vijay tendulkar sakal
सप्तरंग

मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध!

सामाजिक आणि वैयक्तिक अस्वस्थता अन् त्यातून आकाराला आलेले मानवी संबंध हा विजय तेंडुलकर यांच्या लेखनाचा विषय. १९ मे रोजी त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा...

अवतरण टीम

- डॉ. वंदना महाजन

सामाजिक आणि वैयक्तिक अस्वस्थता अन् त्यातून आकाराला आलेले मानवी संबंध हा विजय तेंडुलकर यांच्या लेखनाचा विषय. १९ मे रोजी त्यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा...

लेखक लिहितो म्हणजे नेमके काय करतो? लेखकाचा अनुभव आणि त्याच्या आधारे त्याची तयार झालेली जीवनदृष्टी, त्याची समज तसेच त्याची अभिव्यक्त होण्याची गरज यानुसार लेखकाच्या लेखकीय व्यक्तिमत्त्वाची पोत ठरत असते. लेखकाचे जगाविषयीचे आकलन आणि त्याची माणूस म्हणून अभिव्यक्त होण्याची गरज यातून तो लिहिण्यास प्रवृत्त होत असतो.

यात लेखक ज्या काळात जगत असतो, त्या काळाचा मोठा वाटा असतो. त्यांचा भवताल जे प्रश्न निर्माण करत असतो, त्या प्रश्नांची गुंतागुंत चांगल्या लेखकाला लिहिण्यासाठी प्रवृत्त करीत असते. विजय तेंडुलकर या पठडीतले लेखक आहेत. आपल्या भवतालाची मुळे उकलत जाणे ही लेखक म्हणून त्यांची गरज आहे. सामाजिक आणि वैयक्तिक अस्वस्थता अन् त्यातून आकाराला आलेले मानवी संबंध हा त्यांच्या लेखनाचा विषय आहे.

विजय तेंडुलकर यांचा जन्म १९२८ मध्ये मुंबईत झाला. मृत्यू १९ मे २००८ मध्ये पुण्यात झाला. स्वातंत्र्योत्तर काळात १९५० च्या आसपास त्यांचे सर्जनशील लेखन सुरू झाले. वृत्तपत्रासाठी लेखन आणि संपादन करताना त्यांना त्यांचा लेखकीय अवकाश आकळत गेला. कोवळी उन्हे, रातराणी, फुगे साबणाचे यांसारख्या ललितगद्य वृत्तपत्रीय लेखनातून आकाराला आले. काचपात्रे, मेषपात्रे, द्वंद्व, हे सर्व कोठून येते? यांसारखी उल्लेखनीय व्यक्तिचित्रे यातूनच निर्माण झाली.

विजय तेंडुलकरांनी अनेक साहित्यप्रकार हाताळले. ललित लेखनाबरोबरच कथा, कादंबरी, पटकथा लेखन, अनुवाद या सर्वच क्षेत्रांमध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. तरीही त्यांची सर्वंकष प्रतिभा त्यांनी नाट्यनिर्मितीसाठी वापरली. ‘गृहस्थ’ हे तेंडुलकरांचे पाहिले नाटक. १९६४ मध्ये त्यांनी या नाटकाचे ‘कावळ्याची शाळा’ या नावाने पुनर्लेखन केले.

‘श्रीमंत’, ‘माणूस नावाचे बेट’ ते ‘सखाराम बाईंडर’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘शांतता! कोर्ट चालू आहे’... इथपर्यंत त्यांचा प्रवास केवळ मराठीच नव्हे; तर भारतीय नाट्य परंपरेला सर्वार्थाने समृद्ध करणारा होता. नाटक आणि एकांकिका हे दोन्ही प्रकार तेंडुलकरांनी सारख्याच समर्थपणे हाताळले. नभोवाणीसाठी त्यांनी ‘रात्र’ ही एकांकिका लिहिली.

त्यांच्या ‘अजगर आणि गंधर्व’, ‘भेकड’ आणि इतर एकांकिका प्रसिद्ध आहेत. बालरंगभूमीसाठी त्यांनी लिहिलेली बालनाट्ये, तसेच टेनेसी विल्यम्स, गिरीश कर्नाड, मोहन राकेश यांच्या नाटकांचे केलेले भाषांतर असा तेंडुलकरी नाट्यलेखनाचा प्रदीर्घ आवाका राहिलेला आहे.

स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांच्या काळात तेंडुलकरांनी सातत्याने लेखणी चालवली आहे. हा काळ अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रश्नांच्या गुंतागुंतीचा आहे. समाजवादी प्रभाव असलेला हा काळ माणसाच्या व्यक्तिस्वातंत्र्याविषयी अनेक नवीन प्रश्न निर्माण करणारा आहे. स्त्री-पुरुष नातेसंबंधांचे नवे आकलन या काळात जोरकसपणे पुढे आले. त्यातून कौटुंबिक आणि सामाजिक संघर्षाचे नवे प्रश्न पुढे आले.

