Life threatening depression sakal
सप्तरंग

जीवघेणं नैराश्य

आपली शिक्षणपद्धती परीक्षार्थी असल्यामुळे विद्यार्थ्यांचं ज्ञानाचं कुतूहल जागृत करण्याऐवजी ती विद्यार्थ्यांवर चांगल्या मार्कांनी पास होण्याचा दबाव आणते.

अवतरण टीम

- डॉ. दुलारी देशपांडे

आपली शिक्षणपद्धती परीक्षार्थी असल्यामुळे विद्यार्थ्यांचं ज्ञानाचं कुतूहल जागृत करण्याऐवजी ती विद्यार्थ्यांवर चांगल्या मार्कांनी पास होण्याचा दबाव आणते. याशिवाय विद्यार्थी समाज-माध्यमांत गुंतलेले असतात. ‘आभासी’ जगापेक्षा ‘वास्तव’ जगात रहाणं, हसणं, सामाजिक सुसंवाद प्रस्थापित करणं अधिक महत्त्वाचं आहे; परंतु जरा कुठे लाइक्स-शेअर्स कमी झाले, की त्यातून येणारं नैराश्यही जीवघेणं ठरतं.

विद्यार्थ्यांच्या मनात येणाऱ्या आत्महत्येच्या कारणांचं अनेक मानसशास्त्रज्ञांनी संशोधन करून समाजमन जागृत केलं; तरीही आत्महत्येचं सत्र थांबत नाही, ही बाब चिंता वाढवणारी आहे.

निसर्गात आपल्याला पक्षी सामूहिक आत्महत्या करताना, तर प्राणी देहत्याग करताना दिसतात. आपण आत्महत्या करू शकतो, ही माणसाला स्वत:ची पटलेली ओळख आहे. आत्महत्या करून जीवन संपवून टाकावं, असा विचार मनात कधीच आलेला नाही, असा जगात एकही माणूस नाही.

प्रत्येक माणसाच्या मनात कधीना कधी तरी आत्महत्येचा विचार आलेला असला, तरी प्रत्येक वेळी त्या विचाराचं कृतीत रूपांतर केलं जातंच, असं नाही. मला मरायचं नाही. मला जगायचं आहे. जीवन जगणं ही माझी ‘निवड’ आहे. माणसाच्या मेंदूमध्ये ही निवड करण्याची निश्चितच क्षमता आहे.

आयुष्याचा वय वर्षे १५ ते ३० हा ऐनतारुण्याचा काळ. निसर्गत:च या वयात शरीर-मनात जीवनऊर्जा अगदी सळसळून वाहत असते; मात्र संपूर्ण जगभरात नेमकं याच वयातल्या तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं दिसून येतं.

न्युरोसायन्सच्या अभ्यासात आत्महत्या करणाऱ्यांच्या मेंदूत सेरोटोनिन या संप्रेरकाचं प्रमाण बरचं कमी असल्याचं आढळून आलं आहे. सेरोटोनिन संप्रेरक आपण एखादी कृती का करावी? आता ती करणं गरजेचं आहे की नाही, हे ठरवण्याचं कार्य करतं. आपल्या कृतीचं मूल्यांकन करतं. सेरोटोनिनचं प्रमाण कमी झाल्यास अशा व्यक्तीचा कोणत्याही गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक बनतो.

चेन्नईच्या बिलरॉथ हॉस्पिटलमधले नवजात शास्त्रज्ञ (नियोनेटोलॉजिस्ट) डॉ. रवीन्द्रन यांच्या मते, ‘भारतात होणाऱ्या एकूण आत्महत्यांपैकी प्रत्येकी तिसरी आत्महत्या पौगंडावस्थेतल्या तरुणाची असते.’ जगात पौगंडावस्थेतील मुलांचा आत्महत्येचा दर प्रतिलक्ष १४.५ इतका आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतातला पौगंडावस्थेतल्या मुलांच्या आत्महत्येचा दर सर्वांत अधिक असल्याचं म्हटलं जातं.

२०२० मध्ये महामारीच्या काळात भारतात १४ हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. एका अभ्यासानुसार, २०१९ ते २०२० या एका वर्षाच्या काळात, विद्यार्थांच्या आत्महत्येच्या दरात २१ टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं. २००६-०७ च्या एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार, भारतात पाच हजार ८५७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. याचा अर्थ दिवसाला १६ विद्यार्थ्यांनी आत्महत्येनं आपलं जीवन संपवलं.

डब्ल्यूएचओनुसार, आत्महत्या हे अपघात आणि खुनानंतर पौगंडावस्थेतील मुलांच्या मृत्यूचं तिसऱ्या नंबरचं प्रमुख कारण आहे. पौगंडावस्थेत आत्महत्या यशस्वी करणाऱ्यांपेक्षा आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्यांची संख्या बरीच अधिक आहे. पौगंडावस्थेतील मुलं एवढ्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या का करतात, याचं स्पष्टीकरण देताना एन्डोक्रिनोलॉजिस्ट डॉ. अभ्युदय वर्मा म्हणतात, ‘१३ ते १९ वयोगटातली मुलं वयाच्या एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर असतात.

या वयातल्या मुलांच्या शरीरात संप्रेरकांमधल्या बदलाची प्रक्रिया सर्वोच्च बिंदूवर सुरू असते. या वयातल्या मुलांचं पौगंडावस्थेतून प्रौढावस्थेत रूपांतर होत असतं. याच काळात मुलांमध्ये जग समजून घेण्याच्या क्षमतेचा विकास होत असतो. अशा वेळी कसल्याही प्रकारच्या मानसिक दडपणाचा त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर बराच वाईट प्रभाव पडतो. मुलं या वयात मनानं बरीच संवेदनशील झालेली असतात.

या वयातल्या सर्वच मुलांना काही प्रमाणावर तरी मानसिक ताणाचा सामना करावा लागतो. या मानसिक ताणाचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर, नातेसंबंधांवर तसंच त्यांच्या इतर उपक्रमांवर होऊ शकतो.’ पौगंडावस्थेसारख्या नाजूक काळात बिघडलेलं मुलांचं मानसिक स्वास्थ्य हा या वयातल्या मुलांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करणारा धोकादायक घटक असतो.

पौगंडावस्थेतील मुलांना बरेचदा जबरदस्त ताणतणावाचा, मानसिक गोंधळाचा, स्व-शंकेचा आणि आर्थिक असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. या वयातल्या मुलांच्या आत्महत्येमागे कुटुंबाचा आत्महत्येचा इतिहास, सतत बदलणाऱ्या मानसिक कलांचा इतिहास, प्रेमभंग, शारीरिक हिंसेचा बळी ठरणं, पिस्तुलासारख्या घातक शस्त्रास्त्रांची सहज उपलब्धी, मित्रपरिवार-कुटुंबीयांसोबत संघर्ष, दारू किंवा अमली पदार्थांचं सेवन, सामाजिक अलगीकरण, शैक्षणिक गोष्टींचा दबाव, एखादा मूल्यवान नातेसंबंध गमावणं, स्वत:च्या वेगळ्या लैंगिक कलाच्या स्वीकृतीविषयी संघर्ष, बिघडलेलं सामाजिक कौशल्य, समवयस्कांबरोबरचे खराब झालेले संबंध, मोठ्यांची दादागिरी यांसारखी अनेक कारणे असतात. या वयातल्या मुलांना आपल्या समस्यांसाठी कोणाची मदत मागण्याची लाज वाटते. या आत्महत्यांना काही प्रमाणावर सांस्कृतिक आणि धार्मिक गोष्टी (काही धर्मांत आत्महत्येचं उदात्तीकरण केलं जातं) देखील कारणीभूत ठरतात.

डॉ. राजेंद्र बर्वे म्हणतात, ‘तरुण वयात जीवनाकडे बघण्याचा एकूणच दृष्टिकोन बराच तोकडा असतो. जीवन जे आता आहे तेवढंच आहे. हा दृष्टिकोनच मुळात ‘तोकडा’ दृष्टिकोन आहे. एक माणूस म्हणून, समाजाचा घटक म्हणून, माझ्या जगण्यामागे काही हेतू असू शकतो का? जीवन जगण्यामागची हेतूपूर्णता मला सापडलेली आहे. त्या दिशेनं माझी वाटचाल चालू आहे. या वाटचालीतच मला आनंद मिळतोय. मी जे ठरवलंय ते करतोय.

जीवनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन एकूणच ‘विशाल’ आहे. माझ्या दृष्टीचा पट विशाल आहे. एका मोठ्या हेतूनं मी जीवनात वाटचाल करतोय. हा विचार तरुणांमध्ये विकसित झालेला नसतो. या वीकएंडला मला काय करायचंय एवढा तोकडा त्यांचा दृष्टिकोन असतो. जीवनाला काही निश्चित हेतूपूर्णता असेल, तर ते जीवन शक्यतो आत्महत्येच्या दिशेनं वाटचाल करीत नाही.’

१५ ते ३० वयोगटातल्या तरुणांच्या आत्महत्येमागे त्यांची बिघडलेली मानसिक स्थिती हे कारण २७ ते ९० टक्के प्रमाणात असतं. आत्महत्या करणाऱ्या तरुणांपैकी निम्मे तरुण ‘नैराश्य’ या मनोविकारानं ग्रासलेले असतात. यांत ‘द्विध्रुवीय विकारा’सारखे (बाय-पोलर डीसऑर्डर) मानसिक विकार असतील, तर आत्महत्येचा धोका २० पटीनं वाढतो. या खेरीज विखंडीत मनस्कता (स्पलीट पर्सनॅलिटी), व्यक्तित्व विकार (पर्सनॅलिटी डीसऑर्डर), अभिघातज (स्ट्रेस)सारख्या मनोविकारांचा अंतर्भाव होतो.

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चनुसार, भारतात पौगंडावस्थेतील १२.८ मुलं मानसिक विकारानं ग्रासलेली असतात. या आत्महत्यांमागे नैराश्याचा मनोविकार प्रमुख कारण आहे. मानसशास्त्रज्ञांच्या मते, पौगंडावस्थेतील नैराश्यामागे ‘विपुलते’ची समस्या आहे. ज्यांना लहान वयापासूनच सर्व काही झटपट पुरवलं जातं, त्यांना जीवनातल्या कोणत्याही मनोभंगाचा सामना करणं अवघड जातं.

बंगळूरच्या डॉ. जी. गुरुराज यांच्या मते, ‘‘अशी मुलं बहुदा आत्मकेंद्री असतात. स्वत:त गढून गेलेली असतात. ही मुलं मानसिक विकाराला चटकन बळी पडू शकतात. तरुणांना वाटतं की ते काहीही करू शकतात. त्यांना कुठल्याही गोष्टीचं ताबडतोब समाधान हवं असतं. ज्या मुलांना लहानपणापासून कुठल्याही गोष्टीसाठी ‘नाही’ ऐकण्याची सवय नसते, त्यांना एकूणच भोवतालच्या जगाला त्यांच्या गरजा भागवण्याविषयी काहीच पडलेलं नाही, हे पचवणं खूपचं जड जातं.’

डॉ. राजेंद्र बर्वे म्हणतात, ‘‘मला जे मिळालं नाही ते सर्व मी माझ्या मुलांना देईन, या विचारांचे पालक मुलांना सतत त्यांच्या मनासारखं करू देतात. अशा मुलांना कोणत्याही गोष्टीसाठी ‘नाही’ ऐकण्याची सवय नसते. अशा मुलांना आयुष्यात पुढे जेव्हा एखाद्या मनोभंगाचा सामना करावा लागतो, तेव्हा ती लगेचच निराश होऊन आत्महत्येसारखं घातक पाऊल उचलतात.’

आपली शिक्षणपद्धती परीक्षार्थी असल्यामुळे विद्यार्थ्यांचं ज्ञानाचं कुतूहल जागृत करण्याऐवजी ती विद्यार्थ्यांवर चांगल्या मार्कांनी पास होण्याचा दबाव आणते. मुलांच्या मनावर पडणाऱ्या परीक्षांच्या दडपणाचा प्रभाव नकारात्मक अर्थानं त्यांच्या मानसिक आरोग्यावर होतो. १५ ते ३० वयोगटातल्या विद्यार्थ्यांचं मन पालकांच्या अपेक्षांच्या दडपणाखाली, समवयस्कांच्या दडपणाखाली, परीक्षेतील अपयशाच्या भीतीच्या दडपणाखाली, सिनिअर्सकडून होणाऱ्या रॅगिंगच्या दडपणाखाली दडपलेलं असतं.

या दडपणांचा विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होत असतो. स्पून फिडिंगने मार्क मिळवण्याची सवय झालेले विद्यार्थी त्यांना जेव्हा स्वतंत्रपणे अभ्यास करायची वेळ येते तेव्हा आपण तो करू शकू का, या विचारानं खचून जातात... काही पालक परीक्षा म्हटली की टी.व्ही. बंद, खेळ बंद, घरी कोणाचं येणं-जाणं बंद, असा जो परीक्षेचा मोठा ‘बाऊ’ करतात, त्यामुळेही मुलांच्या मनावर अनावश्यक ताण निर्माण होऊन त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं.

शिक्षणानं विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानाची लालसा निर्माण केली पाहिजे. त्यांना अभ्यासात स्वावलंबी बनवलं पाहिजे. मार्कांपेक्षा त्यांच्या ज्ञानसंपादनाच्या प्रयत्नांचं कौतुक झालं पाहिजे. आज अभ्यासक्रमात जीवन जगण्याची कौशल्यं, भावनांचं-तणावांचं व्यवस्थापन यांसारख्या गोष्टींचा अंतर्भाव होणं गरजेचं आहे. NIMHANS च्या एका अभ्यासानुसार- भारतातल्या ६५ टक्के कुटुंबांना त्यांच्या मुलांमध्ये नैराश्याची मानसिक समस्या आणि आत्महत्या करण्याची मानसिक प्रवृत्ती आहे, याची पुसटदेखील जाणीव नसते.’

भारतात आजही मानसिक विकारांकडे फारसं गंभीरपणे पाहिलं जात नाही. डब्ल्यूएचओच्या एका अहवालानुसार, संपूर्ण जगापेक्षा भारतात नैराश्य मनोविकारानं ग्रासलेले मनोरुग्ण सर्वांत जास्त आहेत. तीनपैकी एका भारतीयाला ‘नैराश्या’चा विकार आहे. मानसशास्त्रज्ञ वेदवती परांजपे-सुर्वे म्हणतात, ‘आपल्याकडच्या तरुणांच्या आत्महत्येमागचं नैराश्य लक्षात घेतलं जात नाही. दिसतं त्यापेक्षा आपल्याकडच्या तरुणांमध्ये नैराश्याचं प्रमाण खूपचं जास्त आहे.

एखाद्या तरुणाला तो आळशी आहे, पडूनच असतो, एखाद्या तरुणीला ती रडकी आहे, रडतचं असते, असं म्हणत, त्यांची हेटाळणी केली जाते. त्यामागं ‘नैराश्य’ हा मनोविकार असू शकतो. एखाद्या तरुणाला जेव्हा कसलाच आनंद, उत्साह वाटत नाही, कशातच रस वाटत नाही, तेव्हा ती धोक्याची घंटा असू शकते.’’

आत्महत्या करणाऱ्या ८० टक्के तरुणांमध्ये आत्महत्येच्या प्रयत्नांआधी काही पूर्वखुणा दिसून येतात. त्यात त्यांच्या खाण्या-पिण्याच्या, झोपण्याच्या सवयीत अचानक झालेला बदल, मित्र-मंडळी-घरच्यांपासून तसंच रोजच्या उपक्रमांपासून स्वत:ला शरीर-मनानं दूर करणं, आक्रमक कृती, बंडखोरीचं वागणं, पळून जाणं, मादक द्रव्य आणि दारूचा वापर, स्वत:च्या दिसण्याकडे दुर्लक्ष करणं, व्यक्तिमत्त्वात अचानक मोठा बदल होणं, सतत कंटाळवाणं वाटणं, मनाला कुठल्याही गोष्टीवर एकाग्र करायला जड जाणं, सतत शारीरिक दुखण्यांबाबत तक्रारींचा पाढा वाचणं, पूर्वी आनंददायक वाटणाऱ्या गोष्टींतला रस संपणं, स्तुती किंवा बक्षिसांबाबत बेपर्वाई वाटणं, नाकारलेपणाची भावना निर्माण होणं, अचानक सर्व गोष्टी व्यवस्थित करणं, निराशेच्या काळानंतर अचानक आनंदी आहोत असं दाखवणं, चिडचिडेपणा भ्रामक कल्पना किंवा चित्र-विचित्र विचार करणं आदी बाबींचा समावेश असतो.

गेल्या दशकभरापूर्वी आलेल्या समाजमाध्यमांनी जगावर मोठ्या प्रमाणावर प्रभाव टाकल्याचं दिसून येतं. आपल्या देशातली तरुण पिढी (१५ ते ३० वयोगट) फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटसॲप, यू-टयूब, ट्विटरवर बराच वेळ खर्च करताना दिसते. समाजमाध्यमांचा अतिरेकी वापर तरुणांमधील आत्महत्येच्या प्रवृत्तीला नकारात्मक अर्थानं खतपाणी घालताना दिसतो.

जसं- यशस्वी आत्महत्या कमी त्रासात कशी करावी, यांसारखी धोकादायक माहिती सहज उपलब्ध होणं, वर्तनात बदल होणं, न्यूनगंडाची भावना होणं, सायबरबुलिंगसारखे धोके वाढू शकतात. माहितीजालावर असलेला ‘सुसाईड-पॅक्ट’ ज्यांत दोन किंवा अधिक व्यक्ती एका विशिष्ट वेळी सारख्याच प्राणघातक पद्धतीनं स्वत:चं जीवन संपवतात.

यू-ट्यूबवरचे स्वत:ला इजा पोहचवण्याचे व्हिडीओज्, समाज-माध्यमांतून झटपट प्रसारित होणाऱ्या यशस्वी आत्महत्या केलेल्यांच्या ‘सुसाईड-नोटस्’ वाचून आत्महत्येकडे प्रवृत्ती असलेल्यांवर अतिशय नकारात्मक प्रभाव पडतो. समाज-माध्यमामुळे एकस्ट्रीम कम्युनिटीज्, ऑन-लाईन ग्रुपशी सहज संपर्क प्रस्थापित होऊन आत्महत्याप्रवण तरुण स्वत:ला नुकसान पोहचवू शकतात.

२०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, जी किशोरवयीन मुलं दररोज दोन तासांपेक्षा जास्त वेळ समाज-माध्यमांच्या संकेत-स्थळांना भेटी देतात, त्यांचं मानसिक स्वास्थ्य इतर किशोरवयीन मुलांच्या तुलनेत अधिक बिघडलेलं असतं. समाजमाध्यमांचा अतिरेकी वापरामुळे आत्महत्येच्या विचारांना खतपाणी घालण्याच्या जोडीलाच आत्मसन्मानाची ‘हीन’ भावना वाढीला लागण्याचा, तसंच स्वत:च्या देहाविषयीची ‘अनुकंपनीय’ शरीर प्रतिमा निर्माण होण्याचा धोका वाढतो.

आत्महत्या करणाऱ्या तरुणांमध्ये ‘सोशलमीडिया इन्फ्ल्युएन्सर’ मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. यामागचं कारण सांगताना डॉ. राजेंद्र बर्वे म्हणतात, ‘‘समाज-माध्यमांचं जग ‘आभासी’ जग आहे. त्यात खरं काही नाही. यात घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीला स्थैर्य नाही. हे ज्याला कळत नाही, त्याच्या मनाची तडफड होते.

सोशल-मीडिया इनफ्ल्युएर्न्सना त्यांच्या कामाचं लाईक्स आणि शेअरच्या माध्यमातून ताबडतोब समाधान हवं असतं. ते जर त्यांना काही कारणानं मिळालं नाही, तर ते लगेच ‘डिप्रेशन’मध्ये जातात. कारण आभासी जगात मिळालेल्या झटपट प्रसिद्धीमुळे नैराश्य सहन करण्याची त्यांची क्षमता बरीच कमी असते. या लोकांमध्ये पैसा, प्रसिद्धी, लोकांकडून सतत वहावा मिळवण्याची तीव्र इच्छा असते. त्यामुळे ते भावनेच्या भरात वहावत जातात. लगे इम्पल्सिव्ह होतात.

आत्मकेंद्रीपण यांच्यात जास्त असतं. गोष्टी जरा कुठे मनासारख्या घडल्या नाहीत, जरा कुठे लाइक्स-शेअर्स कमी झाले, त्यांच्या कामाचं पुरेसं कौतुक झालं नाही की ते नैराश्यात जाऊन आत्महत्या करतात. थोडक्यात, समाज-माध्यमं आत्महत्यापूर्व वर्तन वाढवण्यात भर घालताना दिसतात. समाज-माध्यमांत आत्महत्याविरोधी माहितीही उपलब्ध असते, परंतु हळव्या तरुणांच्या मनावर सकारात्मकतेपेक्षा नकारात्मक गोष्टींचा प्रभाव चटकन पडतो.

पालकांनी पाल्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करून पाल्यांच्या ऑनलाईन-ॲक्टीव्हीटीजवर डोळसपणे लक्ष ठेवल्यास पुढील दुर्घटना बऱ्याच टळू शकतात. मानसशास्त्रीय समुपदेशिका डॉ. सुचित्रा कुलकर्णी-नाईक म्हणतात, ‘‘आयुष्यात प्रत्येकालाच काही ना काही प्रश्न हे असतातच. त्यामुळं कुठल्याही ‘तात्कालिक’ समस्येसाठी आत्महत्येसारखं ‘कायमस्वरूपी’ सुटकेचा मार्ग काढू नका; तर समस्यांना बगल देत हिमतीनं पुढे चला.

‘आभासी’ जगापेक्षा ‘वास्तव’ जगात रहाणं, हसणं, सामाजिक सुसंवाद प्रस्थापित करणं अधिक महत्त्वाचं आहे.’ तंत्रज्ञानाचा वापर केवळ गरजेपुरताच आवश्यक तेवढाच करावा. नाहीतर त्यातून डोळ्यांच्या, मज्जासंस्थेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. झटपट प्रसिद्धीच्या मागे लागू नका. कारण ही प्रसिद्धी जितक्या झटपट मिळते, तितक्या झटपट ती विरूनही जाते.

तुमची भावना निवडायचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तेव्हा नेहमीच सकारात्मक गोष्टींची निवड करा. जगावं की मरावं, प्रत्येकाची स्वत:ची ‘निवड’ आहे. निसर्गनियमाप्रमाणं प्रत्येकासाठी मरण अटळच आहे. मरण जर अटळंच असेल, तर मिळालेलं जीवन आनंदानं, अर्थपूर्ण रीतीनं का जगू नये?

शिक्षणानं विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानलालसा निर्माण केली पाहिजे. अभ्यासात स्वावलंबी बनवलं पाहिजे. मार्कांपेक्षा त्यांच्या ज्ञानसंपादनाच्या प्रयत्नांचं कौतुक झालं पाहिजे. अभ्यासक्रमात जीवन जगण्याची कौशल्यं, भावनांचं-तणावांचं व्यवस्थापन या गोष्टींचा अंतर्भाव होणं गरजेचं आहे.

dularid111@gmail.com

(लेखिका विविध सामाजिक विषयांवर लेखन करतात.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

SCROLL FOR NEXT