महिलांचे विविध प्रश्न सोडवताना तिलाही समाजाशी कसं जोडून घ्यायचं, याचं उत्तर सापडत नव्हतं. अशा प्रकारच्या स्त्रियांशी संवाद साधल्यानंतर पोस्टरचा एक अतिशय चांगला पर्याय समोर आला. अशी पोस्टर्स आणि व्यंगचित्रांची ताकद फार मोठी आहे. मग त्याबाबतचा अभ्यास केला आणि गावोगावी पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती सुरू झाली. तेव्हा जाणवलं, की महिला चळवळीची अशी पोस्टर्स म्हणजे स्त्री-मनाचा आरसाच आहेत.
स्त्रियांच्या विविध प्रश्नांवर बोलायचं झालं, तर त्याची सुरुवात कुठून करायची, याचा आम्ही शोध घेत होतो. स्त्रियांना महिला मंडळात यायचं होतं. मंडळाच्या पुढे जाऊन महिलांनी संघटित व्हायला हवं, असं बऱ्याच जणांना चर्चेनंतर वाटत होतं. महिला मंडळ म्हटल्यावर ठराविक पाकक्रिया, भजन किंवा शिलाई कामाचे क्लास, भरतकाम आणि वीणकाम अशी एक चौकट होती.
अशा कामांमध्ये परंपरेने किंवा कर्तव्य म्हणून त्या कशा पारंगत होतील अशा प्रकारची महिला मंडळाची भूमिका साधारण दिसत होती. काही महिला मंडळांनी स्त्रियांमधील कलाप्रकारांनाही वाव दिलेला असतो. मात्र, महिला मंडळ आणि संघटनेत महत्त्वाचा फरक आहे. संघटनेत समाजकारण, राजकारण, शिक्षण आणि जीवन अशा विविध क्षेत्रांमध्ये महिलांचं दुय्यम स्थान असतं. ते बदलून समान स्थानासाठी प्रयत्न करणं अपेक्षित असतं.
महिला मंडळ पुरेसं नाही; तर आपण संघटना करायला हवी, असा विचार पुढे आला. त्यातूनच आम्ही क्रांतिकारी महिला संघटना आणि स्त्री आधार केंद्राला सुरुवात केली. चर्चेदरम्यान वेगवेगळ्या प्रश्नांची यादी काढली. त्या प्रश्नांमध्ये स्त्रीला समाजाशी जोडून घ्यायचं आहे; परंतु कशा प्रकारे उत्तर शोधायचं हे तिला सापडत नाही. अशा प्रकारच्या स्त्रियांशी संवाद साधल्यानंतर आम्हाला एक अतिशय चांगलं माध्यम लक्षात आलं ते म्हणजे, पोस्टर.
पोस्टर्सचा उपयोग मोठ्या प्रमाणात जगात सगळीकडेच केला जातो. किंबहुना अगदी अलीकडच्या काळात खूप मोठा इतिहास संघटनांनी उभा केला. अशी पोस्टर्स आणि व्यंगचित्रांची ताकद हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून समोर आली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका एका पोस्टरमधून दहा पानांच्या निबंधातून जे बोलता येणार नाही ते साध्य केलं जात होतं.
अशीही पोस्टर्स होती; परंतु आम्ही स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करत होतो आणि त्याच्यासाठी आम्हाला आमचे मार्ग शोधावे लागले. त्या काळात युनायटेड नेशन्ससंबंधित ‘ट्रिब्युनल वर्ल्ड मॅगझीन’ नावाचं एक चित्रमय मॅगझीन येत असे. त्याच्यात बऱ्याचदा एका चौकटीतून स्त्रियांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो त्याच्या पलीकडची बरीच व्यंगचित्रं आणि साधे साधे सल्ले चित्रांच्या माध्यमातून दिलेले असायचे.
आम्ही स्त्रियांशी हिंसाचाराच्या प्रश्नावर आणि समान अधिकारांवर नातं जोडू इच्छित होतो. आम्ही विषयांची यादी काढली. काही विषयांवर नाटकांचे प्रयोग केले. काही आर्टिस्ट मदतीला घेऊन त्या विषयांची सूत्रं दिली आणि त्यावर चित्रं तयार करून दिली. अशा प्रकारचे साधारण दहा विषय आम्ही काढले होते. त्यात काही विषय असे होते, की समान कामाला समान वेतन. दुसरा विषय होता, की स्त्री बळी ठरत आली आहे.
हिंसाचाराविरोधात एकत्र उभे राहा. तिसरा मुद्दा होता, की बलात्कार मोठा अपराध आहे. सुरक्षित जीवन जगणं स्त्रीचा अधिकार आहे. त्याखेरीज स्त्रीला सूर्यास्तानंतर रात्रीच्या वेळी पोलिस ठाण्यात बोलावता येत नाही. १९८० सालानंतर केलेला तो नवा नियम होता. विशेषतः स्त्रीला रात्रीच्या वेळी पोलिस कोठडीत ठेवता येणार नाही. कोठडीत ठेवायचं झालं तर महिला पोलिस आहेत अशा ठिकाणीच ठेवता येईल.
अशा प्रकारचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. त्यामुळे रात्री आठनंतर पोलिस चौकीत महिलांना बोलावू शकत नाही, याची माहितीच नव्हती कोणाला. पोलिसांनी बोलावलं, की जायचं अशा प्रकारची साधारण भूमिका होती. हा एक विषय होता. त्यानंतर शेतमजूर महिलांचा प्रश्न, पिण्याचं पाणी प्रत्येक स्त्रीला मिळालं पाहिजं, ‘आमचं शरीर आमचा अधिकार’ असे काही मुद्देही त्यात होते.
त्या काळात आम्ही एक फार मोठा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला. त्या कार्यक्रमात क्रांतिकारी महिला संघटना आणि नारी समता मंच अशा दोन्ही संस्था एकत्र आल्या. त्यात आम्ही सहभागी झालो होतो. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातल्याही छोट्या छोट्या गावांमधील संघटना आमच्याबरोबर सहभागी झाल्या होत्या. त्या वेळी आम्ही साधारण सात दिवसांची एक पायी पदयात्रा दहा गावांमधून काढली होती.
मावळमधील पवनानगरहून आम्ही पदयात्रा सुरू केली. पवनानगरनजीक शिवणे, जवण इत्यादी जवळजवळ सात-आठ छोटी गावं होती. रोज साधारण पाच ते सहा किलोमीटर चालत जायचो. तिथे आम्ही गावांमध्ये पोस्टर्स लावत असू. पोस्टर्स ठेवण्यासाठी आम्ही काही वाहनं केली होती. एक टीम पुढे जाऊन पोस्टर्स गावात लावत असे आणि मग आम्ही तिथे पोहोचत होतो. प्रत्येक ठिकाणी आम्ही काही नियम केले होते.
म्हणजे पोस्टर्सबाबत नुसती लाऊडस्पीकरवर उद्घोषणा केली नाही. ‘बघा बघा आमचं पोस्टर एक्झिबिशन आहे’ असं काही न करता आम्ही गावामध्ये भाजी बाजार, पाणवठा किंवा लहान मुलांची शाळा सुटते तेव्हा त्यांना आणायला आलेल्या महिलांना दिसतील अशी पाच-सहा पोस्टर्स लावून ठेवत होतो. मग आम्ही लांबून पाहत राहायचो. आम्ही तिथे फार जवळ थांबायचो नाही; परंतु आमचं लक्ष असायचं.
आम्ही साधा एक निकष लावला होता की कुठली पोस्टर्स आपण नंतर मोठ्या प्रमाणात छापून घ्यायची? जी पोस्टर्स पाहिल्यावर एखादी लगबगीने जाणारी महिला थांबेल, पोस्टर वाचेल आणि मग निघून जाईल. आपण लावलेल्या पोस्टरकडे न बघताच महिला निघून गेली तर त्यातील चित्र आणि मथळ्यात काय बदल करायला हवा, याची चर्चा व्हायची.
त्याबद्दल आम्ही रात्री महिलांशी बोलून त्यांना ते पोस्टर दाखवून त्यांच्या शब्दांत ती वाक्यं लिहून घ्यायचो. त्या निमित्ताने प्रश्न लिहून काढायचो. पोस्टरसाठी जवळजवळ ३० ते ४० किलोमीटर पायपीट केलेला ग्रुप मला तर वाटतं महाराष्ट्रामध्ये बहुतेक विरळा असेल. आम्ही त्यानंतर साधना दधात, लता भालेराव, मीना इनामदार, कुंदा अंबुरे, वत्सला पाटील, आशा रणदिवे इत्यादी सगळ्या जणी पायी मोर्चाने गेलो होतो.
सात दिवस फिरून वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये... अगदी खूपच वेगळ्या पद्धतीने स्वागत झाले. पुण्यातील महिला येतात आणि ठिकठिकाणी आपल्याशी चर्चा करतात, भेटतात... गावागावांमध्ये रात्रीच्या साडेआठच्या सुमाराला स्त्रियांशी गप्पागोष्टी करतात यातून खूप वेगळे अनुभव आले.
ग्रामीण स्त्रीचं जीवन काय आहे ते आम्हाला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात आलं. उदगीरला मी असं जीवन पाहिलेलं होतं; परंतु ‘धरण उशाला आणि कोरड घशाला’ अशासारखी म्हण असेल किंवा ‘बाई मी धरण, धरण, धरण बांधते... माझं मरण, मरण, मरण कांडीते’ अशी दया पवारांची कविता असेल... अशांसारख्या धरणाच्या आसपासच्या छोट्या खेड्यांमधील स्त्रीचं जीवन जेव्हा समोर दिसलं तेव्हा त्यात राहणाऱ्या स्त्रीला ‘समान काम समान दाम’ समजावून सांगायला आपल्याला काय करायला पाहिजे, ते आमच्या लक्षात आलं.
त्याचबरोबर आमच्या लक्षात आलं, की अशा कामासाठी थांबून चार क्षण विचार केला पाहिजे. तिच्याशी बोललं पाहिजे. तिच्या प्रश्नाशी जोडलेलं नातं दृढ झालं तर समाजातील जागृती वाढेल. मग बचत गटांसारखा विषय नंतर आला किंवा यंत्रसामग्रीमधून स्त्रीचं श्रम कमी करण्यासारख्या विषयाला किंवा सुरक्षिततेच्या प्रश्नांमध्येही आम्हाला त्यामधले काहीतरी प्रश्न समोर दिसायला लागले.
पोस्टर्सच्या छपाईसाठी स्त्री आधार केंद्राला मदत मिळाली आणि तिचा उपयोग करून आम्ही ५० हजार पोस्टर्स तत्कालीन काळात प्रसिद्ध केली. अनेक गावांत प्रकाशित झालेली पोस्टर्स पाठवली. इतकेच नव्हे; तर पोस्टर प्रदर्शन भरवून ते वायरला लावून ती आम्ही कुठेही झाडाखाली वा एसटी स्टॅण्डवर महिलांना पाहायला लावत असू.
आजही स्त्री आधार केंद्र आणि क्रांतिकारी महिला संघटनेचे कार्यक्रम आम्ही घेतो. त्यामध्ये आजही स्त्रिया त्या किंवा इतर पोस्टर्सचा उपयोग करताना दिसतात. २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२३ दरम्यान एक मोहीम झाली. त्यातही आमच्या कार्यकर्त्या अनिता शिंदे, आश्लेषा खंडागळे, हिमांशी वाडेकर, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी इत्यादी सर्व जणींनी पोस्टर्स घेऊन ठिकठिकाणी महिलांशी बोलून चर्चा केली.
त्या पोस्टर्सनुसार सावित्रीबाई फुले यांचे विचार त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पोस्टर्सच्या निमित्ताने स्त्रीच्या जीवनाशी नातं जोडणारं चांगलं माध्यम आपल्यासमोर आलं. अशीच काही प्रभावी पोस्टर्स नंतर मला चळवळीच्या काळात कामास आली. म्हणून असं जाणवतं, की महिला चळवळीची अशी पोस्टर्स म्हणजे स्त्री-मनाचा आरसा आहे, असंही म्हणता येऊ शकेल.
neeilamgorhe@ gmail.com
(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.