Discovery of the Grand Harbor sakal
सप्तरंग

शोध भव्य बंदराचा...

पानिपतच्या रणांगणावर भारतातील तत्कालीन सर्वांत प्रभावशाली राजसत्ता असलेल्या मराठ्यांमध्ये आणि अहमदशाह अब्दालीच्या सैन्यामध्ये झालेल्या युद्धात भयंकर नरसंहार घडला.

सकाळ वृत्तसेवा

- केतन पुरी, ketan.author@gmail.com

इसवी सन १७६१. भारतात फार मोठी राजकीय उलथापालथ झाली होती. पानिपतच्या रणांगणावर भारतातील तत्कालीन सर्वांत प्रभावशाली राजसत्ता असलेल्या मराठ्यांमध्ये आणि अहमदशाह अब्दालीच्या सैन्यामध्ये झालेल्या युद्धात भयंकर नरसंहार घडला. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न विसरता येणारी भीषण घटना त्या दिवशी घडली होती.

उत्तर भारतात ही घटना घडत असताना दक्षिणेत मात्र वेगळ्याच क्रांतीसाठी धडपड सुरू होती. जीन बाप्टिस्ट ले जेंटिल नामक फ्रेंच व्यक्ती भारताच्या पूर्व किनाऱ्यावर येऊन थांबला होता. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या अतिमहत्त्वाकांक्षी प्रोजेक्टचा भाग म्हणून ले जेंटिल भारतात आला होता. एडमंड हॅली या खगोलशास्त्रज्ञानं एक भाकीत केलं होतं.

शुक्र ग्रह सूर्य आणि पृथ्वीच्या बरोबर मधोमध येणार होता आणि या घटनेमुळं सूर्य आणि पृथ्वीचं प्रमाण अंतर मोजता येण्याची संधी होती. त्यानं जगभरात जवळपास शंभरपेक्षा जास्त शास्त्रज्ञ या घटनेचं निरीक्षण करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले. याचाच भाग म्हणून ले जेंटिल याला फ्रेंच अकॅडमी ऑफ सायन्स मार्फत पुद्दुचेरीला पाठवलं.

मार्च १७६१ मध्ये तो जहाजानं निघाला. कसाबसा मे महिन्याच्या सुमारास तो भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ आला पण कॅप्टनला कळलं, की ब्रिटिशांनी पाँडिचेरी काबीज केलं आहे. निराश झालेल्या ले जेंटिलला फ्रान्सला परतावं लागलं. दुसऱ्यांदा त्यानं मिळालेल्या संधीचा वापर करण्याचं ठरवले. १७६८ मध्ये २७ मार्चला त्यांचं पाँडिचेरी इथं आगमन झाल्यावर गव्हर्नरनं त्यांचे भव्य स्वागत केले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या वेधशाळेसाठी जागा निवडण्यासाठी आमंत्रित केलं.

दरम्यानच्या काळात फ्रेंचांनी पुन्हा एकदा पुद्दुचेरीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. संक्रमणाच्या आदल्या दिवशी आकाश निरभ्र होते. ले जेंटिल आणि गव्हर्नर उपग्रह पाहण्यास ठरवलेल्या जागेवर पोचले. संक्रमणाचं निरीक्षण करण्यासाठी सर्व काही अनुकूल दिसलं. पण रात्री, आकाश ढगाळलेलं पाहून ले जेंटिलला निराशा वाटली. दुसऱ्या दिवशी सकाळी, दाट ढगांनी वादळ आणलं आणि ले जेंटिलच्या दुर्बिणीचा काहीही उपयोग झाला नाही.

उदास ले जेंटिल आजारी पडला आणि यामुळं त्याच्या घरी जाण्यास विलंब झाला. याच काळात पुद्दुचेरीजवळील अरियानकुप्पम नदीकाठी एका जुन्या वस्तीचे अवशेष असल्याचं ले जेंटिलच्या लक्षात आलं. त्याला मोठ्या विटा, उद्ध्वस्त भिंती आणि जुन्या विहिरींचे अवशेष दिसले आणि त्याला खात्री पटली की हे एखाद्या मोठ्या प्राचीन गावाचे किंवा अगदी एखाद्या शहराचे अवशेष आहेत.

या गोष्टीचा त्यानं सविस्तर रिपोर्ट बनवला. त्यावर चर्चा होऊ लागली, संशोधन होऊ लागलं. पण त्या ऐतिहासिक जागेवर पहिलं संशोधनात्मक कार्य सुरू होण्यासाठी तब्बल दोनशे वर्षांचा कालावधी जावा लागला. वर्ष १९४० मध्ये फ्रेंच पुरातत्त्व अभ्यासकांनी या जागेवर उत्खनन केलं आणि त्यांना सापडलं एक अतिश्रीमंत शहर.. अरिकमेडू..!

पहिल्या शतकाच्या आसपास लिहिलेल्या ‘पेरिप्लस ऑफ एरिथरियन सी’ या प्राचीन ग्रंथामध्ये अरिकमेडू शहराचा उल्लेख आहे. संगम काळातील तमिळ कवितांमध्ये यवनांना परदेशी, मुख्यतः ग्रीक, रोमन आणि पश्चिम आशियाई असं ज्यांना संबोधलं गेलं, जे उत्तम दिवे, सोने आणि वाइन यांसारख्या वस्तू घेऊन आले होते. जेव्हा पहिल्यांदा या जागेवर उत्खनन करण्यात आले, तेव्हा या शहराचा जगासोबत असलेला व्यापारी संबंध आणि प्राचीन शहर म्हणून त्याचं महत्त्व अभ्यासकांनी समोर आणलं.

पुढं, अयप्पन यांनी पुरातत्त्वीय मॅपिंग आणि इतर पद्धतीनं या जागेचा संशोधकीय अहवाल तयार केला. ज्याआधारे, या जागेवर भव्य व्यापारी बंदर असल्याची माहिती उजेडात आली. सन १९४० ते १९५० दरम्यान, आणि नंतर पुन्हा सन १९८८ ते १९९२ दरम्यान, सहा हंगामांसाठी अरिकमेडूचे उत्खनन करण्यात आलं. या सर्व उत्खननामधून प्रचंड माहिती उपलब्ध झाली.

सीझरच्या काळात या प्रदेशात ग्रीक, रोमन व्यापारी आपला माल घेऊन येत असत. त्यामध्ये भरपूर प्रमाणात वाइन, सोने, विविध मण्यांपासून तयार केलेले दागिने, काचेच्या वस्तू अशा अनेक गोष्टींचा समावेश होता. तसेच, इथे सापडलेल्या काही खापरी भांड्यांना त्यांच्या वैशिष्ट्यामुळे ‘अरिकमेडू टाईप १’ असं नाव देण्यात आले आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान सुद्धा इथं वैज्ञानिक पद्धतीनं उत्खनन होत राहिलं.

रोममध्ये इसवी सनाच्या पहिल्या शतकात तयार करण्यात आलेलं मातीचं भांडं, मणी, दागदागिने, काचेचे दिवे, जेवणासाठी तयार करण्यात आलेलं भांडं अशा अनेक वस्तू सापडल्या आहेत. यावरून इसवी सन पूर्व पहिल्या शतकापासून ते इसवी सनाच्या दुसऱ्या शतकापर्यंत या जागेवर व्यापारी येत होते, विविध वस्तूंची देवाणघेवाण होत होती आणि जगासोबत भारताचे आर्थिक संबंध प्रस्थापित होते याचा अभ्यासकांना शोध लागला.

या वैभवशाली शहराची आजची परिस्थिती मात्र विचित्र आहे. पुरातत्त्व विभागानं या जागेला संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे. २०१२ मध्ये आलेल्या एका चक्रीवादळात या जागेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तसेच, २००४ च्या त्सुनामी दरम्यान या पुरातत्त्वीय जागेचं आधीच मोठं नुकसान झालं होतं. ले जेंटिल यानं बघितलेले पांढऱ्या मातीचे ढिगारे आता नाहीसे झाले आहेत. स्थानिक लोकांनी सन १७५५ पासून इथल्या विटांचा वापर घराचे बांधकाम करण्यासाठी केला होता. मागील तीनशे वर्षांत या जागेचे बऱ्यापैकी नुकसान झाले आहे.

भौगोलिक बदलामुळंसुद्धा ही जागा ओस पडली आहे. अठराव्या शतकाच्या अखेरीस बांधलेली एक पडीक वास्तू सोडली तर आता या जागेवर फारसं काही पाहण्यासारखं राहिलेलं नाही. बाजूला असलेल्या खाडीचाही वापर होत नाही. पुद्दुचेरी शहरापासून अगदी चारएक किलोमीटर वर असलेल्या या अतिमहत्त्वाच्या पुरातत्त्वीय स्थळाला भेट देणारे पर्यटक सुद्धा फार कमी आहेत.

पण विशेष गोष्ट ही आहे, की एकीकडे उत्तर भारतात लढाई सुरू असताना दक्षिणेत सूर्य आणि पृथ्वीचे अंतर शोधण्यासाठी एक मोहीम सुरू होती. त्यातच, अपघातानं या शहराचा शोध लागला. आज या ठिकाणी उपलब्ध झालेल्या महत्त्वाच्या वस्तू पुद्दुचेरी येथील संग्रहालयात पर्यटकांना पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत. कधी पुद्दुचेरीला गेलात, तर या पुरातत्त्वीय स्थळाला भेट द्यायला विसरू नका.

(लेखक हे पुरातत्त्व विषयाचे अभ्यासक असून लोकसंस्कृती तसंच प्राचीन-मध्ययुगीन भारतीय इतिहास हेदेखील त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT