Dr Pragati Abhyankar writes Antibiotics discovery brought about radical change pharmacology and treatment sakal
सप्तरंग

प्रतिजैविकं : शोध आणि बोध (भाग : २)

प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्स) शोधानं औषधनिर्माणशास्त्रात आणि उपचारपद्धतीत आमूलाग्र बदल घडून आले.

सकाळ वृत्तसेवा

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला संसर्गजन्य आजारानं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण प्रचंड होतं. तेच प्रमाण एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रगत राष्ट्रांमध्ये अत्यल्प झालं.

- डॉ. प्रगती अभ्यंकर

प्रतिजैविकांच्या (अँटिबायोटिक्स) शोधानं औषधनिर्माणशास्त्रात आणि उपचारपद्धतीत आमूलाग्र बदल घडून आले. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला संसर्गजन्य आजारानं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण प्रचंड होतं. तेच प्रमाण एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला प्रगत राष्ट्रांमध्ये अत्यल्प झालं. अलीकडे प्रतिजैविकांचं सेवन मध्यम आणि कमी उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलं आहे.

हे सर्व होत असताना दुसरीकडे जिवाणूंमध्ये (बॅक्टेरिया) या प्रतिजैविकांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण झाली आणि ती बऱ्याच वंशांच्या जिवाणूंमध्ये निर्माण होत असल्याचं लक्षात आलं. असं चित्र निर्माण झाल्यामुळे, आपण पुन्हा प्रतिजैविकपूर्वकाळात तर जाणार नाही ना, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीमुळे आणखी नवीन प्रतिजैविकांचा शोध घेणं गरजेचं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं टीबी व अन्य घातक आजारांच्या जिवाणूंवर (साल्मोनेला, नाईसएरिया गोनोरिया, हेलिकोबॅक्टर पायरोली) परिणामकारक प्रतिजैविकं शोधण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रतिजैविकांचा जिवाणूंवर विविध प्रकारे परिणाम होत असतो. काही जिवाणूंच्या बाह्य पटलावर, काहींच्या जनुकीय संयुगांवर, काही जिवाणूंच्या विशिष्ट एन्झाईमवर व अन्य घटकांवर, काहींच्या प्रथिनांच्या संश्लेषणावर, तर काही जिवाणूंच्या वाहतूकसंस्थेवर व अन्य विशिष्ट भागांमध्ये प्रतिजैविकं बदल घडवून आणतात. याचा परिणाम म्हणून काही वेळा जिवाणू लगेचच मरतात, तर काही वेळा त्यांची वाढ थांबते. परिणामी, त्यांच्या संख्येला आळा बसतो आणि त्यांचे आपल्यावर होणारे दुष्परिणाम थांबतात.

प्रत्येक प्रतिजैविक कुठं, कसा, काय परिणाम करणार हे त्याच्या रासायनिक संरचनेमुळे ठरलेलं असतं, तसंच जिवाणूंच्या विशिष्ट संरचनेमुळे एखादं प्रतिजैविक त्याच्याविरुद्ध परिणामकारक असेल की नाही हे ठरतं.

प्रतिजैविकं ही विशिष्ट जिवाणूंविरुद्ध नसून जिवाणूंच्या विशिष्ट भागाविरुद्ध कार्य करतात, हे समजून घेतलं पाहिजे. एखाद्या जिवाणूमध्ये एखादी विशिष्ट रचना नसली तर वेगळं लक्ष्य असणाऱ्या प्रतिजैविकांचा तिथं काहीच उपयोग होत नाही आणि म्हणूनच अशी प्रतिजैविकं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं योग्य नाही.

आपण नुसतं ऐकीव किंवा वाचलेल्या; पण न समजलेल्या माहितीवरून एखादं प्रतिजैविक घेतलं आणि त्याचं कार्य आपल्याला संसर्ग झालेल्या जिवाणूविरुद्ध नसलं तर आपण ते घेतल्यावर ते काहीतरी परिणाम निश्चितच करणार. जर प्रतिजैविकांना त्यांचं लक्ष्य सापडलं नाही तर आपल्या शरीरातील काही पेशींना आणि अन्य लाभदायक जिवाणूंना त्यांच्याकडून लक्ष्य केलं जातं आणि मग आपल्याला दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं.

काही वेळा डॉक्टरांनी दिलेल्या प्रतिजैविकांच्या सेवनानंतर असे दुष्परिणाम दिसतात. याचं नेमकं कारण काय? आपल्या शरीरात असणाऱ्या संसर्गजन्य जिवाणूंची संख्या प्रचंड असू शकते, ज्यांच्याविरुद्ध प्रतिजैविकं पुरी पडत नाहीत आणि त्यामुळे अपेक्षित परिणाम दिसून येत नाहीत. काही वेळा संबंधित व्यक्तीच्या प्रकृतीमुळे व जनुकीय रचनेमुळे प्रतिजैविकाला दिल्या जाणाऱ्या प्रतिसादात फरक पडतो आणि म्हणूनच एकच प्रतिजैविक काही जणांवर अपेक्षित परिणाम साधतं, तर इतरांवर त्याचे दुष्परिणाम होतात.

प्रतिजैविकं वारंवार घेतल्यामुळे जिवाणूंमध्ये त्यांना प्रतिरोध/प्रतिकार करण्याची क्षमता वाढत जाते आणि पूर्वी एखाद्या प्रतिजैविकामुळे मारले जाणारे जिवाणू आता त्याला जुमानत नाहीत. यालाही कारण प्रतिजैविकांचा अमर्याद वापर हेच आहे. एखाद्या प्रतिजैविकाला एखादा जिवाणू प्रतिकार दर्शवू लागल्यावर आणखी शक्तिवान प्रतिजैविकं वापरावी लागतात. मग आपल्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होणं ओघानंच आलं. एकापेक्षा एक किती वाढीव प्रतिजैविकं आपण घेत राहणार आणि प्रतिरोधक जिवाणूंची संख्या वाढत राहणार?

जसं आपण साध्या घसा दुखण्यावर अमोक्सिसिलिन सहज घेतो; पण हळूहळू त्याचा उपयोग होत नाही हे लक्षात येतं आणि मग आणखी वेगळं प्रतिजैविक घेण्याच्या मागं लागतो. उदाहरणार्थ - अजिथ्रोमायसिन.

प्रतिजैविकांना प्रतिरोध करणाऱ्या जिवाणूंमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या दर वर्षी वाढतच आहे. अनेक जिवाणू (स्टेफ्लोकॉकस) एकाच वेळी अनेक प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात (Multiresistant). काही (सुडोमोनास) बहुतेक प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात (Extensively Drug Resistant) आणि काही (सुडोमोनास आणि क्लबशिएला) अस्तित्वात असणाऱ्या सर्वच प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात (Pan Resistant). जिवाणूंमध्येही फेरफार (Mutation) फार पटकन होतात आणि त्यामुळे प्रतिजैविकांना प्रतिरोध निर्माण होतो. म्हणूनच कुठलंही प्रतिजैविक फार काळ प्रभावी राहत नाही. त्यामुळेच प्रतिजैविकांचा वापर फार काळजीपूर्वक करावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रतिजैविकं घेऊ नयेत, तसंच ऐकीव माहितीवरूनही प्रतिजैविकं घेऊ नयेत. कुठल्याही प्रतिजैविकाच्या सेवनाआधी त्याचा आपल्या शरीरावर काही अहितकारक परिणाम होणार नाही ना याची चाचणी करून घ्यावी (पेनिसिलिनचं इंजेक्शन घेताच मृत्यू झाल्याच्या दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेल्या आहेत). तसा पूर्वानुभव असल्यास डॉक्टरांना वेळीच सूचित करावं. डॉक्टरांनी दिलेला डोस पूर्ण करावा. बऱ्याच वेळा दुष्परिणाम टाळण्यासाठी डॉक्टर पूरक औषधं देतात, तीही व्यवस्थित घ्यावीत. डॉक्टरांनी आपल्याला जी प्रतिजैविकं दिलेली असतात ती घेण्याचा सल्ला आपण इतरांना परस्पर देऊ नये, तसंच डॉक्टरांनी इतरांना दिलेली प्रतिजैविकं आपणही परस्पर घेऊ नयेत. एरवीसुद्धा कालबाह्यतेची तारीख बघून प्रतिजैविकं घ्यावीत. पुरळ येणं, मळमळ, अपचन यांसारखे दुष्परिणाम किंवा याहीपेक्षा गंभीर असं काही आढळल्यास डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

वरील प्रकारे विविध पातळ्यांवर काळजी घेतल्यास प्रतिजैविकं निश्चितपणे वरदान ठरतील. प्रत्येक आजाराला प्रतिजैविकांची गरज असतेच अस नाही. त्यामुळेच काळजी घ्या व विचारपूर्वक सेवन करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: निकालाची धडकी? उद्धव ठाकरेंचा प्लॅन बी! 'लाईव्ह'चं शस्त्र उगारलं, पुन्हा दगा टाळण्यासाठी उमेदवारांना एकत्र आणलं

Adani Group: अदानींना एकाच वेळी 3 मोठे झटके, 600 दशलक्ष डॉलरची योजना रद्द, केनिया करारही रद्द आणि...

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वाढलेला टक्का, कोणाच्या छातीत कळ, कुणाला पाठबळ..? उमेदवारांमध्येच चर्चा

केवळ तुमच्या प्रेमामुळे शक्य झालं... प्राजक्ता माळीची इन्स्टावर नवी पोस्ट, हसऱ्या चेहऱ्याने दिली आनंदाची बातमी

Maharashtra Satta Bazar: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? बुकींची कोणाला पसंती? मविआ महायुतीला सट्टाबाजारात किती मिळतोय भाव?

SCROLL FOR NEXT