मला साहित्याची आवड होतीच. पूर्वीच्या आणि त्यानंतरच्याही काळातील प्रथितयश लेखिकांमधून मला आत्मप्रचीती जाणवत गेली. त्यामुळे स्त्रीच्या जीवनातील गुंतागुंत कळत गेली. त्यातून नेमकेपणाने जाणवलं, की राजकारणामध्ये कशा प्रकारची स्त्री-पुरुष विषमता आहे. त्या दृष्टिकोनातूनच क्रांतिकारी महिला संघटनेचं काम आम्ही सुरू केलं. उत्साही महिला कार्यकर्त्यांचे गट आम्हाला जोडले जाऊ लागले आणि त्यातून मला माझ्या कामाची एक दिशा सापडली.
महाराष्ट्रातील अनेक चळवळींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टप्पे येऊन गेले. त्यात साधारण १९७० च्या सुमाराला युवकांच्या चळवळी संपूर्ण भारतात आणि जगात उभ्या राहिल्या. विविध प्रकारच्या नवीन विचारप्रवाहांचा त्यात समावेश होता. नव मार्क्सवाद आणि नवीन समाजवादाबरोबरच आर्थिक उदारीकरणासंदर्भातील नवीन सिद्धांत, स्त्री-पुरुष संबंधाचं नातं आणि त्याबद्दलचं पुन्हा विवेचन करणारे अनेक शास्त्रीय अभ्यास झाले.
या विविध वादांमध्ये अजून एक विचारप्रवाह प्रामुख्याने समोर आला आणि तो म्हणजे ‘स्त्रीवाद’. स्त्रीवादाचा विचार करताना त्यातून अनेक बाबींमध्ये पुन्हा पुन्हा तपासून बघणं सुरू झालं, की स्त्रियांच्या विविध संघटना किंवा वेगळ्या व्यासपीठांची गरज नक्की काय आहे? तेव्हा असं लक्षात आलं, की बऱ्याचशा स्त्रिया स्त्री-पुरुषांच्या एकत्र व्यासपीठांवर बोलत नाहीत, बोलायला संधी मिळत नाही किंवा त्यांचे जे प्रश्न आहेत त्यांचे प्रतिबिंब त्यांना त्या व्यासपीठावर मांडता येत नाही.
त्याचा परिणाम असा होतो, की समाजातील अनेक घटकांच्या प्रश्नांना चालना देण्यासाठी त्या विषयांना न्यायच दिला जात नाही. त्यामुळे हे जे सगळे विविध विचारप्रवाह होते त्यांनी जगामध्ये सगळीकडे स्वतःचं संगीत, स्वतःचे विचार, स्वतःचं साहित्य, स्वतःची जीवनशैली, स्वतःची कार्यपद्धती, स्वतःचं भूत-भविष्य-इतिहास या सगळ्यांची पुन्हा एकदा तपासणी किंवा पुनर्विलोकन म्हणता येईल, असं सुरू केलं. स्त्री-अभ्यासाचंही असं झालं आणि त्यामध्ये मला माझा मार्ग स्त्री-अभ्यासाच्या खूप जवळचा आहे हे लक्षात आलं.
स्त्री-अभ्यासाचं एक वाक्यच होतं की, ‘Making the Invisible in the History Visible’. म्हणजे जे इतिहासामध्ये अदृश्य आहे ते अधिक दृश्य बनवणं... त्या काळात अनेक अभ्यास सुरू झाले. त्यात महिलांचं साहित्य आणि त्यांची अनेक आत्मचरित्रंही गाजली. त्यात ‘आहे मनोहर तरी’ किंवा वेगवेगळ्या लेखिकांनी लिहिलेली आत्मचरित्रं जशी होती तशीच प्रथितयश व्यक्तीच्या आयुष्यातसुद्धा पत्नीला काय प्रकारचा संघर्ष करावा लागतो, याची मांडणी झालेली होती.
उदा., विंदा करंदीकर म्हणजे माझे सासरे आणि माझ्या सासूबाई सुमा करंदीकर. सुमा करंदीकरांनी लिहिलेलं ‘रास’ हे आत्मचरित्र... काही वेळा हंसा वाडकर यांच्यासारख्या प्रथितयश अभिनेत्रीने लिहिलेलं ‘सांगत्ये ऐका’ हे आत्मचरित्रसुद्धा आलं होतं आणि त्यामधून बऱ्याचशा बाबींवर प्रकाश पडलेला होता. मला स्वतःला साहित्याची आवड होतीच.
पूर्वीच्या काळातील लेखिका त्यात इंदिरा संत असतील, दुर्गा भागवत असतील किंवा विभावरी शिरूरकरांसारख्या स्त्रिया असतील... त्यांच्या नंतरच्या काळातही ज्या लेखिका आहेत त्यांच्या ओळखींमधून मला आत्मप्रचीती जाणवत गेली. त्यामुळे एका बाजूला मेडिकलचा अभ्यास करत असताना स्त्रीच्या जीवनात जी गुंतागुंत असते तीही कळत गेली आणि त्यामध्ये कशा प्रकारे नवीन विचार होतो हेही लक्षात आलं.
त्यातून मला नेमकेपणाने जाणवलं, की राजकारणामध्ये कशा प्रकारची स्त्री-पुरुष विषमता आहे. विशेषत: अनेक पुरोगामी क्रांतिकारी म्हणवणाऱ्या संघटनांमध्ये महिला पूर्णवेळ कार्यकर्त्यांची संख्या कमी होती. पुरुष पूर्णवेळ काम करत होते. बऱ्याचशा पुरुषांचं पूर्णवेळ काम करणं म्हणजे ती एक व्यक्ती स्वतःपुरतं कमवायची आणि स्वतःची काळजी घ्यायची.
तो कुटुंबाचा भाग असल्यामुळे त्याचा आर्थिक भार, घरकामांमधून त्याला जेवण-खान, आरोग्य या दृष्टीने ज्या सेवा पुरवल्या जातील त्या सगळ्या कुटुंबांनी पाहायच्या, म्हणजे पत्नीने बघायच्या. अशा प्रकारे अनेक लोकांनी राजकारणात झोकून दिले होते आणि त्या स्त्रियांनी स्वतःच्या पतीच्या राजकारणासाठी स्वतःला समर्पित केलेलं होतं. गेल्या पंधरा-वीस वर्षांत हा ट्रेंड थोडा बदलला आहे.
त्याच्यामध्ये स्वतः ती व्यक्ती काही ना काही व्यवसायातून आलेली असते आणि त्याच्यानंतर ती राजकारणामध्ये आलेली आपल्याला दिसते. महिला आरक्षण आल्यावर तर पुरुष व्यवसाय करतो आहे आणि पत्नी राजकारणात असल्याचे चित्रदेखील आपल्याला दिसायला लागलं. पण १९८० च्या सुमारास मी पुण्यात परत आले त्या वेळी काही गोष्टी मला खासकरून अधोरेखित करून अगदी ठळकपणाने जाणवल्या.
पहिलं म्हणजे राजकीय संघटनांमध्ये बैठकांच्या ज्या वेळा असतात त्या अतिशय गैरसोयीच्या असतात. बऱ्याचशा बैठका रात्री आठ किंवा नऊला सुरू होतात किंवा सुट्टीच्या दिवशी घेतल्या जातात. महिलांसाठी दुपारची वेळ सोयीची पडते. त्या फार फार तर संध्याकाळी चार-पाच वाजल्यापासून ऑफिस संपलं की त्याच्यानंतर एखादा तास वेळ काढू शकतात. याउलट राजकीय संघटनांमध्ये बैठका कमीत कमी दोन-तीन तास चालतातच.
त्या बैठकांमध्ये जर का एखाद्या गोष्टीवर विचारमंथन व्हायचं असेल तर त्या चार-चार किंवा पाच-पाच ताससुद्धा चालतात. त्यामुळे संध्याकाळी भेटायचं, जेवण करायचं आणि पुन्हा बैठक चालू ठेवायची, अशी साधारण पद्धत होती. ज्यांच्या घरात मुलं लहान आहेत किंवा वृद्ध व्यक्ती आहेत त्यांना त्याच्यातून वेळ काढणं अतिशय अवघड असायचं. आयुष्याच्या ज्या टप्प्यावरून मी जात होते तेव्हा माझी मुलगी लहान होती आणि तिला घेऊन तिथे झोपवणं आणि लक्ष देणं हे जवळजवळ अशक्य होतं. मग असं होतं, की राजकारणातून तुम्ही आपोआपच वगळले जायला लागता.
दुसरं, स्त्रियांवर राजकारणात जबाबदाऱ्या कुठल्या असायच्या तर तिने हिशेब लिहायचा किंवा फार तर फार टिपण काढून मिनिट्स लिहायचे. ही कामं संघटनांमध्ये स्त्रिया करत होत्या आणि बैठकीमध्ये कॉफी करून देण्याचं काम या स्त्रिया करायच्या. क्वचित एखादा पुरुष आवडीने ते करायचा.
परदेशातसुद्धा स्त्रीवादी संघटना, कम्युनिस्ट किंवा पुरोगामी संघटनांमध्ये महिला कार्यकर्त्यांकडून तक्रार मांडायला सुरुवात झाली की स्त्रियांच्या प्रश्नांना स्वतंत्रपणे न्याय देणारी यंत्रणा आवश्यक आहे. म्हणजेच थोडक्यात स्त्रियांच्या स्वयंसिद्ध संघटना किंवा Autonomus ज्याला आपण ‘स्वायत्त संघटना’ म्हणू. त्या संघटनांचे नियंत्रण आणि त्याची निर्णयप्रक्रिया ही महिलांच्याच हातात असावी.
अशा प्रकारच्या संघटनांमध्ये काम करत असताना अर्थातच काही स्त्रिया फक्त घरकाम करणार आणि काही बाहेरचं काम बघणार, अशी विभागणी नसेल तर सर्व स्त्रियांना स्वतःच्या घरामधली आणि राजकीय जबाबदारी सांभाळता येईल, अशा प्रकारची त्याची चौकट असावी. अशा प्रकारची या संघटनांची कार्यपद्धती असावी.
आता या इतक्या तपशीलवार बाबीमध्ये जाणं हे राजकीय पक्षांना तेवढं शक्यही होत नाही आणि ते त्या काळात तर अगदीच अवघड होतं. त्यामुळे महिला संघटनांची वेगळी चूल कशाला? म्हणजे हे स्वतःचं नेतृत्व व्यक्तिगत फुलवण्यापुरतं मर्यादित आहे का? असा विचार सुरू झाला.
राजकीय विचाराबरोबर स्त्री मतदार म्हणून आपल्याला समाजामध्ये जे दुय्यम स्थान आहे ते बदलण्यासाठी काही काम करायला पाहिजे याची जाणीव सातत्याने होत होती. याखेरीज स्त्रियांचे प्रश्न जे समोर आले त्याच्यात कौटुंबिक हिंसाचार आणि आरोग्याचा प्रश्न समोर आला.
महिलांसाठी असणाऱ्या रोजगाराच्या कमी संधी आणि त्यातील दुजाभाव या विषयांबरोबर स्त्रियांना शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक अशा अनेक बाबतींत निर्णयप्रक्रियेपासून राहावं लागतं हेदेखील जाणवलं. त्या पार्श्वभूमीवर मी स्वतःच युवक क्रांती दलातील स्थान आणि राजकारणामध्ये असणारा दुजाभाव या पार्श्वभूमीवर या मतापर्यंत आले, की आपण महिलांच्या प्रश्नांना खास करून वेळ देणारी अशी महिलांची संघटना उभारणं आवश्यक आहे.
त्यामुळे ती फक्त एक संघटना किंवा संस्था नव्हती; तर ज्या कारणामुळे स्त्रीला सार्वजनिक जीवनातून डावललं जातं किंवा स्त्री सार्वजनिक जीवनात येताना कचरते त्याच्यावर ते शोधलेलं उत्तर होतं. त्या उत्तरांमध्ये आम्हाला दिसत होतं की स्त्रियांनी एकत्र येऊन विविध क्षेत्रांतल्या दुजाभावाविरोधात समानता असावी म्हणून दबाव गट करणं, त्याबद्दल जागृती करणं, त्यासाठी कायदे तयार करणं, त्यासाठी धोरणांमध्ये काम करणं हे सगळं आवश्यक आहे.
या दृष्टिकोनातून आमच्या क्रांतिकारी महिला संघटनेचं काम आम्ही सुरू केलं. त्यामधून ठिकठिकाणच्या स्त्रियांशी जेव्हा आम्ही बोलायला लागलो तेव्हा उत्स्फूर्तपणे अगदी पाण्याला जशी वाट मिळावी तसं आणि पाणी जसं वेगाने ठिकठिकाणी जमा होऊन त्याचा एक सुंदर असा स्रोत तयार होतो तशा प्रकारे महिलांचे गटच्या गट, उत्साही महिला कार्यकर्त्या आम्हाला जोडल्या जाऊ लागल्या. त्यातून आमचा उत्साह दुणावला आणि मला माझ्या कामामध्ये एक दिशा सापडली, असं म्हणता येईल.
neeilamgorhe@ gmail.com
(लेखिका विधान परिषदेच्या उपसभापती आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.