Narayan Surve Sakal
सप्तरंग

परिवर्तनाच्या बीजांची रुजवात

अवतीभवतीची राजकीय-सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस भीषण आणि भयाण होत चालली आहे. सार्वत्रिक अराजकानं उच्छाद मांडलाय, अशा कठीण काळात आज लिहिणाऱ्या कवींनी काय करायला हवं?

अवतरण टीम

अवतीभवतीची राजकीय-सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस भीषण आणि भयाण होत चालली आहे. सार्वत्रिक अराजकानं उच्छाद मांडलाय, अशा कठीण काळात आज लिहिणाऱ्या कवींनी काय करायला हवं?

- डॉ. महेश केळुस्कर sakal.avtaran@gmail.com

अवतीभवतीची राजकीय-सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस भीषण आणि भयाण होत चालली आहे. सार्वत्रिक अराजकानं उच्छाद मांडलाय, अशा कठीण काळात आज लिहिणाऱ्या कवींनी काय करायला हवं? मला वाटते, त्यांनी नारायण सुर्वेंसारख्या कवींना आठवायला हवं. ‘नारायण सुर्वे यांच्या गवसलेल्या कविता’ हा संग्रह एकदा तरी वाचायला हवा. सुर्वे यांचा आज (१५ ऑक्टोबर) जन्मदिवस, त्यानिमित्त...

भावनेच्या पाखरा ॥

नभाच्या गोल घुमटीत हिंडसी दिलवरा

थिजल्या भावना घेऊन

शोधसी तू किनारा ॥

तळपून झेप घे पुन्हा

उभारून पिसारा

जाळून, जळाया, फुलाया

जीवनाच्या अंकुरा ॥

‘माझा देश’ साप्ताहिकाच्या ऑक्टोबर १९९४ च्या पहिल्या आणि अखेरच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली नारायण सुर्वे यांची ही पहिली कविता. हे बऱ्याच जणांना माहीत नाही. खुद्द सुर्वे मास्तरांनाही ही कविता आठवत नव्हती; पण प्रा. विजय तापस यांनी १९९४ च्या दरम्यान ‘नारायण सुर्वे यांच्या गवसलेल्या कविता’ हा संपादन प्रकल्प जेव्हा हाती घेतला आणि सुर्वेंच्या पुढच्या कवितासंग्रहांमध्ये समाविष्ट न झालेल्या सुरुवातीच्या कवितांचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा ‘माझा देश’मध्ये ‘भावनेस...’ या शीर्षकाची ही एकूण सात कडव्यांची कविता त्यांना सापडली. डॉ. प्रा. प्रदीप कर्णिक यांच्या ‘संदर्भ प्रकाशन’ने १९९५ मध्ये ‘गवसलेल्या कविता’ हा संग्रह परभणी येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात सुर्वे मास्तरांच्या हस्तेच प्रकाशित केला. परभणीला झालेल्या त्या ६८ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून नारायण सुर्वे यांची निवड झाली होती. उद्‌घाटन सोहळ्याच्या आदल्या दिवशी आम्ही परभणीत पोहोचलो. त्या रात्री सहज म्हणून प्रदीपने पुस्तकांच्या एका गठ्ठ्यातील चार पुस्तकं काढली. बघितली तर पानं उलटसुलट बाईंड केलेली. मग सुनील कर्णिक, प्रदीप, मी आणि जीवराज सावंत रात्रभर व्यवस्थित पानं लावत बसलो. शंभरेक प्रती व्यवस्थित केल्या, तोवर सकाळ झाली होती नि आम्ही पहिला चहा घेतला. ‘गवसलेल्या कविता’चा हा किस्सा प्रकाशनाच्या वेळी आम्ही मास्तरांना सांगितला, तेव्हा ते म्हणाले होते, ‘माझं आयुष्य असंच उलट-सुलट लागत आलंय’.

जन्मतःच रस्त्यावर सोडलेल्या या मुलाला गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने आपल्या घरी आणलं, आपलं नाव दिलं, वाढवलं; पण ते गेल्यावर वयाच्या नवव्या वर्षी नारायण पुन्हा रस्त्यावर आला. जगण्यासाठी लढू लागला. हॉटेलातला पोऱ्या, मग पार्टी ऑफिसवर पहारा करणारा ‘रेडगार्ड’, भूमिगत कार्यकर्ता, पुढे शाळेतला शिपाई आणि अखेरीस शाळा मास्तर अशा लौकिक तपशिलांसह आपली वाट चालत राहिला; पण हा नारायण गंगाराम सुर्वे या नावाचा मुलगा विलक्षण संवेदनशील होता. अतोनात कष्ठाळू आणि लढाऊ होता. आपली लढाई आपणच लढली पाहिजे, हे या मुलाला लहानपणीच कळलं होतं. गेटसभा, कामगारांच्या चर्चा, अण्णा भाऊ साठे, अमरशेख, गवाणकर यांच्या हजारोंना स्फुरण देणाऱ्या काव्यरचना, उर्दू कवितांचा गोतावळा, कलापथकांचे जलसे, लोकनाट्ये या सगळ्याचे वाङ्‌मयीन संस्कार त्या काळात नारायणाच्या भावविश्वावर होत होते.

६ जून ते २८ नोव्हेंबर १९५४ या कालावधीत एकूण २४ अंक प्रकाशित झाल्यावर डी. के. ऊर्फ रावसाहेब पारकर यांचे ‘माझा देश’ हे साप्ताहिक बंद पडले; पण त्याचं ऐतिहासिक महत्त्व असं की नारायण सुर्वे यांची ‘भावनेस...’ ही पहिलीवहिली कविता आणि ‘डोंगरी शेत माझं गं...’ ही पहिली गीतरचना याच साप्ताहिकाने उजेडात आणली. सुर्वेंचा पहिला कवितासंग्रह ‘ऐसा गा मी ब्रह्म’ १९६२ मध्ये ‘पॉप्युलर’ने प्रकाशित केला आणि मराठी साहित्यजगतात पहिल्याच पदार्पणात सुर्वेंना वाङ्‌मयीन प्रतिष्ठा मिळाली; पण तोपर्यंत ‘वर्तमानपत्र्या कवी’ अशीच संभावना अभिजनांकडून होत होती. कारण सुर्वेंच्या सुरुवातीच्या कविता ‘मराठा’, ‘नवयुग’, ‘युगांतर’, ‘लोकयुद्ध’, ‘माझा देश’, ‘भारूड’, अशा वर्तमानपत्रांतून आणि साप्ताहिकांमधून प्रसिद्ध होत होत्या. अभिजनांच्या वाङ्‌मयीन दृष्टीला त्या भावत नव्हत्या; पण त्याच वेळी हजारो वाचकांना, सर्वसामान्यांना थेट भिडत होत्या. याची कारणमीमांसा करताना ‘नारायण सुर्वे यांच्या गवसलेल्या कवितां’चे संपादक विजय तापस आपल्या प्रस्तावनेत म्हणतात, ‘पुढच्या काळातही अभिजनवर्गाने त्यांना ‘आपले’ मानले नाही, मध्यमवर्गाने त्यांना ‘आपले’ म्हटले नाही आणि दलित-पद‌दलितांनीही त्यांना आणि त्यांच्या कवितेला स्वतःच्या तेवढ्याच अहंमन्य गंडाने पछाडून परका वा ‘बाहेरचाच’ मानले. आजही सूक्ष्मपणे पाहता या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही; मग तरीही सुर्वे यांच्या कवितेला समाजाच्या सर्व थरांतून जो प्रचंड प्रतिसाद लाभत राहिला आहे, त्याचे विश्लेषण कसे करणार? सहजतेने सुचणारे उत्तर असे की, प्रत्येक वर्ण-वर्ग-पंथ आणि धर्म या व्यवस्थांमध्येही या व्यवस्थांशी फटकून राहणारी मंडळी वाटते, त्यापेक्षा मोठी असली पाहिजेत किंवा वर्ण-वर्ग-पंथ यापलीकडे झेपावून कवितेला भिडण्याची रसिकत्वक्षमता आश्चर्यकारक श्रेणीने वाढत गेली असली पाहिजे.’

नारायण सुर्वे यांच्या या सुरुवातीच्या कवितांना घामाचा गंध होता आणि ‘पिऊन काळोखाचा रस॥ उभा झालो संगरा॥’ अशी आशावादी जिद्द होती. मूल्यात्मक परिवर्तनाची बीजं ही कविता रुजवत होती. भोवतालच्या काळाशी आणि माणसांशी आपलं रक्तामांसाचं नातं आहे, अशी या कवितांची धारणा होती. समाजाच्या आशा-निराशा, हर्षखेद, वेदना आणि जगण्याची प्राणांतिक धडपड ही कविता आपल्या कवेत घेत होती. आणि म्हणूनच सुर्वे मास्तरांच्या या सुरुवातीच्या कविताही तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत, अभ्यासकांसाठी आणि आजच्या काळातल्या लोकांसाठीही.

‘गवसलेल्या कविता’मध्ये सुर्वेंच्या सुरुवातीच्या काळातील १६ कविता आणि त्यांनी अनुवादित केलेल्या ४१ कविता आहेत. त्या १६ कवितांमध्ये ‘स्पुटनिक’ ही कविता महत्त्वाची आहे. ‘युगांतर’च्या ११ जानेवारी १९५९ च्या अंकात ती प्रसिद्ध झाली. सोव्हिएत रशियाचा दीड टन वजनाचा ‘स्पुटनिक’ हा उपग्रह पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्ष भेदून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालू लागला आणि आंतरराष्ट्रीय चर्चेचा विषय झाला. मराठी कवितेत फक्त नारायण सुर्वेंनी याची दखल घेतली. ते लिहून गेले...

नीळवंतीच्या मुग्ध व्यथेचा

जाणून घ्याया पुरता भेद

अफाट निद्रिस्त ब्रह्मांडाचा

हाच उद्याचा होईल वेद

या काळात आपल्या भोवतीच्या प्रदेशात, देशात आणि जगात काय काय घडते आहे, बिघडते आहे, याची सजग दखल सुर्वेंचे कविमन घेत होते. आपल्या कवितेला काळाशी समांतर ठेवणाच्या सुर्व्यांनी म्हणूनच, भारतीय भाषांमधील सरदार जाफरी, कैफी आझमी, अवतारसिंह पाश, सोहनसिंह मिशा यांसारख्या समाजाभिमुख कवींच्या कवितांचे मराठीत अनुवाद केले. सुर्वे यांच्या पुढील कवितांचा अन्वयार्थ लावणाऱ्या, त्यांच्या कवितांचे अधिष्ठान शोधणाऱ्या अभ्यासकांसाठी या अनुवादित कविता मार्ग दाखवतील. वानगीदाखल अली सरदार जाफरी यांच्या ‘मुंबई’ या मूळ उर्दू दीर्घ कवितेच्या सुर्व्यांनी मराठीत अनुवाद केलेल्या कवितेमधील हा धगधगीत इशारा पाहा...

तुझ्या हृदयात सरंजामी विषदेखील अन्

क्रांतीचे, विद्रोहाचे हलालसुद्धा - अमृतसुद्धा

तुझ्या छातीच्या पोकळीत पोलादी हृदय आहे

नसांनसांतून कामगारांचे, कोळ्यांचे रक्तदेखील

तुझ्या बाहुपाशात कारखान्यांचे जग आहे.

शिवडी, लालबाग आणि परळचे

तुझेच सुपुत्र आणि शूरकन्या

दुखऱ्या बोटांनी

सूताच्या एकेक धाग्यांनी-तारांनी

या देशाला दुःखात लोटणारांसाठी

कफन विणत आहेत.

सूताच्या धाग्यांनी शोषकांचे कफन विणगारे गिरणी कामगार संपवले गेले; पण आजही हा इशारा लागू आहे. पुलाखालून बरेच जागतिकीकरणाचे बरेच पाणी वाहून गेले, जग बदललेय, मुंबई बदललीय; पण कष्टकऱ्यांची, श्रमिकांची दुर्दशा तीच आहे, जी सुर्व्यांच्या काळात होती. अवतीभवतीची राजकीय-सामाजिक परिस्थिती दिवसेंदिवस भीषण आणि भयाण होत चालली आहे. सार्वत्रिक अराजकानं उच्छाद मांडलाय, अशा कठीण काळात आज लिहिणाऱ्या कवींनी काय करायला हवं? मला वाटते, त्यांनी नारायण सुर्वेंसारख्या कवींना आठवायला हवं. ‘नारायण सुर्वेंच्या गवसलेल्या कविता’ हा संग्रह एकदा तरी वाचायला हवा.

(लेखक कवी, निवेदक, पटकथा, संवाद लेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT