सप्तरंग

'रायडर' म्हणजे काय? (दिलीप बार्शीकर) 

दिलीप बार्शीकर

मूळ विमा योजनेसोबत विमेदाराला काही 'अतिरिक्त लाभ देणारी तरतूद' म्हणजे रायडर्स. रायडर्स विमेदाराला 'ऍड ऑन बेनेफिट्‌स' देतात, ज्यामुळं मूळ विमा योजना अधिक उपयुक्त आणि आकर्षक बनते. आपण गंमतीनं याची तुलना पिझ्झावरील टॉपिंग्जशी करू शकू. पिझ्झाप्रेमी मंडळी आपल्या आवडीनुसार पिझ्झावर पनीर, मशरूम, कॉर्न अशी काही टॉपिंग्ज टाकून आपला पिझ्झा अधिक चविष्ट, रुचकर बनवतात. अर्थात त्यासाठी थोडे अधिक पैसे मोजावे लागतात. त्याप्रमाणंच मूळ विमा योजनेसोबत रायडर्स घेतल्यामुळं विमेदाराला काही ज्यादा लाभ उपलब्ध होतात आणि विमा योजना अधिक फायदेशीर, अधिक परिपूर्ण होऊ शकते. विमा योजनेसोबत रायडर्स घेणं हे विमेदारांसाठी बंधनकारक नसून, ती केवळ ऐच्छिक बाब आहे. रायडर्सचं मूल्यही (प्रीमियम) माफक असतं. आयुर्विमा कंपन्यांकडं वेगवेगळ्या नावांनी विविध रायडर्स उपलब्ध असतात. तथापि मुख्यत्वे चार प्रकारचे रायडर्स विमेदारांत प्रिय आहेत, उपयुक्तही आहेत. 

अपघाती मृत्यू/ कायमचे अपंगत्व रायडर : ज्या विमेदारानं आपल्या मूळ पॉलिसीबरोबर हा रायडर घेतला आहे, अशा विमेदाराचं दुर्दैवाने अपघाती निधन झालं, तर विमेदाराच्या वारसांना मूळ पॉलिसीच्या फायद्यांबरोबरच या रायडरची रक्कमसुद्धा मिळते. उदाहरणार्थ, समजा 'अ' या विमेदारानं एक लाख विमा रकमेची एंडॉमेंट योजनेखाली एक पॉलिसी घेतली आहे- जिचा वार्षिक प्रीमियम पाच हजार रुपये इतका आहे. त्यानं या पॉलिसीसोबत एक लाख रकमेचा अपघाती फायद्याचा रायडरही घेतला आहे. आता हाच प्रीमियम थोडासा वाढून पाच हजार एकशे रुपये इतका होईल. (सर्वसाधारणपणे या रायडरअंतर्गत एक हजार रुपयांच्या फायद्यासाठी एक रुपया अशा प्रकारच्या साधारण माफक दरानं प्रीमियम आकारला जातो. त्यामुळंच या पॉलिसीत एक लाखाच्या अपघाती फायद्यासाठी शंभर रुपये जादा आकारले आहेत.) आता या विमेदाराचा पॉलिसी कालावधीत अपघाती मृत्यू झाला, तर वारसांना मूळ विमा रक्कम एक लाख रुपये + बोनस एवढी रक्कम तर मिळेलच; पण त्याशिवाय अपघाती रायडरचे एक लाख रुपयेसुद्धा मिळतील. 

टर्म रायडर : या रायडरचा लाभ टर्म इन्शुरन्सप्रमाणंच असतो. म्हणजेच विमा पॉलिसीच्या मुदतीत विमेदाराचा कोणत्याही कारणानं मृत्यू झाल्यास मूळ पॉलिसीच्या फायद्यांसोबत टर्म रायडरची रक्कमसुद्धा वारसांना दिली जाते. उदाहरणार्थ, समजा 'ब' या विमेदारानं एक लाख विमा रकमेची एक पॉलिसी घेतली आहे. त्यानं यासोबत प्रत्येकी एक लाख रकमेचा अपघाती रायडर आणि टर्म रायडरही घेतला आहे. समजा, त्याचा मूळ पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम पाच हजार रुपये असेल, तर अपघाती रायडरचे शंभर रुपये आणि टर्म रायडरचे 170 रुपये (अंदाजे) धरून त्याचा एकूण प्रीमियम 5280 रुपये इतका होईल. (अपघाती रायडर वगळता इतर प्रीमियम हे विमेदाराचं वय, शारीरिक स्थिती, सवयी, कौटुंबिक पार्श्वभूमी, विमा कंपनीचं दरकोष्टक अशा अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. वर दिलेला प्रीमियम केवळ उदाहरण म्हणून दिला आहे.) या विमेदाराचं अपघाती निधन झाल्यास वारसांना मूळ विमा रक्कम : एक लाख रुपये +बोनस, अपघाती रायडर : एक लाख रुपये, टर्म रायडर : एक लाख रुपये अशी म्हणजे तीन लाख रुपये + बोनस इतकी रक्कम वारसाना मिळेल. 
याच विमेदाराचं निधन अपघात सोडून अन्य कारणानं झाल्यास वरीलपैकी फक्त अपघाती रायडरची रक्कम वगळून दोन लाख रुपये + बोनस एवढी रक्कम वारसांना मिळेल. 

मूळ पॉलिसीमधलं विमासंरक्षण वाढवण्यासाठी हा उत्तम रायडर आहे. एक उदाहरण पाहू. समजा एखादा विमेदार 'मनी बॅक' पॉलिसीच्या प्रेमात पडला. तो दोन लाख रकमेची 'मनी बॅक' पॉलिसी घेऊ इच्छितो. मनी बॅक पॉलिसीचा प्रीमियम जास्त असतो. समजा त्याला या पॉलिसीसाठी तेरा हजार रुपये इतका वार्षिक प्रीमियम लागतो. तो भरण्याची त्याची तयारीही आहे; पण त्याला वाटतंय, की दोन लाख रुपये हे विमासंरक्षण अपुरं आहे, ते चार लाख तरी असायला हवं. आता त्या 'मनी बॅक' पॉलिसीची रक्कम दोन लाखांवरून चार लाख करायची झाली, तर प्रीमियमसुद्धा 13 हजारांवरून 26 हजार रुपयांच्या आसपास जाईल. हे मात्र त्याला परवडणारं नाही. अशा वेळी त्या व्यक्तीनं दोन लाखांच्या मनी बॅक पॉलिसीसोबत दोन लाखाचा टर्म रायडर घेतला, तर त्याला अपेक्षित चार लाख रुपयांचं विमासंरक्षण मिळेलच आणि या दोन लाखांच्या टर्म रायडरसाठी त्याला अवघे साडेतीनशे ते चारशे रुपये जास्त द्यावे लागतील. 

क्रिटिकल इलनेस रायडर : विमेदारानं आपल्या पॉलिसीसोबत हा रायडर घेतला असल्यास त्याला काही गंभीर आजारात एकरकमी आर्थिक मदत मिळण्याची तरतूद या रायडरमध्ये आहे. पॉलिसी काळात विमेदाराला कॅन्सर, स्ट्रोक, दोन्ही मूत्रपिंडं निकामी होणं, हृदय शस्त्रक्रिया, अवयवारोपण अशा प्रकारच्या गंभीर व्याधींशी सामना करण्याची वेळ आली, तर संपूर्ण रायडर रक्कम विमेदाराला दिली जाते. बहुतेक सर्व कंपन्या याहूनही जास्त आजारांत या रायडरचं संरक्षण पुरवतात. त्या आजारांची नावं, वैद्यकीय परिभाषेत त्यांच्या व्याख्या याविषयीची माहिती त्या त्या कंपनीच्या माहितीपत्रकात; तसंच पॉलिसी दस्तावेजात सविस्तरपणे दिलेली असते. 

प्रीमियममाफीचा रायडर : या रायडरला 'प्रीमियम वेव्हर बेनिफिट' किंवा 'वेव्हर ऑफ प्रीमियम' असं संबोधलं जातं. या रायडरनुसार विशिष्ट परिस्थितीत (उदाहरणार्थ, विमेदाराला संपूर्ण अपंगत्व येणं, एखाद्या दुर्धर आजारामुळं तो नोकरी/व्यवसाय यांसाठी पूर्णपणे अपात्र ठरणं) प्रीमियम भरण्यापासून विमेदाराला माफी मिळू शकते. विमेदाराच्या वतीनं कंपनी प्रीमियम भरते आणि त्यामुळे पॉलिसी सर्व फायद्यांसह चालू स्थितीत राहते. मुलांच्या पॉलिसीमध्ये हा रायडर घेणं विशेष महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, समजा, सात वर्षांच्या मुलाची पॉलिसी त्यांच्या वडिलांनी काढली आहे आणि पॉलिसी सुरू झाल्यावर दोन वर्षांनी वडिलांचाच मृत्यू झाला. आता पुढचे हप्ते कोण आणि कसे भरणार? अशा वेळी पॉलिसी घेतानाच हा रायडर घेतला असेल, तर पुढील प्रीमियम भरण्याला माफी मिळू शकते. 

एकूणच रायडर या विषयासंदर्भात निर्णय घेताना, किंवा विचार करताना या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ः 

  • रायडरचा फायदा मिळण्यासाठी वेळेवर प्रीमियम भरून पॉलिसी चालू स्थितीत ठेवणं आवश्‍यक असतं. 
  • अपघाती फायद्याचा रायडर प्रत्येक विमेदारानं अवश्‍य घ्यावा. तथापि अन्य रायडर्स (विशेषत: क्रिटिकल इलनेस रायडर) घेताना मिळणाऱ्या लाभांची, भराव्या लागणाऱ्या प्रीमियमची; तसंच या संदर्भातल्या अटींची संपूर्ण माहिती करून घ्यावी, म्हणजे संभाव्य गैरसमज, फसगत टळू शकेल. 
  • रायडर्ससाठीचा प्रीमियम मुख्य विमा प्रीमियमबरोबरच भरला जातो. त्यामुळं तो विमा प्रीमियमचा एक भाग म्हणून गणला जातो, आणि म्हणूनच प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी नुसार तो करसवलतीसाठी पात्र ठरतो. 
  • क्रिटिकल इलनेस रायडरसाठी भरला जाणारा प्रीमियम कलम 80 सीनुसार करसवलतीसाठी पात्र असतोच; पण एखाद्या व्यक्तीनं कलम 80 सीची कमाल गुंतवणूक (सध्याच्या नियमांनुसार दीड लाख रुपये) आधीच केली असेल, तर या प्रीमियमसाठी कलम 80 डीनुसार स्वतंत्र सवलतही घेता येते. 
  • रायडर्स क्‍लेम्समधून विमेदाराला/वारसांना मिळणारी रक्कम कलम 10नुसार (10 डी) करमुक्त असते. 
  • कोणत्याही एका रायडरअंतर्गत मिळणारा लाभ मूळ विमा रकमेपेक्षा अधिक असू शकत नाही. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीनं पाच लाख विमा रकमेची पॉलिसी घेतली आहे. त्याला या पॉलिसीसोबत 'अपघाती फायद्याचा रायडर' घ्यायचा असेल, तर तो जास्तीत जास्त पाच लाख रकमेचा घेता येईल, त्यापेक्षा अधिक नाही. 
  • नवीन विमा पॉलिसी घेतानाच आपल्या गरजेनुसार योग्य ते रायडर्स त्यासोबत घेणं केव्हाही चांगलं. तथापि काही रायडर्स नंतरसुद्धा पॉलिसीला संलग्न करून घेता येतात. (उदाहरणार्थ, अपघाती फायद्याचा रायडर). 'वेव्हर ऑफ प्रीमियम'सारखे रायडर मात्र पॉलिसीच्या सुरवातीलाच घ्यावे लागतात, नंतर संलग्न करता येत नाहीत. याबाबत प्रत्येक विमा कंपनीनुसार नियम थोडे वेगळे असू शकतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT