सप्तरंग

शाळांमध्ये नैतिकता व नीतिशास्त्र शिकवायला हवं

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या माझ्या धाकट्या मुलीच्या घरातून एक कॅमेरा, आयपॉड आणि काही रोख रक्कम अगदी अलीकडेच चोरीला गेली.

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या माझ्या धाकट्या मुलीच्या घरातून एक कॅमेरा, आयपॉड आणि काही रोख रक्कम अगदी अलीकडेच चोरीला गेली.

- डॉ. अनिल राजवंशी anilrajvanshi@gmail.com

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या माझ्या धाकट्या मुलीच्या घरातून एक कॅमेरा, आयपॉड आणि काही रोख रक्कम अगदी अलीकडेच चोरीला गेली. गावातल्या एका चांगल्या शाळेत आठवीत शिकणाऱ्या एका बारीक चणीच्या मुलाकडे संशयाची सुई वळली. तो जवळच राहायचा आणि माझी मुलगी नसताना आपल्या कुत्र्याला घेऊन बऱ्याचदा तिच्या घरी यायचा. त्याच्या कुत्र्याला माझ्या मुलीच्या कुत्र्याशी खेळायचं असे आणि घरातील मोलकरीण त्याला घरात घेऊन खेळू देई.

पोलिसांच्या सरबत्तीनंतर त्या मुलानं चोरी कबूल केली; पण त्यानंतर त्यानं जे सांगितलं ते ऐकून मात्र सगळेच हादरून गेले.

‘माझ्या वर्गातली बहुतेक सगळी मुलं नेहमीच अशा चोऱ्या करतात,’ असं त्यानं सांगितलं. ते सारेजण स्मार्ट फोन्स, कॅमेरे असली इलेक्ट्रॉनिक उपकरणं चोरत आणि लगेच गावातल्या दुकानदाराला विकून टाकत. हा जणू त्यांचा एक खेळच झाला होता. कुणी सगळ्यात भारी उपकरण चोरलं याबद्दलची चर्चाही त्यांच्यात रंगे. तिथल्या पोलिसानं या शाळकरी मुलांच्या आणखी काही धक्कादायक ‘करतूती’ही आम्हाला सांगितल्या. ही मुलं किरकोळ चोऱ्या तर करतच होती; पण दारूही पीत होती. गंभीर स्वरूपाची शारीरिक हिंसाही त्यांना वर्ज्य नव्हती.

असल्या गोष्टी केवळ ग्रामीण भागातील छोट्या गावांतच होतात असं मुळीच नाही. देशभर सगळीकडेच हे घडत आहे. आपल्या समाजात आपण ही कसली मुलं घडवत आहोत? हीच मुलं मोठी झाली की याहून मोठे गुन्हे करू लागतात. आणि, ध्यानात घ्या, ही मुलं आमच्या फलटणमधल्या एका नामवंत शाळेत शिकत होती.

या मुलाच्या तोंडून अगदी सहज स्वरात त्याच्या चोऱ्यांच्या ‘मर्दुमक्या’ ऐकताना मन विषण्ण होत होतं. अशा प्रकारचं वळण मुलांना लागू नये म्हणून शाळेत आपण कोणत्या प्रकारचं वातावरण निर्माण केलं पाहिजे असा विचार मी करू लागलो.

मला वाटतं, दिलेली माहिती (आणि बऱ्याचदा निरुपयोगी माहिती) मुलांना तोंडपाठ करायला लावण्याच्या शर्यतीच्या नादी लागून आपण नीतिशास्त्र आणि योग्य, नैतिक वर्तन मुलांच्या अंगी बाणवण्याची कला गमावून बसलोय.

आपल्या समाजाचं लक्ष्य आज संपत्ती, संचय आणि वस्तूंची वारेमाप खरेदी यावरच केंद्रित झालेलं आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनातही स्वाभाविकपणे त्याचंच प्रतिबिंब पडलेलं दिसतं.

मात्र, सर्वच विषयांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून नीतितत्त्वे आणि नैतिकता मुलांना शिकवली तर त्यांचा स्वभाव बदलायला आणि चारित्र्य घडवायला ते साह्यभूत ठरेल. मुलांबरोबर घालवायला सध्या फारच थोड्या पालकांकडे वेळ असल्यामुळे तर ही गोष्ट अधिकच आवश्यक ठरते. मुलांना शिकवणीवर्गांना पाठवलं किंवा रात्री उशिरापर्यंत आपण गृहपाठ करत बसलोय असं दाखवायचं नाटक त्यांनी केलं की बहुतेक पालकांना इतिकर्तव्यता वाटते. योग्य काय आणि अयोग्य काय यावर किंवा नीतितत्त्वांवर घरात क्वचितच चर्चा होते. मुलं मग आपल्या सवंगड्यांकडून असलं धक्कादायक वर्तन शिकत जातात.

आपण या मुलांना अधिक चांगलं वळण कसं लावू शकू? शिक्षण आनंददायी करणं हा त्यासाठीचा एक उपाय होय. आज त्याचं स्वरूप ‘घोकंपट्टी करा आणि परीक्षेतून सुटा’ असं झालं आहे. वर्गात शिकवताना आपण, मुलांना आवडतील अशा प्रत्यक्ष कृतीत आणि प्रयोगात गुंतवलं तर गुन्हेगारीकृत्यांचा विचार करायला त्यांच्याकडे फारसा वेळच उरणार नाही. रिकामं मन हेच तर सैतानाचं घर असतं!

जगभरातील काही श्रेष्ठ शाळांत मुलं थ्री-डी प्रिंटर्सवरून विविध गोष्टी तयार करतात. इतरही अनेक उपक्रम मुलांना दिले जातात. हे उपक्रम नुसते त्यांना गुंतवून ठेवत नाहीत, तर त्यामुळे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इतर विषयांतील शिक्षण आनंददायक पद्धतीनं त्यांना मिळतं. अमेरिकेत या शिक्षणपद्धतीला Maker Movement असं म्हटलं जातं. या उपक्रमांत मुलं दैनंदिन उपयोगाच्या विविध वस्तू तयार करतात आणि त्या तयार करता करता त्यामागील तत्त्वे आणि तंत्रज्ञान याबाबतचं भरपूर ज्ञान आत्मसात करतात.

अर्थात्, आपल्याकडे असं घडायचं तर त्यासाठी आपल्याला शिकवण्यावर प्रेम करणारे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याची आवड असणारे श्रेष्ठ दर्जाचे शिक्षक लागतील.

शिक्षकांना कितीही चांगला पगार दिला तरी श्रेष्ठ शिक्षक क्वचितच लाभतात. मला वाटतं, शिक्षक हे जन्मालाच यावे लागतात. जीवनाच्या विविध क्षेत्रांतून त्यांना हेरणं आणि शिक्षकी पेशात यायला प्रवृत्त करणं ही खरी कळीची गोष्ट आहे.

शिक्षकी पेशात असलेले बहुतांश लोक नोकरीकडे केवळ उपजीविकेचं साधन म्हणून पाहत असल्यानं इतर काहीच न करता निव्वळ ठरलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यावरच सगळं लक्ष केंद्रित करणं त्यांना सहज जमतं. यातूनच केवळ परीक्षेत उत्तीर्ण होण्यावरच भर देणाऱ्या व्यवस्थेचा अंमल सुरू होतो; परंतु आता थ्रीडी प्रिंटिंगचं नवनवं तंत्रज्ञान, रास्त किमतीत मिळणारं साहित्य, यूट्यूब वरील व्हिडिओज् यांच्या आधारे मुलांना, आनंद घेता येईल, शिकण्यात मजा वाटेल अशा पद्धतीनं शिकवणं शक्य झालं आहे.

माझी मुलगी फलटण इथल्या ‘कमला निंबकर बालभवन’ या शाळेत इंग्लिश आणि गणित शिकवते. सातवी-आठवीतल्या विद्यार्थ्यांना ती चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेतून इंग्लिश शिकवते. तिनं मुलांना छोट्या छोट्या दृश्यफिती तयार करायला शिकवलंय. या दृश्यफिती मग ती मुलं यूट्यूबवर टाकतात. अशा निर्मितीची त्यांना एवढी गोडी लागलीय की त्यासाठी विविध विषय, त्यांना साजेसं संगीत यांचा शोध घेत तासन् तास ती सारी इंटरनेटवर बसू लागली आहेत. निर्मितीचं हे वेड त्यांना सदैव मग्न ठेवू लागलंय. समाजमाध्यमांवर आता ते मुळीच चकाट्या पिटत बसत नाहीत.

भारतात दुसरी एक अडचण अशी आहे की, शिकवण्याची कितीही जबरदस्त इच्छा आणि उपजत क्षमता तुमच्याकडे असली तरी तुम्ही शिक्षक नाही होऊ शकत. त्यासाठी बीएड म्हणजे शिक्षणशास्त्रातील पदवीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक असतं; विशेषतः सरकारी अनुदानप्राप्त शाळांत तर त्याशिवाय चालतच नाही.

बीएड करणं काही मोठं कठीण काम नाही; पण हा शिक्षणक्रम अत्यंत कंटाळवाणा आणि भयानक वैतागवाणा असतो. चांगलं शिक्षक कसं व्हावं ही बाब तर सोडूनच द्या; कशाचंच फारसं ज्ञान त्यात दिलं जात नाही. प्राथमिक शाळेतील बऱ्याच शिक्षकांपाशी हीच पदवी असते. यावरून कोणत्या दर्जाचे शिक्षक आपण निर्माण करत आहोत याची कल्पना करता येईल. आणि, आपली सर्वाधिक लोकसंख्या जिथं राहते त्या ग्रामीण भागातील शाळांत हेच सगळे शिक्षक मुलांना शिकवत असतात.

मला वाटतं, शालेय व्यवस्थेतील नोकरशाहीचं वर्चस्व कमी करून आपण तिथं उपक्रमशीलता आणि सर्जनशीलता फुलू दिली पाहिजे. त्यामुळे समर्पित वृत्तीचे स्वयंप्रेरित शिक्षक अधिकाधिक प्रमाणात या क्षेत्राकडे आकृष्ट होऊ शकतील. नियमित अभ्यासक्रम शिकवण्याबरोबरच प्रत्येक विषयात नैतिकता आणि नीतिशास्त्र यांचा आपण समावेश करायला हवा. नैतिकतेवर (धर्मावर मुळीच नव्हे) असा सातत्यपूर्ण भर दिल्यामुळे मुलांच्या विचारशीलतेची गुणवत्ता वाढेल.

माझ्या शालेय जीवनात आम्हाला प्रत्येक वर्गात नीतिशास्त्राचा एक सक्तीचा अभ्यासक्रम असे. (आमची शाळा ही मिशनरी शाळा असल्यानं) त्यातील बरीचशी सामग्री ख्रिश्चन धर्माभिमुख असे खरी; पण माझ्या मनावर अमीट ठसा उमटवणारं त्यातलं एक पुस्तक मला आजही स्पष्ट आठवतं. All men are brothers - A portrait of Albert Schweitzer या नावाचं अल्बर्ट श्वाइट्झर या नोबेल पारितोषिकविजेत्या लेखकाचं चरित्र होतं ते. डॉ. श्वाईट्झर यांचं आफ्रिकेच्या जंगलातील जीवन आणि समर्पित वृत्तीनं गोरगरिबांवर उपचार करण्याचं त्यांचं निःस्वार्थ कार्य यांचा मोठाच प्रभाव माझ्या मनावर पडला होता.

आपल्या देशातील माणसांच्या आणि इतरांच्याही अशा प्रेरक कथा बालमनाला प्रेरणा देतील. याच्या जोडीलाच मुलांना भारतीय अभिजात साहित्य शिकवण्याचाही उपक्रम हाती घेतला जावा. अशी शिकवण मुलांना उदात्त विचारांचं आणि कल्पनांचं महाद्वार खुलं करून देईल. आजच्या इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांत अशी संधी अभावानंच मिळते.

(लेखक फलटण येथील ‘निंबकर ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट़’चे संचालक आहेत.)

अनुवाद : अनंत घोटगाळकर ananta.ghotgalkar@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

Malegaon Crime : पोलिसांनी पकडला प्रतिबंधित गुटखा, ११ लाख ३९ हजार ५६० रुपयांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT