Foreign Currency sakal
सप्तरंग

व्यवस्थापन परकीय चलनाचं

उद्योगाचं जवळपास पूर्णपणे जागतिकीकरण झाल्याने आपण परकीय चलन टाळूच शकत नाही. अप्रत्यक्षपणे तर परकीय चलनाशी आपला संबंध रोजच येतो.

सकाळ वृत्तसेवा

उद्योगाचं जवळपास पूर्णपणे जागतिकीकरण झाल्याने आपण परकीय चलन टाळूच शकत नाही. अप्रत्यक्षपणे तर परकीय चलनाशी आपला संबंध रोजच येतो.

- डॉ. गिरीश जाखोटिया, girishjakhotiya@gmail.com

उद्योगाचं जवळपास पूर्णपणे जागतिकीकरण झाल्याने आपण परकीय चलन टाळूच शकत नाही. अप्रत्यक्षपणे तर परकीय चलनाशी आपला संबंध रोजच येतो. उदाहरणार्थ - कच्चं तेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू अथवा सेमिकंडक्टर्स आपण बहुतांशाने आयात करतो. हां, यूरो, पाउंड, येन, युआन, रुबल, रियाल, दिरहॅम इ. चलनांपेक्षा अमेरिकन डॉलरशी आपला मोठा संबंध येतो. गेली जवळपास दीडशे वर्षं हे अमेरिकन चलन आपलं वर्चस्व सांभाळून आहे आणि आजही ते आपली दादागिरी करतं आहेच.

अर्थात, यामुळे बहुतेक उद्योजकांना (आणि व्यवस्थापकांनासुद्धा) डॉलर्स कमवावेसे वाटतात. सोन्याच्या बरोबरीने अमेरिकन डॉलर हे एक आंतरराष्ट्रीय चलन म्हणून अजून किमान पन्नास वर्षं तरी जागतिक व्यवहारात प्रभावशाली राहील याबाबत शंका नसावी. बऱ्याच उद्योगांचा नफा हा परदेशी चलनाच्या चलाख व्यवस्थापनामुळे वाढतो, किंवा गंभीर चुकांमुळे घसरतोही. अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय घटकांचा एकत्रित व अनिश्चित परिणाम हा परकीय चलनावर होत असल्याने त्याचं व्यवस्थापन हे एक विशेष कौशल्याची बाब बनलं आहे.

ज्या परकीय चलनात आपण व्यवहार करू इच्छितो, त्याच्या मागील किमान तीन वर्षांच्या वाटचालीचा ढोबळ आढावा घ्यायला हवा. मुळात कोणत्याही चलनाची प्राथमिक ताकद ही त्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या एकूण कामगिरीवर अवलंबून असते. यातील पहिलं महत्त्वाचं निदर्शक म्हणजे ‘महागाईचा दर’ जो त्या चलनाची क्रयशक्ती (परचेसिंग पॉवर) ठरवीत असतो. उदाहरणार्थ - पाकिस्तान व श्रीलंकेतील भरमसाट महागाई व तेथील चलनाची प्रचंड पडझड या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. याव्यतिरिक्त चलनाची दूरगामी व नैमित्तिक कामगिरी ठरविणारे अनेक घटक असतात.

जसं की, त्या देशातील नैसर्गिक आपत्ती, युद्धजन्य परिस्थिती, राजकीय उलथापालथ, हळूहळू खालावणारी उत्पादकता, आयात-निर्यातीमधील अचानक झालेल्या असंतुलनामुळे डॉलरच्या तुलनेत बदललेली कामगिरी, देशातील परकीय चलनाचा साठा, परदेशी भांडवलाची गुंतवणूक इत्यादी. या सर्व घटकांचा परिणाम बारकाईने अभ्यासल्यास त्या चलनाची पुढील एका वर्षातील वाटचाल साधारणपणे लक्षात येऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चं तेल, सोनं, अमेरिकन बाँड्सची खरेदी-विक्री इ. सट्टासदृश उलाढालही लक्षात घेतली तर डॉलरची नैमित्तिक वाटचाल कळू शकते.

