- मुक्ता चैतन्य
‘‘आई, सगळ्या मैत्रिणींकडं सोशल मीडिया आहे, मलाही हवाय...’’ दहा वर्षांची मुलगी हट्टाला पेटते. ‘‘अरे, किती वेळ गेमिंग करतोयस? अभ्यासाला बस. एवढ्या रात्री कुणाशी चॅटिंग सुरू आहे?’’ तेरा-चौदा वर्षांच्या मुलाचा बाबा काळजीनं; पण चिडून म्हणतो आणि मुलगा ‘मला माझी स्पेस हवीये, तुम्ही काहीही सांगू नका’ म्हणत पुन्हा मोबाईलमध्ये डोकं घालून बसतो.
असे प्रसंग हल्ली घरोघरी घडतात. मोबाईलवरून शाब्दिक हल्ले, कटकटी सुरू झाल्या आहेत. ‘फोन ठेव आता’ असं मुलांना म्हटलं की मुलं चिडचिड, आदळआपट करतात...रुसून बसतात. ‘आई-बाबांना आमचं जगणं समजतच नाही,’ असा सूर लावतात.
प्रसंगी एकमेकांच्या अंगावर हात उगारण्याचे प्रकारही होतात. केरळमधल्या कन्नूर जिल्ह्यातल्या केणिच्चिरा या गावातली घटना यासंदर्भात अंगावर काटा आणणारी आहे. मोबाईलचं व्यसन लागलेल्या मुलाला मोबाईलच्या अतिवापराबद्दल आई रागावली, तिनं त्याला टोकलं,
वातावरण भलतंच तापलं आणि रागाच्या भरात मुलानं आईचं डोकं घरातल्या भिंतीवर आपटलं. हा हल्ला इतका जबरदस्त होता की, त्यात आई मृत्युमुखी पडली. आईवर आठवडाभर रुग्णालयात उपचार झाले; पण झालेल्या जबर दुखापतीतून ती वाचू शकली नाही.
इतक्या टोकाच्या हिंसेचे प्रकार अपवादात्मक असले तरी मोबाईल या विषयावरून मुलांना पालक मारहाण करतात ही वस्तुस्थिती आहे, तसंच प्रसंगी मुलंही पालकांवर हात उचलतात हे कामाच्या निमित्तानं दिसून येतं.
हा तिढा सुटला पाहिजे; कारण मोबाईल, त्यातलं इंटरनेट आणि आभासी जग यांपासून आता आपली सुटका नाहीये. मोबाईल आणि त्यातलं इंटरनेट हा जगण्याचा अविभाज्य घटक बनलेला आहे. या तंत्रज्ञानाचे अनेक फायदे आहेत, तसेच तोटेही.
चीननं १.२ TB/second एवढं प्रचंड स्पीड असलेलं इंटरनेट निर्मित केल्याचा दावा केला आहे. एआय, सुपरफास्ट इंटरनेट, इम्प्लान्ट आणि वेअरेबल गॅजेट्स, अत्याधुनिक संगणक हे सगळं आपलं भविष्य नव्हे तर, वर्तमान आहे.
तंत्रज्ञानात अगणित बदल होणारच आहेत, त्यात अधिकाधिक आधुनिकता येणारच आहे. हे आपण काहीच रोखू शकत नाही. आपण काय करू शकतो? तर, या सगळ्या तांत्रिक क्रांतींना सामोरं जाण्यासाठी स्वतःला आणि आपल्या मुलांना तयार करू शकतो. यालाच म्हणतात ‘सायबर-पालकत्व’.
तांत्रिक बदलांच्या झंझावातात पालक म्हणून आपली भूमिका काय हवी, आपण नेमकं काय करायला हवं, नेट आणि टेक्नोसॅव्ही मुलांना समजून कसं घ्यायचं, तंत्रज्ञानाचा समतोल वापर स्वतः शिकायचा आणि मुलांना शिकवायचा कसा,
इथपासून ते तंत्रज्ञान आणि माध्यमं यांतले धोके कमी करून सायबर-गुन्ह्यांविषयी जागरूक होत मुलं आणि तंत्रज्ञान यांच्या शाश्वत, सुसंवादी आणि सजग सहअस्तित्वासाठी प्रयत्नरत असणं म्हणजेच सायबर-पालकत्व.
आजवरच्या मानवी इतिहासातल्या आधीच्या कुठल्याही पालकांच्या पिढ्यांना ज्या गोष्टींचा सामना करावा लागलेला नाही त्या गोष्टींशी आजचे पालक झुंजत आहेत. हायब्रीड जगणं (म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन यांच्या मिश्रणातून तयार झालेलं जगणं) या आधीच्या ज्ञात मानवी पिढ्यांनी जगलेलं नाही.
त्यामुळे याविषयीचा कसलाही पालकत्वाचा इतिहास आपल्याला नाही. पालक झाल्यानंतर आपण नेमकं काय करायचं असतं आणि काय टाळायचं असतं हे आपण स्वानुभवानुसार ठरवत असतो. आपल्याला जसं वाढवलं गेलेलं आहे, त्या वेळी आपल्या आजूबाजूला,
घरात जे काही वातावरण होतं त्या अनुभवांच्या आधारावर आणि पालक झाल्यानंतर इतर पालक काय करत आहेत हे जाणून घेऊन त्यातलं जे काही आपल्याला आपल्या वर्तनात आणि निर्णयात आणता येईल त्यानुषंगानं आपण आपल्या पालकत्वाचं सिलॅबस ठरवतो;
पण आपण लहान असताना ना मोबाईल होते, ना इंटरनेट होतं, ना हायब्रीड जगणं होतं. त्यामुळे आपल्या सिलॅबसमध्ये पूर्वानुभवाचे पाठच नाहीत. आपण जे काही करणार आहोत, करतो आहोत ते सगळं मानवी पालकत्वाच्या प्रवासात पहिल्यांदाच घडतंय.
खरं तर अशा अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडलेल्या आहेत; पण तरीही त्यात ‘हायब्रीड जगणं’ यासारखा अतिशय किचकट आणि विविध स्तरांवर परिणाम करणारा घटक कधीच नव्हता. पालकत्वाच्या प्रवासात अनेक आव्हानं प्रत्येक पिढीसमोर होतीच; पण ती सगळीच प्रत्यक्ष जगातली होती. सायबर-पालकत्वात प्रत्यक्ष आणि आभासी जगाची आव्हानं आहेत आणि म्हणून हा प्रवास अवघड आहे आणि विलक्षणही!
मुलांचा, पालकांचा आणि अगदी आजी-आजोबांचाही अती स्क्रीनटाइम. व्यक्तीऐवजी तंत्रज्ञान : अनेक आई-बाबा, आजी-आजोबा हे त्यांचा मोबाईलचा आणि टीव्हीचा वेळ कमी होऊ नये यासाठी मुलांच्या हातात मोबाईल देतात. आई-बाबा आणि आजी-आजोबा यांना पर्याय तंत्रज्ञान होऊ बघतं आहे.
बक्षिसांचा खेळ : पालक अनेकदा मोबाईल ‘बक्षिसा’सारखा वापरतात. ‘अभ्यास कर मोबाईल देईन’, ‘अमुक एक गोष्ट केलीस तर गेमिंगसाठी जास्तीचा वेळ मिळेल...’ यातून तंत्रज्ञानाबरोबरचं सजग सहजीवन विकसित होऊ शकत नाही.
पिढ्यांमधली डिजिटल दरी : पालक आणि मुल यांच्यात समान गोष्टींची यादी प्रचंड कमी झालेली आहे. म्हणजे, ज्यांत एकाच वेळी पालक आणि मुलं यांना रस असेल, अशा गोष्टी. ही डिजिटल-दरी भरून काढणं हे मोठं आव्हान आहे. या दोन पिढ्यांमध्ये समान जमीन असणं आवश्यक आहे.
सायबर-सेफ्टी आणि सिक्युरिटी यांबद्दल पालकांचं अज्ञान.
डिजिटल-जगात सायबर-पालकत्व निभावताना काही गोष्टी पूर्वीच्या जशा आवश्यक आहेत तशीच काही नवीन कौशल्यंही शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी पालक अनेकदा उदासीन असतात.
या नव्या कौशल्यांमधलं सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य ‘नाही’ म्हणण्याचं आहे. कशाला परवानगी द्यायची, कधी द्यायची आणि कशाला, कधी ‘नाही’ म्हणायचं याचा ताळमेळ आवश्यक आहे. आणि, हे मोठंच आव्हान आहे.
इंटरनेट आणि मोबाईल यांचा सुयोग्य वापर शिकवणं आणि शिकणं.
इंटरनेट-व्यसनाच्या धोक्याच्या जागा ओळखणं.
ऑनलाईन जगाचे अद्भुत अनुभव घेताना ऑफलाईन जगातले विलक्षण अनुभव घेणं सोडून न देणं.
(लेखिका ह्या ‘सायबर-मैत्र’च्या संस्थापक, तसंच सायबर-पत्रकार आहेत.)
(या सदरातल्या विषयासंदर्भातली सविस्तर मार्गदर्शन कार्यशाळा ‘सकाळ माध्यम समूहाची कौशल्यविकास संस्थे’तर्फे (एसआयआयएलसी) येत्या ता. ०४ फेब्रुवारी रोजी आयोजिण्यात आली आहे. सहभागासाठी व नावनोंदणीसाठी
संपर्क - ८९५६३४४४७२)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.