सप्तरंग

कोरोना विषाणूचे वजन आहे तरी किती?

डॉ. नानासाहेब थोरात

एका फुफ्फुसातील पेशीत कमीत कमी पाच ते दहा हजार कोरोना विषाणू सहज राहू शकतात.

इस्राईलमधील ‘वेईझमँन इन्स्टिटयूट ऑफ सायन्स’ आणि अमेरिकेतील ‘कॅलिफोर्निया इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी’मधील शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूचे वजन किती असेल, याचे अनुमान काढले आहे. ‘नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्स’च्या जर्नलमध्ये ते प्रसिद्ध केले आहे. या माहितीवरून आता लस आणि औषध निर्मितीच्या क्षेत्रात नवीन बदल घडून येताना दिसतील. भविष्यात नवीन कोणता विषाणू आला तर त्याचे लगेचच मानवी शरीरावर काय परिणाम होतील, याचाही अंदाज लावता येईल.

कोरोना हा आपल्या उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. त्यासाठी किचकट तंत्रज्ञान वापरून तयार केलेला सूक्ष्मदर्शक लागतो. त्याची किंमत अंदाजे दहा कोटीपेक्षा अधिक आहे. तो ठेवण्यासाठी दोन कोटीची एक रूम तयार करावी लागते. अमेरिका, चीन, जपान आणि युरोपियन देशांमध्ये काही सूक्ष्मदर्शक आहेत, यामधून आपण १०० ते १५० नॅनोमीटर एवढा लहान आकाराचा कोरोना विषाणू आहे, तसा पाहू शकतो.

कोरोनापेक्षा आपल्या फुफ्फुसातील पेशी हजारो पटीने मोठ्या असतात. म्हणजेच एका फुफ्फुसातील पेशीत कमीत कमी पाच ते दहा हजार कोरोना विषाणू सहज राहू शकतात. आपल्या फुफुसांमध्ये ४० प्रकारच्या वेगेवेगळ्या पेशी असतात आणि त्यांची एकूण संख्या १०० कोटींपेक्षा अधिक असते.

वजन किती असेल?

शास्त्रज्ञांच्या अनुमानानुसार एका व्यक्तीला सुरुवातीला जो कोरोनाचा संसर्ग होतो, तेव्हा त्याच्या शरीरात शंभर कोटींच्या (दहाचा नववा घात म्हणजेच एक अब्ज) आसपास विषाणू असतात. पुढे संसर्ग खूपच वाढला तर तेव्हा विषाणूचे प्रमाण एक हजार ते दहा हजार कोटीपर्यंत जाते (दहाचा दहावा ते अकरावा घात, दहा ते शंभर अब्ज.) समजा, एका व्यक्तीत दहा हजार कोटी एवढे जरी विषाणूचे प्रमाण धरले तर त्या सर्वांचे वजन भरते फक्त शंभर मायक्रोग्रॅम. म्हणजेच एका मिलिग्रॅमपेक्षा दहा पटीने कमी. जर आपण आजचे चालू आकडे अंदाज लावण्यासाठी वापरले तरी जगभरातील संक्रमित व्यक्तींमध्ये विषाणूची एकूण संख्या आणि कोविड-१९ संसर्गित लोकांची संख्या यांचा विचार केला तर संपूर्ण मानवी यजमानांमधील विषाणूचे वजन हे कमीत कमी १०० ग्रॅम ते जास्तीत जास्त फक्त १० किलोग्रॅम एवढेच भरेल.

एवढा कमी वजनाचा विषाणू मानवी शरीरातील जास्तीत जास्त किती पेशींना संसर्ग करतो? शास्त्रज्ञांच्या प्रयोगशाळेतील प्रयोगातून तयार केलेल्या मॉडेलनुसार जास्तीत जास्त फुफ्फुसामधील एक कोटी पेशींना कोरोना विषाणूचा संसर्ग होतोय. आपल्या शरीरात एकूण ३ ट्रिलियन पेशी असतात. अगदी सुरवातीच्या संसर्गामध्ये फक्त दहा व्हायरस एका पेशीमध्ये प्रवेश करतात आणि सुरवातीला या पेशींची संख्या असते फक्त दहा हजार. कोव्हिड आजाराचं अगदी अत्युच्च पातळीवर याची संख्या वाढून हेच व्हायरस एक कोटी पेशींना संसर्गित करतात आणि त्यावेळी एका पेशीमध्ये सरासरी एक हजार ते दहा हजार व्हायरस वाढलेले असतात.

एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूची संख्या वाढलेली असताना त्यांना आपली नैसर्गिक प्रतिकारशक्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न करते का, या प्रश्नाचे उत्तरसुद्धा शास्त्रज्ञांनी शोधले आहे. विषाणूने शरीरात प्रवेश केल्यावर आपली नैसर्गिक प्रतिकारशक्ती त्याला ओळखते आणि त्याला बाहेर काढण्यासाठी अँटीबॉडीज तयार करते. अँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण हे रक्तामध्ये अधिक असते तर फुफुसामध्ये ते फारच कमी असते. त्यामुळेच जेव्हा कोरोनाचा संसर्ग फुफुसांमध्ये पसरतो तेव्हा तो रोखणे अवघड होते. जेव्हा कोरोनाचा संसर्ग अत्युच्च पातळीवर असतो तेव्हासुद्धा आपली प्रतिकारशक्ती अतिशय निकराने त्याच्याशी लढत असते. आश्यर्य म्हणजे त्यावेळी एका कोरोना व्हायरसवर एक हजारापेक्षा अधिक अँटीबॉडीज जाऊन चिकटलेल्या असतात तरीसुद्धा व्हायरस वेगाने वाढतच असतो.

सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो रोगी आणि निरोगी व्यक्ती जिममध्ये कमीत कमी अर्धा तास एकत्र व्यायाम करत असतील तर काय होईल? अर्थातच व्यायाम करताना दोन्ही व्यक्ती मास्क वापरू शकत नाहीत. अशा ठिकाणी एक रोगी व्यक्ती निरोगी व्यक्तीला कमीत कमी ८६,००० एवढे व्हायरस फक्त अर्ध्या तासात देऊन जाईल. समजा जर निरोगी व्यक्तीचं शरीरात एवढे व्हायरस कमीत कमी वेळेत गेल्यामुळे प्रतिकारशक्तीला ते तेवढ्याच वेगाने बाहेर काढणे अवघड जाते आणि पुढच्या २४ तासात त्या व्हायरसची संख्या १ कोटी एवढी होऊ शकते. त्यामुळे आपल्या नाकातील, तोंडातील आणि श्वसनमार्गातील दहा लाख पेशींना संसर्गित करेल. जर योग्य वेळेत त्या व्यक्तीला उपचार मिळाले नाहीत किंवा व्हायरसचा प्रसार झाला आहे हे समजले नाही तर पुढच्या ७२ तासांत (४ दिवसांत) त्या व्यक्तीच्या शरीरात १० कोटीपेक्षा अधिक व्हायरसची प्रतिकृती तयार झालेल्या असतात.

सगळ्यात सुरवातीला फक्त दहा कोरोनाव्हायरस दहा हजार पेशींमध्ये प्रवेश करतात आणि त्याचे तेव्हाचे वजन मोजूच शकत नाही एवढे कमी असते. या दहा व्हायरस वरती शंभर अँटीबॉडीज जाऊन चिकटल्या तरी व्हायरसची संख्या वाढतच जाते. दहा हजारांपासून दहा कोटी पेशींना संसर्ग करून व्हायरस स्वतःची संख्या शंभर कोटीपेक्षा अधिक करतो. तेव्हासुद्धा त्याचे वजन फक्त काही मायक्रोग्रॅम असते मात्र कितीतरी किलो वजन असणाऱ्या आपल्या शरीराला मात्र निर्जीव करून टाकतो.

मास्क वापरल्यास आणि न वापरल्यास...

समजा एक व्यक्ती चालत निघाली आहे आणि समोरून दुसरी संसर्गित व्यक्ती येत आहे. दोघांनीही मास्क लावलेला नाही. अशावेळी दोघेजण एकमेकांना क्रॉस करताना रोगी व्यक्ती निरोगी व्यक्तीला किती विषाणूंनी संसर्गित करेल? याचे शास्त्रीय अनुमान आहे जास्तीत जास्त ७५ विषाणू. ते निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्यावर २४ ते ३६ तासांत जास्तीत जास्त दहा हजार होतील. त्याचवेळी आपली नैसर्गिक प्रतिकारशक्ती त्याला ओळखून आणि त्याला बाहेर काढण्यासाठी एका विषाणूमागे एक हजार अँटीबॉडीज तयार करेल. निरोगी व्यक्तीला त्याचा कोणताही त्रास होणार नाही. याचप्रमाणे रोगी आणि निरोगी व्यक्ती २० मिनिटे तीन फुटाच्या अंतरात बोलले तर कमीत कमी दोन हजार कोरोना विषाणू निरोगी व्यक्तीकडे येतील, मात्र मास्क लावून बोलले तर फक्त १०० विषाणू निरोगी व्यक्तीकडे येतील. हेच प्रमाण दोन व्यक्ती बसमध्ये न बोलता अर्ध्या तासासाठी बसले असतील तर ८० विषाणू निरोगी व्यक्तीकडे येतील. समजा विमानातून तीन तास एकत्र प्रवास केला तर मास्कशिवाय ३००० तर दोघांनी मास्क वापरल्यावर फक्त २०४ कोरोना विषाणू निरोगी व्यक्तीकडे येतील. एका हॉटेलमध्ये जर दोन लोक एकत्र जेवण करीत असतील तर तेवढ्याच वेळात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला १४०० ते १८०० व्हायरस देऊन जातो. हेच प्रमाण रेल्वेमधून एकत्रित प्रवास केल्यास एका तासासाठी १९०० एवढे आहे आणि मास्क वापरला तर फक्त १२१ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT