Film Industry drama sakal
सप्तरंग

चित्रपटांची दुनिया

चित्रपट व नाटके ही जशी कला आहे, तसाच तो एक उद्योगही आहे, याची जाणीव हळूहळू अनुभवातून व अभ्यासातून येत गेली.

डॉ. नीलम गोऱ्हे

चित्रपट व नाटके ही जशी कला आहे, तसाच तो एक उद्योगही आहे, याची जाणीव हळूहळू अनुभवातून व अभ्यासातून येत गेली. चित्रपटांच्या ग्लॅमरकडून माझे मन व विचार हळूहळू निशांत, अंकुर, न्यू दिल्ली टाइम्स अशा चित्रपटांकडे वळत गेले. ‘गुड्डी’च्या अनुभवानंतर चित्रपटांच्या फक्त ग्लॅमरचा विचार डोक्यातून पूर्णपणे गेला. चित्रपटांच्या दुनियेतून मी जमिनीवर आले व माणसांचा संघर्ष, अनुभव, साहित्य याकडे ओढली जाऊ लागले.

राजकारणात अनेक वर्षे काम करत असल्याने लोक मला उत्सुकतेने विचारतात, की ‘तुम्ही कधी सिनेमा- नाटक पाहता का?’ त्याच्यावर माझे उत्तर ‘फार क्वचित’ असे असते. लहानपणी व तरुण वयात मात्र स्थिती थोडी निराळी होती. वरळीहून आम्ही गोरेगावात सिबा कंपनीच्या वसाहतीत राहायला आलो. गोरेगावच्या जयप्रकाश नगरच्या कॉलनीत नंदादीप विद्यालय ही शाळा होती. त्यात मी नवनीत व जेहलम सातवीच्या वर्गात शाळा शिकू लागलो.

बाबांनी परदेशातून येताना पांढऱ्या क्रीम रंगाची फियाट गाडीही आणली होती व ती ‘लेफ्ट हॅण्ड ड्राईव्ह’ गाडी होती. त्या गाडीवर तसे लिहिलेही होते. १९७० च्या सुमारास मोटारींची संख्या कमी होती व त्यातून एवढी चकचकीत पांढरी गाडी पाहून लोक उत्सुकतेने पाहत असत. दर शनिवारी आई-बाबा आम्हाला शाळेत घ्यायला येत असत.

आम्हीही शाळेचा युनिफॉर्म बदलून न चुकता सिनेमाला जात असू. गोरेगावात त्या वेळी पूर्वेस ‘अनुपम’ हे थिएटर होते. त्या काळात आराधना, खिलौना, जॉनी मेरा नाम, कटी पतंग, आनंद, मेरे अपने, अभिमान, नया जमाना असे अनेक चित्रपट पाहिले. दुःखी सीन आला की मी आणि आई हमखास रडायचो!

गोरेगावात जाण्याआधी शाळेत असताना म्हणजे पाचवी-सहावीत वरळीत राहत असल्याने अमर हिंद मंडळातील नाटकेही बघण्याचा योग आला होता. रायगडाला जेव्हा जाग येते, वाहतो ही दुर्वांची जुडी, तुझे आहे तुजपाशी, कट्यार काळजात घुसली, तो मी नव्हेच अशी गाजलेली नाटके लाखो मराठी रसिकांप्रमाणे आम्हीही पाहिली व तो एक उत्कट व अविस्मरणीय अनुभव होता.

मराठी चित्रपटांपैकीसुद्धा मोलकरीण, जगाच्या पाठीवर, मराठा तितुका मेळवावा यासारखे चित्रपट, रामायणसारखे हिंदी चित्रपट; तर ‘साऊंड ऑफ म्युझिक’सारखे इंग्रजी चित्रपट आम्हाला आवर्जून दाखवले जायचे. थोडक्यात, मुलांनी सिनेमे पाहायचे नाहीत, त्यांनी फार कडक शिस्तीत राहायचे हा प्रकार नव्हता.

काय पाहायचे- काय दाखवायचे यावर घरात चर्चा मात्र असे. मला आठवते, की ‘गाईड’ चित्रपट त्या वेळी तुफान चालत होता, पण आम्हा मुलांनी तो पाहू नये असा निर्णय घरात झाला. परिणामी त्यास आम्हाला जाऊ दिले गेले नाही. त्या वयात हे मला फार मनास लागले होते.

यापेक्षा अगदी एक वेगळा निर्णय आईने घेतला होता. ‘अपराध’ किंवा अशाच नावाचा एक मराठी चित्रपट आला होता. त्यात नायिका जयश्री गडकर हिचे नायकाशी एकांतात संबंध होतात असे दाखवले होते. त्या वेळी हा खल(नायक) दाराच्या पडद्यामागे कॅमेरा लपवत असतो. या कॅमेऱ्यातून तो खलनायक परत परत ब्लॅकमेल करू लागतो. अशा वेळी नायिकेची होणारी उलघाल, लांडगेतोड व शोषण याचे फार प्रभावी कथानक होते.

मी तर पाचवी-सहावीतच असेन व जेहलम दुसरी-तिसरीतच होती. तिला ते फारसे कळले नसावे, पण ‘चांगली वाटणारी माणसेही मुलींना फसवू शकतात’ याचा धडा या चित्रपटातून कळत होता. इतक्या जुन्या काळातही ब्लॅकमेलिंगबाबत मुलींना सावध करणारी आमची आई लतिकाताई गोऱ्हे एक दूरदर्शी विचारांची आधुनिक स्त्री होती, असे म्हणण्यास हरकत नाही.

लहान वयात छोट्या मुला-मुलींना असतो तसा नटनट्यांचे फोटो जमवायचा छंदही मला लागला होता. १०० सिनेमांची नावे मी नॉन स्टॉप सांगू शकायचे. स्वतः नाटक-सिनेमात काम करावे किंवा शूटिंग पाहायचे वेड मात्र नव्हते, पण तेव्हा गोरेगावात ऑब्झर्वेशन पोस्टपाशी सुंदर उद्यान होते.

आज त्याची बरीचशी दुरवस्था झाली असली तरी तेव्हा शेकडो चित्रपटांत काश्मीर म्हणून खुशाल याच गोरेगावच्या उद्यानातील चित्रीकरण केले जायचे. आम्ही आई-बाबांबरोबर न्यूझिलंड हॉस्टेल या गोरेगावच्या आरे कॉलनीत जायचो. त्या काळी तिथे बऱ्यापैकी रेस्टॉरंटही होते. बाबा व्हेटर्नरी डॉक्टर असल्याने आम्ही तिथे जाऊ शकत होतो. त्या वेळी आम्हाला अनेक चित्रपटांची शूटिंगही पाहावयास मिळाली.

हेमामालिनी, धर्मेंद्र, संजीव कुमार, देव आनंद, शर्मिला टागोर, जॉनी वॉकर, केश्तो मुखर्जी असे अभिनेते-अभिनेत्री आम्ही तिथे पाहिले. नंतर पुनश्च वरळी सी फेसला राहायला गेल्यावरही तेव्हा अनेक चित्रपटांत वरळी सी फेसचे शूटिंग होत असे. तेथेही गर्दीत डोकावले की या गोष्टी नजरेला पडायच्या. तेव्हा फार भारी वाटत असे.

कॉलेजमध्येही ही चित्रपटांची दोस्ती चालू राहिली, परंतु त्या काळात ‘जया भादुरी’ यांची भूमिका असलेला ‘गुड्डी’ हा चित्रपट चांगल्या अर्थाने डोळे उघडणारा ठरला. ‘गुड्डी’ चित्रपटात चित्रपटांची रंगीन दुनिया जरी चमचमती भासली तरी पडद्यामागचे कष्ट, त्यातील ट्रिक सीन्स, सामान्य कलाकारांची ओढाताण हे सर्व फार प्रभावीपणे दाखवले आहे.

किशोरवयीन मुला-मुलींनाच नव्हे, तर सर्वांनाच चित्रपटसृष्टीचे प्रचंड आकर्षण असते. या क्षेत्रातील मोठ्या घटना, आत्महत्या घडल्या की मोठी खळबळ होते. चित्रपट व नाटके ही जशी कला आहे, तसाच तो एक उद्योगही आहे याची जाणीव हळूहळू अनुभवातून व अभ्यासातून येत गेली. चित्रपटांच्या ग्लॅमरकडून माझे मन व विचार हळूहळू निशांत, अंकुर, न्यू दिल्ली टाइम्स अशा चित्रपटांकडे वळत गेले.

‘गुड्डी’च्या अनुभवानंतर चित्रपटांच्या फक्त ग्लॅमरचा विचार डोक्यातून पूर्णपणे गेला. चित्रपटांच्या दुनियेतून मी जमिनीवर आले व माणसांचा संघर्ष, अनुभव, साहित्य याकडे ओढली जाऊ लागले. त्या काळात गोदावरी परुळेकरांचे ‘जेव्हा माणूस जागा होतो’ हे पुस्तक मी वाचले व मन सामाजिक कामात भारावून गेले.

विशेष म्हणजे १९८९ ते १९९२ या कालावधीत मी केंद्रीय चित्रपट सेन्सॅार बोर्डावरही काम केले. त्या कामाचा भाग म्हणून महिन्यात दोन-तीन वेळा चित्रपट पाहावे लागले. त्यांचे अनुभव व प्रकारही भलताच विस्मयकारक वाटला. चित्रपटांच्या दुनियेतील बालवयातील आकर्षण नंतर चित्रपटातून आलेले वास्तवाचे भान, त्यातून सर्जनशील लिखाण व चर्चा हा प्रवासही केला.

उंबरठा, नॉट ऑन्ली मिसेस राऊत, बाईपण भारी देवासारखे चित्रपट महिलांसाठी थिएटर बुक करूनही दाखवले व त्यांचा उपयोग सामाजिक जागृतीसाठीही केला. तुम्ही नेता, कार्यकर्ता वा सामान्य माणूस कोणीही असा, चित्रपटांशी तुमचे एक नाते तयार होतेच, ते अपरिहार्य आहे!

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT