disabled person doing business motivation story of pravin navale Sakal
सप्तरंग

दिव्यांगातलं दिव्यत्व

सकाळ वृत्तसेवा

प्रा.विशाल गरड

व्याख्यानाच्या निमित्तानं काही दिवसांपूर्वी मी कांदलगावला गेलो होतो. व्याख्यानाला थोडा अवधी असल्यानं आयोजकांसोबत गावातील चौकात असलेल्या एका छोट्याशा टपरीवर पाण्याची बाटली घेण्यासाठी गेलो असता त्या दुकानदाराला बघून मी क्षणभर अचंबित झालो.

कारण एक दिव्यांग युवक त्या दुकानाचा मालक होता. त्याच्या टपरीवजा दुकानात जनरल स्टोअरसह शीतपेयं देखील होती. पण त्याच्या समोरचा लॅपटॉप आणि प्रिंटर पाहून मात्र मला प्रश्न पडला, की त्याच्या दोन्ही हातात अपंगत्व असताना तो ऑनलाइन कामं कशी करत असेल ?

मग मी त्याच्या दुकानात जाऊन त्याची विचारपूस केली. सर्वांत प्रथम मी त्याला लिहायला लावलं. फ्रीजरवरची वही घेऊन त्यातला पेन दोन्ही हातांनी पकडून त्यानं कागदावर सुंदर हस्ताक्षरात स्वतःचं नाव इंग्रजीत लिहिलं. त्याचं हे कौशल्य पाहून मला आश्चर्य वाटलं.

एवढ्यात कार्यक्रमाची वेळ झाल्यानं मी दुकानदाराला नंतर येतो म्हणून निघून गेलो. व्याख्यानाआधी सूत्रसंचालक माझी ओळख करून देत असताना शेजारी बसलेले सरपंच प्रदीप नवले यांच्याशी मी त्या दिव्यांग मुलाबद्दल विचारपूस केली, तेव्हा त्यांच्याकडून समजलं, त्याचं नाव प्रवीण नवले आहे.

ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर जर काय टाईप करून हवं असेल तर प्रवीण ते काम लगेच करून देतो. अपंगत्वावर मात करीत त्यानं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. गेल्या सहासात वर्षांपासून तो खूप प्रामाणिकपणे व्यवसाय करतोय.

गावकऱ्यांचीही त्याला साथ असते. व्याख्यानानंतर आपण त्याला भेटू असं सांगून मी बोलण्यासाठी उभा राहिलो. ‘तरुणाईसमोरील आव्हाने’ हा विषय मांडताना व्याख्यानाची सुरुवातच प्रवीणचं उदाहरण देऊन केली. पुढं व्याख्यान संपल्यावर मला प्रवीणची स्टोरी ऐकून घ्यायची जिज्ञासा असल्यानं मी सरपंचाला घेऊन प्रवीणच्या दुकानात गेलो.

प्रवीणला बोलता येत नव्हते. मी विचारलेल्या प्रश्नाला तो लिहून उत्तर द्यायचा. त्याचा काहीसा भूतकाळ मला सरपंचांनी सांगितला. तो लहानपणापासून हुशार विद्यार्थी होता पण पाचवीत असताना त्याचा ताप मेंदूपर्यंत गेल्यानं त्याला अपंगत्व आलं.

दोन्ही हात आणि तोंड वाकडं झाल्यानं स्वतःच्या हातांनी त्याला जेवता येत नाही. अपंगत्व आल्यापासून प्रवीणच्या लहान बहिणीनं त्याला खाऊ घातलं. तिच्या लग्नानंतर आता आई त्याला रोज भरवते. बहीण आणि आई या दोन स्त्रियांचं प्रवीणच्या आयुष्यात मोठं योगदान आहे.

कुठं बाजार करायचा असेल तर प्रवीण त्याच्या भावाला गाडीवर सोबत घेऊन जातो. गिऱ्हाईक बोललेलं त्याला सर्व समजतं. गावकऱ्यांनाही आता त्याची सवय झाल्यानं व्यवहार करताना काही अडचण येत नाही. आधार कार्ड, पॅन कार्ड, परीक्षा फॉर्म, ऑनलाइन उतारे आणि पीक विमा अशी अनेक कामं तो लीलया पार पाडतो.

सुरुवातीपासूनच उपचारावर बराच खर्च झाल्यानं प्रवीणला उद्योग सुरू करायला पैसे नव्हते. मग गावातील काही मित्रांनी मिळून सुरू केलेली सत्तर हजारांची भिशी उचलून त्यानं स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सध्या तो दुकान सांभाळत सांभाळत घरची शेतीही संभाळतो. यातूनही वेळ काढून तो शेअरबाजारासंबधीही काम करतो.

ज्याच्या आजारपणात डॉक्टरांनी तो संपला म्हणून सोडून दिलं, ‘‘याला आता घरी घेऊन जावा,’’ असं म्हटलं, तोच प्रवीण त्याच्या अपंगत्वावर मात करून घराचा आधार बनलाय, हे हातपाय धडधाकट असून फक्त आईबापाच्या जिवावर भाकरी मोडणाऱ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन आहे.

पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट मिळवूनही बेरोजगार असलेल्या तरुणांनी प्रवीणकडं पाहून काहीतरी शिकायला हवे. नशिबाला दोष देत रडत बसण्यापेक्षा आपल्याकडे आहे त्या कौशल्यावर काही ना काही करणारा, प्रयत्नात सातत्य ठेवणारा एक दिवस नक्की जिंकतोच.

प्रवीणच्या भूतकाळात आणि भविष्यकाळात किती मोठं दुःख दडलंय याची आपण कल्पना करू शकत नाहीत पण याही परिस्थितीत तो आजचा दिवस हसत हसत आनंदात जगतोय. त्याला त्याच्या दिसण्याची अजिबात चिंता नाही, कारण निव्वळ आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्या तरुणांपेक्षा त्याचं कर्तृत्व कैकपटीनं सुंदरच आहे.

एकीकडं धडधाकट शरीर संपत्ती असणारे युवक बेरोजगारीच्या नैराश्येत येऊन आत्महत्या करीत आहेत तर दुसरीकडं पोटात अन्नाचा घास सारायला सुद्धा ज्याला संघर्ष करावा लागतो, ते प्रवीणसारखे युवक कुटुंबाला हातभार लावत आहेत.

सध्याच्या पोरांकडं शिक्षण, पालकांचं आर्थिक पाठबळ, शारीरिक तंदुरुस्ती असतानाही तारुण्याचा सुवर्णकाळ ते व्यसनात वाया घालवत आहेत. शेकडो कारणं सांगत जबाबदारीतून पळ काढणाऱ्या रिकामटेकड्या युवकांसाठी प्रवीण एक प्रेरणा आहे.

युवकांनो, काळाची वेळ वेळीच ओळखून घ्या, समाजानं तुमच्यावर कर्तृत्वाच्या अपंगत्वाचा शिक्का मारण्याआधीच कुटुंबाचा आधार बना, बघा तोच समाज तुमचा सन्मान करायला लागेल. अपंगत्व खुंटीला टांगून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर शारीरिक अपंगत्व असतानाही घराला आर्थिक आधार देण्याची हिंमत ठेवणाऱ्या प्रवीणला माझा सलाम.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि पीकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dasara Melava Rally: प्रचार तोफांची आज पहिली सलामी; जाणून घ्या कोणत्या नेत्याचा कुठं होणार दसरा मेळावा

Bagmati Express Accident: मोठा रेल्वे अपघात! वेग 75 किमी, बागमती एक्स्प्रेस मुख्य मार्गाऐवजी लूप लाइनमध्ये घुसली; 19 प्रवासी जखमी

Dussehra Melava 2024 Live Updates: विजयादशमीनिमित्त माँ कामाख्या देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

अग्रलेख : अपने अपने रावण!

Dussehra 2024 Wishes: 'वाईटावर चांगल्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय..' दसऱ्याच्या प्रियजनांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

SCROLL FOR NEXT