महत्त्वाची बाब अशी की, रुपया व डॉलरचं गुणोत्तर हे एखादी विशिष्ट वस्तू आयात (किंवा निर्यात) करताना लागू होईलच असं नाही. म्हणजे त्या वस्तूशी संबंधित ‘क्रयशक्तीची समतुल्यता’ (परचेसिंग पॉवर पॅरिटी) ही दोन चलनांना भिन्न भिन्न लागू होऊ शकते. उदाहरणार्थ - अमेरिकेत दुधाचे पदार्थ जसं की, आइस्क्रीम तुलनात्मकरीत्या खूप स्वस्त आहे. समजा, आपल्या इथं एक मोठा कप उत्तम आइस्क्रीम शंभर रुपयांना मिळत असेल, तर तेच आइस्क्रीम अमेरिकेत तीन डॉलर्सना मिळतं. आज एक डॉलर म्हणजे साधारणपणे ऐंशी रुपये होतात. अमेरिकेत आइस्क्रीमची किंमत होते रुपये दोनशे चाळीस. आइस्क्रीम हे तुलनेचं माध्यम घेतल्यास इथं भारतीय शंभर रुपये हे अमेरिकन तीन डॉलर्सच्या बरोबरीचे होतात. म्हणजे गुणोत्तर पूर्णपणे बदलतं.

निष्कर्ष असा की, प्रत्येक वस्तू व सेवेच्या बाबतीत स्थानिक वास्तव हे भिन्न भिन्न असू शकतं, जे दोन चलनांतील वरवरच्या गुणोत्तराने ठरत नाही. याठिकाणी मागणी व पुरवठा या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. परकीय चलनाचं व्यवस्थापन हे विविध प्रकारे होऊ शकतं. यातील दोन सामान्य प्रकार जे अगदीच प्रचलित आहेत ते म्हणजे, परकीय चलनाचा धोका बंदिस्त करणं आणि नैसर्गिक ‘हेज’ करणं. डॉलरच्या किमतीतील चढ-उतारांची जबाबदारी ही विशिष्ट शुल्क भरून परकीय चलनाच्या डीलरला किंवा बँकरला सोपवता येते. अर्थात, जेवढं परकीय चलन धोक्याचं, तेवढं शुल्क जास्त. या व्यवहारात अनेक लघु, मध्यम व दीर्घ मुदतीसाठीचे कल्पक प्रकार उपलब्ध असतात, जे त्या-त्या देशाच्या धोरणात्मक चौकटीत ठरवले जातात.

आजही याबाबतीत अमेरिका व इंग्लंड हे दोन देश जगाच्या खूप पुढं आहेत. नैसर्गिक हेज म्हणजे, ज्या परकीय चलनात आपण आयात करतो, त्याच चलनात निर्यात करायची. म्हणजे समसमान डॉलर्स मिळवले व खर्चले. हा एक प्रकारचा ‘झीरो सम गेम’ असतो. टाटा किंवा बिर्लासारख्या मोठ्या उद्योगसमूहांमध्ये समूह पातळीवर यासंबंधी व्यूहरचना आखली जाते, कारण समूहातील काही कंपन्या डॉलर्समध्ये निर्यात करत असतील, तर काही आयात करत असतील. अगदीच मोठ्या समूहाची स्वतःची बँक किंवा बँकिंगसदृश व्यवसाय करणारी कंपनी असते, जी परकीय चलनाचं संपूर्ण व्यवस्थापन पहाते.

‘करन्सी हेज’चा आणखी एक लोकप्रिय प्रकार म्हणजे, परकीय चलनातील कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करणं. उदाहरणार्थ - आपण डॉलर्स खर्चून अमेरिकेतून (किंवा अन्य देशातून) आयात करत असू, तर समांतररीत्या डॉलर्समधील अमेरिकन कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक करावी. डॉलर वधारल्याने आयातीत जे नुकसान होतं, ते कर्जरोख्यांवरील वाढत्या उत्पन्नाने भरून काढता येतं. काहीजण सोनं आणि डॉलर यांची सांगड घालून सोन्यावर आधारित बाँड्समध्ये गुंतवणूक करतात. परकीय चलनामध्ये म्युच्यअल फंड चालवणं, अनिवासी भारतीयांची गुंतवणूक डॉलर्समध्ये स्वीकारणं, परदेशी संस्थांना आपल्या समभागांमध्ये डॉलर्सच्या स्वरूपात गुंतवणूक करण्यास सांगणं इ. अनेक प्रकार इथं संभवतात.

बहुराष्ट्रीय कंपन्या या परकीय चलनाचं सर्वोत्तम व्यवस्थापन करण्यासाठी नावाजल्या जातात, कारण त्या शेकडो देशांमध्ये उद्योग करीत असतात. या कंपन्या सहसा त्या-त्या देशातीलच स्थानिक चलनांत बहुतांश व्यवहार करतात, ज्यामुळे चलनातील अस्थिरतेचा धोका कमी करता येतो. अर्थात, श्रीलंका किंवा पाकिस्तानमध्ये मात्र त्या डॉलरसारख्या चलनात अंतिम व्यवहार करतात व स्थानिक चलनातील आपली उलाढाल कमीतकमी ठेवतात. बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्या स्थानिक भांडवल व कर्जं घेऊन खेळत्या भांडवलाचं नियोजन करतात, परंतु यांचा अंतिम हिशेब हा डॉलरमध्येच येऊन संपतो.

परकीय चलनाच्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थापनात कल्पकतेचा असीमित वापर होऊ शकतो, जर दोन देशांनी संयुक्तपणे असं परस्परपूरक धोरण राबवलं तर. उदाहरणार्थ - टोक्यो व न्यूयॉर्क या दोन शहरांमध्ये साधारणपणे बारा तासांचं वेळेचं अंतर आहे. आज दिवसभर मी माझं खेळतं भांडवल टोक्योमध्ये येन या जपानी चलनात वापरतो, जेव्हा टोक्योमध्ये संध्याकाळ होते, तेव्हा त्याच तारखेचा दिवस न्यूयॉर्कमध्ये सुरू होतो, यामुळे टोक्योच्या कार्यालयातील येनमधील खेळतं भांडवल मी डॉलरमध्ये रूपांतरित करून ऑनलाइन लगेच न्यूयॉर्कच्या कार्यालयास पाठवू शकतो व पुन्हा तिथं दिवसभर त्याच तारखेसाठी वापरू शकतो. म्हणजे माझं भांडवल इथे चोवीस तास काम करत राहतं.

अन्य शब्दांत, त्याचा मी एकाच दिवसात डबल उपयोग करून घेतो. बऱ्याच बहुराष्ट्रीय कंपन्या या स्वस्त चलन असलेल्या देशांमध्ये उत्पादन करतात व महाग चलनांच्या देशांत विक्री करतात. जवळपास सर्वच बहुराष्ट्रीय कंपन्या या आपापल्या देशातील नामवंत आंतरराष्ट्रीय बँकेद्वारा आपले जगभरातील व्यवहार विविध चलनांमध्ये नियंत्रित करतात. यामुळे चलनांच्या चढ-उतारांबाबत यांना धोक्याचे किंवा फायद्याचे इशारे पटापट मिळतात. या सर्व कल्पक प्रयत्नांच्या एकूण रचनेला आपण चलनाचं ‘आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग’ म्हणू शकू ! पुढील भागात आपण पाहूयात उद्योगपतीची ‘टॉप टीम’.

(लेखक हे व्यवस्थापकीय, उद्योजकीय व वित्तीय सल्लागार आहेत. देशात व परदेशांत त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन! ट्रायल पेमेंटसाठी आज 1 रुपया पाठवला जाईल; बॅंक खात्यांची होईल खात्री अन्‌ बुधवारपासून उर्वरित रक्कम मिळणार

SCROLL FOR NEXT