‘बिटकॉइन’ या ‘क्रिप्टोकरन्सी’ची जगभर चर्चा सुरू आहे आणि भारतातही तिनं वेगवेगळ्या प्रकारे पाय पसरायला सुरवात केली आहे. नेमकी काय असते ही ‘क्रिप्टोकरन्सी’, तिचं वैशिष्ट्य काय, तिचे फायदे-तोटे काय, तिच्याबरोबर येणारे धोके कोणते, अर्थव्यवस्थेवर नक्की काय परिणाम होणार अशा विविध गोष्टींवर एक नजर.
येत्या पाच ते सात वर्षांत भारतासह जगभरात अर्थव्यवस्थेत काही आमूलाग्र बदल अपेक्षित आहेत. सर्वाधिक मोठा बदल असेल, तो चलनामध्ये! पारंपरिक चलनाला सर्वाधिक धक्के बसत आहेत. नोटा किंवा नाणी स्वरूपातलं चलन हद्दपार होण्यास ‘डिजिटल’ युगात आधीच सुरवात झाली आहे; नवा बदल असेल तो ‘चलन’ या व्यवस्थेवरच्या संस्थांच्या मक्तेदारीला. चलनाचा व्यवहार हा मुळात विश्वासाचा व्यवहार असतो. चलनाला ‘सरकार’ नावाची व्यवस्था विश्वास प्राप्त करून देते. परिणामी, चलनावर सरकारचं बऱ्याच प्रमाणात नियंत्रण असतं. देवाणघेवाणीच्या प्रमाणात चलनाचे दर ठरवण्याची सर्वसाधारण पद्धत आहे आणि देवाणघेवाण ही संबंधित देशाच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक क्षमतेवर आधारित असते. परिणामी, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्याही चलनावर सरकारी व्यवस्थेचं नियंत्रण राहतं. मात्र, नेमक्या याच रचनेवर सध्या ‘डिजिटल’ घाव घातले जात आहेत. त्यातून उदयाला येणारी नवी व्यवस्था नेमकी कशी असेल; कितपत विश्वासार्ह, सुरक्षित असेल आदीबाबतचं नेमकं चित्र आज स्पष्ट झालेलं नसलं, तरी त्याची झलक दिसायला लागली आहे ती ‘क्रिप्टोकरन्सी’च्या रूपानं.
दुबईमधली प्रस्तावित ‘ब्लॉकचेन स्ट्रॅटेजी’
दुबई सरकारने डिसेंबर २०१६ पासून ‘स्मार्ट दुबई’अंतर्गत ‘स्मार्ट दुबई कार्यालय’ आणि ‘दुबई फ्युचर फाऊंडेशन’अंतर्गत ‘ब्लॉकचेन स्ट्रॅटेजी’ वापरण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. त्यांच्या मते, ही आधुनिक कार्यप्रणाली सुरक्षितता, योग्यता, परिणामकारक, वेळ वाचवण्यासाठी फायदेशीर आहे. यामधून दुबईतली आर्थिक उलाढाल वाढेल; तसंच विकासाचा नवीन मार्ग विकसित होईल. यातून महासत्ता, निर्णयक्षम अर्थकारण, नवीन उद्योगधंद्यांची पायाभरणी, तेलाची निर्यात, आदी जागतिक विकासवाढीवर विपरीत परिणाम होईल. ते असंही म्हणतात ः ‘दुबईमध्ये ब्लॉकचेन ही संकल्पना अस्तित्वात आणल्यास दरवर्षी इतकी बचत होईल, की ती रक्कम बुर्ज खलिफा या वास्तूच्या किंमतीइतकी असेल. या ब्लॉकचेनच्या कार्यप्रणालीचा वापर करून दुबईमध्ये होणारे व्हिसा ॲप्लिकेशन्स, बिल पेमेंट्स, लायसन्स रिन्युअल्स हे ऑनलाइन व्यवहार होतील. दरवर्षी सुमारे दहा कोटी एवढी कागदपत्रं या व्यवहारातून हाताळली जातात. या कार्यप्रणालीमुळे जवळपास ११४ टन एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडणारा कार्बन डायऑक्साईड; तसंच २.५१ कोटी तासांची बचत होण्यास फार मोलाची मदत होईल. यातून नवनवीन व्यवसाय करण्यास सुलभता येईल. बांधकाम, वित्त, आरोग्य, दळणवळण, ऊर्जा, डिजिटल कॉमर्स, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये विशेष वाढ होईल. २०२० पर्यंत दुबई हे डिजिटल अर्थकारण करणारं जगातलं पहिलं शहर असेल.’
एकंदरीत पाहता भारतामध्ये असणारा ‘बिटकॉइन’ला विरोध; तसंच दुबईमध्ये स्वागत यामुळं सर्वसामान्यांच्या तूर्तास मनात गोंधळ निर्माण होत असला, तरी भविष्यात ‘बिटकॉइन’ हे एक चलन माध्यम म्हणूनच उदयास येईल यात शंका नाही. मात्र, गुंतवणुकीचा पर्याय म्हणून त्याचा वापर होत असताना, सर्वसामान्यांचं नुकसान टाळण्यासाठी यावर निर्बंध आणले पाहिजेत, हेही तितकंच खरं. ‘ब्लॉकचेन संकल्पना’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेशी निगडित असून भविष्यातलं जग खूपच खूपच रोमांचकारक असेल.
आधुनिक अर्थकारण व्यवहारप्रणाली
बिटकॉइन या डिजिटल चलनाची थोडक्यात तोंडओळख करून घेऊया.
मुख्य वैशिष्ट्यं
आधुनिक क्रिप्टोग्राफी
बिटकॉइन ही जगभर वापरली जाणारी एक आधुनिक क्रिप्टोग्राफी (डिजिटल पेमेंट सिस्टिम) आहे. बिटकॉइनला ‘पहिली डिसेंट्रलाइज्ड डिजिटल करन्सी’ असंदेखील संबोधलं जातं. ही संगणकप्रणाली ‘सतोशी नकामोतो’ या नावाच्या एक अनोळखी व्यक्तीनं किंवा व्यक्तीच्या गटानं मिळून बनवली. ही प्रणाली २००९ च्या सुमारास ओपन सोर्स सॉफ्टवेअरअंतर्गत उदयास आली. या प्रणालीमुळं कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तीशी, कोणाच्याही आधाराशिवाय, कोणत्याही वेळी आर्थिक देवाणघेवाण करू शकते. आर्थिक देवाणघेवाण ही एका विशिष्ट नोडमार्फत केली जाते. मग ही रेकॉर्डस पब्लिक लेजर म्हणजेच ‘ब्लॉकचेन’च्या स्वरूपात स्टोअर केली जातात. बिटकॉइन्स वापरून आपण करन्सी एक्सचेंज; तसंच वस्तू, सेवा यांचीही देवाणघेवाण करू शकतो. फेब्रुवारी २०१५ च्या सांख्यिकी आकडेवारीनुसार, जवळपास एक लाखांहून अधिक व्यापारी ‘बिटकॉइन’ हे पेमेंट माध्यम म्हणून वापरत होते. हा आकडा आणखी वाढला असेल. अलीकडच्या काळात बिटकॉइनकडं ‘गुंतवणुकीचा पर्याय’ म्हणूनही बघितलं जातं. केंब्रिज विद्यापीठाच्या एका अहवालानुसार, २९ ते ५८ लाख लोक हे क्रिप्टोग्राफी करन्सी वापरत आहेत. भारतीय रुपये हे Indian Rupees(INR) असे दर्शवतात त्याप्रमाणे बिटकॉइन हे BTC/ XBT असे ओळखले जातात. सतोशी आणि मिलिबिटकॉइन हे लहान परिमाण एकक आहे.
बिटकॉइनचा इतिहास
१८ ऑगस्ट २००८ रोजी bitcoin.org हे संकेतस्थळ रजिस्टर केलं गेलं. नोव्हेंबर २००८ मध्ये क्रिप्टोग्राफीच्या एका मेलिंग लिस्टवर ’Bitcoin: A Peer-to-Peer Electronic Cash System’ या विषयावर सतोशी नकामोतो या नावानं एक पेपर टाकण्यात आला. या नाकामोतोची ओळख आजपर्यंत पटलेली नाही.
बिटकॉइन काम कसं करतं?
बिटकॉइन हे इतर पेमेंट वॉलेटप्रमाणेच कार्य करणारं एक मोबाइल ॲप आहे. एका विशिष्ट कॉम्प्युटर प्रोग्रॅमद्वारे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बिटकॉइन्स पाठवू शकते. हे व्यवहार होत असताना प्रत्येक व्यक्तीचा संगणक हा प्रत्येक व्यवहारओळख तपासण्यासाठी वापरला जातो. या प्रत्येक व्यवहाराची सुरक्षितता डिजिटल सिग्नेचरच्या माध्यमातून तपासली जाते. यामध्ये बिटकॉइन्स पाठवणाऱ्याचा संगणकीय ॲड्रेस बघितला जातो. एप्रिल २०१७ च्या सांखिकीनुसार एकूण २० अब्ज अमेरिकी डॉलर्सइतके बिटकॉइन्स वापरले गेले. हा आकडा दिवसेंदिवस अजून वाढतच चालला आहे. सध्या हॉटेल्स, अपार्टमेंट्स, कायद्याची कार्यालयं, ऑनलाईन सेवा देणाऱ्या संस्था उदा. नेमचिप, ओव्हरस्टोक.कॉम, रेडिट आदी कंपन्या बिटकॉइन्स ही पेमेंट प्रणाली वापरत आहेत. बिटकॉइनचं जाळं कोणीही नियंत्रित करू शकत नाही. ते स्वतः महत्त्वाचे निर्णय घेऊन स्वयंचलित पद्धतीनं चालतं. जगभरातल्या बिटकॉइनच्या युजर्सच्या माध्यमातून हे जाळं काम करतं. बिटकॉइन हे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. कोणतीही व्यक्ती अथवा संस्था त्यांच्या गरजेप्रमाणं ते वापरू शकतात. यावर बिटकॉईनच्या संगणक अभियंताचं काहीही नियंत्रण नसतं.
भारतात प्रामुख्यानं zebpay आणि coindesk या दोन कंपन्या बिटकॉइनसंदर्भात उलाढाल करतात. यातील झेबपे कंपनी ग्राहकांचं पॅन कार्ड; तसंच बॅंक अकाऊंटसंदर्भात माहिती गोळा केल्यानंतरच आपणास ट्रान्झॅक्शन करण्यास परवानगी देते. हे ॲप वापरून आपण बिटकॉइनची खरेदी-विक्री करू शकता. बिटकॉईनची किंमत ही त्यादिवशी त्या वेळेला असणाऱ्या किंमतीप्रमाणं मोजली जाते. कमीत कमी एक हजार रुपयांपासून पुढं आपण बिटकॉइन्स खरेदी करू शकता. एका बिटकॉइनचा दर कसाही बदलू शकतो. तो काही दिवसांपूर्वी प्रति बिटकॉइन वीस हजार डॉलरवर पोचला होता. आता तो कमीकमी होत असून, २५ डिसेंबर रोजी त्याचा दर सुमारे साडेचौदा हजार डॉलर इतका होता.
रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या मते, ‘व्हर्चुअल कार्डस’ ही सेवा अधिक सोपे, सुरक्षित अर्थप्रणाली म्हणून ओळखली जाऊ शकते. भविष्यात ही संकल्पना अजून विस्तृत होईल. प्रमुख चलन वापरण्याऐवजी अशी व्हर्चुअल कार्डस वापरणं फारच सोईचं आहे. सध्या लोक डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड वापरत आहेत. तशाचा प्रकारे भविष्यात लोक ही प्रणालीसुद्धा वापरू शकतील.
बिटकॉइनचे फायदे ः
पेमेंट करण्याचं स्वातंत्र्य हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. यामध्ये आपण कोणत्याही वेळेला पेमेंट करू शकतो. बॅंकांना असणाऱ्या सुट्या, नोकरशाहीचा अभाव, मर्यादित वापर याचा कोणताही परिणाम या पेमेंट व्यवस्थेवर होत नाही. कमी वेळेत व्यापार/व्यवहार करणं हे या प्रणालीचं वैशिष्ट्य.
वित्तीय संस्था ः जगभरामध्ये बऱ्याच वित्तीय संस्था ‘बिटकॉईन’ या पेमेंट प्रणालीचा वापर करण्यास उत्सुक आहेत. ओव्हरस्टोक.कॉम, मायक्रोसॉफ्ट, चिपएअर.कॉम, विकिपीडिया, अल्झा, चॅन.कॉम, बिटकॉइनकॉफी.कॉम, ब्लूमबर्ग.कॉम अशा बऱ्याच संस्था बिटकॉइन्स हे माध्यम वापरत आहेत.
कायदेविषयक ः बिटकॉइनवर भारतामध्ये सुरुवातीला कोणतेही निर्बंध नव्हते. मात्र, या आभासी चलनाचा गैरवापर पाहता रिझर्व्ह बॅंकेनं तिच्यावर आता बरेचसे निर्बंध आणलेले आहेत. अर्जेंटिना आणि रशिया या देशांचा अपवाद वगळता बाकी देशांमध्ये वापरास बंदी नाही. थायलंडमध्ये बिटकॉइन्स एक्सचेसाठी अधिकृत परवाना असणं अनिवार्य आहे.
उपलब्धता/स्कोप ः कोणतेही कार्ड न वापरता व्यवहार करणं हे बिटकॉइन्समुळं शक्य झालं.
खर्चिक गोष्टींचं निवारण ः ‘व्हर्चुअल मनी अर्थात व्हर्चुअल पेमेंट सिस्टिममुळे’ कागदी नोटांच्या स्वरूपात असणारं चलन एका नवीन रूपात बदलेल. यामुळं नोटा प्रिंट करण्यासाठी लागणारे विशिष्ट तंत्रज्ञान, येणारा खर्च, गुणवत्ताप्राप्त मनुष्यबळ यांची गरज फार कमी स्वरूपात लागेल.
बिटकॉइनचे तोटे
बिटकॉइन या चलनावर कोणतंही नियंत्रण नसणं ही त्याची एक मर्यादाही बनते आहे. या बिटकॉइनवर भारतात रिझर्व्ह बॅंकेनं आता बरेचसे निर्बंध आणलेले आहेत, त्याच्यामागं तोच हेतू आहे. गॅम्बलिंग, हॅकिंग अशा गोष्टींसाठी अनधिकृत युजर्स बेकायदेशीरदृष्ट्या बिटकॉइन्सचा व्यवहार, वापर करू शकतील, किंवा करत आहेत, असा संशय आहे. भारतात रिझर्व्ह बॅंकेनं त्याबाबत नकारात्मक भूमिका घेतली आहे ती त्यामुळंच. नुकतंच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही ‘क्रिप्टोकरन्सी’चे व्यवहार स्वतःच्या जबाबदारीवर करावेत, असं संसदेत स्पष्ट केलं आहे. बिटकॉइन्सकडं एक गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बरेच जण पाहत आहेत. अचानक वाढणारा दर या गोष्टीमुळं अनेक जण त्याच्याकडं खेचले जात आहेत. काही जण कुंपणावर आहेत आणि परताव्याच्या लोभानं या चलनाकडं बघत आहेत. मात्र, तूर्तास गुंतवणूक पर्याय म्हणून त्याच्यात बरीच जोखीम आहे. कारण त्याचं मूल्य विशिष्ट काळात प्रचंड वाढत असलं, तरी ते तितक्याच प्रमाणात खालीही येत असतं. त्यामुळं सर्वसामान्य गुंतवणूकदार जाळ्यात अडकू शकतात.
रॅन्समवेअरशी संबंध ः काही महिन्यांपूर्वी रॅन्समवेअर या संगणकीय व्हायरसमुळे जगभरातील संगणकीय व्यवस्था बिघडली गेली होती. हे कृत्य करणाऱ्या हॅकर्सनी बिटकॉइन्सच्या माध्यमातून पैसे कमावले होते. या घटनेनंतरच बिटकॉइन्स फारच चर्चेत आली. ज्या लोकांनी सर्वसाधारणतः २०१० ते २०१४ दरम्यान गुंतवणूक केली आहे, त्यांना सध्या ‘अच्छे दिन’ आहेत, हे खरं असलं, तरी नवीन स्वरूपाची गुंतवणूक फार घातकी आहे. नवीन बदल, फोर्क यामुळं नक्कीच बिटकॉईन्सचा दर कमी होईल. म्हणून बिटकॉईन्सकडे ‘एक गुंतवणूक पर्याय’ म्हणून न पाहता एक ‘व्यापारवाढीचं नवं ऑनलाइन/व्हर्चुअल चलन’ म्हणून पाहणं गरजेचं आणि फायद्याचं ठरेल. बिटकॉइन्सच्या अधिकृत संकेतस्थळानं ‘तुम्ही बिटकॉइनमुळं किंवा नवीन तंत्रज्ञानामुळं श्रीमंत होण्याची अपेक्षा ठेवू नका. बिटकॉइनचा दर गेल्या काही वर्षांत वाढला असला, तरी तो असाच वाढत राहील, अशी कोणतीही शास्वती नाही,’ असं स्पष्ट केलं आहे. तेही लक्षात ठेवायला हवं
वित्तीय आणि तंत्रज्ञान अभ्यासमर्यादा ः काही संस्था, व्यक्ती बिटकॉइन्स वापरण्यास मज्जाव करत आहेत. अपुरी माहिती आणि विश्वासार्हतेचा प्रश्न या मुख्य कारणांमुळे बहुतांश लोक या वॉलेटच्या वापरापासून दूर आहेत, असं दिसतं.
व्यक्तिगत/आर्थिक माहिती गोपनीयता : प्रत्येक बिटकॉइन्सच्या युजरनं आपली स्वतःची व्यक्तिगत/आर्थिक माहिती अथवा ओळख लपवणं हे थोडं जिकिरीचं काम आहे. शैक्षणिकदृष्ट्या हे लोक तत्पर हवेत. सुरक्षिततेबद्दल योग्य ती जिज्ञासा हवी.
मनुष्यबळावर येणारं संकट : बिटकॉइन्स, व्हर्चुअल कार्डस यांची वेगवान वाढ पाहता भविष्यामध्ये मनुष्यबळावर याचा विपरीत परिणाम होणारच हे निश्चित आहे. आर्थिक व्यवहार हे संगणकीकृत होणं, किंवा या संगणकप्रणाली महत्त्वाचे निर्णय घेण्यास कार्यक्षम असणं या गोष्टींमुळं २०३०पर्यंत हे बदल स्पष्ट दिसू लागतील. त्यामुळं वेळीच जागृत राहून त्याप्रमाणं अधिक माहिती मिळवून व्यक्तिगत विकास करणं हे शहाणपणाचं लक्षण ठरेल.
भविष्य नक्की कसं?
बिटकॉइन ही पेमेंट प्रणाली ‘एक आधुनिक पेमेंट हस्तांतर’ पर्याय म्हणून वापरण्यास हरकत नाही. तिच्याकडं गुंतवणूक म्हणून न बघता, योग्य असा वापर करणं हा आजच्या काळात शहाणपणाचा निर्णय. मात्र, एकूणच पुढच्या सात-आठ वर्षांत नव्यानं उदयास येणाऱ्या पेमेंट सिस्टिम्स या अशाच काही स्वरूपाच्या असतील, हे नक्की. वित्तीय कायदे, सरकारचे निर्णय आणि नियम या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या पेमेंट सिस्टिम्स वापराव्यात आणि त्यांच्यामुळं तोटा करून न घेता त्यांचा सुयोग्य वापर करावा, हीच गोष्ट सर्वांत महत्त्वाची.
बिटकॉइनचं मूल्य
(अमेरिकी डॉलरमध्ये)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.