Disaster Sakal
सप्तरंग

महापूर, लेप्टो आणि डॉक्सी

मुंबईसारख्या शहरात अनेक घटना घडतात. अनेक संकटे येतात. कधी अपघात घडतात, कधी नैसर्गिक आपत्ती येते. कधी मुंबई पावसात बुडते.

अवतरण टीम

मुंबईसारख्या शहरात अनेक घटना घडतात. अनेक संकटे येतात. कधी अपघात घडतात, कधी नैसर्गिक आपत्ती येते. कधी मुंबई पावसात बुडते.

- डॉ. अविनाश सुपे

मुंबईसारख्या शहरात अनेक घटना घडतात. अनेक संकटे येतात. कधी अपघात घडतात, कधी नैसर्गिक आपत्ती येते. कधी मुंबई पावसात बुडते. अशा वेळी सर्व सरकारी व इतर यंत्रणांनी एकत्र येऊन सहकार्याने काम केले, तर आपण या संकटांवर मात करू शकतो. त्याचा प्रत्यय २०१७ मध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले तेव्हा केलेल्या उपाययोजनेत आला. त्याची ही गोष्ट...

तो दुर्दैवी दिवस २६ जुलै २००५. एका दिवसात झालेल्या तुफान वृष्टीमुळे मुंबई पाण्याखाली गेली होती. आपण अनेक मुंबईकर वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडलो होतो. मीसुद्धा किंग्ज सर्कलला रात्रभर अडकलो. पहाटे सायनला जाऊन राहावे लागले. सायन ते चेंबूर पूर्ण भाग पाण्याखाली होता. पुढे दोन दिवसांनी पाणी ओसरले तेव्हा घरी जाता आले.

पुढच्या दोन-तीन आठवड्यात लेप्टोचे असंख्य रुग्ण विविध रुग्णालयांत दाखल होत होते आणि केवळ नायर रुग्णालयात चारशेपेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर मलेरिया, डेंगी, डायरिया अशा अनेक आजारांचा उद्रेक झाला. पावसाळी आजारांचे रौद्ररूप लोकांसमोर आले. तेव्हापासून महापालिकेत १५ मे ते १५ नोव्हेंबरपर्यंत पावसाळी आजारांसाठी कक्ष उघडणे, औषधे व इतर सामुग्री तयार ठेवणे अशा सेवांची एक निश्चित रूपरेषा करून अंमलबजावणी केली जाते. दाखल रुग्णांचा तपशील प्रत्येक दिवशी मुख्यालय, आरोग्य विभाग व मंत्रालय येथे सादर केला जातो. नियमितपणे विभागवार रुग्णसंख्या वाढते, कमी होते, या सर्वांचा काटेकोरपणे आढावा घेतला जातो व योग्य पावले उचलण्यात येतात.

२०१७ मध्ये असेच मुंबईत पाणी तुंबले आणि एका दिवसांत ओसरल्यावर मला महापौर बंगला, अनेक नेते यांचे फोन येऊ लागले. आयुक्तांनी बोलावून विचारले की, आपल्याला जर लेप्टोचे मृत्यू थांबवायचे असतील, तर काय करावे लागेल? मी ताबडतोब कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. केसकर आणि महापालिकेचे इतर आरोग्य अधिकारी, राज्याचे महासंचालक, आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य, पावसाळी आजारविषयक तज्ज्ञ व आमच्या चारही वैद्यकीय महाविद्यालयांचे संबंधित प्राध्यापक यांच्याशी संपर्क करून दुसऱ्या दिवशी सखोल चर्चा करून यासाठी योजना तयार केली. सरकारच्या सर्व परिपत्रकांचा / प्रसिद्ध झालेल्या सर्व संशोधनाचा अभ्यास केला. त्यात जाणवले की अशा परिस्थितीत उद्भवणाऱ्या समस्यांसाठी निश्चित अशी मार्गदर्शक तत्त्वे नव्हती. त्यामुळे सर्वांच्या विचारांनी आम्ही मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. त्यात असे ठरवले, की मुंबईभर घरोघर जाऊन पाहणी / तपासणी करायची व उपचार तीन स्तरांत करायचे.

मुंबईच्या महापुरात ज्यांचा पाण्याशी संपर्क आला, त्यांना डॉक्सिच्या दोन गोळ्या समोर घ्यायला लावायच्या. ज्यांना जखम होती व त्यांनी पाण्यातून प्रवास केला त्यांनी तीन दिवस गोळ्या घ्यायच्या आणि जे पाण्यातच काम करतात त्यांनी पूर्ण कोर्स करायचा. अशाप्रकारे उपलब्ध वैज्ञानिक संशोधन व तज्ज्ञांचे अनुभव यांच्या आधारे भारतात प्रथमच यावर मार्गदर्शक सूचना तयार केल्या.

लेप्टो हा आजार उंदीर, कुत्रा, गाई, गुरे, घोडे व जंगली जनावरे यांच्या मलमूत्रातून पसरतो. यामध्ये त्या जनावरांना किंवा उंदरना काही त्रास होत नाही; परंतु जर त्यांच्या मूत्राचा किंव्हा मूत्र ज्या पाण्यात मिसळले असेल, त्याचा माणसाशी संबंध आला, तर हा आजार माणसांना होऊ शकतो. महापुराच्या साचलेल्या पाण्यात जनावराचे मूत्र मिसळलेले असते. जर एखाद्याच्या पायाला जखम असेल व अशी व्यक्ती महापुरात पाण्यातून चालली तर त्याला लेप्टो होण्याची शक्यता जास्त असते. लेप्टोची लक्षणे दुसऱ्या दिवसापासून ३० दिवसापर्यंत कधीही आढळू लागतात.

खूप ताप, डोकेदुखी, थंडी, स्नायुदुखी (विशेषकरून पाठीचे व पोटऱ्यांचे स्नायू), उलट्या, कावीळ, पोटदुखी, पुरळ ही लक्षणे दिसतात आणि पाच ते सात दिवसांत कमी होतात आणि पुन्हा लक्षणे वाढतात, हा आजाराचा दुसरा टप्पा असतो. अशा वेळी कधी कधी लक्षणे तीव्र होऊन रुग्ण अत्यवस्थ होऊनच येतो. त्याला अतिदक्षता विभागातच दाखल करणे भाग असते. महापुरात पाण्यात चाललेल्या व्यक्तींना ७२ तासांत जर डॉक्सिच्या दोन गोळ्या दिल्या, तर लेप्टोची शक्यता खूप कमी होते. त्यामुळे लगेच गोळ्या वाटप होणे गरजेचे होते.

यातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे त्यानंतर ३६ ते ४० तासांत म्हणजे दीड दिवसात पालिकेची संपूर्ण आरोग्य यंत्रणा, सर्व वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये, दवाखाने या सर्वानी एकत्र येऊन जवळ जवळ १७ लाख घरांमधील ६७ लाख लोकांशी संपर्क साधून विचारपूस केली. त्यात आशा वर्कर्स, एएनएम वर्कर्स, उषा वर्कर्स, सगळे विद्यार्थी, कर्मचारी (जवळ जवळ ९५००) सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण मुंबईत तपासणी सत्र करून १६ लाख व्यक्तींना गोळ्यांचे वितरण केले. ही पालिकेसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. हे काम म्हणजे जगन्नाथाचा रथ होता. दीड दिवसात ज्या वेगाने त्यांनी हे काम केले, त्यासाठी त्यांचे कितीही कौतुक केले तरी कमीच ठरेल.

याचा परिणाम असा झाला की २००५ मध्ये जेवढे लेप्टोने मृत्यू झाले होते, त्या तुलनेत अत्यंत कमी मृत्यू २०१७ मध्ये झाले. हा एक मोठा दिलासा होता कारण लेप्टोने जेव्हा मृत्यू होतात त्या बहुतांशी तरुण वर्गाचे असतात. हे तरुण अचानक रुग्णालयात येतात, त्यांना कावीळ होऊन लिव्हर खराब होते. व्हेंटिलेटरवर ठेवले तरी त्यांचा मृत्यू होतो. असे मोठ्या प्रमाणात येणारे रुग्ण कमी झाले व त्यामुळे मृत्यू कमी झाले. आम्ही हे मृत्यू टाळू शकलो. हे सर्व आम्ही पुढे नॅशनल मेडिकल जर्नल या इंडेक्स मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित केले. आता ही मार्गदर्शक तत्त्वे केवळ भारतातच नाही, तर इतरत्रही वापरल्या जातात. जगभरातून माझ्याकडे विचारणा झाली. जिथे जिथे जास्त वृष्टी होऊन पाणी तुंबते तिथे डॉक्सिच्या दोन गोळ्या दिल्या जातात. कदाचित आता यावर अजून वैज्ञानिक संशोधन करणे आवश्यक आहे.

यातून आपण एक शिकलो की, असे कठीण प्रसंग जेव्हा उद्भवतात जसे की मुसळधार पर्जन्यवृष्टी, स्वाईन फ्लू, मलेरिया, डेंगी, कोविड तेव्हा सर्व तज्ज्ञांनी एकत्र येऊन आपले ज्ञान आणि अनुभव यांचे सार काढून मार्गदर्शक तत्त्वे तयार केली. आपली आरोग्य व्यवस्था योग्यरीत्या राबवली, तर समाजाला त्याचा निश्चित फायदा होतो. विविध साथी आटोक्यात येऊ शकतात, आजारांची गुंतागुंत कमी होते. त्याचबरोबर जनजागृती होऊन लोक आपली काळजी बऱ्याच प्रमाणात घेऊ शकतात. महानगरपालिकेतील सर्व घटक - यामध्ये मोठी रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालयाने, उपनगरीय रुग्णालये, आरोग्य व्यवस्था व दवाखाने येथील सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन सहकार्याने असे काम केले व अनेक तरुणाचे जीव वाचले. मला हा अनुभव अत्यंत समाधान देऊन गेला की एकत्र येऊन आपण एवढ्या मोठ्या संकटाचा सामना करू शकतो. आजही मुंबईत किंवा इतरत्र पाणी साचते तेव्हा ही मार्गदर्शक तत्त्वे वापरले जातात. अशा गोष्टींचा फायदा केवळ मुंबईलाच नाही, तर अखिल मानवजातीला होतो.

(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीचे नेते पत्रकार परिषद घेणार

Mahad Assembly Election 2024 result live : महाड विधानसभेत भरत गोगावलेंची सरशी ! ठाकरे गटाच्या स्नेहल जगतापांचा दणदणीत पराभव

Konkan Region Assembly Election Result 2024: राणे बंधूंनी तळकोकण राखले; भास्कर जाधव यांनी थोडक्यात गुहागर जिंकले

Sanjay Gaikwad won Buldana Vidhan Sabha: दोन शिवसेनेत कडवी झुंज! संजय गायकवाडांचा निसटता विजय, उद्धवसेनेच्या जयश्रींनीची तगडी फाईट

SCROLL FOR NEXT