Actress Sridevi Sakal
सप्तरंग

श्रीदेवी पुन्हा होणे नाही!

दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच बॉलीवूड गाजवणाऱ्या श्रीदेवी वयाच्या ५४ वर्षांपर्यंत अभिनयाच्या क्षेत्रात आपले अधिराज्य गाजवत राहिल्या.

अवतरण टीम

- धीरज कुमार

दाक्षिणात्य सिनेसृष्टीसोबतच बॉलीवूड गाजवणाऱ्या श्रीदेवी वयाच्या ५४ वर्षांपर्यंत अभिनयाच्या क्षेत्रात आपले अधिराज्य गाजवत राहिल्या. भारतीय सिनेमातील पहिली महिला ‘सुपरस्टार’ची अशी बिरुदावली त्यांनी मिळवली. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे अकाली निधन झाले. मात्र, भारतीय सिनेविश्‍वातील एकेकाळचा त्यांचा अनभिषिक्त सम्राज्ञीसारखा वावर आठवला तर त्यांच्या स्मृती पुन्हा जाग्या होतात.

जगातील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या श्रीदेवी यांनी आपल्या उण्यापुऱ्या ५४ वर्षांच्या आयुष्यातील ५० वर्षे कला आणि मनोरंजनासाठी समर्पित केली. श्रीदेवी म्हणजे भारतीय मनोरंजन विश्‍वातील एक महत्त्वाचे नाव. त्यांनी आपल्या किशोरावस्थेपासून अभिनयाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली आणि भारतीयांच्या अनेक पिढ्यांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले. जवळपास तीनशे चित्रपटांमध्ये त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या.

बॉक्स ऑफिसला अनेक सिल्व्‍हर, गोल्डन, डायमंड आणि प्लॅटिनम ज्युबिली सिनेमे दिले. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटवली. भारताबाबतच्या त्यांच्या अशा अनोख्या योगदानासाठी त्यांच्या हीरक महोत्सवी वर्षात त्यांना मानवंदना द्यायलाच हवी. श्रीदेवी यांच्या अकाली जाण्याला आता सहा वर्षे होऊन गेली आहेत; पण भारतीय सिनेविश्‍वातील एकेकाळचा त्यांचा अनभिषिक्त सम्राज्ञीसारखा वावर आठवला तर त्यांच्या स्मृती पुन्हा जाग्या होतात.

संपत्ती, सत्ता आणि संपन्नतेची देवी मानल्या जाणाऱ्या देवी लक्ष्मीच्या नावावरून श्रीदेवी यांचे नाव ठेवले गेले. १९६३ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांची आई राजेश्‍वरी बॅकग्राऊंड डान्सर आणि ज्युनिअर आर्टिस्ट होती. वडील आयप्पन मद्रासमध्ये (आताचे चेन्नई) वकिलीचा व्यवसाय करत होते. लहानगी श्रीदेवी चुणचुणीत आणि आपल्या आई-वडिलांची आज्ञा पाळणारी होती.

घरी आल्या-गेलेल्यांची हुबेहूब नक्कल करण्याची कला छोट्या श्रीदेवीला चांगलीच जमायची. त्यांचा आवाज, हावभाव आणि लकब श्रीदेवी सहज उचलायची, असे तिची आई सांगते. त्यानंतरच आपल्या सुंदर आणि चुलबुल्या मुलीला सिनेजगतात घेऊन जावे, असे राजेश्‍वरी यांना वाटू लागले. मद्रास म्हणजे तेव्हाचे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचे केंद्र होते. दक्षिणेतील चारही राज्यांतील टॅलेंटेड व्यक्ती अशा भरभराटी दुनियेने प्रभावित झाल्या होत्या.

सुरुवातीला थोड्या अपयशाचा सामना करावा लागल्यानंतर श्रीदेवीना १९६९ मध्ये बालकलाकार म्हणून पहिली संधी मिळाली. एम. जी. रामचंद्रन, डॉ. जे. जयललिता आणि सोवकार जानकींसारख्या दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. १९६९ मध्ये ‘तुनैवन’ नावाचा एक धार्मिक विषयावरील चित्रपट आला होता. त्यात श्रीदेवी यांनी ‘मुरुगन’ देवाची भूमिका साकारली.

