- डॉ. अविनाश सुपे
१५ ऑगस्ट, २६ जानेवारी या राष्ट्रीय सणांना सुट्टी असते आणि ते एकत्रितपणे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. इमारतींवर विजेची रोषणाई केली जाते, झेंडे लावले जातात. राष्ट्रप्रेमाने मुले आपल्या शर्टावर छोटे झेंडे लावतात. तिरंगी टी-शर्ट घालतात. हल्ली तर आपल्या मोटारीवरही झेंडा लावला जातो. तिरंगी झेंडा किंवा रंग असलेले संदेश समाजमाध्यमांवर असतात. या तिरंग्याचे वेड किंवा उत्साह खाद्यपदार्थांपर्यंत पोहोचून तिरंगी बर्फी उत्साहाने बनविली जाते. एकदा त्या बर्फीतूनच विषबाधा झाली.
१५ ऑगस्ट २०१४ची घटना आहे. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे दोन्ही दिवस अधिष्ठाता यांच्यासाठी अत्यंत धावपळीचे असतात. साधारण पावणेसात वाजता मी सायन रुग्णालयात जाऊन ध्वजवंदन आणि एक छोटासा कार्यक्रम पूर्ण केला. मग ८ वाजता महापालिकेत जाऊन ध्वजवंदन कार्यक्रम ८ ते ९ वेळात पूर्ण केला आणि नंतर राज्यस्तरावरचे कार्यक्रम ९ वाजल्यापासून सुरू झाले.
त्यानंतर परत रुग्णालयात येऊन कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावून मी २ वाजता घरी पोहोचलो. जेवून जरा वेळ पहुडलो. साधारण ३ वाजता फोन आला की, एका निवासी वैद्यकीय अधिकाऱ्याला उलट्या होत आहेत आणि त्याला दाखल केले आहे. अजून काही निवासी अधिकारी उलट्या होत असल्यामुळे दाखल झाले.
मी धावतपळत रुग्णालयात पोहोचलो. तोपर्यंत जास्त संख्येने आरएमओज दाखल झाले. मला परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव झाली. मी ताबडतोब एक वॉर्ड रिकामा करून सर्वांना तिथे ठेवले. वरिष्ठ डॉक्टरना तत्काळ उपचारासाठी फोन करून बोलावून घेतले.
६०० निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी ६० दाखल झाले होते. सुदैवाने ५९ जणांवर उपचार केल्यावर चार तासात त्यांना सोडण्यात आले. एकाला मात्र ज्याची प्रकृती गंभीर असल्याने दुसऱ्या दिवशी सोडले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; पण मनस्ताप आणि त्रास भरपूर झाला. सर्वत्र भीतीचे वातावरण होते. पूर्ण दिवसभर सर्व चॅनेल व पत्रकारांना तोंड द्यावे लागले.
पोलिस, एफडीए यांनी अनेकांच्या जबान्या घेतल्या. एक विशेष गोष्ट म्हणजे, सर्वसाधारणपणे, सायन रुग्णालयात अँटॉप हिल, धारावी किंवा कुर्ला या वस्तीतील ४-५ जरी रुग्ण आले, तरी राजकीय पक्षाचे नेते, नगरसेवक ताबडतोब येतात. इथे ६० निवासी डॉक्टर असूनही (कदाचित ते त्यांचे मतदार नसतील म्हणून) एकही राजकीय नेता, कार्यकर्ता तिथे आला नाही. अतिरिक्त आयुक्त व आयुक्त मात्र येऊन गेले.
चौकशीअंती लक्षात आले की, निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मेसमध्ये त्या दिवशी तिरंगी बर्फी त्याच्याच कर्मचाऱ्याद्वारे बनवलेली होती. मेसच्या कंत्राटदाराने जो मावा आणला होता, तो अँटॉप हिलच्या एका दुकानातून आणला होता. ताबडतोब कंत्राटदार व मावा पुरवणाऱ्या दुकानदारांना अटक झाली. पुढे कंत्राटदार आणि दुकानदार यांना शिक्षा/दंड झाला; पण यातून आपण काही शिकले पाहिजे.
अशा या सणांच्या वेळी आपण पेढे, बर्फी, मावा कुठून घेतो, हे फार महत्त्वाचे आहे. गणपती उत्सवाच्या वेळी माव्याला मोदकांसाठी मागणी प्रचंड असते. त्यात विविध रंग वापरले जातात. मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी आणि पैसे कमावण्यासाठी स्वच्छता, गुणवत्ता पाळली जात नाही. तो काळ तर पावसाचादेखील असतो.
ही छोटी माव्याची दुकाने आपण आत जाऊन पहिली तर माव्याचे मोदक खाताना आपण दहा वेळा तरी विचार करू. कधी कधी हानीकारक पदार्थही वापरले जातात. यावर खूप नियंत्रणाची गरज असते; परंतु कर्मचाऱ्यांचा तुटवडा, लाचखोरपणा यामुळे यावर उत्सवाच्या वेळी योग्य ते नियंत्रण ठेवले जात नाही. या गुन्ह्यासाठी अत्यंत कडक शिक्षा होणे आवश्यक आहे.
आपण हे पदार्थ खात्री असलेल्या ठिकाणाहून घेतले तर आपण सुरक्षित राहू. उत्सवाच्या वेळी, कॉन्फरन्समध्ये किंवा लग्न समारंभात अन्नपदार्थ कुठे आणि कसे बनविले जात आहेत व तेथील स्वच्छतेबाबत जागरूक राहिले पाहिजे.
कार्यक्रम आखताना कंत्राटदार स्वच्छता कशी पाळतो, चांगल्या प्रतीचा कच्चा माल वापरतो की नाही, हेही पाहिले पाहिजे. शिळे, निकृष्ट पदार्थ, हातमोजे न वापरता केलेले पदार्थ यापासून दूर राहिले पाहिजे. लांबच्या प्रवासात स्टेशनवर काही खाताना किंवा लग्नाच्या बुफेमध्ये जे पदार्थ आपल्या डोळ्यासमोर बनत असतात, ते गरम पदार्थ खाणे चांगले.
आपल्या पोटात जाणाऱ्या अन्नामुळे आपल्याला विषबाधा / संसर्ग होणार नाही, हानी होणार नाही, याची खबरदारी आपण घेतली, तर या गोष्टींना आळा बसेल आणि आपले आरोग्य सुरक्षित राहील.
(लेखक केईएम रुग्णालयातून अधिष्ठातापदावरून निवृत्त झाले असून, त्यांचे ‘सर्जन’शील हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.