Vaccine 
सप्तरंग

लसीकरण आणि आपली मानसिकता 

डॉ. नानासाहेब थोरात saptrang@esakal.com

भारतात एका दिवसाच्या बाळापासून ते ते एक वर्षाचं होईपर्यंत १२ वेगवेगळी व्हॅक्सिन्स (लशी) दिली जातात. बीसीजी (टीबी रोगप्रतिबंधक), कावीळ, देवी, पोलिओ, रोटाव्हायरस अशा अनेक प्रकारच्या आजारांसाठीच्या या लशी असतात. आपल्यापैकी कितीतरी जणांनी आपल्या अपत्यांना, अगदी डॉक्टरांनी सांगितलेल्या दिवशी, न चुकता या लशी दिल्या असणार. लहान मुलांना लस देताना आपण कधीच त्याबद्दलचे गैरसमज पसरवत नाही किंवा आपल्या मनातसुद्धा ते येत नाहीत. मग कोरोनाव्हायरसची लस घेतानाच आपण असा विचार का करतोय? का आपण चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवतोय? किंवा ती इतरांना पाठवतोय? लशीबद्दलची जी माहिती व्हाट्सॲप, फेसबुक इत्यादी सोशल मीडियावर वाचतोय त्यातली किती खरी आहे, किती खोटी आहे याची फेरतपासणी करतोय का आपण? लोकांच्या मनात नक्की का गैरसमज होतायत याची काही कारणं आणि त्यांची सत्य परिस्थिती किंवा माहिती घेऊ या...

‘कोरोनाव्हायरसची लस कमी कालावधीत तयार झालीय म्हणून ती सुरक्षित नाही,’ असा सर्वात मोठा गैरसमज सर्वच लोकांच्या मनात आहे. अमेरिका-युरोप ते भारत असा सर्वत्र हा गैरसमज आहे; पण तो खरा नाही. जरी सर्वच लशी कमी कालावधीत तयार झालेल्या असल्या तरी सर्वच लशींच्या चाचण्या या आंतरराष्ट्रीय नियमांनुसारच झालेल्या आहेत. पूर्वी याची माहिती गुप्त ठेवली जायची; पण या वेळी सर्वच कंपन्यांच्या लशींची माहिती, चाचण्या कशा झाल्या, किती लोकांना लस दिली, नक्की किती प्रमाणात लस परिणामकारक आहे अशी सर्व माहिती आता गुगलवरसुद्धा उपलब्ध आहे. 

लशीचे दीर्घकालीन फायदे आणि परिणाम यांबद्दलसुद्धा लोकांना शंका आहे. कोरोनाव्हायरसची लस कमी कालावधीत तयार झालेली असल्यानं आणि कमीत कमी वेळेत लोकांपर्यंत पोहोचलेली असल्यानं या लशीचे दीर्घकालीन, म्हणजे पुढच्या दोन-चार वर्षांतले किंवा दहा वर्षांनंतरचे, काय परिणाम आहेत हे आज तरी सांगता येणार नाहीत. मात्र, अशा प्रकारचे अंदाज फक्त लशींबद्दलच नव्हे, तर इतर औषधांबद्दलसुद्धा करता येत नाहीत. तरीसुद्धा, मानवी आरोग्यासाठी सुरक्षित असल्या संदर्भातल्या, आंतरराष्ट्रीय नियमांनुसार होणाऱ्या चाचण्या सर्वच लशींबाबत झालेल्या आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतर आरोग्यावर परिणाम होतो याविषयी काही शंका घेण्याचं कारण नाही. कोरोनाव्हायरससारखा कमी वेळेत आलेला रोग कमीत कमी वेळेत समाजातून घालवून टाकायचा असेल तर सार्वत्रिक लसीकरणच गरजेचं आहे. लस घेण्याचा सर्वात मोठा दीर्घकालीन फायदा हा आहे. 

लस घेऊनही कोरोना होतोय, मग लस का घ्यायची? हा सर्वात मोठा प्रश्न आज सर्वांच्या पुढं आहे किंवा त्याबद्दल गैरसमजही खूप आहेत. खरं तर मार्च २०२० पासूनच - जेव्हा लशीवर संशोधन सुरू होतं -  सर्वांचा एक समज झालाय की, लस घेतल्यावर कोरोनाव्हायरसचा संसर्गच होणार नाही. वस्तुतिथी मात्र अशी नाही. लस घेतल्यानंतर कोरोनाव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो; पण त्या संसर्गामुळे तीव्र लक्षणं दिसणार नाहीत किंवा कोरोनाव्हायरसचा संसर्ग झालेला समजूनही येणार नाही. 
उदाहरणच द्यायचं झालं तर, इंग्लंड मध्ये ६.५ कोटी लोकसंख्येपैकी तीन कोटी लोकांना लस दिली गेली आहे. लसीकरण सुरू झाल्यानंतर एका महिन्यात, इंग्लंडमधील कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण ९० टक्क्यांनी कमी झालं आहे. त्यामुळे लस घेऊनही कोरोना होतोय तर का लस घायची, असा प्रश्न विचारण्यात काही अर्थ नाही. 

लस घेहूनही सोशल डिस्टन्सिंग, मास्क का वापरावा लागतोय? या कारणामुळेसुद्धा अनेक लोकांचा लशीला विरोध करण्याचं प्रमाण वाढतंय. जरी लस घेतली तरी कोरोनाव्हायरसविरुद्ध पूर्णपणे प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी काही दिवसांचा किंवा आठवड्यांचासुद्धा वेळ लागत असतो. या कालावधीत जर मास्क वापरला नाही किंवा सोशल डिस्टन्सिंग केलं नाही तर आपल्याला कोरोनाव्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. हा संसर्ग तीव्र स्वरूपाचासुद्धा असू शकतो.

लस घेतल्यानंतर साधारण ताप आणि अंगदुखी ही एक किंवा दोन दिवस होते आणि हा त्रास सर्वांना होतो असंही नाही. काही लोकांना पहिला डोस घेतल्यानंतर, तर काहींना दुसरा डोस घेतल्यानंतर हे होतं, तर काही लोकांना असा त्रास होतसुद्धा नाही. 

अशा अनेक कारणांमुळे सध्या लोक लसीकरणाच्या या मोहिमेला सहकार्य करताना दिसत नाहीत. लशीबद्दल अनेक गैरसमज सुरवातीपासूनच निर्माण केले गेले. लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आणि त्यामुळे लोकांची मानसिकता लसीकरणाच्या विरोधात गेली. त्याचा सर्वात मोठा तोटा आता आपल्याला दिसतोय. महाराष्ट्रासारख्या राज्यात कोरोनाचे रुग्ण फारच वेगानं वाढत आहेत...कोरोनाची दुसरी लाट आलेली असताना लसीकरण मात्र फारच हळूहळू सुरू आहे. लसीकरण सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. या कालावधीत कमीत कमी चार कोटी लोकांचं लसीकरण व्हायला पाहिजे होतं. मात्र, आपण अजून एक कोटीचा आकडासुद्धा गाठू 
शकलेलो नाही. 

संपूर्ण भारताचा विचार केला तर आज ज्या वेगानं लसीकरण सुरू आहे, तो ‘वेग’ असाच राहिला तर शेवटच्या व्यक्तीपर्यंत लस पोहोचण्यासाठी १२ वर्षं लागतील! लसीकरणाचा वेग आणि लसीकरणाबाबतची मानसिकता... या दोन्ही बाबी आता आपल्याला बदलाव्या लागतील हे यावरून स्पष्ट व्हावं! 

(लेखक हे ऑक्‍सफर्ड विद्यापीठात मेडिकल सायन्स डिव्हिजनमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)    

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT