deep take sakal
सप्तरंग

‘डीप टेक’ किती खोल?

‘डीप टेक’ म्हणजे उच्च तंत्रज्ञानातल्या नावीन्यपूर्ण संकल्पना. प्रामुख्यानं प्रगत अभियांत्रिकीचा आणि वैज्ञानिकतेचा वापर करून उच्च तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता ‘डीप टेक’मध्ये आहे.

सम्राट फडणीस samrat.phadnis@esakal.com

काही तांत्रिक संज्ञा किचकट वाटतात. अशा संज्ञांच्या वाट्याला सहसा कुणी जात नाही. त्या संज्ञांच्या परिघात काम करणाऱ्यांपलीकडं इतर कुणाला त्याबद्दल फारशी माहिती होत नसते. ‘डीप टेक’ ही अशीच एक संज्ञा. ‘डीप फेक’ व्हिडिओंबद्दल, छायाचित्रांबद्दल अलीकडं ऐकलं-वाचलं-बोललं गेलं आहे. हुबेहूब वाटावा असा आशय निर्माण करणारं तंत्रज्ञान म्हणजे ‘डीप फेक’. प्रामुख्यानं नकारात्मक अशी छटा या संज्ञेला चिकटली आहे.

त्यामुळं, ‘डीप टेक’बद्दलही असंच काहीसं वाटण्याचा संभव अधिक. प्रत्यक्षात ‘डीप टेक’ संज्ञेभोवती आज सुरू असलेल्या कामातून उद्याचं जगणं अधिक सुसह्य, अधिक उपयुक्त होणार आहे. उद्याच्या बलाढ्य कंपन्यांची बीजं आजच्या ‘डीप टेक’मध्ये आहेत. उद्याचे बलाढ्य उद्योजकही ‘डीप टेक’मधूनच येण्याची सर्वाधिक शक्यता आहे. ‘भारताची उद्याच्या जगातली ताकद ‘डीप टेक’मधून निश्चित होईल,’ हे विधानही अतिरंजित नाही.

‘डीप टेक’ म्हणजे उच्च तंत्रज्ञानातल्या नावीन्यपूर्ण संकल्पना. प्रामुख्यानं प्रगत अभियांत्रिकीचा आणि वैज्ञानिकतेचा वापर करून उच्च तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता ‘डीप टेक’मध्ये आहे. या क्षेत्रात गेल्या दशकभरात स्टार्टअप पुढं येत आहेत. विज्ञान आणि अभियांत्रिकी या सतत विकसित होत जाणाऱ्या शाखा आहेत. मानवी कल्पनाशक्तीची झेप आणि उच्च तंत्रज्ञानानं उपलब्ध झालेली साधन-सामग्री यांचा वापर ‘डीप टेक’मध्ये होतो.

जगातले मोठमोठे, क्लिष्ट प्रश्न घेऊन त्यांवर उत्तरं शोधण्यासाठी ‘डीप टेक’ स्टार्टअप धडपडत असल्याचं जगभरात दिसतं. उदाहरणार्थ : कार्बन -उत्सर्जनाचा प्रश्न जगाला भेडसावतो आहे. या उत्सर्जनाचा परिणाम म्हणून हवामानबदल होत आहे. जग संकटाच्या खाईत लोटलं जात आहे. कार्बन-उत्सर्जन कमी करायचं तर, जगाचं दळणवळण ज्या जीवाष्मइंधनावर अवलंबून आहे, त्याचा वापर कमी केला पाहिजे.

मात्र, त्याच वेळी दळणवळण अविरत सुरू राहिलं पाहिजे. मग, यावर उपाय म्हणून आली इलेक्ट्रिक-वाहनं. ही होती नावीन्यपूर्ण संकल्पना. थोड्याच अवधीत जगाच्या लक्षात आलं की, या वाहनांमधल्या लिथियम बॅटऱ्यांचं आयुष्य कमी आहे. शिवाय, ऊर्जेची घनता असेल...बॅटरी चार्ज करण्याचा वेळ असेल...किंवा सुरक्षितता असेल...या बाबींवर अधिक काम व्हावं लागेल. इथं ‘डीप टेक’ स्टार्टअप काम सुरू करतात.

आजच्या आणि उद्याच्याही जगाला भेडसावू पाहणाऱ्या समस्येवर, उपाययोजनांवर विचार करतात. त्यासाठी अत्याधुनिक वैज्ञानिक संशोधन, अभियांत्रिकीचा वापर करतात. परिणामी, लिथियम बॅटऱ्यांवर अधिकाधिक प्रयोग होऊ लागतात आणि उद्याची समस्या सुटण्याच्या दिशेनं जगाची पावलं पडतात. वाहनं इलेक्ट्रिक बॅटरीवर चालवणं ही अभियांत्रिकीची एक पायरी होती. पुढच्या पायऱ्यांवर ‘डीप टेक’ उपयोगी पडतं आहे. क्वांटमस्केप, एथर अशा कंपन्या यांमध्ये काम करत आहेत.

भारतीय स्टार्टअप...

क्वांटम कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात काम करणारी ‘रिगेटी’ आजच्या संगणकांच्या मर्यादा ओलांडण्यासाठी प्रयत्न करते आहे. या अमेरिकी कंपनीचे अध्यक्ष आहेत सुबोध कुलकर्णी. थ्रीडी प्रिंटिंगच्या क्षेत्रात गेल्या दशकभरात अपेक्षित प्रगती झालेली नाही. ती समस्या सोडवण्यासाठी ‘डीप टेक’ आहे डेस्कटॉप मेटल. सूक्ष्म जीवांचा वापर करून नवनव्या गोष्टी बनवणाऱ्या ‘गिंगको बायोवर्क्स’कडं जैवतंत्रज्ञानासाठी उपयुक्त डेटा पुरवण्याची क्षमता आहे. जैवतंत्रज्ञानापासून ते औषधनिर्मितीपर्यंत अनेक ठिकाणी गिंगकोच्या ‘डीप टेक’चा वापर होऊ शकतो आहे.

बंगळूरची ‘सिग्ट्युपल’ ही कंपनी वैद्यकीय, पॅथालॉजी क्षेत्रातल्या वर्षानुवर्षांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करते आहे. अवकाशशास्त्रातल्या भविष्यासाठी ‘बेलाट्रिक्स एरोस्पेस’ ही कंपनी काम करते आहे. या कंपनीच्या उत्पादन-सेवांची नावं आहेत ‘अर्क’, ‘रुद्र’, ‘पुष्पक’, ‘जल’ अशी अस्सल भारतीय. अवकाशसंशोधनाच्या क्षेत्रात भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं (इस्रो) मोठी प्रगती करून जगाला अचंबित केलं आहेच. आता भारतीय स्टार्टअप जगाला आश्चर्यचकित करण्यासाठी सज्ज होत आहेत.

‘डीप टेक’मध्ये काम करणाऱ्या स्टार्टअप वाहतूक, आरोग्य, अवकाश, ऊर्जा, शेती अशा अनेक आघाड्यांवर काम करू लागल्या आहेत.

प्रगतीचा महादरवाजा

बरोबर एक वर्षापूर्वी, भारत सरकारनं ‘डीप टेक’ स्टार्टअपसाठी स्वतंत्र धोरणाचा मसुदा प्रसिद्ध केला. मे २०२३ अखेर भारतातल्या १०,२९८ स्टार्टअप ‘डीप टेक’मध्ये काम करत होत्या. त्यांपैकी सर्वाधिक, म्हणजे ३१७५ स्टार्टअप, थ्रीडी प्रिंटिंग, सेमिकंडक्टरविषयी नावीन्यपूर्ण प्रयोग करत होत्या. त्याखालोखाल, १६५० स्टार्टअप आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये काम करणाऱ्या होत्या आणि १४७९ स्टार्टअप ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज्’ उपकरणांमध्ये आहेत.

नॅनोटेक्नॉलॉजीत १५५ ‘डीप टेक’ स्टार्टअप आहेत. आकडेवारीनुसार, भारतात ‘डीप टेक’ला उज्ज्वल भविष्य आहे. व्यापक क्षेत्रावर प्रभाव टाकू शकणाऱ्या भावी कंपन्या आज स्टार्टअपच्या रूपानं भारतात आकाराला येत आहेत. यातल्या बहुतांश स्टार्टअप उद्योगांसमोरचेही प्रश्न सोडवू पाहत आहेत. त्या आपल्या तंत्रज्ञानाची सेवा मोठ्या उद्योगांसमोरच्या प्रश्नांना देऊन त्याद्वारे स्वतःला प्रस्थापित करत आहेत.

या स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारही पुढं येत आहेत. शिवाय, काही स्टार्टअप परस्परांमध्ये समाविष्ट होऊन नव्या कंपन्यांना जन्म देत आहेत. या साऱ्या घडामोडी पाहिल्या तर, भारत प्रगतीच्या महादरवाज्यासमोर उभा असल्याचं जाणवेल. भारताची अवाढव्य लोकसंख्या, तसंच सतत आ वासून उभं असलेलं बेरोजगारीचं संकट ही समस्या सोबतीला असताना ‘डीप टेक’मधून डोकावणाऱ्या महाकाय संधी उद्याच्या भारताचं आशास्थान ठरणार आहेत.

प्रगल्भ व्यवस्थेचा विचार

स्टार्टअप ही संकल्पना भारतात स्थिरावते आहे. अजून ती गावपातळीपासून बरीचशी दूर आहे; पण ही संकल्पना किमान शहरांच्या सीमा तरी ओलांडू लागली आहे. स्टार्टअपसाठी धोरणात्मक निर्णय भारत सरकार, महाराष्ट्र सरकार घेत असतं. स्टार्टअपमधल्या प्रभावशाली ‘डीप टेक’साठी स्वतंत्र धोरण हे एकूण स्टार्टअपच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे.

एखाद्या क्षेत्रासाठी धोरणाचा मसुदा तयार करणं आणि ते धोरण प्रत्यक्षात अमलात येणं या दोन टोकांमध्ये वर्षानुवर्षांचं अंतर असणं हे भारताला नवं नाही. ‘डीप टेक’ धोरणाचा मसुदाही गेलं वर्षभर तयार आहे. रोजगाराचा विषय लोकसभेच्या निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनतो. मात्र, रोजगारनिर्मिती करणाऱ्या उद्योग-व्यवसायाच्या धोरणाबद्दल कुणाला काही बोलावसं वाटत नाही, हा आपल्या निवडणूक प्रचारयंत्रणेतला गंभीर दोष.

आता निवडणुका होऊन गेल्या आहेत आणि नवं सरकार अस्तित्वात आलं आहे. तेव्हा, ‘डीप टेक’ स्टार्टअपच्या राष्ट्रीय धोरणाबद्दल आग्रहानं मांडणी केली पाहिजे. अमेरिका आणि ब्रिटन यांच्याबरोबरच जर्मनी, कॅनडा, बेल्जियममध्ये ‘डीप टेक’ स्टार्टअपसाठी स्वतंत्र व्यवस्था काम करते. त्यांना योग्य गुंतवणूक उपलब्ध व्हावी यासाठी सरकार खासगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देतं. गुंतवणूकदारांचा समुदाय एकत्रितपणे ‘डीप टेक’चा विचार करतो.

भविष्यातलं ‘गुगल’, ‘उबर’ इथून निर्माण होऊ शकेल, असा विश्वास बाळगतो. धाडसी आणि प्रगल्भ व्यवस्था आज भारतात सहजपणे उपलब्ध नाही. भारत सरकार तयार करत असलेल्या नव्या धोरणामध्ये अशा व्यवस्थेचा प्राधान्यानं विचार केला गेला आहे.

भविष्यकाळ उज्ज्वल

‘डीप टेक’ स्टार्टअपसमोर दोन प्रमुख अडचणी सातत्यानं असतात. भांडवली गुंतवणूक ही पहिली अडचण. धोरणाच्या मसुद्यात म्हटलंय की संयमानं, दीर्घ काळ विशेष योजनेतून अशा स्टार्टअपना गुंतवणूक उपलब्ध करून दिली जाईल. या माध्यमातून भांडवलाची अडचण संपेल अशी अपेक्षा आहे. दुसरी अडचण, जगाच्या बाजारपेठेत ‘डीप टेक’मध्ये सुरू असलेल्या स्पर्धेची जाणीव असणं.

आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना भारतातल्या स्टार्टअपमध्ये गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देऊन स्पर्धेत भारताला बरोबरीत ठेवण्याचा विचारही धोरणाच्या मसुद्यात आहे. असे गुंतवणूकदार जगभरात गुंतवणूक करत असतात. त्यामुळं, ते उत्तम संकल्पनेला अधिक बळ देऊ शकतील अशी अपेक्षा आहे.

अत्याधुनिक विज्ञान आणि अभियांत्रिकी हा ‘डीप टेक’चा पाया आहे. जगातली सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात ‘डीप टेक’नं अधिकाधिक प्रश्न सोडवता येऊ शकतात. भारतीय स्टार्टअप व्यवस्थेनं गेल्या दशकभरात आपलं सामर्थ्य दाखवून दिलं आहे. ‘डीप टेक’ आणखी प्रभावीपणे, आणखी व्यापक प्रश्नांना हात घालून तंत्रज्ञानाच्या मदतीनं ते सोडवू शकतं. तितकी विपुल बुद्धिमत्ता भारतात आहे. त्यामुळंच, या क्षेत्रातला भारताचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: धंगेकरांवर रासने यांनी घेतली आघाडी, तिसऱ्या फेरी अखेर कसब्यात उलटफेर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंना फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT