- डॉ. अविनाश सुपे
जुलै २००५ च्या ढगफुटीने तुफान वर्षावृष्टी झाली तेव्हा उपनगरात पाणी तुंबले होते. या घटनेने आपले डोळे उघडले आणि त्याचे फलित म्हणजे महापालिकेने एक उत्तम योजना आखली. प्रभावीपणे अंमलात आणली. महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने अन् तत्कालीन उच्च अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापून दोन वॉररूम्स तयार केल्या. ही व्यवस्था इतकी नीट केलेली आहे, की एका रूममध्ये बसून संपूर्ण मुंबईत काय चालले आहे हे कळत राहते. आपत्तीप्रसंगी ही वॉररूम अहोरात्र सुरू असते...
जिथे युद्धाचे नकाशे, भौगोलिक परिस्थिती जोखून तज्ज्ञ माणसे भेटतात ती वॉररूम. तिथेच कामाची रूपरेषा आखली जाते आणि अंमलबजावणी युद्धपातळीवर केली जाते. साधारण १९६९ मध्ये पहिल्यांदा दंगल पाहिली. गाड्या जाळणे, आरे बूथ जाळणे, सुरा घेऊन, बाटल्या फेकून गटागटांत मारामाऱ्या पाहिल्या. मी त्या वेळी आठवीत होतो.
पुढे केईएम रुग्णालयात कार्यरत असताना मात्र खूप दंगली, महापूर, विषबाधा, बॉम्बस्फोट, इमारती कोसळणे अशा अनेक निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित आपत्ती पाहिल्या. त्यातील ९२-९३ मध्ये झालेल्या दंगली, बॉम्ब स्फोट ठळकपणे लक्षात राहिले. बाबरी मशीद पडल्यानंतर उसळलेल्या दंगलीवेळी दिवसाला १५०-२०० रुग्ण दाखल होत. १०० च्या वर शस्त्रक्रिया कराव्या लागत.
अनेक मृत्युमुखी पडत. एकाच वेळी इतके गंभीर रुग्ण रुग्णालयात येतात, त्या वेळी नेहमीची तात्काळ रुग्णव्यवस्था अगदीच अपुरी होते. तात्काळ सेवा विभागात एका वेळी १०-१५ रुग्ण हाताळण्याइतकीच माणसे, औषधे आदी व्यवस्था असते; पण अशा मोठ्या आपत्तीच्या वेळी अनेक कामे अंगावर येतात. अवेळी शस्त्रक्रियागारे उघडावी लागतात. मनुष्यबळ कमी असते. नातेवाईकांशी बोलणे, पोलिस दलाला त्यांच्या कामात सहकार्य करावे लागते.
हे सर्व आम्हाला तेव्हा नवीन होते. एका वेळी इतके मृतदेह ठेवणे किंवा नातेवाईकांकडे ओळख पटवून सुपूर्द करणे ही सर्व अत्यंत जबाबदारीची आणि महत्त्वाची वेगळी कामे रुग्णालय प्रशासनाकडे असायची. जास्तीत जास्त लोक कसे वाचू शकतील याचा आटोकाट प्रयत्न आम्ही करायचो. आम्ही एक मोठी पेटी औषधे आणि इतर सामुग्री भरून आमच्या वॉर्डच्या सिस्टरकडे ठेवली होती. आणीबाणीच्या प्रसंगी वापरण्यासाठी.
या अनुभवातून माझ्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले आणि मी एक सडेतोड, खरमरीत लेख आमच्या जर्नलमध्ये लिहिला. अशा आपत्कालीन परिस्थितीला कसे हाताळायचे याचे पूर्ण ज्ञान, प्रोटोकॉल, नियमावली आपल्याकडे आहे का? कोणत्या गोष्टी लागतात? औषध साठा किती असावा, तो आपण तयार ठेवतो का? केईएमसारख्या महाकाय रुग्णालयात बस किंवा रेल्वे अपघातात, इमारत कोसळल्यामुळे येणारी ३०/४० माणसे हाताळणे शक्य होते; पण जेव्हा शेकड्याने रुग्ण येतात तेव्हा प्रोटोकॉलची नितांत गरज मी विशद केली.
हा लेख माझे गुरुवर्य बापट सर आणि इतर सहकाऱ्यांनी वाचल्यावर चर्चा झाली. त्या वेळचे मुख्यमंत्री व इतर अधिकाऱ्यांनाही तो दाखवण्यात आला. विविध समित्यांमध्ये त्या अनुषंगाने चर्चा झाली आणि सर्वांनी त्याबाबत सहभावना व्यक्त केल्यावर राष्ट्रीय स्थरावर राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय, राज्यीय आणि शहरातून याबाबत जागरुकता आली आणि दले निर्माण करण्यात आली. हळूहळू त्यात सुधारणा होत गेल्या.
असे असले तरीही २६-२७ जुलै २००५ च्या ढगफुटीने तुफान वर्षावृष्टी झाली तेव्हा उपनगरात पाणी तुंबले होते. मुंबई शहरात मात्र तसे झाले नाही. शहरातील दक्षिण मुंबईतील अनेक उच्च अधिकाऱ्यांना उपनगरातील संकटाची व्याप्ती लक्षात आली नाही आणि कळली तेव्हा खूप नुकसान होऊन गेले होते. शतकातून किंवा अर्धशतकातून घडणाऱ्या या घटनेने मात्र आपले डोळे उघडले आणि त्याचे फलित म्हणजे महापालिकेने एक उत्तम योजना आखली.
प्रभावीपणे अमलात आणली. महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने अन् तत्कालीन उच्च अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभाग स्थापून दोन वॉररूम्स तयार केल्या. एक मुख्यालयात आणि जर त्या रूममध्ये काही अडचण आली तर पर्यायी व्यवस्था म्हणून एक परळ येथील आपत्ती व्यवस्थापन संस्थेमध्ये. या दोन्ही वॉर रूम्स सारख्याच आहेत. जवळपास पाच हजार कॅमेरे संपूर्ण मुंबई शहरात बसवण्यात आले.
त्यांच्याकडून सतत येत असलेल्या माहितीची छाननी होत राहते. अग्निशमन दल, पोलिस दल यांचे प्रतिनिधी मिळून आपत्ती निवारण कामाचा उत्तम समन्वय असल्याने भौगोलिक सीमांचे अडथळे जलदपणे आणि सुलभतेने दूर करून साधणे शक्य झाले. ही व्यवस्था इतकी नीट केलेली आहे, की एका रूममध्ये बसून संपूर्ण मुंबईत काय चालले आहे हे कळत राहते.
माझे मित्र व या विभागाचे संचालक महेश नार्वेकर यांच्यासोबत १०-१५ माणसे दिवस-रात्र काम करीत असतात. १०-१५ जणांची राहण्याची सोय आहे, त्यामुळे आपत्तीप्रसंगी मग तो पूर असो किंवा गाड्या बंद पडणे असो किंवा दंगली, वॉर रूम अहोरात्र सुरू असते. कित्येकदा कुठल्याही आपत्तीप्रसंगी मुख्यमंत्री व इतर अधिकारी इथे येऊन परिस्थिती हाताळत असतात.
कोरोना काळात आयुक्त चहल यांच्या नेतृत्वाखाली या वॉररूमने नेत्रदीपक कामगिरी केली आणि ती ‘मुंबई मॉडेल’ म्हणून मान्यता पावली. कोणत्याही रुग्णाला कुठल्या रुग्णालयात बेड आहे आणि ऑक्सिजन उपलबद्धता कळू शकली. त्यांना घरून अॅम्ब्युलन्सद्वारे योग्य त्या रुग्णालयात वेळीच नेण्यात आले. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत मुंबईसारख्या दाट आणि अफाट लोकवस्तीच्या शहरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अल्प राहिले. याबद्दल आपण या मुंबई महानगरपालिकेचे व संबंधितांचे खूप कौतुक करायला पाहिजे.
मुंबईत आता आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था सुरू केली आहे. परळ येथे पाच मजली इमारतीत ही संस्था कार्यरत आहे. संस्थेचे छान सभागृह आहे. तिथे दोनतीन महिन्यांचे आपत्ती व्यवस्थापनाचे पॅरामिलिटरी प्रशिक्षण दिले जाते.
डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, पोलिस आणि अग्निशमन दल या संबंधितांना हे शिक्षण दिले जातेच; पण हे ज्ञान तळागाळापर्यंत गेले पाहिजे. लोकसंस्था, तरुण वर्ग यांनी हे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. प्रत्येक शालेय विद्यार्थी व नागरिकाला आपत्तीबाबतचे प्राथमिक ज्ञान व प्रशिक्षण दिले गेले पाहिजे. मुंबईसारख्या शहरात नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती तर येणारच आणि तिचे गांभीर्यही वाढते राहील. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन या आपत्तीचा सामना केला तर कमीत कमी जीवितहानी होईल हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.
(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठाता पदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.