लेखक - डॉ. हेमंत ओस्तवाल
जानेवारी २०२२ पासून आपण सर्व जण प्रत्येक रविवारी न चुकता मोठ्या उत्सुकतेने, आशेने, विश्वासाने ‘पंख सकारात्मकतेचे’ हे सदर वाचत असतात. माझ्यापर्यंत असंख्य प्रतिक्रियादेखील येत आहेत. प्रत्येक लेखामध्ये आपणास नक्कीच सकारात्मकता भरभरून दिसलेली आहे. आपण अनुभवली आहे. मला कित्येकांनी भेटून, भ्रमणध्वनीवरून, व्हॉट्सअॅप, ईमेल, एसएमएसद्वारादेखील विचारणा केली आहे, की एवढी सकारात्मकता आपल्यामध्ये कुठून, कशी, कुणामुळे, कुणाचे पाहून, जन्मापासूनच का? इत्यादी... आजच्या लेखामध्ये याच प्रश्नाचे ५० टक्क्यांहून थोडेसे जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न मी केला आहे.
आज मी माझ्या बाईचा, म्हणजेच आईचा, म्हणजेच श्रीमती सुशीला पवनलाल ओस्तवाल यांच्या आयुष्याचा प्रवासच जणू उलगडतोय. बाईच्या आयुष्यातील साधारणतः २३, २४ वयापर्यंतच्या सगळ्या गोष्टी मला माझ्या बाईकडून, नानाजी म्हणजे (स्व.) बाबूलालजी अमोलकचंदजी पारख, नानीजी म्हणजे (स्व.) सूरजबाई बाबूलालजी पारख, तसेच माझ्या चार मावश्यांकडून, बाईच्या इतर नातेवाइकांकडून माहीत पडलेल्या आहेत. वयाच्या २३, २४ पासून तर आजतागायत, आता आमची बाई ८०-८१ वर्षांची आहे, म्हणजे जवळपास ५६-५७ वर्षांपासून तर मी स्वतःच या सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे.
आमच्या बाईचा जन्म स्वातंत्र्यापूर्वी, १५ जुलै १९४३ ला झाला. मोठ्या दोन बहिणी, छोट्या दोन बहिणी, जन्म रेडगाव मिरचीच्या पालखेडजवळ (ता. निफाड, जि. नाशिक) येथे झाला. त्यावेळी आजोबांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. छोटेसे किराणा दुकान आणि थोडीशी शेती. आमची बाई चार वर्षांची असताना आजोबांनी खडकजाम (ता. चांदवड) येथे स्थिरस्थावर होण्याचा प्रयत्न केला. खडकजाम येथेही छोटेसे किराणा मालाचे दुकान टाकले. आजोबांची प्रकृती तेवढी चांगली राहत नसल्याने, जास्त वेळ ही दुकानदारी बाई व तिच्या इतर बहिणी करत असत. अगदी किराणा दुकानाची सामान खरेदीदेखील, बाई पाच किलोमीटरवरील वडाळीभोईला पायी जाऊन करीत असे. या सगळ्याबरोबरच बाईची वयाच्या पाचव्या वर्षी शाळा सुरू झाली. खडकजाम येथे चौथीपर्यंतची एकशिक्षकी शाळा होती. खऱ्या अर्थाने बाई फक्त पहिले तीन महिने शाळा शिकली. बाई जात्याच खूप हुशार असल्याने त्या वेळचे चौथीपर्यंतचे शिक्षण तिने जवळपास पहिल्या तीन महिन्यांतच संपविले. उरलेली इतर पावणेचार वर्षे बाई कुठल्यातरी एका वर्गाला शिकवीत असे.
एकीकडे गुरुजी, तर एकीकडे आमची बाई असे त्या शाळेत शिक्षण सुरू असे. म्हणता म्हणता चौथीची वार्षिक परीक्षा आली. त्या काळी आज जसे दहावी-बारावीला बोर्डाची परीक्षा असते, तसे त्या वेळी चौथी, सातवी आणि अकरावीला बोर्डाची परीक्षा असे. बोर्डाच्या परीक्षेकरिता विशिष्ट केंद्र असे. ज्यामध्ये तालुक्यातील अनेक शाळांचा समावेश असे. बाईला त्या वेळी वडाळीभोई केंद्र बोर्डाच्या परीक्षेकरिता मिळाले आणि आमची बाई वडाळीभोई केंद्रामध्ये त्या वेळी दुसरी आली होती. अर्थातच पुढे गावात शिक्षणाची सोय नसल्याने आणि बाहेर कुठे पाठविण्यासाठी आर्थिक ताकद नसल्याने बाईचे शिक्षण तेथेच थांबले. यादरम्यान आमच्या आजोबांची प्रकृती जास्तच खराब होत चालली होती म्हणून आता बाईने किराणा दुकान चालविण्याबरोबरच, अक्षरशः शेतांमध्ये रोजंदारीने कामाला जायला सुरवात केली होती. बरोबरच गावातील इतर छोटी-मोठी कामेही ती करायला लागली होती.
ज्या वेळी कामे मिळत नसत त्या वेळी बाईने अक्षरशः जंगलातून लाकूडफाटा, गोवऱ्यादेखील वेचून आणलेल्या आहेत, विकलेल्या आहेत. भाव किती असावा, तर एक रुपयाला एक.पोतेभर गोवऱ्या या भावाने बाई द्यावयाची. ही सर्व कामे करण्याची हिंमत, हुशारी, धीटपणा इतर बहिणींमध्ये फारसा नव्हता. बाईमध्ये या सर्व गोष्टी ठासून भरलेल्या होत्या. इतर बहिणी म्हणजे छोट्या लीलाबाई आणि कंचनबाई. मोठ्या झंकारबाई आणि कौशल्याबाईचे लग्न खडकजामला येतानाच झालेले होते.
अशा खडतर परिस्थितीमध्ये बाईचे आयुष्य एवढ्या छोट्या वयामध्ये सर्व घर सांभाळून चालून चालले होते. म्हणता म्हणता बाई १४ वर्षांची झाली आणि त्या वेळच्या रिवाजाप्रमाणे लग्नाचे विषय सुरू झाले. त्या काळी मुलांना फारच जास्त डिमांड होती, मागणी होती. हुंड्याचे प्रमाण भरपूर होते. आजोबांची आर्थिक स्थिती तर अत्यंत कमकुवत होती. घर जवळपास बाईच्या मेहनतीवरती सुरू होते आणि त्यामुळे बाईला स्थळे सांगून यायला तर लागलीच, परंतु ती सर्व दुजवर, तीजवर किंवा कुठले तरी वैगुण्य असलेला मुलगा अशा प्रकारची स्थळे येऊ लागली. एक घडलेली घटना येथे सांगण्यासारखी आहे. बाईला त्या वेळी पिंपळगाव बसवंत येथील एक दुजवर मुलगा बघायला आला. प्राप्त परिस्थितीमध्ये आजोबांनाही तो पसंत पडला. गावातील चार ओळखीच्या लोकांनीही होकार दर्शविला आणि बाईला हे माहीत पडताच तिने काय केले असेल बरे? बाईने स्वतःला एका खोलीमध्ये कोंडून घेतले आणि तिथूनच सांगून टाकले, ‘मी भलेही कुवारी राहीन, परंतु मी आयुष्यात दुजवर-तीजवर अशा कुठल्याही मुलाशी लग्न करणार नाही. करेन तर फक्त सुशिक्षित आणि ज्याचं नियमितपणे पहिलं लग्न होत आहे अशाच मुलाशी मी लग्न करेन.’
आजोबांनी ओळखी-पाळखीच्यांनी आईला आहे त्या परिस्थितीबद्दल बरेच काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील बाईने त्यांचे काहीही ऐकले नाही. खोलीचा दरवाजा तेवढा मजबूत नव्हता. तो उघडून जाऊ नये म्हणून बाईने काय केले असेल बरे! चक्क किराणा मालाचे जे डबे होते ते दरवाजाला लावून वरती स्वतः बसली आणि दरवाजा उघडू नये म्हणून पुरेपूर काळजी घेतली. शेवटी आजोबांचा नाइलाज झाला. आजोबांनी त्या पाहुण्यांना परत पाठवून दिले, मगच बाईने दरवाजा उघडला. अशी बाई अत्यंत सकारात्मक, अतिशय योग्य निर्णयक्षमता, अर्थातच बाईच्या अशा अनेक पैलूंवर आपण पुढे नजर टाकणार आहोतच. गाव अत्यंत छोटे असल्याने झालेल्या प्रकाराची वाच्यता फार पटकन पूर्ण गावामध्ये झाली. गावातील मुलांची नजर बदलली आणि आजोबांच्या तब्येतीला मर्यादा असल्याने आजोबांनी आणि बाईने गाव सोडण्याचा निर्णय घेतला. अशारीतीने बाईच्या वयाच्या चौदाव्या वर्षी चांदवडला राहायला आले. आजोबा जाऊन-येऊन, कधी बाईबरोबर असायचे, तर कधी एकटे जाऊन खडकजामचे किराणा दुकान काही वर्षे चालविले. धंदा असा फार जास्त नव्हताच.
हळूहळू तोही जवळपास बंदच पडला. प्रकृतिअस्वास्थ्यामुळे आजोबांचे काम करणे जवळपास बंद पडले. त्यांना अगदी चालणेही शक्य होत नव्हते. जवळ असलेले पैसे थोडेफार व्याजाने देऊन आणि बाई जे काही कमवेल त्यावरच सर्व कुटुंब अवलंबून झाले. बाई तिच्या सख्ख्या मावसा-मावशी म्हणजे श्री. हरकचंदजी डुंगरवाल यांच्या घरी दिवसभर काम करायची आणि मावशीकडेच खाणेपिणेही व्हायचे. वरतून वर्षातून दोनदा कपडेही मिळायचे. सोबतच बाईच्या मावस भावाची म्हणजे श्री. ताराचंदजी डुंगरवाल यांचा प्रिंटिंग प्रेसदेखील होता. त्या प्रिंटिंग प्रेसची कामे बाई करायची. जसे की पावती पुस्तक छापलेले असले तर त्याच्यावर नंबर्स मारायचे. अशा प्रकारची कामे बाई करायची. सोबत गावामध्ये कोणाच्याही घरी काही काम निघाले तर हमखास बाईला बोलावणे येणार. मग बाई जाऊन ती कामे करायची. त्या काळी मासिक पाळीच्या वेळी चार दिवस अतिशय कडक पद्धतीने बाजूला बसविले जायचे. मग त्यांच्या इथे जाऊन स्वयंपाक करून दे, अजून काही इतर कामे करून दे. थोडक्यात काय, कुठलीही कामे असली तर बाई जाऊन करून द्यायची. त्यातून मिळणाऱ्या तटपुंज्या कमाईवर आजोबांचे घर चालत होते. दिवस चालले होते आणि जो खेळ खडकजामला सुरू झाला होता तोच चांदवडलादेखील सुरूच होता. लग्नासाठी दुजवर-तीजवर मुलांची स्थळे येत होती. बहुतेक वेळा बाई मावशीच्या घरातील कामे करीत असायची. बहुतांश वेळा धुणीभांडी करायची. कपडे गुडघ्यापासून वरती कंबरेला खोचलेले असायचे.
बाई अगदी त्या अवस्थेत त्या मुलांच्या समोर यायची आणि स्पष्टपणे त्यांना तोंडावर सांगायची, ‘मी लग्न करीन तर सुशिक्षित, पहिल्यांदा लग्न करणाऱ्या मुलाशी. मला तुमच्याशी लग्न करायचं नाही. कृपया आपण जावं,’ असे उत्तर बाईने कित्येक वेळा दिले. बाईचा तो आवेश, ती हिंमत, तो अवतार बघून ती पाहुणेमंडळी अक्षरशः अवाक होऊन जायची. म्हणता म्हणता बाईला विसावे वर्ष लागले. त्या वेळी बाईच्या कामसू, सकारात्मक, धाडसी, योग्य वेळी योग्य निर्णय, सर्वांना मदत करण्याच्या स्वभावाची चर्चा पूर्ण चांदवड गावात, पंचक्रोशीत व्हायला लागलेली होती. त्या वेळी चांदवडच्या श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम या संस्थेमध्ये बिनायक्या नावाचे गृहस्थ व्यवस्थापकपदावर कार्यरत होते. त्याच वेळी आमचे भाऊसा म्हणजे माझे वडील श्री. पवनलालजी चंदुलालजी ओस्तवाल शिक्षक म्हणून संस्थेच्या श्री नेमिनाथ जैन हायस्कूलमध्ये नुकतेच रुजू झाले होते. वडिलांचीही कष्ट करण्याची कामसू वृत्ती, सकारात्मकता, सगळ्यांना घेऊन चालण्याचा स्वभाव, वडिलांच्याही घरची गरिबी हे सर्व त्यांच्या नजरेत आले होते. त्यामुळे त्यांनी आमच्या नानाजींची बोलणी करून नुसता बाईकरिता प्रस्ताव न आणता, बाई आणि तिची लहान बहीण लीलाबाई म्हणजे माझी मावशी या दोघींकरिता वडील आणि त्यांचे मोठे भाऊ असा प्रस्ताव आणला. भाऊसांचे भाऊ म्हणजे श्री. पूनमचंदजी ओस्तवाल हे त्यांच्या मानाने खूप अशिक्षित होते. फक्त चौथी पास होते. हे जसे बाईला माहिती पडले तसा बाईचा पुनश्च एकदा संताप संताप झाला.
बाई खूप चिडली. नानाजींना बोलली, की मी तुम्हाला किती वेळा समजून सांगितले, की मी भले पाहिजे तर कुवारी राहीन परंतु अशिक्षित, दुजवर, तीजवर इत्यादी कुणाशीही लग्न करणार नाही, मग आपण असे का करता आहात? मला हे लग्न करायचे नाही, असे बाईने नानाजींना निक्षून सांगितले. शेवटी नानाजींनी परत बिनायक्या यांना बोलवून, त्यांना स्पष्ट सांगितले, की मी एकच मुलगी देईन तीही फक्त शिक्षक असलेल्या पवनलालजी यांना. अशा रीतीने आमच्या बाई आणि भाऊसांचे लग्न, नाशिकच्या गोदातीरी त्या काळी पन्नास रुपयांमध्ये, म्हणजे १९६३ मध्ये लागले. आर्थिक स्थितीबद्दल दोन्हीकडे अगदी आनंदीआनंद होता. किती आनंदीआनंद असावा बरे तर! लग्नामध्ये स्वतःचे घालण्याचे कपडेदेखील दोघांकडेही नव्हते, ते दुसऱ्यांचे घातले होते. यापलीकडे काय आता सांगावे? याच्यातच सर्व काही आले. अशा प्रतिकूल परिस्थितीतून जीवनामध्ये संघर्ष करीत बाई आणि भाऊसांनी त्यांच्या संसाराची सुरवात केली होती. हा सर्व संघर्षमय सकारात्मक इतिहास खासकरून बाईचा (भाऊसांच्या जीवनातल्या संघर्षमय सकारात्मकतेबद्दल आपण स्वतंत्र लेखांमध्ये अनुभवणारच आहोत.) मला माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावरती, माझ्या सर्व जवळच्या नातेवाईक, बाईच्या माहेरच्या मित्रमंडळींमधून मला अनुभवायला मिळालेला आहे. हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, की बाईने किती प्रतिकूल परिस्थितीतून आपले आयुष्य घडविले आहे, याची जाणीव आपणा सर्वांना व्हावी.
याच्या पुढचा बाईच्या आयुष्याचा सकारात्मक प्रवास हा माझ्यासमोरच अत्यंत स्फूर्तिदायक, प्रेरणादायी घडत आहे, घडलेला आहे. या सर्व आणि यापुढील बाईच्या आयुष्यातील घटनांमधून सकारात्मकता अधोरेखित करण्यासाठी मी बाईच्या आयुष्यातील घडलेल्या घटनांना सात भागांमध्ये विभागतो आहे आणि हे सर्व सात गुण जगातील सात आश्चर्यांपेक्षा कमी नाहीत,
ते असे ः
१) शिक्षण
२) निर्मोही कष्ट
३) निडरता
४) मध्यवर्ती भूमिका
५) समाजसेवा
६) त्याग
७) धर्म
या विषयांमध्ये जेव्हा आपण सखोल बघतो तेव्हा अक्षरशः आपण आश्चर्यचकित होतो, की एकाच व्यक्तीमध्ये एवढे सर्व गुण कसे शक्य आहेत? आणि म्हणूनच मी यांची तुलना जगातील सात आश्चर्यांशी केली आहे. कारण यातला एखादाही गुण कोणत्याही व्यक्तीमध्ये असला, तरी आपण त्याला चांगली व्यक्ती असे संबोधतो. चला, तर बघू या या एकेक गुणविशेषाकडे!
शिक्षण ः बाईने स्वतः लहानपणी किती कष्ट करून आणि तेही खऱ्या अर्थाने फक्त तीन महिने शिक्षण घेऊन आणि पावणेचार वर्षे इतर वर्गांना शिकवून, चौथीपर्यंतची शाळा शिकली. त्यातही घरचे किराणा दुकान सांभाळणे, इतर रोजंदारीवरची कामे करणे इत्यादी इत्यादी सुरूच होते. एवढे करूनही बाईने त्या वेळी वडाळीभोई केंद्रात दुसरा नंबर मिळविला होता. नाइलाजाने आर्थिक स्थितीअभावी आणि गावात चौथीपर्यंतच शाळा असल्याकारणाने बाईचे पुढील शिक्षण दुर्दैवाने होऊ शकले नव्हते. ज्याची खंत बाईला आयुष्यभर, अगदी आजही आहे. तथापि, त्या काळी आणि त्यानंतर अगदी आजतागायतदेखील, आयुष्याच्या शाळेमध्ये पूर्णपणे सकारात्मकतेचे जे शिक्षण घेतले आहे ते फार क्वचित कोणी घेत असेल एवढे नक्की. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीतही बाईने केंद्रामध्ये दुसरा नंबर घेऊन आपल्या हुशारीची चमक नक्कीच दाखविली होती. असो. हे सर्व झाले बाईच्या स्वशिक्षणाबद्दल; परंतु याहीपलीकडे तिला आमच्या शिक्षणाची काळजी तर होतीच, परंतु तिने अनेक नातेवाइकांमध्ये मुला-मुलींना ऐपत नसताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना, अनेक जणांना आईने चांदवडला आमच्या घरी ठेवून शिकविले, सुसंस्कारित केले. आयुष्यभरासाठी शिक्षणाचा, संस्कारांचा ठेवा दिला. तिने हे फक्त नातेवाइकांसाठीच केले का? नाही. ज्यांना ज्यांना म्हणून मदत करणे शक्य आहे, त्यांना आईने फार मोठ्या प्रमाणामध्ये नेहमीच मदत केली. आज अनेक मुले, मुली आपापल्या आयुष्यात, अनेक उच्च पदांवर कार्यरत आहेत. उद्योगधंद्यांमध्ये अग्रेसर आहेत. फार लांब जाण्याची गरज नाही, अगदी माझेच उदाहरण घ्या ना. मी जे डॉक्टर झालेलो आहे याचे संपूर्ण श्रेय बाईलाच जाते. ‘माझ्या हेमंतला डॉक्टरच करीन’ हे संपूर्णपणे तिचे स्वप्न होते. खरे सांगायचे तर माझी आवड एनडीएमध्ये जाऊन देशसेवा करायची, हे माझे स्वप्न होते. आज जे काही मी डॉक्टर झालोय, यशस्वी डॉक्टर झालोय याचे खरे श्रेय आमच्या बाईलाच जाते. अशा अनेकांच्या आयुष्याची बाई शिल्पकार आहे.
आता वळू या बाईच्या पुढच्या गुणाकडे, तो म्हणजे निर्मोही कष्ट ः आपण बाईच्या आयुष्यातील लहानपणातील कष्टांची एक फक्त झलक बघितली. बाई आणि कष्ट तेही नुसते कष्ट नाहीत, तर निर्मोही कष्ट. म्हणजे काय? बाईला जेथे म्हणून संधी मिळेल, कुठेही, कुणाकरिताही काहीही करायची संधी मिळाली, अगदी समोरची व्यक्ती बाईशी बोलत नसली तरीही बाईला त्या व्यक्तीकरिता, कष्ट करण्याकरिता बाईला कधीही अडचण आली नाही. आपणास आश्चर्य वाटेल, पण बाई कुठल्याही कष्टापासून, कामापासून कधीही मागे सरकलेली नाही. काही उदाहरणे मी इथे देऊ इच्छितो. मला आठवते, माझी लहान बहीण ज्योतीचे लग्न होते, वर्ष १९९१. लग्न आधी नाशिकला करायचे ठरविले होते, आपणा सर्वांना आठवत असेल, तर त्याचदरम्यान कुवेत युद्ध सुरू झाले. सर्वत्र डिझेल-पेट्रोल इंधनाची टंचाई सुरू झाली आणि त्यामुळे नाइलाजास्तव नाशिकला ठेवलेले लग्न आम्ही मुंबईला बोरिवलीला करायचे ठरविले. आपल्या सगळ्यांमध्येच गावजेवणाची पद्धत असते, तसे आम्हालाही गावजेवण द्यायचे होते. आमच्या जैनांमध्ये अशा वेळी शक्यतो कुंकुमच्या दिवशी गावजेवणाचा कार्यक्रम ठेवतात. मुंबईला लग्न ठेवल्यामुळे आमच्या बजेटचे अगोदरच तीन तेरा झालेले होते. मुळात लग्नाचा खर्च मुंबईला गेल्यामुळे वाढला होता.
ट्रान्स्पोर्टेशनचाही खर्च वाढला होता आणि त्यात अजून नाशिकच्या गावजेवणाचा खर्चदेखील वाढत होता. त्या वेळी आमची आर्थिक स्थिती नक्कीच तेवढी चांगली नव्हती. काय करावे, मोठा अवघड प्रश्न आमच्या ओस्तवाल परिवारासमोर त्या वेळी उभा ठाकला होता आणि त्यातून मार्ग आमच्या बाईनेच काढला. त्या वेळी त्रिमूर्ती चौकातील माझ्या ओपीडीच्या बाजूचा एक फ्लॅट खाली होता. बाईने चक्क घरच्या घरी अडीचशे-पावणेतीनशे लोकांचा स्वयंपाक केला होता. आम्ही सर्व, काही आमचे मित्र, असे सर्व मिळून बाकीचे कामकाज केले. अगदीच अशक्य वाटत असलेले गावजेवणदेखील घरच्या घरी स्वयंपाक करून केले होते. आपणास आश्चर्य वाटेल, नियोजन केले होते दीडशे लोकांचे आणि जेवले जवळपास पावणेतीनशे लोक. कुठेही अडचण आली नाही. काहीही कमी पडले नाही. काय कारण असावे बरे? तर फक्त बाईची सकारात्मकता. मला भीती वाटत होती. हे कमी पडेल, ते कमी पडेल, पण बाई मात्र निश्चिंत होती. ‘काही चिंता करू नकोस, काहीही कमी पडणार नाही’, हे बाईचे उद्गार होते. आमची बाई म्हणजे खरोखर साक्षात अन्नपूर्णाच आहे. मी फक्त मोठी मोठी उदाहरणे घेतो आहे. अजून एक उदाहरण म्हणजे माझे वडील म्हणजे पवन सर हे अकाली, वयाच्या ४६ व्या वर्षी, स्वर्गवासी झाल्यानंतर आमच्या घरची परिस्थिती अत्यंत बिकट झाली होती. वडील शिक्षक होते.
ज्या दिवशी मृत्युमुखी पडले होते त्याच दिवशी वडिलांचा पगारही बंद झाला होता. मुळातच काही कारणाने भाऊसा मृत्युमुखी पडतानाच आमच्यावर बऱ्यापैकी कर्ज होते आणि त्यात अजून घरातली संपूर्ण कमाई ठप्प झालेली होती. अक्षरशः खायचे काय? कसे? ही परिस्थिती आमच्यावर उद्भवलेली होती. माझे वैद्यकीय शिक्षण त्या वेळी नुकतेच पूर्ण होऊन मी पुणे येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये रेसिडेंट मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होतो. माझीही ओपीडी वगैरे काहीही सुरू नव्हती. इतर कुठलाही उत्पन्नाचा मार्ग त्या वेळी आमच्याकडे नव्हता. पतीचे अकाली निधन म्हणजे वयाच्या ४६ व्या वर्षी झालेले निधन बाईने सकारात्मकरीत्या स्वीकारून, लगेच घरगुती खानावळ-मेस सुरू केली. हाताखाली कुठलेही नोकरचाकर नसताना आमच्या नानीजी व लहान भाऊ संजय यांच्या मदतीने सुरू केली होती. थोडीथोडकी नव्हे तब्बल शंभर माणसे त्या वेळी आमच्याकडे जेवायला येत असत आणि या १०० माणसांच्या खानावळीवरच त्या वेळी आमचे घर चालले. मलाही ओपीडी टाकण्याकरिता त्यातूनच बाईने पैसा दिला. अशी आमची बाई जी कष्टाला कधी हरली नाही. ही मोठी मोठी उदाहरणे झाली.
याहीपलीकडे चांदवड गावामध्ये आणि आजदेखील नाशिकमध्ये कोणाकडेही काही प्रसंग उभा राहिला तर आमची बाई तेथे हमखास उभी असायची किंवा असते. त्या वेळी अक्षरशः अनेक घरांचे लोणचे घालण्याचे काम, थंडीचे लाडू करण्याचे काम, मकरसंक्रांतीचे तिळगूळ, बोरबण्याचा लाडू अशी नानाविध कामे बाई न चुकता, अव्याहतपणे, न थकता करत असे आणि हेच आजही सुरू आहे. तिला या सगळ्या कष्टांच्या बाबतीत कसल्याही आशा-अपेक्षा अजिबात नाहीत. स्वार्थ नाही, कोणी परत काही करावे, अशीही अपेक्षा नाही. अशा या आमच्या बाईचे निर्मोही कष्ट.
(लेखक प्रथितयश सुयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.