वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण झाल्यानंतर चळवळीचं केंद्र असलेल्या मराठवाड्यात जावं, असा निर्णय मी आणि आनंदने घेतला. वैद्यकीय सेवेसोबतच सामाजिक काम करण्यासाठी उदगीर हे गाव निवडलं. तिथे राहण्याच्या व्यवस्थेपासून दवाखाना सुरू करण्यापर्यंत फारच कसरत करावी लागली. तो अनुभव वैद्यकीय सेवा कार्यासाठी लाखमोलाचा ठरला, त्याची ही गोष्ट...
मुंबई येथील सर्व वैद्यकीय सेवा झाल्यानंतर आम्ही मराठवाड्यात जायचा निर्णय घेतला. मराठवाडा त्यावेळेला युवक क्रांती दलाव्यतिरिक्त अनेक संघटना आणि चळवळीचं एक केंद्र होते. आजसुद्धा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक चळवळीची केंद्रे आहेत. शेवटी ही केंद्रे केवळ भौगोलिकरीत्या बनलेली नसतात.
त्या त्या ठिकाणच्या व्यक्ती, त्यांचे अभ्यास, त्यांनी केलेले कार्य, यामधून त्या सांस्कृतिक चळवळीमधून त्याच्यामध्ये मोठी शक्ती तयार होते. लोक एकमेकांशी बोलायला लागतात, इतकेच नव्हे, तर लिहायला लागतात. लिहिल्यानंतर त्यावर चर्चा होते. त्यावर परत संवाद केला जातो. ‘वादेवादे जायते तत्त्व बोध:’ या वाक्याप्रमाणे या वाद-विवादामधून नक्की सगळ्यांना मिळून आपल्याला काय म्हणायचं, हे निश्चित होतं; पण प्रत्येकच वाद किंवा प्रत्येक चर्चा चुकीची असते, असं अजिबात नाही.
या पार्श्वभूमीवर कृतीशीलता आणि विद्यार्थ्यांचे केंद्र असणाऱ्या काही गावांत जायला हवं, असं मनामध्ये वाटत होतं; पण शहरापेक्षासुद्धा थोड्या छोट्या गावांना प्राधान्य द्यावंसं आम्हाला वाटलं. त्या वेळेला त्या शहराला औरंगाबाद नाव होते, आता त्याचे नामकरण छत्रपती संभाजीनगर झाले आहे. संभाजीनगरसोबतच बीड, परभणी आणि उदगीर अशी नावं डोळ्यासमोर होती.
लातूरचं नाव होतं; पण लातूरही अधिक मोठी व्यापारी पेठ आहे आणि लातूरपेक्षा उदगीरला शैक्षणिक केंद्रही आहे, असं जाणवलं. उदगीर हे एक महाराष्ट्राच्या टोकाला असलेलं गाव आहे. त्यानंतर आंध्र आणि कर्नाटक सुरू होतात. यामुळे उदगीर वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. उदगीरला त्या ठिकाणी उदयगिरी महाविद्यालय आणि अनेक शाळा वेगळ्या होत्या.
आसपासच्या अनेक गावातून शेकडो विद्यार्थी तिथे येत असत. त्यामुळे तिथे एक सामाजिक जागृतीची गरज तयार झाली होती. इतकंच नव्हे तर डॉ. ना. य. डोळे हे राष्ट्रसेवा दलाशी संबंधित विचारवंत, अभ्यासक तिथे उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य होते. त्याखेरीज एक मोठी टीम तिथे होती, ज्यांची खूप इच्छा होती, की आम्ही आणि आनंदने तिथे उदगीरला जावे.
त्याच्यामध्ये प्राध्यापक मनोहर हिबारे, मनोहर पटवारी, गोविंद केंद्रे, लहुजी गंगापुरे, विजय चिल्लरगे अशा सगळ्यांचा समावेश होता. या सर्वांच्या मध्ये काम करत असताना आम्हाला परभणी, छत्रपती संभाजीनगर तेथील लोक भेटायचे.
आम्ही शिबिरानादेखील तेथे होतो. त्या ठिकाणी सर्व वातावरण पहिल्यानंतर एकूण असणारे प्रश्न, समाजा-समाजामध्ये असणारी दरी व त्यासाठी आरोग्यविषयक खऱ्या कामांची खूप आवश्यकता, शिक्षणामुळे आलेली जागृती; पण वास्तविक असणारे निराशेचे प्रश्न, अशा सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांमधून वाट शोधणारी माणसं आम्हाला दिसत होती. ज्या कार्यकर्त्यांमध्ये संवेदनशीलता होती, त्यांच्यामध्ये अभ्यासाची इच्छा होती.
महत्त्वाचे म्हणजे आम्ही जरी मुंबईतून शिकून आलो असलो, तरीसुद्धा त्याबद्दल त्यांची सकारात्मक आणि चांगली भूमिका होती. म्हणून आम्ही या सगळ्या शहरांपैकी उदगीरला जायचा निर्णय घेतला. तिथे जाण्याआधी मी स्वतः आणि आनंद दोघेही तिथे जाऊन आलो. चार-पाच वेळा तरी आनंद गेला असेल, मी दोन-तीनदा गेले. मी लातूर आणि बीडला अनेक वेळा त्यापूर्वी गेले होते.
अशा वेळेला स्वतःचा दवाखाना काढण्याऐवजी तिथेच असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये मी काम केलं, तर अजून चांगलं होईल का, असा मला प्रश्न होता; परंतु आर्थिकदृष्ट्या मला सगळं घर चालवायचं होतं म्हटल्यावर तिथे शक्य होईल की नाही, अशी शंका होती.
एक खूप मोठी संस्था आहे, नाव आहे. त्यांचे मराठवाड्यात एका तालुक्यात शेतीविषयक मोठे प्रकल्प होते. त्यांचाही दवाखाना होता आणि तिथे ते आयुर्वेदिक डॉक्टर्सना घेत असत. म्हणून मी त्यांनाही भेटले, तेव्हा ते म्हणाले, ‘हे सगळं काम आहे ती माझी पत्नी पाहते. त्यामुळे तुम्ही त्यांना भेटा.’’
हाऊसमनला तेव्हा साधारण ८०० ते हजार रुपये किंवा काही ठिकाणी बाराशे रुपये महिन्याला मिळायचे. त्या वेळेला ते हॉस्पिटल छोटं होतं. मी जेव्हा हॉस्पिटलला भेट दिली तेव्हा तिथे चारच पेशंट होते. एकूण दोन रूम्स होत्या; तरीही शस्त्रक्रिया व्हायच्या व ऑपरेशन थिएटर होतं. माझ्या अनुभवाचा उपयोग त्यांना पेशंटसाठी खूपच झाला असता. कारण मी आरोग्यविषयक वेगवेगळ्या पोस्ट केलेल्या होत्या, असं मला वाटलं.
त्यानंतर मी त्यांना भेटले आणि तेव्हा मात्र त्यांनी सांगितलं की, ‘‘आम्ही सेवाभावी संस्था म्हणून हे चालवतो. त्यामुळे तुम्हाला आम्ही शहरांमध्ये मानधन ८०० ते हजार असेल, तरी तीनशे रुपये मानधन देऊ शकतो. हे ऐकल्यानंतर मी थोडी सर्द झाले. कारण तीनशे रुपयांमध्ये घर चालवणं, हे मला शक्यच नव्हतं.
त्यामुळे मी त्यांना नम्रपणे नकार दिला; परंतु ज्या हेतूने तिथे आम्ही आलो होतो, हे पुरोगामी विचाराचे लोक आहेत म्हटल्यावर ते थोडा सहानुभूतीने विचार करतील, असं मला वाटलं होतं; परंतु त्यांच्याबाबत अपेक्षाभंग झाला.
परिणामी मी खासगी दवाखाना उदगीरला सुरू करायचा, असे ठरवले. वरळीच्या घरातील थोडेफार सामान आम्ही घेऊन गेलो. उदगीरला आमचे स्नेही विजय चिल्लरगे यांचा खूप आग्रह होता की, ‘माझ्या घराजवळ तुम्ही दवाखाना काढा. तुम्हाला पसंत पडते का बघा.’
आम्ही तिथे चार खोल्या भाड्याने दवाखान्यासाठी घेतल्या. दोन खोल्यांमध्ये माझा दवाखाना होईल. एका खोलीमध्ये कोणी भेटायला इतर लोक आले तर ते बसतील. बाकीच्या आतल्या खोलीमध्ये औषधाचा स्टॉक वगैरे ठेवायला.
त्या चार खोल्यांचं भाडं साधारण मला वाटतं दिवस शंभर ते दीडशे रुपये होतं. घर आम्ही नई आबादी भागात घेतलं, आता त्याचे नाव गणेशनगर आहे. त्या गणेशनगरमध्ये तर सुरुवातीला तीन महिने राहिलो.
त्या घराला वरती पत्राच होता. ते घर प्रचंड तापत होतं, त्यामुळे आमचे मित्र व परिचित फार हळहळले. घरात अर्धी मोरी होती; पण स्वच्छतागृह नव्हते. ते दोन बिऱ्हाडासाठी एकच आणि लांब होतं. घरून पाणी घेऊन तिथे जायला लागत असे. तिथे दुसरी कुठलीही स्वच्छतेची व्यवस्था नव्हती. कोणीही माणसे स्वच्छतागृहाकडे निघाले की डुकराचा थवाच्या थवा तिथे जायचा. क्षणार्धात फरशीच्या खालील खड्ड्यातील मैला फस्त करून टाकायची.
ते बघून मला प्रचंड भीती वाटायची, की कधीतरी डुकरे आपल्यावर हल्ला करतील. त्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिथे राहिलो. मी व आनंदने विचार केला की, आधी न परवडणारे घर घेतले व ते नंतर सोडून परत लहान घरात जावे लागले, तर जड होईल म्हणून साधेच घर घेतले.
माझा दवाखाना सुरू झाला तेव्हा माझे आई, बाबा व मणिभाई देसाई हेही स्वतः दोन मोटारी घेऊन आले होते. बाबा काही दिवस राहिले. ते फार मोठ्या पदावर होते; पण ते आनंदाने माझ्या दवाखान्यात पेशंट येईपर्यंत वाट पाहत असत. काही दिवस आई-बाबा आनंदाने राहून पुण्यास परत गेले. आमचे नेहमीचे काम जोरात सुरू झाले.
आनंदने रिक्षावाल्यांची युनियन सुरू केली होती. उदगीरला ३०० ते ४०० सायकल-रिक्षा होत्या. त्यांचे बरेच प्रश्न होते. पोलिस, आरोग्य यावर सातत्याने संघर्ष चालत असे. याखेरीज आमच्या घराजवळच खादी ग्रामोद्योग केंद्र होते. त्या खादी ग्रामोद्योग केंद्रात १०० ते १५० बायका हातमागांवर काम करत असत. त्यांच्याशी बोलणं, त्यांना आरोग्याची माहिती देणं, ज्यांच्या मुली कुपोषित होत्या, त्यांना मदत देणे असे एका बाजूला सोशलवर्क मी सुरू केले.
रोज सकाळी दहा ते एक आणि संध्याकाळी सहा ते नऊ असा मी दवाखाना सुरू केला. तेव्हा काही वेळेला मी साडेपाच ते साडेआठ दवाखाना चालवत असे. पहिल्याच आठवड्यामध्ये माझ्याकडे पेशंटचा ओघ सुरू झाला आणि पंधरा-वीस दिवसांमध्येच माझ्या लक्षात आलं की, मला त्या काळामध्ये जवळजवळ हाऊसमन म्हणून मिळत होते तेवढे पैसे मिळायला लागले.
साधारण एक ते दीड हजार रुपये महिना पहिल्याच महिन्यात मिळाले. मी अत्यंत माफक फी ठेवलेली होती, जे तिथल्या डॉक्टरचे दर होते, तेच दर ठेवलेले होते. कारण मला कुठेही आपल्याकडून शोषण होतं, हे नको होतं; परंतु महिला पेशंटचा ओघ सुरू झाला.
खरं सांगायचं तर मला एका महिन्यातच चिंतांवर उत्तर मिळालं. कारण उदगीरचा माझ्या दवाखान्यात रुग्णांची गर्दी जमायला लागली, असं चित्र दिसायला लागलं. मीही दवाखान्याचा थोडा वेळ वाढवला. व्हिजिटनाही जाऊ लागले.
आनंदचे कामही हळूहळू वाढत होते. त्या वेळेलाच आम्ही एक निर्णय घेतला आणि तो म्हणजे बाळाला जन्माला घालायचे. बाळ कसे असेल, मुलगा की मुलगी हा विचारही डोक्यात नव्हता. मुक्तासारखी गोड, हुशार व प्रेमळ मुलगी जन्मास येईल, याचा काहीही अंदाज नव्हता; पण दवाखाना सांभाळून गरोदरपण सांभाळता येईल व नंतर दोन/तीन महिने दवाखाना बंद राहिला तरी परवडेल, असे वाटायला लागले. मुक्ताच्या जन्माच्या आधी बाळंतपणासाठी मी दोन महिने आधी पुण्यास गेले. मुक्ताच्या जन्माची अशी कहाणी.
त्याच्या अगोदरच आम्ही तिथे सामाजिक, सांस्कृतिक जीवनामध्ये रुळण्याचा सूर सापडत होता. उदगीरला आम्ही तिथे राहत असताना तीन-चार महिन्यांमध्ये दुसरं घरदेखील शोधलं आणि थोडं मोठ्या घरामध्ये आम्ही प्रवेश केला होता. एका अर्थी आम्ही उदगीरला स्थिरावू, असे वाटायला लागले होते; परंतु आनंदच्या राजकीय कामाला वेगळेच वळण मिळाले, ते सर्वच अनपेक्षित होते!
(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)
neeilamgorhe@gmail.com
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.