Doctor and Patient sakal
सप्तरंग

रुग्णस्नेही ‘विसावा’ अन्‌ ‘सावली’

अवतरण टीम

- डॉ. अविनाश सुपे

रुग्णालय हे केवळ रुग्ण आणि त्यांचे उपचार इतके मर्यादित नसते. रुग्णाचे नातेवाईक हा रुग्णालयाचा एक अविभाज्य घटक आहे. दुर्धर आजाराने ग्रस्त रुग्णाचे नातेवाईक, दुरून येणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांना मानवतावादी दृष्टिकोनातून निवाऱ्याची सोय करणे गरजेचे आहे. रुग्णालय प्रशासन, सामाजिक संस्था व सरकार यांनी मिळून ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे अत्यंत आवश्यक आहे.

साधारण १९८०-९०च्या दरम्यान आम्ही घरून केईएम रुग्णालयात येताना बसने प्रवास करायचो. परळच्या बसथांब्यावर उतरून, मधल्या गल्लीतून केईएम रुग्णालयाकडे यायचो. येताना वाटेत आम्हाला रुग्णांचे काही नातेवाईक दिसायचे, आजही दिसतात. जिथे सावली मिळेल तिथे पथारी टाकलेले, कधी लाकडाच्या चुलीवर जेवण करणारे; तर कधी रुग्णाबरोबरच्या रात्रीच्या जागरणाने दमून बसलेले.

आम्हाला ते बघून फार वाईट वाटायचे. हे बाहेरगावचे गरीब लोक आपल्या मुलांना, नातेवाईकांना उपचार करून घेण्यासाठी लांबून मुंबईत आलेले असायचे. त्यांच्याकडे राहण्याची सोय नसायची आणि बाहेर खाणे त्यांना परवडायचे नाही. काहीतरी रस्त्यावर शिजवून ते वेळ मारून न्यायचे. हे असे राहणे कधी कधी १५-२० किंवा त्यापेक्षा जास्त दिवस असायचे. केईएममध्ये बहुतांशी उपचार हे मोफत असतात; परंतु नातेवाईकांचा राहण्याचा व खाण्याचा खर्च खूप असतो.

माझ्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला एक रात्र झोपण्यासाठी त्यावेळी १२०० रुपये द्यावे लागले होते. तेसुद्धा परळच्या चाळीत एका खोलीच्या छोट्या घरात पलंगाखाली झोपावे लागले होते. ते माझ्या मनाला फार लागले. कधीकधी लोक एखाद्याच्या अगतिकतेचा कसा फायदा घेतात, याचे ते उदाहरण होते. त्यामुळे या गरीब लोकांसाठी आपण काही करून शकत नाही, ही खंत मनात होती.

याच काळात एक दिलदार, सच्चे समाजवादी बचूभाई शहा- ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतरही सतत समाजसेवा केली- ते एक योजना घेऊन आले. त्यांच्या साठीच्या कार्यक्रमात त्यांना एक निधी मिळाला होता, तो त्यांना रुग्णालयासाठी द्यायचा होता. ते स्वतः एक उद्योजक होते व वेळोवेळी केईएमला मदत करायचे. त्या निधीतून संयोग ट्रस्ट हा नोंदणीकृत ट्रस्ट निर्माण करण्यात आला.

त्या ट्रस्टमधील निधीतून केईएम रुग्णालयातील विविध विभागांना लागणारी अत्यावश्यक साधनसामग्री पुरविण्यात येते. अत्यंत गरजू रुग्णांना मदतही केली जाते. आजही हा ट्रस्ट अत्यंत महत्त्वाची कामगिरी करत आहे. त्यांच्या मनात एक कल्पना आली की, रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णालयात राहण्यासाठी जर जागा उपलब्ध करून दिली तर त्यांना फार मदत होईल.

तत्कालीन अधिष्ठातांनी तत्परतेने सीव्हीटीसी इमारतीमधील तळघरातील मजल्याची जागा रिकामी करून दिली. माझ्या शिक्षिका, प्रख्यात लेखिका, आयुर्वेदपारंगत डॉ. शरदिनी डहाणूकर यांची एक कला म्हणजे अशा योजनांना अनुरूप नाव देणे. त्याप्रमाणे त्यांनी या प्रकल्पाला नाव दिले ‘सावली’. त्या जागेत प्रथम स्त्रिया आणि पुरुष यांच्यासाठी एकूण ३० बेड होते.

पुढे गरजेप्रमाणे वाढत जाऊन ते आता ६० बेड झाले आहेत. तेथे प्यायला पाणी, स्वच्छतागृह, टीव्ही, जेवणासाठी टेबल, लॉकर्स अशी सर्व सोय करण्यात आली. माणशी नाममात्र रुपये २० घेऊन रुग्णाचा नातेवाईक तिथे राहू शकतो. सुरुवातीस फक्त १० रुपये एवढे भाडे होते.

केईएममधील वॉर्डची सिस्टर रुग्णाचे नाव घालून एक चिठ्ठी देते आणि त्यानुसार अत्यंत गरजू नातेवाईकाला जास्तीत जास्त एक महिना राहण्यास देण्यात येते. संपूर्ण भारतातून म्हणजे अगदी अरुणाचल, तमिळनाडू, उत्तर प्रदेश इथून आलेल्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. ही सेवा गेली ३२ वर्षे अव्याहत सुरू आहे.

काही रुग्ण आणि नातेवाईक इतके गरीब असतात की, ते महत्प्रयासाने गाडीभाडे गोळा करून मुंबईत आलेले असतात. त्यांच्या खाण्यापिण्याची काय व्यवस्था करता येईल, हा प्रश्न मला सतत पडत असे. जरी उपचार फुकट असले किंवा नाममात्र शुल्क असले, तरी नातेवाईकांचा इतर खर्च असतोच. यासाठी आम्ही अनेक संस्थांकडे चौकशी केली.

लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयाचा अधिष्ठाता असताना माझ्या लक्षात आले की अनेक फाऊंडेशन्स पुढे येऊ शकतील. सायन रुग्णालयाच्या पटांगणात रोज ७०० रुग्णांच्या नातेवाईकांना फुकट नाश्ता दिला जातो. केईएममध्ये त्याचप्रमाणे ज्या नातेवाईकांना घरे आहेत; पण त्यांना संबंध दिवस रुग्णाबरोबर घालवावा लागतो, अशांसाठी ‘विसावा’ अशी एक थोड्या विश्रांतीसाठी जागा निश्चित केली.

तिथे घरून आणलेला डबा खाण्यासाठी टेबले, पाणी इत्यादींची सोय केली. ज्वेलेक्स फाऊंडेशनने नाना पालकर स्मृती प्रतिष्ठानच्या किचनमधून घेऊन १० रुपयांत पोळीभाजी गरजू नातेवाईकांना देणे सुरू केले. दररोज ३०० रुग्णांच्या नातेवाईकांना हा फायदा दिला जातो. या योजनेचा कोरोना काळात नातेवाईकांना खूप उपयोग झाला. त्याशिवाय १२ ते २ या वेळेत तिथेही गरजू नातेवाईकांना विनामूल्य पोळीभाजी दिली जाते. याचा सर्वच फायदा रुग्णांनाही होतो.

याचबरोबर रुग्णालयात मागे ५० रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दुसरे सावली केंद्रसुद्धा सुरू झाले आहे. आजही परळच्या आसपास हॉटेल्स कमी आहेत व खूप महाग आहेत; परंतु काही सामाजिक संस्थांनी नायगाव, बीपीटी कॉलनी व हाजी अली येथे रुग्णाच्या नातेवाईकांची कमी दरात सोय केली आहे; परंतु आवश्यकतेपेक्षा हे फार कमी आहे व अजून खूप करण्याची गरज आहे.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT