे, तू सांग ना कुठं जायचं ते!

‘अरे, असं कसं सांगणार...? मला कुठंही चालेल. आय ॲम ओके. आय ॲम इझी-गोइंग पर्सन.’

नाही! तुम्ही ‘इझी-गोइंग’ वगैरे काहीही नाही आहात...तुम्ही ‘इनडिसायसिव’ आहात, हे लक्षात घ्या.

काही जणांना प्रश्‍न पडतात : मी बारावीनंतर काय करू? कोणता विषय घेऊ? कोणत्या शहरात जाऊ?

त्यांना ‘आपण हेही करू या...तेही करू या,’ असं वाटत असतं; पण ठामपणे काहीच ठरवता येत नसतं. असं चालत नाही.

तुम्हाला स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावेच लागतात आणि जर तुम्ही ते घेऊ शकला नाहीत, तर तुमच्या आयुष्याचे निर्णय दुसरं कुणीतरी घेईल. त्या माणसाची तुमच्यावर हुकमत असेल, तो जास्त प्रभावी ठरेल, तो तुमच्यापेक्षा जास्त पैसा मिळवेल, आणि तुम्ही...तुम्ही चमनलाल... लल्लूच राहाल!

त्यामुळे, मित्रांनो, तुम्ही निर्णय घ्यायला शिका. मग ते कुठल्याही बाबतीत असोत. समजा, तुम्हाला ‘डेट’वर जायचंय, तर त्यासाठी तुमच्याकडे ‘प्लॅन’ असायला हवा. मग तो काहीही असू द्या. ‘आपण ‘कन्हैया स्वीट्‌स’मध्ये जाऊन छोले-भटोरे खाऊ या’ हासुद्धा ‘प्लॅन’च आहे. कुठलाच ‘प्लॅन’ नसण्यापेक्षा हे कितीतरी चांगलं आहे.

समजा, काही जणांना विचारलं की, ‘कॉलेज संपल्यावर काय करणार?’ तर त्यांचं उत्तर असतं, ‘देखी जायेगी.. बघू या.’

काय देखी जायेगी? आणि कुठं नि काय बघणार आहात तुम्ही? काय बघायचंय ते आत्ताच बघा ना!

हे असे जे ‘इनडिसायसिव’ लोक असतात ना, त्यांच्या हातून आयुष्यात काहीही घडत नाही आणि ते पाहून मी त्रस्त होतो. तुम्ही माझे वाचक आहात...तुम्ही आयुष्यात पुढं जावं, समाजातले जे टॉप पाच टक्के लोक असतील, त्यांच्या पंक्तीत तुम्ही यावं असं मला वाटतं. त्यासाठी तुमच्यात निर्णयक्षमता असायलाच हवी; पण काही जणांना, उद्या कुठला शर्ट घालायचा...कुठल्या शहरात नोकरी करायची हेही ठरवता येत नाही. मग तुम्ही आयुष्यात काही भव्यदिव्य कसं करणार?

ज्या लोकांना निर्णय घेता येत नाहीत...‘मित्र म्हणतील ते करू या... बघू या...अशी ज्यांची भूमिका असते ते लोक जबाबदारी टाळत असतात. असे लोक स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी टाळत असतात. त्यांचा ग्रुप असो वा कुटुंब, मित्र, ऑफिस...कुठल्याही बाबतीत त्यांची भूमिका अशीच असते. तुम्ही जितक्‍या जास्त जबाबदाऱ्या घेता, तितके तुम्ही नेतृत्वस्थानाच्या दिशेनं वरवर जात असता; पण तुम्हाला जबाबदाऱ्या घ्यायच्याच नाहीयेत, तुम्हाला नेतृत्वस्थानीही जायचं नाहीये, तुम्ही निर्णय घेत नाही; कारण, ‘दिमाग पे लोड पडता है ना!’ ते तुम्हाला नकोय आणि तुमचं ‘दिमाग’ खराब झालेलंच आहे. तुमच्यात क्षमता होती; पण तुम्ही मोबाइलवर फालतू, बकवास गोष्टी पाहून स्वतःच्या डोक्‍याची वाट लावून घेतलेली आहे. तुम्ही हे जे छोटे छोटे व्हिडिओ बघत असता ना...‘रील्स’, ‘शॉर्टस्’ वगैरे, ते तुमचा मेंदू ‘हायजॅक’ करतात. तुमच्या मेंदूत विचार करण्याची क्षमताच उरलेली नाही. तुम्ही जनावर बनला आहात...स्क्रीन पाहणारे जनावर!

अशी अवस्था असताना, तुम्ही निर्णय कसे घेणार? आणि जर तुम्ही निर्णय घेतले नाहीत तर तुम्ही पुढं कसे जाणार?

तुम्ही घेतलेला निर्णय चुकला तरी चालेल, इट्‌स ओके. तुम्ही चार लोकांशी सल्ला-मसलत करून निर्णय घेतलात तरी हरकत नाही; पण तुम्ही निर्णय घ्या. समजा, तुमचा निर्णय चुकला तर त्यातून धडा घ्या.

आयुष्यात निर्णयक्षमता खूप गरजेची असते. उत्तम ‘जजमेंट’ हळूहळू... सरावानंच येतं. बरेच निर्णय घेतल्यावर तुमचं ‘जजमेंट’ उत्तम होतं. तुम्ही साधकबाधक विचार करू शकता. मित्रांनो, हे सगळं समजून घ्या. तुम्हाला मी हे का सांगतोय, त्यामागचा उद्देश लक्षात घ्या...अँड कीप इम्प्रूव्हिंग युवरसेल्फ. टेक केअर.

(अनुवाद : सुप्रिया वकील)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT