accident esakal
सप्तरंग

काळ आला होता, पण वेळ आलेली नव्हती!

सकाळ डिजिटल टीम

लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल

ही थरकाप उडवणारी, अंगावर शहारे आणणारी घटना आहे १९८७ मधील. माझी आई म्हणजे श्रीमती सुशीलाबाई पवनलाल ओस्तवाल खऱ्या अर्थाने सकारात्मक नसती, तर-तर आज माझे जे सकारात्मकतेचे पंख अवकाशात झेप घेत आहेत, ते १९८७ मध्येच शांत होऊन गेले असते.

माझ्या वडिलांचा ३० मे १९८६ ला अत्यंत दुर्दैवीरीत्या वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराने अकाली मृत्यू झाला. त्यानंतर १२ डिसेंबर १९८६ ला मी नाशिक शहरात ओपीडी सुरू केले. त्यानंतरदेखील दीड-दोन वर्षे आमचे घर चांदवड या आमच्या गावी होते. काही शासकीय कामांसाठी मला आईला चांदवडहून नाशिकला घेऊन यायचे होते. आईला आम्ही सगळे भावंडे बाई म्हणतो. तरुण वयात दुचाकी चालविण्याच्या उत्साहामुळे, बाई नको-नको म्हणत असतानाही मी तिला अक्षरशः बळजबरी स्कूटरवर घेऊन आलो होतो. तो दिवस सोमवती अमावस्येचा होता. त्या वेळी असल्या कुठल्याही गोष्टींवर माझा विश्‍वास नव्हता. आईचा स्कूटरवर येण्यास नकारामागे या अमावस्येचादेखील वाटा होता. अर्थात‌च तिला आयुष्यातील भल्याबुऱ्या अनुभवांमुळे दुचाकीवरील प्रवास आणि तोही हायवेवरून हा अत्यंत जोखमीचा वाटत होता आणि जे की खरेही होते. त्यामुळेच तिचा खूप जास्त विरोध होताच. तरीही माझ्या ड्रायव्हिंगच्या आवडीमुळे (जी आजही कायम आहे) तरुण वयात बाईच्या विरोधावर मात करून आम्ही माय-लेक स्कूटरवर नाशिकला आलो होतो.

वडिलांच्या निधनानंतर बऱ्याच दिवसांच्या अंतराने आम्ही नाशिकला आलेलो असल्याने बरीच कामे शिल्लक होती. कामे आटोपता-आटोपता बराच उशीर झाला. कामांनंतर आम्ही मावशीकडे जेवण करून अंदाजे रात्री दहाच्या सुमारास चांदवडला जाण्यासाठी निघालो. अंदाजे अकरा-सव्वा अकरादरम्यान आम्ही शिरवाडे फाटा ते खडकजांबदरम्यान होतो. आमच्या स्कूटरचा अंदाजे वेग ६०-७० किलोमीटर प्रतितास असा होता. त्या काळात महामार्ग फक्त दुहेरी होता. बऱ्यापैकी मोठ्या वाहनांची वर्दळ होती. छोट्या वाहनांची ये-जा मात्र जवळपास नव्हतीच. पादचाऱ्याचा, दुचाकीचा तर विषयच नव्हता. इथपर्यंतचे मला आजही सर्व काही आठवते.

मात्र, त्यानंतर साधारणतः मला जे आठवले ते म्हणजे, मी तेव्हा काळ्या-पिवळ्या टॅक्सीमध्ये होतो. शेजारीच आई होती आणि अत्यंत जीवघेणी गर्दी टॅक्सीमध्ये झाली होती. साधारण १८ प्रवासी त्या टॅक्सीमध्ये कोंबलेले होते. मला काहीच कळत नव्हते, की नेमके काय झालेय? मी टॅक्सीमध्ये कसा? मग इकडेतिकडे बघायला लागलो, तर हायवेला आमच्या टॅक्सीच्या पुढे माझी स्कूटर चालली होती, क्रमांक होता एमजेआय ६४५३.
काहीच कळेना! आईला विचारायचा प्रयत्न केला, तर आई प्रचंड चिडली, ‘चूप बेठ’ (चूप बस) परत बोलायचा प्रयत्न केला, तर एक चापट खाल्ली. ‘चुपचाप घरे चाल, पचे थारा कने देखू’ (घरी चूपचाप चल, मग तुझ्याकडे बघते.) मला काहीच कळेना की नेमके काय चाललेय ते? मी माझ्या मेंदूला खूप ताण द्यायचा प्रयत्न केला. पण काही केल्या काहीच आठवत नव्हते. डोके मात्र खूप दुखत असल्याचे जाणवत होते. जणू डोक्यावर कोणी मार देत होते. शेवटी मी शांत बसलो.

टॅक्सी चांदवडला पोचली. नेहमी कुठलीही गाडी असली, तरी हायवेला पेट्रोलपंपाजवळ अथवा बस स्टॅँडजवळ उतरवून देत असत. या टॅक्सीवाल्याने चक्क घरापर्यंत टॅक्सी आणली. खाली उतरलो, तर आईने त्या टॅक्सी ड्रायव्हरला साष्टांग दंडवत केला. ‘भाऊ, तू देवासारखा धावून आलास. तुझी फार मदत झाली. तुझ्यामुळेच माझ्या मुलाचा जीव वाचला.’ मला एकावर एक आश्‍चर्याचे धक्केच बसत होते. नेमके काय झालेय कळत नव्हते.
आई आणि मी घरात गेलो आणि आत्तापर्यंत आईने मोठ्या मुश्‍किलीने थोपवून धरलेला अश्रूंचा बांध फुटला. रात्रीचे दोन वाजलेले. घरात म्हातारी आजी, लहान भाऊ, बहीण सर्व जण गाढ झोपेतून उठून बसलेले. आईला रडताना बघून सर्वच जण रडायला लागले. मात्र आईला सोडून कोणालाच काहीही कळत नव्हते. माझ्यासह आम्ही सर्व आईला विचारत होतो, आई काय झालंय? काय झालंय? आई हळूहळू शांत होत होती आणि मग आई बोलायला लागली. आता मात्र खूपच जास्त आश्‍चर्याचे धक्के बसायला लागले. आम्ही सर्व जण सुन्न झालो होतो.

झाले असे होते, की आम्ही शिरवाडे फाटा सोडल्यानंतर एका वळणावर आमच्या स्कूटरच्या पुढच्या चाकाची ट्यूबची पिन आपोआप निघाली होती (जे नंतर पंक्चर काढायला गेलो, त्या वेळी कळले). त्यामुळे अचानक पुढच्या चाकाची हवा पूर्णपणे निघून गेली. त्यामुळे आमचा तोल जाऊन आमचा अपघात झाला होता.सुदैवाने आईला कुठलीही दुखापत झाली नव्हती, जो आमच्यासाठी दैवी चमत्कारच होता. परंतु मला मात्र डोक्यावर पडल्याने ‘हेड इन्जुरी’ झाली होती (डोक्याला मार) आणि त्यामुळे मी अपघातस्थळी जागीच बेशुद्ध पडलो होतो. अगदी मी जिवंत आहे की मेलो? की कुठल्याही मिनिटाला मरणार हेही कळत नव्हते. अत्यंत बिकट आणीबाणीची परिस्थिती आईवर, आमच्यावर ओढावली होती.
आता विचार करा. एक ४२ वर्षांची स्त्री, जिचा पती ४६ व्या वर्षी अवघ्या काही महिन्यांपूर्वी कुठलाही आजार नसताना अचानक ‘ऑन द स्पॉट’ मृत्युमुखी पडला होता, तिचाच डॉक्टर मुलगा ज्याच्यावरती तिच्या संपूर्ण आयुष्याच्या आशा-आकांक्षा आता केंद्रित झाल्या होत्या. जो की आता पतीच्या आकस्मिक निधनानंतर सर्व घराचा आधार होणार होता. थोडक्यात जो तिचे सर्वस्व होता, तो मुलगा एक तर मरणाच्या दारात तरी होता, अथवा मृत्युमुखी तरी पडला होता. त्या स्त्रीची काय अवस्था झाली असेल किंवा आपण कोणीही स्वतः जरी अशा ठिकाणी असतो, तर काय अवस्था होईल.

मी हायवेवर एका बाजूला बेशुद्धावस्थेत. एका बाजूला तपकिरी रंगाची स्कूटर पडलेली. जिला कुठल्याही प्रकारचे रिफ्लेक्टर नाही, कुठलेही लाइट सुरू नाहीत... अमावस्येची रात्र. काळाकुट्ट अंधार, डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही, अशी परिस्थिती. आई काही महिन्यांआधी विधवा झालेली असल्याने आईने पांढरी साडी परिधान केली होती. दोन्ही बाजूने वाहने भरधाव येत-जात होती. आमचा अपघात अंदाजे अकराच्या सुमारास झाला होता. आई अव्याहतपणे मोठ्या हिमतीने प्रत्येक गाडीला हात देऊन मदतीसाठी याचना करत होती. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे आईने जणू काही एक अभेद्य सुरक्षाकवच माझ्याभोवती तयार केले होते. आई अर्धा-एक मिनिट जरी घाबरून बाजूला झाली, असती तर विचार करा, माझी काय अवस्था झाली असती? आपण हायवेवर एक चित्र नेहमी बघतो, एखादे जनावर खास करून कुत्रा एखाद्या गाडीला धडकून पडतो आणि नंतर काही मिनिटांतच त्याचे शरीर होत्याचे नव्हते होते. त्यावरून असंख्य वाहने येत-जात असतात.

कदाचित तीच अवस्था माझ्याही शरीराची झाली असती की नाही? कल्पनाही करवत नाही ना?त्या दिवशी खऱ्या अर्थाने अपघात झाल्यानंतर किती विदारक परिस्थिती निर्माण होते, हे आम्हाला पहिल्यांदा कळले. त्या दोन-अडीच तासांत आईने किमान अडीचशे ते तीनशे वाहनांना हात दिला असेल; परंतु एक तरी वाहन थांबले का? आणि अपघातानंतर जेवढ्या त्वरित वैद्यकीय मदत मिळेल तेवढा जीव वाचण्याची शक्यता अधिक असते. जसे की प्लॅटिनम अवर, गोल्डन अवर. मला इथे आज खेदाने नमूद करावेसे वाटते, की निव्वळ वैद्यकीय मदत न मिळाल्याने आपल्या देशातील अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ही आठ ते दहापट मोठी असावी. सुदैवाने यांच्यात आता काही प्रमाणात का होईना फरक पडतोय; परंतु अजूनही गरज आहे खूप सुधारणा होण्याची आणि हा टॅक्सीवाला तरी कसा थांबला? खरेतर तोही निघून चालला होता. थोडे पुढे गेल्यावर त्याच्या लक्षात आले, की अरे या तर पवन सरांच्या पत्नी दिसतात. पवन सर म्हणजे माझे वडील. तो माझ्या वडिलांचा विद्यार्थी होता. म्हणून त्याने टॅक्सी मध्ये थांबवली. तो जर वडिलांचा विद्यार्थी नसता तर? तर? विचारही करवत नाही.

अशाच प्रसंगांमध्ये आपली, आपल्या सकारात्मकतेची कसोटी लागत असते. आईच्या आयुष्यातील जे काही एखाददोन सगळ्यात वाईट प्रसंग असतील, त्यातील हा नक्कीच एक अत्यंत विदारक प्रसंग होता; परंतु आईने हा विदारक क्षण स्वीकारला. नुसताच स्वीकारला नाही, तर अत्यंत सकारात्मकरीत्या स्वीकारला अन्यथा? अन्यथा?
आज ज्या पद्धतीने मी अनेक बऱ्यावाईट घटनांना सकारात्मकतेने सामोरे जात असतो त्याचे बाळकडू आईने आम्हाला अशा अनेक छोट्या-मोठ्या प्रसंगांतून दिले आहे. आज मला यानिमित्ताने आपणा सर्वांना मनापासून आवाहन करावयाचे आहे, की आपण सर्वांनीदेखील हीच सकारात्मकता आपल्या आयुष्यात आणून आपले आयुष्य अजून सुंदर करू या.

लेखक सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT