wardha akhil bhartiy marathi sahitya sammelan sakal
सप्तरंग

वर्ध्याचा वाङ्‌मयीन विचार

वर्धा येथे ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे.

डॉ. राजेंद्र मुंढे

वर्धा येथे ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे.

वर्धा येथे ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९६ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन होत आहे. वर्धा जिल्हा महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या वास्तव्यामुळे जगभरात ओळखला जातो. या नगरीत हे संमेलन होत असताना वर्ध्याला पुरातन काळापासून असलेल्या परंपरेचा घेतलेला धांडोळा...

वर्धा जिल्ह्याचे नाव साऱ्या दिगंतात प्रसिद्ध आहे ते महात्मा गांधीजींच्या सेवाग्राम वास्तव्यामुळे. प्रशासकीयदृष्ट्या जिल्ह्याचा इतिहास केवळ दीड-पावणेदोनशे वर्षांचा असला तरी जिल्ह्याच्या अस्तित्वाच्या खुणा मात्र याआधीच्या शतकात शोधता येतात त्या प्राचीन-मध्ययुगीन कालखंडात गुणाढ्यांसारख्या ‘पैशांची भाषा’च्या विद्वान जगद्‍‍विख्यात बृहत् कथांच्या जनकाच्या रूपात. त्याचे हिंगणघाट तालुक्यात पोथरा या गावात वास्तव्या होते. लोकभाषा व लोककथांचा मुळारंभ म्हणून गुणाढ्यांनी लिहिलेल्या या बृहत्कथांकडे पाहिले जाते. गुणाढ्यांची मूळ लेखनसंहिता आज उपलब्ध नाही. गुणाढ्यांच्या लोककथांचा आधार घेऊन क्षेमेंद्र यांनी ‘बृहत्कथा’ व सोमदेव यांनी ‘कथासरितासागर’ या दोन संस्कृत ग्रंथांची निर्मिती केली. ज्येष्ठ संशोधक व विदर्भातील लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. भाऊ मांडवकर यांनी गुणाढ्य हे हिंगणघाट तालुक्यातील पोथरा गावातील मूळ रहिवासी असल्याचा दावा आपल्या ‘आदिजन’ या ग्रंथामध्ये केला आहे.

ए. बेरेडल कीथ नावाच्या पाश्चिमात्त्य संशोधकाने कम्बोडिया येथे प्राप्त झालेल्या एका अभिलेखाच्या आधारे गुणाढ्याचा कालखंड शोधण्याचा प्रयत्न केला. जागतिक साहित्यक्षेत्रात गुणाढ्याच्या कलाकृतीबाबत रोज नवी चर्चा होत असताना डॉ. भाऊ मांडवकरांच्या या संशोधनाकडे वैदर्भीय नव्या लोकसाहित्य अभ्यासकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसते. वाशीम आणि वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट पोथराशी थेट संबंध असणारा गुणाढ्य त्यातच अलीकडील काळात तो काश्मिरी होता, या तर्कावर अभ्यासकांमध्ये चर्वितचर्वण केले जात आहे. हा युक्तिवाद वैदर्भीय सांस्कृतिक विश्वाला धोक्याचा ठरू शकतो. गुणाढ्याचा हा संदर्भ सोडल्यास वर्ध्याच्या वाङ्‌मयीन परंपरेची मुळे खऱ्या अर्थाने रुजली ती आधुनिक काळातील स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर कालखंडात, ती म्हणजे गांधीजींच्या आगमनानंतरच. म्हणूनच असे म्हटले जाते, वर्धा जिल्ह्याला फारशी साहित्य परंपरा नाही. नभांगणात अधूनमधून एखादा तारा चमकावा असं कधी कधी घडत असतं. परंतु याच गांधी, विनोबांच्या वास्तव्याने काही संस्कृती, साहित्य व कलापुरुषांचा वर्ध्याला स्पर्श झाला हेही तेवढेच खरे!

स्वतः विनोबा भावे (११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२) संत, प्राच्यविद्या पारंगत व थोर साहित्यिक होते. ‘गीताई’, ‘मधुकर’सारखी रचना, ‘गीता प्रवचने’सारखे अजोड साहित्य त्यांनी निर्मिले, ज्यात अष्टादशी (सार्थ), ईशावास्यवृत्ति, उपनिषदांचा अभ्यास, गीताई-चिंतनिका, गुरुबोध सार (सार्थ), जीवनदृष्टी, भागवत धर्म-सार, लोकनीती, विचार पोथी साम्यसूत्र, साम्यसूत्र वृत्ति, स्थितप्रज्ञ-दर्शन ही विनोबांची विपुल ग्रंथसंपदा आहे. विनोबांचा वारसा दादा धर्माधिकारी यांनी (जन्म १८८९ : मृत्यू १ डिसेंबर १९८५) त्यांच्या आपल्या गणराज्याची घडण (मराठी), गांधीजी की दृष्टी, तरुणाई, दादांच्या बोधकथा, दादांच्या शब्दांत दादा, नागरिक विश्वविद्यालय- एक परिकल्पना, प्रिय मुली, मानवनिष्ठ भारतीयता, मैत्री, क्रांतिवादी तरुणांनो, लोकशाही विकास आणि भविष्य, सर्वोदय दर्शन, स्त्री-पुरुष सहजीवन, हे ग्रंथ तर त्यांचे सुपुत्र न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी (जन्मतारीख : २० नोव्हेंबर १९२७ मृत्यू : ३ जानेवारी २०१९) यांनीही अंतर्यात्रा, काळाची पाऊले, न्यायमूर्ती का हलफनामा (हिंदी), भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंझील दूरच राहिली!, माणूसनामा, मानवनिष्ठ अध्यात्म, लोकतंत्र एवं राहों के अन्वेषण (हिंदी), शोध गांधींचा, समाजमन, सहप्रवास, सूर्योदयाची वाट पाहूया आदी ग्रंथांतून विपुल लेखन केले आहे.

पु. य. देशपांडे (जन्म ११ डिसेंबर १८९९, मृत्यू २६ जुलै १९८६) यांच्या बंधनाच्या पलीकडे, सदाफुली, अनामिकाची चिंतनिका -१९६२ साहित्य अकादमी पुरस्कार भेविघोष-धर्मघोष, काळी राणी, मयूरपंख, विशाल जीवन कादंबऱ्या व गांधीजीच का? हे वैचारिक लेखन, आचार्य काका कालेलकर यांची गुजराथी, हिंदी, मराठीतील वैविध्यपूर्ण साहित्यसंपदा, भदंत आनंद कौसल्यायन, भवाणीप्रसाद मिश्र, शंकरराव देव, आचार्य जावडेकर, श्रीकृष्णदास जाजू, श्रीमननारायण, कुंदर दिवाण, रामेश्वर दयाल दुबे, मदालसा नारायण, निर्मला देशपांडे, मधुकरराव चौधरी, ठाकूरदासजी बंग, सुमनताई बंग, डॉ. अभय बंग यांनी पुढे नेलेला दिसतो. गांधीवादी साहित्य परंपरा इथेच थांबत नाही, तर पुढच्या काळात बौद्ध पंडित प्रो. धर्मानंद कोसंबी या प्रभावळीत येऊन सामील होतात. वामनराव चोरघडे यांच्या संस्कारक्षम कथांच्या पहिल्या संग्रहाचा बहर येथेच बहरतो आणि पुढे मराठी लघुकथेच्या मांदियाळीत दाखल होताना दिसतो. त्यांची खरी ‘जडण घडण’ (आत्मचरित्र, १९८१) वर्ध्यातच झालेली आहे; तर आजही ‘खादीशी जुळले नाते’ या आत्मकथनातून रघुनाथ कुलकर्णी यांनी स्वतःच्या जीवनप्रवासातून भारताच्या खादीक्षेत्रातील वाटचालीचं खरखुरं चित्र रेखाटलं आहे.

कवी मंगेश पाडगावकरांना ‘जिप्सी’ची भेट याच गांधीनगरीत होते. आधुनिक मराठी कवितेचे जनकत्व ज्यांना बहाल केले गेले, त्या केशवसुतांचे बालपण वर्ध्यात मामाकडे गेलेले. गांधीजींच्या वर्ध्यात येण्यापूर्वी महात्मा फुलेंची ओळख साऱ्या जगाला करून दिली ती याच शहराने; ते त्यांचे पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेले चरित्र येथील जीनदासजी चवडे यांनी छापून आणि प्रसिद्ध करूनच. वर्ध्यात महात्मा गांधीजी येण्यापूर्वी लोकमान्य टिळक येथे आलेले होते. पुढे त्यांचे प्रत्यक्षपणे वर्ध्याशी नातेही जुळलेले. गांधीजींची पत्रकारिता व स्वातंत्र्य लढ्याची मुहूर्तमेढ सेवाग्राम येथून झालेली असल्याने हा कालखंड गांधीवादी साहित्याने प्रभावित झालेला. सुप्रसिद्ध कवी आणि वक्ते मधुकर केचेंचा जन्मदेखील वर्धा नदीच्या कुशीत असलेल्या अंतोरा या गावाचा. लेखक कादंबरीकार व संशोधक डॉ. भाऊ मांडवकर यांनी वर्ध्यात शिक्षण व काही काळ नोकरीनिमित्त केलेले वास्तव्य या साहित्य प्रांतात छाप पाडून गेले.

एखाद्या गावात साहित्य संमेलन झाल्यावर त्या क्षेत्रात उत्साह असतो; परंतु १९७० ते १९८० हे दशक यादृष्टीने कोरडे असल्याचा प्रत्यय येतो. साधारणतः १९८० नंतरचा कालखंड वर्धा जिल्ह्यातील साहित्य चळवळीला ऊर्ध्वावस्था प्राप्त करून देणारा ठरला आहे. प्रा. किशोर सानप, प्रा. नवनीत देशमुख यांसारख्या समीक्षक-लेखकांनी नोकरीनिमित्ताने वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला आणि जिल्ह्याचे साहित्य क्षितिज उजळून निघू लागले. सुरुवातीला डॉ. किशोर सानप यांच्या पुढाकाराने विदर्भ साहित्य संघाचे कार्य जोर धरून यातूनच सतीश पावडे, मनोज तायडे, अशोक चोपडे, प्रशांत पनवेलकर आणि संजय इंगळे तिगावकरांसारखी नवी पिढी पुढे आली. डॉ. हेमचंद्र वैद्य यांचे हिंदी-मराठीतील लेखन, डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे हे विज्ञान शाखेचे विद्यार्थी, त्यांनी केलेले विज्ञान कवितेच्या लेखनाचे प्रयोग, पुढे कादंबरी, कथा, कविता, पटकथा संवाद लेखक म्हणूनही नावालौकिक मिळाला.

स्त्री लेखनाची परंपरा वर्ध्यात रुजवण्याचा आणि अग्रणी लेखिका म्हणून उषा देशमुख यांना मान द्यावाच लागतो. डॉ. सुनीता कावळे यांनी विपुल आणि वैविध्यपूर्ण लेखन करून स्त्रीलेखनाच्या दालनाला समृद्ध केले. त्यांचा वारसा आणि स्त्री संघर्षाच्या गाथा दीपमाला कुबडे काव्यातून मांडताना दिसतात. विदर्भातील एकमेव यशस्वी प्रकाशिका आणि लेखिका अरुणा सबाने यांच्या कादंबरीतील नायिका कर्तृत्वाचं बळ प्राप्त करून, ऊर्जास्रोत ठरणाऱ्या नायिका जोरकसपणे उभ्या केल्या आहेत. काही वर्षे येथे वास्तव्यात असणाऱ्या इंदुमती जोंधळे, तारा धर्माधिकारी आणि लक्ष्मी गेडाम यांनीही कथालेखन केले आहे. सुमती वानखेडे यांच्या काव्य व ललितलेखनातून आत्मप्रत्ययाचा सहजोद्गार उमटलेला दिसतो. सुनीता झाडे यांच्या काव्यातून स्त्रियांच्या अंतर्मनातील हळुवार संवेदनांची स्पंदने टिपली गेली आहेत. डॉ. स्मिता वानखेडे यांचे समीक्षा लेखन प्रगल्भ आहे. मीना करंजेकर, मंजुषा चौगावकर, ऋता देशमुख-खापर्डे, कथाकार कल्पना नरांजे, नूतन माळवी करीत असलेले लेखन लक्षवेधी ठरत आहे. मीना करंजेकर, सुषमा पाखरे, जयश्री कोटगीरवार, किरण नागतोडे, सुहास चौधरी, इंदुमती कुकडकर, आशा निभोरकार यांचे वेगवेगळ्या वाङ्‌मय प्रकारांतील लेखन आश्‍वासक आहे. मूळ वर्धेकर असणाऱ्या मृणालिनी केळकर आणि रंजना पाठक या दोन स्त्री लेखिकांची अनुवादाच्या क्षेत्रातील उत्तुंग भरारी लक्षणीय आहे.

दलित साहित्याची उज्ज्वल परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे. आर्वीचे तुकाराम अंबादास पुरोहित, आंबेडकरी विचारवंत डॉ. मधुकर कासारे, सूर्यकांत भगत, कथाकार डॉ. अमिताभ, योगेंद्र मेश्राम, डॉ. प्रदीप आगलावे, डॉ. इंद्रजीत ओरके, अशोक बुरबुरे, मनोहर नरांजे, वैभव सोनारकर, दीपक रंगारी, मनोहर नाईक, भूषण रामटेके, मिलिंद कांबळे असे अनेक लेखक, कवी, नाटककार, कथाकार आहेत. प्रशांत ढोले, संजय ओरके यांचेही कविता लेखनात सातत्य दिसून येते. मोरेश्वर सहारे, राजेश डंभारे, संदीप धावडे कवी-लेखक मंडळी पुढे येत आहेत.

जिल्ह्यातील आदिवासी साहित्यिकांनी साहित्य, भाषा, संशोधनाच्या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. यातील अग्रणी असलेले व्यंकटेश आत्राम. पुढे मारोती उईके यांच्यासह डॉ. विनोद कुमरे, राजेश मडावी, मारोती चावरे, रंजना उईके, रेखा जुगनाके यांचे लेखन वेगवेगळ्या वाङ्‌मय प्रकारांत अधोरेखित झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT