Agitation Sakal
सप्तरंग

नामांतर लढ्याचे दिवस...

सामाजिक जीवनात अनेक आंदोलने पाहायला मिळाली. काही आंदोलनांत सक्रिय सहभागी होते. काहींचे जवळून निरीक्षण करत आले. काही कालांतराने विझली, काही आंदोलनांना यश प्राप्त झाले.

डॉ. नीलम गोऱ्हे

सामाजिक जीवनात अनेक आंदोलने पाहायला मिळाली. काही आंदोलनांत सक्रिय सहभागी होते. काहींचे जवळून निरीक्षण करत आले. काही कालांतराने विझली, काही आंदोलनांना यश प्राप्त झाले. त्यापैकी एक म्हणजे मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी झालेला मोठा लढा...

रायगड जिल्ह्यामध्ये महाडला दरवर्षी २० मार्चला ‘महाड सत्याग्रहा’चा कार्यक्रम होतो. साधारणपणे १९७७-७८ च्या सुमाराला असाच कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि पाण्याच्या सत्याग्रहाला आदरांजली व्यक्त करण्यासाठी झाला. त्याठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी असे जाहीर केले होते की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव एखाद्या विद्यापीठाला सन्मानाने देणे आवश्यक आहे.

त्यानंतर काही दिवसांतच ते पायउतार झाले आणि ती मागणी मात्र आंबेडकरप्रेमींच्या मनामध्ये घर करून बसली. त्याचेच फलित म्हणजे तत्कालीन औरंगाबाद, आताचे संभाजीनगरमध्ये तीव्र स्वरूपामध्ये प्रतिक्रिया विशेषत: आंबेडकरी चळवळीच्या विद्यार्थ्यांकडून सुरू झाल्या. त्या काळात आम्ही उदगीरलाच राहत होतो.

मला चांगले आठवते की, विधान परिषदेचे आणि विधानसभेचे अधिवेशन चालू होते. त्यात दर शुक्रवारी एक आयुध असते आणि त्याला म्हणतात ‘अशासकीय ठराव’. सदस्यांनी तो स्वतःच्या भूमिकेसाठी म्हणून केलेला ठराव असतो. त्यासाठी साधारणत: ४५ मिनिटांचा वेळ असतो. त्यात संबंधित सदस्य पंचवीस-तीस मिनिटे सविस्तर भाषण करतात. त्यानंतर सरकार उत्तर देत असते.

त्यावेळी विधान परिषदेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायचे, असा ठराव ग. प्र. प्रधान आणि ना. धो. महानोर यांनी मांडला होता. असा अशासकीय ठराव नंतर मागेही घ्यायला लागतो, कारण त्याचा तो प्रघातच आहे. त्यावेळेस आकाशवाणी होती आणि दूरदर्शन नुकतेच सुरू झाले होते. त्यामुळे लवकरच सगळीकडे बातमी पसरली की, मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा ठराव मंजूर झाला.

काही तासांतच बातमी आली की, तो ठराव मागे घेतला. खरे म्हणजे ठराव मागे घ्यायलाच लागत असतो; परंतु सरकार त्याला जाहीर करू शकले असते की, आम्ही हा ठराव स्वीकारत आहोत. तसे झाले असते तर तो विषय वेगळा होता; परंतु तेवढ्या काळामध्ये ठराव मंजूर झाला म्हटल्यावर प्रचंड प्रमाणावर जाळपोळ झाली, ठराव मागे घेतला म्हटल्यावरही प्रखर प्रतिक्रिया उमटल्या.

बीड, लातूर, परभणी, संभाजीनगर अशा अनेक भागांमध्ये युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते काम करत होते. त्याचबरोबर दलित पॅंथरमधील अनेक नेते मंडळी होते. ते सिद्धार्थ कॉलेज, मुंबई, नाशिक, नागपूरमधून सूत्रे हलवत होते. बरीच समाजवादी नेते मंडळी, युवक क्रांती दल, राष्ट्र सेवादल कार्यकर्ते होते, तेही सक्रिय भूमिका घेत होते. बऱ्याचशा पुरोगामी संघटनांपैकी काही राजकीय पक्षांनीही त्याला पाठिंबा दिलेला होता.

जे मोठे पक्ष होते, त्यांनी काही त्यावर फार प्रतिक्रिया दिलेली नव्हती. नामांतरावरती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक एका बाजूला आणि दुसरीकडे मराठवाडा हा शब्द काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देणे हे पचनी पडत नव्हते असे लोक होते.

या सगळ्या कालावधीमध्ये आम्ही उदगीरलाच होतो. आम्ही ठिकठिकाणी समाजबांधवांशी थोडं बोलण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी दोन्हीकडची लोकं हे नेतृत्व करतानाच आढळले. म्हणजे जो ज्या समाजाचे नेतृत्व करून सर्वमान्य भूमिका घेत असतो, तीच व्यक्ती जेव्हा जाती-जातीमध्ये दुफळी तयार होते, त्यावेळी एका जातीची भूमिका घेऊन त्यांचं नेतृत्व करताना आढळतात.

त्यावेळी ते इतर समाजाने आपल्यालासुद्धा पाठिंबा दिलेला आहे, आपले नेहमीचे जीवलग मित्र, आपले समर्थक, आपले कार्यकर्ते इतर समाजाचेसुद्धा आहेत, या गोष्टींचा त्यामध्ये बऱ्याच वेळेला समावेश असतो. फक्त जातीचे किंवा राजकीय स्वरूपाचे जे कंगोरे असतात, ते धारदार होऊन टोकाचा संघर्ष उभा राहिलेला दिसतो. आम्ही सगळीकडे त्या त्या भागात बैठका घेतल्या. संवाद सुरू केला; पण त्याचा फार उपयोग होतोय असे दिसत नव्हते. कारण निर्णय आता दोन्ही बाजूने अटीतटीचा झालेला होता.

त्यावेळचा एक अनुभव म्हणजे सगळीकडे सत्याग्रह करायचे ठरले. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव द्यावे, यासाठी १९७८ पासून सुरू झालेले आंदेालन जवळजवळ १९९१ पर्यंत सुरू होते. या तेरा वर्षांच्या लढ्यामध्ये शेकडो ठिकाणी सत्याग्रह झाले, आंदोलने झाली, काही ठिकाणी तर लोकांचे बळी गेले, काही वेळेला कार्यकर्त्यांवर केसेस लागल्या, समाजामध्ये वाद झाला. तरीदेखील १९९१ नंतर ‘नामांतर’ न म्हणता ‘नामविस्तार’ करावे, असा विचार झाला.

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असे नाव देण्यात यावे, असा विचार झाला. या आंदोलनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला किती विरोध होता असे म्हणण्यापेक्षा मी असे म्हणेन की, त्याला मोठ्या प्रमाणामध्ये ‘विभागीय अस्मिता’ आणि ‘जातीय अस्मिता’ अशा दोन अस्मितांमधील हा संघर्ष होता, असे आपल्याला दिसते. त्याच्यात वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भूमिका घेत होते.

१९७८ मध्ये एका सत्याग्रहामध्ये आम्ही सहभागी झालो होतो. उदगीरला तहसील ऑफिससमोर जाऊन घोषणा द्यायच्या, असे आमचे ठरले होते. त्या ठिकाणी आम्ही युवक क्रांती दलाचे कार्यकर्ते, सोबत दलित पॅंथर, रिपब्लिकन पक्ष गटांचे वेगवेगळे कार्यकर्ते होते. इतर अन्य समाजवादी पुरोगामी नागरिकांसह आम्ही ६० ते ७० जण उदगीरच्या तहसील ऑफिसजवळ जमलो. त्यावेळी नुकतीच मला आई होण्याची चाहूल लागलेली होती.

चार-पाच महिन्यांचे बाळ माझ्या पोटात होते. तरीदेखील मी त्या दिवशी दवाखाना बंद ठेवला होता. आम्ही मोर्चामध्ये साधारण तीन-चार किलोमीटर चालत गेलो. दुपारी साडेअकरा-बाराची वेळ होती. तहसील ऑफिसमध्ये गेल्यावर आम्हाला पोलिसांनी घेरा घातला. पोलिसांच्या गाडीत बसवले आणि गाडीतून आम्ही घोषणा देत, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव दिलेच पाहिजे’, अशा प्रकारच्या घोषणा देत पोलिसांची गाडी निघाली.

गाडी कुठे चालली कळत नव्हते; परंतु महाराष्ट्रात न ठेवता आम्हाला कर्नाटकमध्ये कमालनगर या ठिकाणच्या कस्टडीमध्ये नेण्यात आले. तिथेच एका शाळेचे रूपांतर कस्टडीमध्ये करण्यात आले होते. त्या कस्टडीमध्ये आम्हाला थांबवण्यात आले. दिवसभर बसवून ठेवले. संध्याकाळी त्यांनी चुरमुऱ्याचा चिवडा दिला आणि संध्याकाळी साडेसहा-सात वाजता आमची सुटका झाली.

या सगळ्या काळामध्ये प्रचंड ऊन होते. मी बायकांशी गप्पा मारल्या, बायकांची एक गटचर्चा घेतली, त्यांना समजून घेतलं, त्या कुठून आल्या आहेत, त्यांची काय अपेक्षा आहे. एक लक्षात आलं की, त्या बहुतेक बायका अर्थातच सगळ्या आंबेडकरी चळवळीतल्या किंवा सामान्य कार्यकर्त्या होत्या. प्रत्येकीचे म्हणणे होते की, बाबासाहेबांसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. त्यातल्या दोघी-तिघी मात्र म्हणाल्या की, ‘तुम्ही कशाला आला? तुम्ही नको होतं यायला.’ मी विचारलं, ‘का?’ त्यांचे म्हणणे की, ‘पोटुशी असताना कशाला यायचं, कशाला एवढा त्रास घ्यायचा.’

नंतर मला दमल्यासारखं वाटायला लागल्यावर मी कस्टडीतल्या दगडी फरशीवरच जरा आडवी झाले. चक्क झोपूनच गेले. त्यात काही कुणाला फारसे वाटले नाही; पण आनंदने मात्र त्या क्षणांवर एक सुंदर कविता लिहिली होती! संध्याकाळी आम्हाला उदगीरला सोडून देण्यात आले. खूप लोकांना विशेष वाटलं की, एक डॉक्टर असून या सत्याग्रहात स्वत:हून आलेल्या आहेत.

त्यानंतर बऱ्याचशा सुशिक्षित व डॉक्टर महिलाही नामांतर लढ्यात सहभागी झाल्या. आम्ही उदगीरला परत आलो. उदगीरमधल्या दलित आणि दलितेतर दोन्ही समाजांनी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य दिले.

प्रत्यक्षात १४ जानेवारी १९९१ ला जेव्हा मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्ताराचा निर्णय झाला तेव्हा सगळीकडे जल्लोष झाला. तो निर्णय महाराष्ट्रातल्या सर्व पक्षांनी सहमतीने घेतला! मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्यात आले, असा बोर्ड तिथे लागला. तो बोर्ड जेव्हा जेव्हा आजही मी जाताना पाहते, त्यावेळेला मला कमालनगरच्या पोलिस कस्टडीतील क्षणांची नेहमी आठवण होते.

मला असे वाटते, माझ्यासारखे ज्यांनी ज्यांनी नामविस्तारासाठी प्रयत्न केले होते, सहभागी झाले होते, त्यांनासुद्धा या नामविस्ताराच्या आंदोलनाच्या आठवणींचा कधीच विसर पडणार नाही. मी असे म्हणेन की, वेगवेगळी आंदोलने, त्यातले लढे आणि त्यातले विजय यांमधूनच समाजाचा इतिहास घडत असतो...

neeilamgorhe@gmail.com

(लेखिका विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “आजही तो कुटुंबासाठी काही बोलत नाही….”; सांगता सभेत अजित पवारांच्या आईचं पत्र दाखवलं वाचून

Sports Bulletin 18th November: गौतम गंभीरला हाय कोर्टाकडून दिलासा ते चेतेश्वर पुजारावर बॉर्डर-गावस्कर मालिकेत नवी जबाबदारी

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Champions Trophy पाकिस्तानमध्येच होणार, मागे हटणार नाही! PCB प्रमुखांचं रोखठोक मत; पाहा Video

Latest Maharashtra News Updates : सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

SCROLL FOR NEXT