नैसर्गिक आपत्तींची संख्या एकविसाव्या शतकात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. कोरोनाची वैश्विक साथ ही त्यापैकी एक ! पृथ्वीच्या निर्मितीपासून मागील दोन लाख वर्षात माणसाने जी प्रगती केली आहे. त्याचे फलित नैसर्गिक आपत्तीच्या स्वरूपात समोर येत आहे. जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे कोरोनासाख्या विषाणूपासून ते अतिवृष्टी, चक्रीवादळे, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्तींच्या तीव्रतेत अधिक वाढ झाली आहे. हे सर्व रोखण्यासाठी निसर्ग, जमीन आणि पर्यावरणासंबंधीची जाणीव वाढवायला हवी.
भारताच्या पारंपारिक जीवनशैलीत निसर्गाची ‘समज’ होती. मंदिरात जो ‘भगवान’ पुजला जातो. तो माझ्या दृष्टीने ‘भ’ म्हणजे भूमी, ‘ग’ म्हणजे गगन, ‘वा’ म्हणजे वायू, ‘अ’ म्हणजे अग्नी आणि ‘न’ म्हणजे नीर आहे. आधुनिक शिक्षणामुळे जमिनीशी किंवा भूमातेशी असलेले आपले संबंधी तोडले गेले आहेत. आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाला जाणिवांचे वलय नाही. शिक्षणपद्धतीमध्ये ‘सायन्स वुईथ सेन्स’चा अभाव दिसतोय. जगात एकही विद्यापीठ असे नाही की जे विज्ञानबरोबर निसर्गाच्या संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रूजवत असेल. गणिती आकडेमोड आणि तार्किक मांडणीतून शिकविल्या जाणाऱ्या विज्ञानामुळे निसर्गाचे केवळ शोषण होते, पोषण नाही. निसर्गाचा सर्वाधिक वापर, आर्थिक फायद्याचा विचार करायला लावणाऱ्या या शिक्षण पद्धतीने आपल्याला अज्ञानी केले आहे. मागील दोनशे वर्षात एक तरी अभियंता असा दाखवा, की ज्याने निसर्ग संवर्धनासाठी कार्य केले आहे. मोठी धरणे, प्रकल्प यांतून मानवाचे आणि जीवसृष्टीचे स्थलांतर झाले. एवढंच काय पुणे शहराचेच घ्या, मुळा-मुठेतील अतिक्रमणांमुळे पुराची पातळी दीड मीटरने वाढली आहे. हे मी नाही तर सरकारी अहवालच सांगत आहे. आर्थिक फायद्यासाठी होणाऱ्या निसर्गाच्या शोषणातून हवामान बदलाचे संकट अधिकच वाढत जाणार आहे. कारण सहन करण्याची निसर्गाची शक्ती आता क्षीण झाली आहे. येत्या काळात लोकजागृती झाली तर काही प्रमाणात आपण हे रोखू शकतो.
नैसर्गिक आपत्ती रोखण्यासाठी भारताच्या पारंपरिक ज्ञान प्रणालीचा अभ्यास करायला हवा. त्यासाठी निसर्गाला समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. भारतात ९० शेती-जैवविविधता क्षेत्र आहेत. त्यांची जनुकीय रचना (जीन-पूल) भिन्न आहेत. भवतालाच्या जाणिवेतून आणि त्याला समजून घेण्याच्या प्रक्रियेतूनच ज्ञानाची उपासना शक्य आहे. माझेच उदाहरण घ्या, मी स्वतः वैद्यक क्षेत्रातील डॉक्टर आहे. पण एका वृद्ध व्यक्तीने माणसांऐवजी निसर्गावर किंवा भू-मातेवर उपचार करण्यास सांगितले. निसर्गाची चिकित्सा, पाण्याच कामं त्यांनी शिकवलं, त्यातून माझं आजच जीवन साकार झाले आहे. जमिनीवर पडलेले पाणी जमिनीत मुरायला हवं, नाहीतर बाष्पीभवनाने आणि माणसाच्या लालसेने त्याचा अतिवापर होईल. विहिरींद्वारे भू-गर्भातील रचनेच्या अभ्यासातून भू-जलविज्ञान त्यांनी शिकवलं. म्हणूनच महाराष्ट्रासह देशभरातील १२ नद्यांचे पुनरुज्जीवन करू शकलो. ‘सायन्स वुईथ सेन्स’म्हणून ओळखले जाणारे भारतीय विज्ञान कमी खर्चात, निसर्गाच पोषणाचे पर्यावरणपुरक ज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्याला देते. आपल्या भवतालातील समाज, पाणी, शेती, शेतकरी आदींच्या जाणीव अशाच ज्ञानातून विकसित होतात. त्यातूनच सर्वसामान्य माणसासाठी, निसर्गासाठी काम करण्याची प्रेरणा मिळते.
पर्यावरणाचा विनाश वाढला...
मी जेंव्हा पासून जलसंवर्धानाचे कार्य केले सुरू केले, तेव्हापासून आजपर्यंत पर्यावरणाचा विनाश तिपटीने वाढला आहे. मी ज्या ठिकाणी काम केले तो भाग आता हिरवाईने नटला आहे. समृद्ध झाला आहे. पण संपूर्ण भारतात ही स्थिती नाही. हिमालयातून वाहणाऱ्या बारमाही नद्या आणि उर्वरित भारतातील हंगामी नद्या घेतल्या, तर एकही नदी समृद्ध आहे, निरोगी आहे, असं आपल्याला म्हणता येणार आहे. पर्यावरण जर निरोगी असेल तर त्यावर अवलंबून माणसाचे जीवनही निरोगी राहील. आपल्याला प्रकृती बरोबर सहजीवनाचा मंत्र आत्मसात करावा लागेल आणि त्यासाठी निसर्गासारखा गुरू नाही. आपल्यातील उणिवा, त्रुटी तोच लक्षात आणून देऊ शकतो. त्यासाठी प्रथम येथील आधुनिक शिक्षणपद्धत
विसरावी लागेल. माणसांऐवजी आता पृथ्वीच्या संवर्धनाची आणि प्रगतीचा विचार करावा लागेल.
ऐंशीच्या दशकात जेंव्हा मी कामाला सुरुवात केली. तर अगदी संसद भवनाच्या रायसीना टेकडीपासून ते गुजरातपर्यंत अरवली पर्वतरांगेत खाणींचे साम्राज्य होते. डोलामाईनसारख्या खनिजांच्या लालसेपोटी माणसाने पर्वतावरील जैवविविधता नष्ट केली होती. सर्वोच्च न्यायालयात जाऊन आम्ही यावर स्थगिती आणली. वेळ आली तर जमिनीवर उतरून दोन हात करावे लागतील. काही मिळविण्यासाठी काहीतरी गमवावेही लागते.
दक्षिण गंगेचे संवर्धन...
दक्षिणेची गंगा समजल्या जाणाऱ्या गोदावरीच्या नैसर्गिक प्रवाहाचे संवर्धन करण्यासाठी त्र्यंबकेश्वर ते राजमुंद्रीपर्यंतचा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. चार वर्षापूर्वीच्या या प्रकल्पात कोरोनामुळे फार काम झालेले नाही. मात्र त्र्यंबकेश्वरजवळच्या ब्रह्मगिरीपर्वता संदर्भात एक सकारात्मक पाऊल उचललेले गेले आहे. आपली सरकारे तीर्थक्षेत्रांचा पर्यटनस्थळे म्हणून विकसित करत आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी फार्म हाउस आणि अनावश्यक बांधकामांचा घाट घातल्यामुळे जैवपरिसंस्था नष्ट होत आहे. जगभर तीर्थाटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ब्रह्मगिरीचे असे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यांना म्हटलो,‘‘ब्रह्मगिरी हमारी माई है. माई से कमाई नही हो सकती.’’ पर्यावरणाच्या संवर्धनासाठी ब्रह्मगिरीतील जैवविविधतेचे संवर्धन होणे गरजेचे आहे. म्हणून पर्वतावरील उतार हा जैवसंवर्धन क्षेत्र म्हणून आरक्षित करण्यात आले. गोदावरीचा उगम आणि शेवट, अशा दोन्ही बाजूला वातावरण निर्मितीचे कार्य चालू आहे. तेलंगणात प्रकाश राव, आंध्रप्रदेशात सत्यनारायण गुलशेट्टी, तर महाराष्ट्रात एक मोठी टीम कार्यरत आहे. अनेक राज्यांमधून जाणारी गोदावरी ही राष्ट्रीय नदी आहे. त्यामुळे केंद्राबरोबर राज्य सरकारांशीही चर्चा करावी लागले. आमचा संपूर्ण आराखडा तयार असून, त्यावरील कार्यवाहीसाठी राज्य सरकारांशी चर्चा बाकी आहे.
नमामी गंगेचे वास्तव...
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी गंगेच्या संवर्धनाची मोहीम हाती घेतली. त्यानंतर पंतप्रधान मनमोहन सिंगांनी त्यांच्या कार्यकाळात गंगेचा पर्यावरणीय प्रवाह नियमित करण्यासाठी भागीरथी आणि मंदाकिनी नदीवर कार्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या घोषणा करून ‘नमामी गंगा’ प्रकल्प सुरू केला, पण त्यात आजार दूसरा आणि उपचार तिसरा अशी गंमत आहे. घाटांचे सुशोभीकरण म्हणजे गंगेचे संवर्धन नाही. २०१४ पेक्षा आज गंगेची स्थिती अधिक विदारक आहे.
महाराष्ट्रात हवे विकेंद्रित जलव्यवस्थापन
स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात बांधली गेली. मात्र त्यातून भू-जलाचे संवर्धन झाले नाही. त्यासाठी सामुहीक पद्धतीने विकेंद्रीत जलव्यवस्थापन करावे लागेल
राज्यातील शेतकऱ्याने बाजारधार्जिण्या पीकपद्धती ऐवजी मॉन्सूनवर आधारीत पीक पद्धतीचा अवलंब करायला हवा, तेव्हा कुठे शेतीसंबंधीच्या समस्यांचे निराकरण होईल
येणाऱ्या पिढ्यांमध्ये हवामान बदलासंबंधी जागृती करायला हवी. त्यासाठी नदी, तलाव, पर्वत आदींच्या परिसर भेटींचे आयोजन करायला हवे. विद्यार्थ्यांना भवताल समजले तरच ते निसर्गांचे संवर्धन करू शकतात
- डॉ. राजेंद्रसिंह saptrang@esakal.com
(लेखक ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि नदी पुनरुज्जीवन प्रक्रियेचे जाणकार आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.