मल्लिका म्हणजे मोगरा. लहानपणी आम्ही वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला रे संपला, की एक-दोन दिवसात आजोळी पळायचो.
- डॉ. किरण पाठक
मल्लिका म्हणजे मोगरा. लहानपणी आम्ही वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला रे संपला, की एक-दोन दिवसात आजोळी पळायचो. माझं आजोळ पुणे. अर्थातच तिथं नळाला असणारं दिवसभराचं पाणी आणि अंगणात फुलणारी जाई, जुई, मोगऱ्याची झाडं हे आजी-आजोबांच्या प्रेमळ नात्याइतकंच सुगंधी आणि आनंददायक. उन्हाळ्यात दुपार तापली, की माठातलं थंडगार पाणी ही एक मेजवानीच असायची. भल्या पहाटे आम्हा मुलांना झोपेतून उठून ‘चला रे मुलांनो, फुलं काढा देवपूजा करायची मला,’ या आजीच्या हाकेनंच आमची सकाळ उजाडे. खरं तर देवपूजेच्या नावाखाली आजी निसर्गाचा जवळून परिचय आम्हाला करून देत होती.
आम्ही फुलं गोळा करून आणली, की त्यातली चांगली ओंजळभर मोगरीची फुलं आजी माठात टाकत असे. दुपारच्या वेळी मग हे पाणी पिताना त्या फुलांचा गंध पाण्यात उतरलेला असे. ते मोगर-गंधी पाणी पिणं हा आनंद स्वर्गीय. हे पाणी दिवसभरात संपलं नाही, तर या पाण्यानं आजी आम्हा मुलांना डोक्यावरून अंघोळ घालत असे.
लहानपणी अनुभवलेलं हे सुख पुढे आयुर्वेदशास्त्राच्या अभ्यास करताना, मोगरा हा शीतगुणी असल्यामुळे त्याचं पाणीही शीतगुणाचं म्हणजे पोटात थंडावा निर्माण करणारं, उन्हाळ्यात अंगाची होणारी काहीली कमी करणारं हे लक्षात आलं. हा मोगरा गुणानं जसा शीत; तसंच रूपही डोळ्यांना एक प्रकारे शीतलता देणारंच. (वार्षिकी शीतला लघवी टिकता दोषत्रयापहा।) ‘वार्षिकी’ हे मोगऱ्याचं एक नाव. त्याच्या टपोऱ्या कळ्यांचे फुलांचं शुभ्र स्वच्छ रूप हे कवीला मोहवणारं.
या मोगऱ्याच्या जाती अनेक. एक पाकळीचा म्हणजे सिंगल, दुहेरी पाकळीचा डबल, तर अनेक पाकळ्यांचा बट मोगरा, मोतिया मोगरा, मदनबाण हे सगळे प्रकार सुगंधाचे फर्मान घेऊन येणारेच. या मोगऱ्याचा उपयोगही त्यामुळे अत्तर, साबण, उदबत्ती, डिओ, फ्रेशनर अशा सुगंधी वस्तू तयार करण्यासाठी सर्रास केला जातो. अरोमा थेरपीमध्ये याचा वापर त्याच्या गंधामुळेच केला गेला आहे. मोगऱ्यापासून मिळणाऱ्या तेलामुळे अंगाची खाज, अंगावर लालसर पुरळ उठणं, अंगाला घाम येणं अशा तक्रारींवर मात करता येते. शिवाय हे तेल केसांनाही खूप उपयुक्त.
मोगऱ्याच्या तेलाचं केसांना हलकं मालिश केलं, तर केस गळणं, केसात होणारा कोंडा या तक्रारी कमी होतात आणि केसांची वाढ करणारा म्हणूनच समस्त स्त्री वर्गांच्या केसात हार, वेणी, गजरा या रूपात हा पूर्वापार माळला गेला. केवळ केसांचीच नव्हे, तर मनातील हळुवार भावभावनांची वीण अधिक घट्ट करणारा म्हणूनच, की काय ज्ञानेश्वर माऊली म्हणतात...
मोगरा फुलला, मोगरा फुलला..
मनाचीये गुंती गुंफियेला शेला....
चला तर, आपल्या बाल्कनीत, परसदारी आपण यांची एखादी तरी कुंडी जोपासू या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.