तरीही स्त्रियांकडे बघण्याच्या पारंपरिक दृष्टिकोनात फारसा फरक पडला नाही. या काळातील लेखक आपापल्या पद्धतीने या वास्तवाला मांडण्याचा प्रयत्न करत होते. या काळाच्या आसपास निर्माण झालेल्या नवसाहित्याने मानवी मनाची उकल करीत पारंपरिक साहित्यिक संकेतांना झुगारून देण्याचा प्रयत्न चालवला होता. नाटक या साहित्य प्रकारातून मात्र असे प्रयत्न क्षीण स्वरूपातच झाले.

या काळात विजय तेंडुलकरांनी मात्र साहित्यविषयक प्रामुख्याने नाट्यविषयक जे पारंपरिक संकेत निर्माण झाले होते ते सर्व झुगारून दिले. स्वातंत्र्योत्तर काळात एकीकडे लोकशाहीचा स्वीकार, तर दुसरीकडे निर्माण झालेल्या मध्यमवर्गीय जाणिवा, राजकारणाचा बिघडत गेलेला स्तर यातून सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली दांभिकता हे विजय तेंडुलकर यांच्या चिंतनाचे विषय दिसतात.

मानवी मनातील हिंस्रता त्यांनी ज्या पद्धतीने नाटकासारख्या सादरीकरण प्रधान साहित्य प्रकारातून मांडली. त्यामुळे मराठी नाट्यसृष्टीला तर हादरे बसलेच; पण प्रेक्षकांची अभिरुची बदलण्यासाठी यांचा खूप मोठा उपयोग झाला. नाटक हे मानवी संबंधाच्या, माणसाच्या बऱ्यावाईट इच्छा-आकांक्षाचा शोध प्रभावीपणे घेण्याचे माध्यम आहे, हे तेंडुलकरांनी सिद्ध करून दाखवले. पण हा शोध घेताना माणूस आणि समाज यांचे अपरिहार्य संबंध विलग झाले नाहीत.

माणसाची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक परिस्थिती त्याच्यावर सातत्याने आघात करते. या आघातांना प्रतिसाद देताना माणसे कोलमडून पडतात किंवा हिंसक होतात. माणसाचे हे हिंसक रूप तेंडुलकरांनी अपार मायेने रेखाटले. यात त्यांच्यातील नाटककार यशस्वी झाला, मोठा ठरला.

तेंडुलकर कोणत्याही विचारधारेचा प्रभाव मान्य करत नसले तरी सगळ्याच विचारधारांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम ज्या समाजावर, पर्यायाने माणसांवर झाला त्या माणसांच्या अंतर्मनाचा ठाव घेणे, हे त्यांच्या नाट्यलेखनाचे प्रमुख प्रयोजन दिसते. सांस्कृतिक मुलाम्याच्या खाली जगणाऱ्या माणसांच्या आजूबाजूची सगळी आवरणे बाजूला करून माणसांची शारीरिक, वैचारिक नग्नता तेंडुलकरांनी तपासली.

त्यातून समोर आलेल्या मानवी मनातील हिंस्रतेला, अमानुषतेला त्यांनी नाट्यरूप दिले. सिग्मंड फ्रॉईड यांनी माणसांच्या अंतर्मनाविषयी मांडणी करताना त्यातील हिंस्रतेची मांडणी केली आहे. तेंडुलकर नाटकासारख्या लोकप्रिय माध्यमातून या हिंसेला भिडतात.

लेखक जे विशिष्ट फॉर्म हाताळतो त्यावर त्याची पकड असणे आवश्यकच असते. नाटक या आकृतीबंधावर तेंडुलकरांची केवळ पकडच नाही तर हुकूमत असलेली दिसते. कदाचित त्यांनी साहित्याचे इतर फॉर्म वापरून मानवी मनातील विकृती, हिंस्रता, लैंगिकता, स्त्री-पुरुष संबंधांविषयी माणसाची समज याचा तळ जो त्यांनी नाटकात गाठला, तो गाठणे त्यांना शक्य झाले नसते.

तेंडुलकरांनी सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, आक्रोश, अर्धसत्य इत्यादी चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या. या पटकथादेखील माणसाच्या अंतर्मनाचा शोध घेणाऱ्या आहेत. काळे, पांढरे या दोन पद्धतीने मानवी संबंधांचे चित्रण करणे तेंडुलकरांनी नाकारले. मानवी संबंधांमध्ये जी गुंतागुंत असते ती माणसाच्या व्यक्तिमत्त्वातही असते. बाह्य संघर्षाबरोबरच माणसाचा आंतरिक संघर्ष सुरू असतो. या अंतर्गत संघर्षाची अनेक रूपे तेंडुलकरांच्या नाटकांमधून पुढे आली.

‘घाशीराम कोतवाल’ हे नाटक अनेक कारणांनी विवादास्पद ठरले. हे नाटक राजकीय आहे की अराजकीय याविषयी चर्चा रंगली. याविषयी मत व्यक्त करताना तेंडुलकरांनी म्हटले आहे, ‘नाना फडणीस आणि घाशीराम कोतवाल यांचे कालातीत संबंध दाखविणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट होते.’ प्रत्येक काळातील सामाजिक परिस्थितीत नाना आणि घाशीराम अशी माणसे असतात, विशिष्ट सामाजिक परिस्थितीत ही माणसे तयार होतात.

यात मानवी सत्तासंबंध आपली विशिष्ट भूमिका बजावत असते. सत्तासंबंध केवळ राजकीय नसतात तर ते सामाजिक, सांस्कृतिक आणि कुटुंबातदेखील असतात, याचे अत्यंत सखोल भान तेंडुलकरांच्या नाटकांमधून समोर येते. सत्ता संघर्षाचे बीज असते. यातून माणसे टोकाचे स्वार्थलोलुप होतात आणि त्यांचे हिंस्र रूप बाहेर येते. सत्तेसाठी दहशत आवश्यक असते, त्यासाठी हिंसेची मदत घेतली जाते.

घाशीराम कोतवाल विशिष्ट राजकीय परिस्थितीत उभा राहत असला तरी बदलत्या काळात आणि परिस्थितीत असे अनेक घाशीराम निर्माण होतात. याचे अचूक भान तेंडुलकरांना होते. याअर्थाने काळाच्या पुढे बघणारी दृष्टी हा तेंडुलकरांच्या नाटकांचा स्थायीभाव आहे. सामाजिक आणि वैयक्तिक स्खलनशीलतेचे रूप त्यांच्या नाटकांमधून पुढे आले.

‘शांतता! कोर्ट चालू आहे’, ‘सखाराम बाईंडर’, ‘कमला’ या नाटकांमधील पात्रांचा वेध घेतला म्हणजे सामाजिक वास्तवतेत स्त्री-पुरुष संबंधांची चिरफाड समोर येते. अनेक गोंडस रूपे देऊन या नात्याला व्यवस्थेने गोंजारले आहे, पण यात बाई ही भोगवस्तू आहे, गुलाम आहे, हेच वास्तव आहे.

पुरुषांच्या लेखी बाई त्यांच्या लैंगिक इच्छापूर्तीचे साधन असले तरी बाईच्याही लैंगिक इच्छा असतात आणि त्या पूर्ण करण्याचा तिला अधिकार आहे, हे ‘सखाराम बाईंडर’मधील चंपाद्वारे तेंडुलकरांनी आक्रमकपणे मांडले आहे. कधी समाज परिस्थितीला शरण जात तर कधी या परिस्थितीला आव्हान देत त्यांची स्त्री पात्रे उभी राहतात. कमला, लक्ष्मी, सरिता, चंपा, बेणारेबाई ही तेंडुलकरांची उल्लेखनीय स्त्री पात्रे आहेत.

व्यवस्थेविषयीची अपार समज या स्त्रियांना उपजतच आहे. स्त्री-पुरुषांचे लैंगिक संबंध हे हिंसाप्रधान असतात. त्यात अनेकदा स्त्रियांचा बळी घेतला जातो, हे तेंडुलकरांनी मांडले. त्याचबरोबर हिंसा केवळ शारीरिक नसते; तर ती मानसिकही असते. मानसिक हिंसेचा नकारात्मक प्रभाव माणसांच्या व्यक्तिमत्त्वावर पडतो, हे मराठी नाटकातून तेंडुलकरांनी प्रथमच प्रभावीपणे मांडले.

शेवटी तेंडुलकर म्हणतात त्याप्रमाणे लेखक असणे सहावे बोट असण्यासारखे आहे. हा दुःखशोधाचा प्रवास विजय तेंडुलकर यांनी विनातक्रार केला. त्यातून त्यांच्या नाट्यशैलीची आणि नाट्यभाषेची जडणघडण झाली. मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध घेताना त्यांनी नाट्यभाषेला नवे रूप दिले.

अलंकारविहीन थेट भाषा यातून निर्माण झाली. आपण विचारप्रवाहांपासून दूर आहोत, असे म्हणत तेंडुलकरांनी आपल्या सर्व सर्जनशील साहित्यनिर्मितीतून आपली वेगळी विचारधारा निर्माण केली. ही विचारधारा केवळ मराठीच नव्हे; तर भारतीय नाटकांसाठी आजही दिशादर्शक आहे.

dr.vandanamahajan@gmail.com

(लेखिका मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

SCROLL FOR NEXT