त्यानंतर तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी सिनेनिर्मात्यांनी त्यांची तारीख मिळवण्यासाठी रांगा लावायला सुरुवात केली. त्यानंतर श्रीदेवी यांनी लागोपाठ हिट सिनेमे दिले. त्या यादीत तमिळमधील ‘नाम नादू’ (१९६९), ‘मा नना निर्दोशी’ (१९७०), तेलुगूमधील ‘ना तम्मुदू’ (१९७१), मल्याळमधील ‘पूम्पटा’ (१९७१) आणि कानडीतील ‘भक्त कुम्बरा’ (१९७४) यांचा समावेश होता.

विशेष म्हणजे, त्यांनी हिंदी सिनेमात बालकलाकार म्हणून ‘रानी मेरा नाम’ (१९७१) चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यात मराठीतील दिग्गज अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. बालकलाकार म्हणून पाच भाषांमध्ये तब्बल ७० सिनेमे त्यांनी केले. १९७५ मध्ये आलेला ‘यशोदा कृष्ण’ त्यातील त्यांचा शेवटचा सिनेमा होता. त्यात त्यांनी भगवान कृष्णाची भूमिका साकारली होती.

श्रीदेवी तारुण्यात पदार्पण करत होत्या तशा त्यांना येणाऱ्या चित्रपटांच्या ऑफर्स कमी होऊ लागल्या. मग नायिका म्हणून त्यांनी तेलुगू चित्रपट ‘अनुरागलू’मधून (१९७५) पदार्पण केले. त्यात त्यांनी एका अंध मुलीची भूमिका साकारली होती; पण चित्रपटाला अपेक्षित यश न मिळाल्याने त्यांच्या अभिनेत्री होण्याच्या प्रवासात अडथळा आला.

सुरुवातीच्या काळात बरेच चढ-उतार अनुभवल्यानंतर आणि मल्याळम सिनेमातील काही कामानंतर त्यांच्या आयुष्यात एक निर्णायक वळण आले. ख्यातनाम दिग्दर्शक के. बालचंदर यांनी त्यांना ‘मुंद्रू मुदिचू’ (१९७६) सिनेमात संधी दिली. तमिळमधील उदयोन्मुख तारा कमल हसन आणि नवखे रजनीकांत त्यात श्रीदेवींसोबत होते. श्रीदेवी यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्या दोघांसमोर आपली दखल घ्यायला भाग पाडले.

तेलुगूमधील प्रभावशाली दिग्दर्शक रघुवेंद्र राव यांनी श्रीदेवी यांचे सिनेसृष्टीतील पालकत्व स्वीकारले आणि त्यांना ‘पदहारेल्ला वायसू’ (१९७८) सिनेमात भूमिका दिली. श्रीदेवी यांच्याच ‘वायतिनिले’ (१९७७) तमिळ सिनेमाचा तो रिमेक होता. ‘पदहारेल्ला वायसू’मुळे श्रीदेवी यांची तेलुगू सिनेमातील करिअरची गाडी पुन्हा एकदा धावायला लागली. तीन चित्रपटांनंतर त्या करिअरमध्ये स्थिरावल्या. त्यानंतर त्यांना चांगल्या भूमिका, चित्रपट, उत्तम दिग्दर्शक आणि मोठे बॅनर मिळवण्यासाठी धडपड करण्याची गरज उरली नाही.

श्रीदेवी यांनी तेलुगूमध्ये एन. टी. रामा राव आणि अक्किनेनी नागेश्‍वर राव यांच्यासोबत काम केले. तमिळमध्ये कमल हसन आणि रजनीकांतसारख्या स्टारबरोबर स्क्रीन शेअर केली. त्यामुळे त्यांच्या खात्यावर यशस्वी चित्रपट जमा झालेच, शिवाय प्रेक्षकांनाही त्यांनी भुरळ पाडली. १९८०च्या दशकात त्यांनी शोभन बाबू आणि कृष्णा यांच्यासारख्या तरुण अभिनेत्यांसोबत काम करायला सुरुवात केली.

दक्षिणेत श्रीदेवी यांची लोकप्रियता केवळ त्यांच्या सौंदर्यामुळे नव्हती; तर ‘जॉनी’ (१९८०), ‘कार्तिका दीपम’ (१९७९), ‘प्रेमाभिषेकम’ (१९८१), ‘मीनदुम कोकिला’ (१९८१), ‘देवता’ (१९८२) आणि ‘मूंद्रम पिराई’ (१९८२) सारख्या सिनेमांतील त्यांच्या मोहक अभिनयामुळे होती. १९७९ मध्ये आलेल्या ‘सोलवा सावन’ सिनेमातून श्रीदेवी यांनी हिंदीत पदार्पण केले; पण तो अयशस्वी ठरला.

त्यानंतर हिंदीत यश मिळवण्याची त्यांची इच्छा अपुरीच राहील, असे वाटू लागले. जितेंद्र यांच्यासोबत ‘हिम्मतवाला’ (१९८३) सिनेमात काम करून हिंदी सिनेसृष्टीसाठी आणखी एक प्रयत्न करावा, असा सल्ला श्रीदेवी यांना दिग्दर्शक राघवेंद्र राव यांनी दिला. मनात साशंकता असूनही त्यांनी ती संधी साधायचे ठरवले आणि इतिहास घडला. ‘हिम्मतवाला’ने बॉक्स ऑफीस गाजवले आणि श्रीदेवी यांच्या हिंदी सिनेमातील अध्यायाला सुरुवात झाली.

चित्रपटातील ‘नैनो में सपना’ गाण्याने त्यांना राष्ट्रीयस्तरावर ओळख मिळवून दिली. त्याचा प्रभाव इतका होता की, १९८४ मध्ये ‘फिल्मफेअर’ने त्यांना ‘नंबर वन हिरोईन’ असे संबोधले. विशेष म्हणजे, तो काळ समांतर सिनेमाच्या प्रभावाचा आणि ख्यातनाम अभिनेत्री शबाना आझमी व स्मिता पाटील साकारत असलेल्या महिलाप्रधान सशक्त भूमिकांचा होता.

श्रीदेवी यांनी हिंदी सिनेमाच्या नायिकेच्या प्रतिमेत आमूलाग्र बदल घडवून आणला. आपले मितभाषी वर्तन आणि संयमी स्वभावाने त्यांनी चित्रपटाच्या बॉक्स ऑफीस व्यवसायावरही आपली छाप पाडली. जितेंद्र आणि श्रीदेवी यांनी सलग चार वर्षे कौटुंबिक विषयांवरील चित्रपट करत हिंदी सिनेमावर वर्चस्व गाजवले.

श्रीदेवी बॉक्स ऑफीस कलेक्शनमुळे आनंदी असल्या तरी व्यावसायिक भूमिकांबाबत असमाधानी होत्या. तेलुगू आणि तमिळ सिनेमांप्रमाणेच हिंदीतही सशक्त भूमिका मिळाव्यात, अशी त्यांची इच्छा होती. तोपर्यंत सिनेसृष्टीला अनोळखी असणारा दिग्दर्शक हर्मेश मल्होत्रा यांनी श्रीदेवी यांना आपल्या ‘नगिना’ (१९८३) सिनेमाची ऑफर दिली. तो त्या वर्षातील सर्वाधिक यशस्वी ठरलेला दुसरा चित्रपट ठरला.

‘नगिना’ने श्रीदेवी यांना उत्तर भारतात ओळख मिळवून दिली. दक्षिणेत त्यांची बाजू आधीच भक्कम होती. ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील अभिनयाने त्यांनी संपूर्ण भारताचे लक्ष वेधून घेतले. त्यातील एका दृश्यामध्ये त्यांनी साकारलेला चार्ली चॅप्लिन भलताच भाव खाऊन गेला. ‘काटे नहीं कटते’ आणि ‘हवा हवाई’ गाण्यांमधील त्यांच्या मोहक अदाकारीने त्यांच्यातील कलात्मक क्षमताही दिसून आली. श्रीदेवी यांची घोडदौड इथेच थांबली नाही.

कारण यश चोप्रा यांचा ‘चांदनी’ आणि १९८९ मध्ये आलेला दुहेरी भूमिकेतील ‘चालबाज’ असे त्यांचे दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. तेलुगूमध्येही ‘आखरी पोर्तम’ (१९८८), ‘जागदेका वीरुदू अतिलोका सुंदरी’ (१९९०) आणि ‘क्षण क्षणम’ (१९९१) असे लागोपाठ ब्लॉकबस्टर सिनेमे देणे चालूच होते.

श्रीदेवी यांचे हिंदी आणि तेलुगू दोन्ही सिनेसृष्टींवर निर्विवाद वर्चस्व होते. त्यांनी केलेली कामगिरी आधी आणि नंतरही कुणा अभिनेत्री किंवा अभिनेत्याला जमलेली नाही. श्रीदेवी यांनी भारतभर अधिराज्य गाजवले. भारतीय सिनेमातील पहिली महिला ‘सुपरस्टार’ची बिरुदावली त्यांनी प्राप्त केली.

‘लम्हे’ (१९९१), ‘खुदा गवाह’ (१९९२), ‘गोविंदा गोविंदा’ (१९९३), ‘लाडला’ (१९९४) आणि ‘जुदाई’ (१९९७) चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयानंतर श्रीदेवी अधिक प्रभावी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. १९९६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक बोनी कपूर यांच्याशी त्यांनी विवाह केला. १९९७ मध्ये जान्हवी आणि २००० मध्ये खुशी अशा दोन मुलींना त्यांनी जन्म दिला. जवळपास १५ वर्षे भारत आणि विदेशातही चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी श्रीदेवी बोनी कपूर यांच्यासोबत फिरल्या. त्या काळात त्यांनी एक जबाबदार आई म्हणून आपल्या मुलींची काळजी घेतली.

२००४ मध्ये श्रीदेवी यांनी मालिनी अय्यर यांच्यासोबत दूरदर्शनवर पदार्पण केले; पण २०१२ मध्ये ‘इंग्लिश विंग्लिश’ सिनेमातून त्यांनी जगभरातील प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पुण्यात राहणाऱ्या शशी नामक मराठी महिलेची व्यक्तिरेखा त्यांनी त्यात साकारली होती. शशीला इंग्रजी बोलता येत नसल्याने अपमानाचा सामना करावा लागत असतो. त्यामुळे ती कोणालाही न सांगता अमेरिकेतील एका क्रॅश कोर्ससाठी प्रवेश घेते.

‘इंग्लिश विंग्लिश’मधून श्रीदेवी यांनी धमाकेदार पुनरागमन करत बॉक्स ऑफीस आणि सिनेमॅटिक नियमांना धक्का दिला. त्या सिनेमानंतर पुन्हा एकदा वयाच्या ४९व्या वर्षी त्यांना ‘मेगास्टार’ म्हणून मान्यता मिळाली. पती आणि मुलींनी पाठिंबा दिल्यामुळे श्रीदेवी ‘पुली’ (२०१५) आणि ‘मॉम’ (२०१७) चित्रपटांतून पुन्हा एकदा ७० एमएम पडद्यावर परतल्या. तेव्हा त्यांची स्पर्धा तेव्हाच्या आघाडीच्या अभिनेत्रींशी होती.

त्यानंतर त्या अनेक ब्रॅण्डचे उद्‍घाटन, फॅशन वीक, टीव्ही शो आणि रेड कार्पेटवर दिसल्या. ‘नवराई माझी’ गाण्यावरचे नृत्य त्यांच्या आयुष्यातील एक निर्णायक टप्पा होता. २४ फेब्रुवारी २०१८ मध्ये दुबईत त्यांचे अचानक निधन झाले आणि अवघ्या देशाला धक्का बसला. देशाच्या महनीय व्यक्तींपासून सामान्य माणसांनी त्यांनी दिलेली मानवंदना त्यांची लोकप्रियता सांगून जाते.

श्रीदेवी यांच्या हयातीत आणि नंतर मिळालेल्या पुरस्कारांचे मोल त्यांना प्रेक्षक अन् चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमासमोर काहीच नव्हते. देशाकडून झालेले कौतुक त्यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार होता. कारण दुसरी श्रीदेवी पुन्हा कधीच होणे नाही. एक अशी मेगास्टार जिच्यावर देशवासीयांनी आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे प्रेम केले.

dhiraj.rao@gmail.com

(लेखक प्रसिद्ध स्तंभलेखक असून सध्या श्रीदेवी कपूर यांचे जीवनचरित्र लिहीत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT