Dev Anand Guide movie bollywood hindi film industry  Sakal
सप्तरंग

‘ गाईड ’ नावाचा फिनाॅमिनाॅन

मी आयुष्यात किती हिंदी चित्रपट पाहिले, त्याची मोजदाद माझ्याकडे नाही. कॉलेजमध्ये इंटर सायन्सला असताना मी ९० तरी चित्रपट पाहिले होते.

द्वारकानाथ संझगिरी

मी आयुष्यात किती हिंदी चित्रपट पाहिले, त्याची मोजदाद माझ्याकडे नाही. कॉलेजमध्ये इंटर सायन्सला असताना मी ९० तरी चित्रपट पाहिले होते. आज ती संख्या हजारांच्यावर नक्की असेल. पण त्यातला माझा सर्वांत आवडता, देव आनंदचा गाईड. सर्वांत आवडता सिनेमा हा सर्वोत्कृष्ट असतोच असं नाही. कारण आवडणं वेगवेगळ्या कारणांसाठी असतं.

तरीही काळ पुढे पुढे जात राहिला, तसा तो चित्रपट अधिकाधिक समजत गेला.आणि तो मग जवळपास सर्वोत्तम वाटायला लागला. मध्यंतरी नसीरुद्दीन शाह यानं ‘गाईड’चं वर्णन एक परिपूर्ण चित्रपट असं केलं. मी गाईड एकंदरीत २८ वेळा पाहिला. एके काळी तो चित्रपट मला शॉट - बाय - शॉट पाठ होता. त्यातले अनेक संवाद मुखोद्‍गत होते. नंतर ती भक्ती गेली.

आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमातील देव आनंद, एस डी बर्मन, वहिदा, शैलेंद्र, फली मिस्त्री, विजय आनंद यांची प्रतिमा उंच उंच होत गेली. त्यात सर्वांत उंच होता विजय आनंद. देव आनंदचं वाचन अफाट होतं. शेवटी त्या काळात त्यानं इंग्लिश साहित्यात एम. ए. केलं होतं. आर.के आनंदची गाईड कादंबरी वाचून त्याला त्यावर हिंदी आणि इंग्लिश सिनेमा करावासा वाटला. इंग्लिश सिनेमा त्याने पर्ल बकवर सोपवला. त्यानं तिची ''द गूड अर्थ'' कादंबरी वाचली होती.

इंग्लिशमध्ये तो सिनेमा काढणं यात विषयाचं आव्हान नव्हतं. हिंदीत ते होतं. कारण ती कथा काळाच्या पुढची होती. आपण साठच्या दशकातल्या पहिल्या काही वर्षाच्या काळाबद्दल बोलतोय. ६ फेब्रुवारी १९६५ ला तो झळकला. म्हणजे साधारण १९६३ च्या सुमारास देव आनंदनं सिनेमा करायचा विचार केला असेल.

त्या काळात एक शिकलेला माणूस चक्क गणिकेच्या मुलीशी लग्न करतो. अर्थात हिंदी सिनेमात आधी ते क्वचित का होईना आलं होत. पण नंतर ती नवऱ्याला सोडून एका गाईडकडे राहते, आणि तेही लग्न न करता. आजच्या भाषेत सांगायचं तर लिव्ह इन् रिलेशनशिप!

त्यात राजू गाईड हा नायिकेच्या नवऱ्याने दिलेल्या पेपरवर तिची खोटी सही करतो. शेवटी त्याच राजूला गावातली भोळी जनता चक्क स्वामी म्हणून स्वीकारते. आणि मग पाऊस पडतो. राजू गाईड ऊर्फ स्वामी आपला देह ठेवतात. ज्या सांस्कृतिक जडणघडणीचा समाज त्या वेळी होता, त्यापेक्षा वेगळा, काळाच्या पुढे जाणारा हा विषय होता. मग लोकांनी तो कसा स्वीकारला?

लोकांनी हा स्वीकारला, कारण विजय आनंदने पटकथा लिहिताना कादंबरीतल्या विषयावर साखरेचं वेष्टण चढवलं. त्यामुळं अजिबात आदर्शवादी नसलेली राजू गाईडची व्यक्तिरेखा आदर्शवादी बनली नसली, तरी राजूकडे आपली सहानुभूती वळते. पाऊस पडल्यानंतर त्याचा झालेला मृत्यू मनाला चटका लावून जातो. राजूला मृत्यू त्यागमूर्ती बनवतो.

त्याच बरोबर देव आनंदला तिच्या पैशापेक्षा तिला मोठी नर्तिका बनवण्यात जास्त रस असतो, हे मनावर बिंबत जातं. तो तिची सही तिचा ऐवज लुटण्यासाठी करत नाही. ती पुन्हा तिच्या नवऱ्याकडे परत जाईल, ही त्याला भीती असते.

म्हणूनच त्याला पोलिसाने पकडल्यावर ती जेव्हा म्हणते, " पैसे हवे होते तर मला सांगायचं. पैसे तर तुझ्याकडेच असतात." तेव्हा तो म्हणतो, " सच बात ये हैं के न तुम मुझे समज सकी, ना मैं तुम्हे" देव आनंदची ही भूमिका त्याच्या नेहमीच्या रोमँटिक भूमिकेपेक्षा वेगळी आहे. किंबहुना ''गाता रहे मेरा दिल'' आणि '' तेरे मेरे सपने'' सोडलं तर सिनेमात देव आनंदला रोमँटिक गाणं नाही. स्वामी म्हणून त्याने बेअरिंग खूप सुंदर सांभाळलं आहे.

गाईड पाहताना पुन्हा जाणवतं की देव आनंद खूप चांगला अभिनेता होऊ शकला असता. पण मोठा स्टार होण्यात त्याने शक्ती खर्च केली. वाहिदाने तिच्या कारकीर्दीत केलेल्या भूमिकांपैकी ही एक उत्कृष्ट भूमिका आहे.

तिची व्यक्तिरेखा लिहिताना विजय आनंदने ती व्यभिचारी, वाटणार नाही याची काळजी घेतली. ती नवऱ्याला सोडून राजू गाईडकडे राहत असली, तरी नवऱ्यानेच तिच्यावर अशी पाळी आणली, हे आपल्या मनावर ठसविण्याचा विजय आनंदचा प्रयत्न यशस्वी झालाय. तिला मोठ्या नर्तिकेचं रूप देऊन तिच्या कलेच्या विकासासाठी तिचं बदफैली नवऱ्याला सोडणं आपल्याला खटकत नाही.

तिने अभिनय तर उत्तम केलाच आहे. पण तिची नृत्यं डोळ्याचं पारणं फेडतात. तिचा नुसत्या संगीतावर घेतलेला नागाचा नाच, तेव्हा मी डोळ्यात साठवला होता, तो अजून डोळ्यासमोरून जात नाही. तिने त्या भूमिकेसाठी आठ आठ तास मेहनत घेतली होती..

''काँटोसे खिंच के ये ऑचल,'' या गाण्यातल्या भावना ती जगली आहे. चितोडच्या किल्ल्यावर ते चित्रित केलय. मी तिथे गेलोय. ती जिथे जिथे नाचली तो भाग मी जवळून पाहिला आहे. एका ठिकाणी तर ती अत्यंत धोकादायक अशा जागेवर नाचली आहे.

मनात रेंगाळणारी आत्महत्येची भावना, आणि समोर नव्या आयुष्याचं चित्र याच्या उंबरठ्यावर उभं राहून तिने म्हटलेलं गाणं, ती जागा आणि वहिदाच्या चेहऱ्यावरचे भाव यामुळे जिवंत झालं आहे. तो फक्त अभिनय राहिलेला नाही. वहिदा त्या अनुभवातून जातेय असं वाटतं राहतं.

खरं तर किशोर साहू, गजानन जहागीरदार यांच्यापासून छोट्यातल्या छोट्या कलाकारांपर्यंत प्रत्येकाने आपली भूमिका चोख केलीय. पण या सिनेमात खऱ्या अर्थाने वटवृक्ष झालाय विजय आनंद. आनंद बंधूंमधला सर्वांत बुद्धिमान माणूस. देवने त्याच्या हातात सिनेमा दिला आणि त्या सिनेमाचं सोनं झालं.

आधी दिग्दर्शन चेतन आनंद करणार होता. पण त्याला रोझी म्हणून प्रिया राजवंश हवी होती. यालाच प्रेमात आंधळं होणं म्हणत असावेत. मग देव आनंदने राज खोसलाला विचारलं. वहिदा म्हणाली, " तो हवा असेल तर दुसरी नायिका शोधा."सीआयडी पासून त्या दोघांचं कधी जमलं नाही. मग विजय आनंद आला. त्याने सर्वच केलं. संवादही लिहिले. त्याच्या दिग्दर्शनाचा प्रत्येक पैलू उलगडून दाखवायचा असेल, तर वेगळा लेख लिहावा लागेल. मी फक्त दोनतीन गाण्यांबद्दल लिहितो.

''काँटोसे खिंच के ये ऑचल'' गाण्यात एक शॉट असा आहे, की ट्रकमधून जाताना, आनंदाच्या भरात वहिदा एका बाईच्या डोक्यावरचं मडकं उचलून फोडून टाकते. ते फक्त आनंद व्यक्त करण्यासाठी केलेलं नाही. माणसाच्या मृत्यूनंतर शेवटच्या विधीत मडकं फोडलं जातं. जुनं आयुष्य संपवलं आहे, आणि नवं आयुष्य सुरू होतंय या घटनेसाठी ‘फोडलेल मडकं’ हे एक प्रतीक आहे.

''तेरे मेरे सपने'' गाणं त्याने सकाळच्या संधिप्रकाशामध्ये चित्रित केलंय. रात्र संपते आहे आणि नवी पहाट उगवते आहे हे त्याला दाखवायचं होतं. सिनेमात ''मोसे छल'' आणि ''क्या से क्या हो गया'' ही गाणी एका पाठोपाठ एक येतात.

रोझीची आपल्याला राजूने खोटी सही करून फसवलं आहे आणि त्यातून निर्माण होणारी चीड विजय आनंदला गाण्यातून दाखवायची होती. पण मग राजू गाईडलाही एक बाजू असते. म्हणून मग लगेच ते ''क्यासे क्या हो गया'' घेतलंय. सिनेमाचं संकलन तर एवढं सुंदर केलंय, की अमुक एक शॉट हवा होता किंवा नको होता असं वाटत नाही. हा सिनेमा दिग्दर्शित करताना विजय आनंद फक्त ३० वर्षांचा होता.

काय गुणवत्ता असेल विचार करा. आणि गाईडचा चौथा खांब होता, संगीत. त्याबद्दल पुढीलवेळी.

सुरवातीला मी हा चित्रपट देव आनंदसाठी पाहिला. मग गाणी, वहिदा, विजय आनंदचं दिग्दर्शन, मग अगदी छोटी भूमिका करणारं मणी हे पात्र सुद्धा मला भावलं. जसजसा मी सिनेमा अधिक प्रगल्भपणे पाहत गेलो तसतशी गाईडची सौंदर्यस्थळं अधिक समजत गेली आणि मला तो सिनेमा मी पाहिलेल्या पांच सर्वोत्कृष्ट सिनेमांपैकी एक वाटू लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT