सप्तरंग

बकासुराच्या मंदिराचं गाव !

आदिलशाहीतला सरदार बहलोलखान पठाण आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यात भयंकर उन्हाळ्यात तितकाच भयंकर युद्धाचा भडका उडाला.

डॉ. सागर देशपांडे

आदिलशाहीतला सरदार बहलोलखान पठाण आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यात भयंकर उन्हाळ्यात तितकाच भयंकर युद्धाचा भडका उडाला.

या घटनेला सुमारे साडेतीनशे वर्षं होतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यासह एकूण सात शिलेदारांनी नेसरी (जि. कोल्हापूर) जवळच्या कुपे - कानडेवाडी परिसरातील खिंडीत महाशिवरात्रीच्या दिवशी हौतात्म्य पत्करलं. आदिलशाहीतला सरदार बहलोलखान याला सोडून दिल्याचा पश्चात्ताप प्रतापरावांना झाला. जीवदान दिल्याबद्दलची कृतज्ञता दूरच, बहलोलखान हजारोंच्या फौजेनिशी स्वराज्यावर चालून आला. शिवकाळातील या गाजलेल्या अध्यायाची सुरुवात झाली होती सध्याच्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमराणी गावाच्या परिसरात, डोण नदीच्या काठी.

आदिलशाहीतला सरदार बहलोलखान पठाण आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यात भयंकर उन्हाळ्यात तितकाच भयंकर युद्धाचा भडका उडाला. खानाच्या सैन्याची आणि जनावरांची पाण्याविना तडफड सुरू झाली. एक तर शरण येणं किंवा मरण पत्करणं याशिवाय खानास पर्याय नव्हता. त्याने प्रतापरावांकडे शरणागती मागितली. १६७३ मध्ये १५ एप्रिलला आदिलशाही फौजेची दाणादाण उडवतानाच सहिष्णू प्रतापरावांनी त्याला जीवदान दिलं. उमराणीच्या भूमीत खान शरण आला; पण याच कारणासाठी छत्रपती शिवाजी महाराज प्रतापरावांवर रागावले.

पुढे सुमारे दहा महिन्यांच्या काळातील उमराणी ते नेसरीपर्यंतच्या संघर्षाचं वर्णन ज्येष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘राजा शिवछत्रपती’ या महाग्रंथात केलं आहे. तर, साक्षात कुसुमाग्रजांनी हा अध्याय काव्यबद्ध करून अजरामर केला आहे. जत परिसराला अशाच ऐतिहासिक रणसंग्रामांचा प्रेरणादायी वारसा लाभला आहे.

इंग्रज आणि जुलमी सावकारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा, जतच्या दक्षिण कर्नाटक सीमेवरील सिंदूर गावात रामोशी समाजात जन्मलेला लक्ष्मण आणि त्याचा भाचा नरसप्पा यांची लक्ष्या - नरस्या ही जोडी खूप प्रसिद्ध होती. जत, अथणी, बागलकोट, बेळगाव, रायबाग परिसरातही या लक्ष्मणने ब्रिटिशांच्या आणि सावकारांच्या ताब्यातील धान्याचे साठे दुष्काळात गरिबांना खुले करून दिले. १९१५ च्या दरम्यान लक्ष्मणला पकडणाऱ्यास ब्रिटिशांनी दहा हजार रुपयांचं इनाम जाहीर केलं होतं. अखेर ब्रिटिशांनी फितुरीने पकडून लक्ष्मणला गोळ्या घातल्या. गावाच्या नावासह ‘सिंदूर लक्ष्मण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्रांतिकारकाच्या जीवनावर कानडीतून चित्रपट निघाला, कानडी नाटक आणि कादंबऱ्यांचा तो महानायक बनला; पण स्वातंत्र्योत्तर भारतात अनेक सशस्त्र क्रांतिकारकांची आणि त्यांच्या वंशजांची जशी उपेक्षा झाली, तीच सिंदूर लक्ष्मण यांच्याही वाट्याला आली.

स्वातंत्र्यपूर्वकाळापासून दुष्काळात होरपळणाऱ्या आणि आजही पाणीटंचाईचे तडाखे सोसणाऱ्या जत परिसरावर विजयनगरच्या सम्राटापासून ते डफळे घराण्यापर्यंत अनेक राजघराण्यांची सत्ता होती, त्यामुळेच सुंदर राजवाडे, चिरेबंदी वाडे, काळ्या पाषाणातील देखणी हेमाडपंती मंदिरं, दगड-मातीचे भक्कम बुरुज, तटबंद्या, शिलालेख इथं अनेक गावांतून पाहायला मिळतात. जयंतीनगर या जुन्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या शहराच्या मध्यभागी पूर्वी गंधर्व नदी (आताचा गंधर्व ओढा) होती. या नदीकाठी भीमाने बकासुराला ठार केलं आणि त्याचं जतमध्ये असलेलं मंदिर हे देशातील एकमेव बकासुराचं मंदिर आहे, असं मानलं जातं.

इ.स. १६८६ मध्ये श्रीमंत सटवाजीराजे डफळे यांनी जत संस्थानची स्थापना केली. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीच या संस्थानात लोकनियुक्त मंत्रिमंडळ, शाळा, नगरपालिका, दवाखाने सुरू झाले होते. बोर ही तालुक्यातील एकमेव नदी आणि दोन मध्यम पाटबंधारे प्रकल्प. सध्याच्या कर्नाटक राज्याला लागून असलेल्या या जत तालुक्यातील लोकांना ‘गडीनाडू’ (सीमावर्ती) म्हटलं जातं. मराठी, कन्नड, उर्दू, हळेकन्नड, दख्खनी मुसलमानी आणि विविध जमातींच्या आपापल्या बोलीभाषा हे या परिसराचं भाषावैभव.

राजे रामराव यांनी जतच्या पश्चिमेला उभारलेला देखणा ‘रामविलास पॅलेस’, शहराच्या मध्यवर्ती असलेला भुईकोट किल्ला म्हणजेच ४७ वर्षं डफळे घराण्याची सत्ता चालवणाऱ्या येसूबाईंचा वाडा, छत्रीबाग, अंबाबाई वनपर्यटन केंद्र, यल्लम्मादेवी-बसवेश्वर-हनुमान-विठ्ठल मंदिर, केंचराया मंदिर, गीता आश्रम, दर्गा, मशीद, जैन मंदिर, बौद्ध विहार अशी जतमध्ये अनेक धार्मिक स्थळं आहेत. याशिवाय रामपूर किल्ला, बालगावचा गुरुदेव आश्रम, कोळागिरीचं भैरवनाथ मंदिर, महाभारतकालीन मुचंडीचं श्रीदरेश्वर, बिळूरचं काशी काळभैरवनाथ मंदिर, बनाळीचं बनशंकरी मंदिर, छोट्या गूढ आणि रहस्यमय विहिरींसह प्राचीन इतिहासाचं साक्षीदार असलेलं वळसंग गाव, पूर्वी कलचुरी राजांच्या उपराजधानीचं नगर म्हणून ओळखलं जाणारं उंबरावणी म्हणजेच सध्याचं उमराणी, तिथलं महाराणी दानम्मांचं जन्मस्थळ आणि कर्मभूमी गुड्डापूर, शेड्याळचं शिवमंदिर, नारायणपूर म्हणून ओळखलं जाणारं; पण औरंगजेबाने नामांतर केलेलं सध्याचं उमदी गाव हे या तालुक्यातील लाखभर वस्तीचं मोठं गाव. सोन्या-चांदीच्या मूर्ती, कासे या धातूची भांडी आणि सतरंज्या/गालिचे तयार करण्याचा या गावी मोठा व्यवसाय होता. १२ वेशींच्या या गावातील विद्यापीठात देश-विदेशांतील सुमारे बाराशे विद्यार्थ्यांची शिक्षण आणि निवासाची व्यवस्था होती. गुरुदेव रानडे यांचे गुरू, इंचगिरी संप्रदायाची स्थापना करणारे आणि एनी बेझंटसह देशाच्या माजी राष्ट्रपतींनी ज्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं ते सद्‌गुरू भाऊसाहेब महाराजदेखील उमदीचेच.

वळसंगमधील अद्‌भुत विहिरी, वाल्मीकींची तपोभूमी, तीन धोंड्यांचं खोरं, रहस्यमय गवळीवाडी, केरसुणीचं माहेरघर बागेवाडी, माडग्याळी बोरं हीदेखील या परिसराची खास वैशिष्ट्यं ! राजकारणासह विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान मंडळींची माहिती देणारं दिनराज वाघमारे यांचं ‘वैभवशाली जत’ हे पुस्तक वाचताना पूर्वी फिरलेला जतचा परिसर डोळ्यांसमोर तसाच उभा राहतो. शिवाय ग. दि. माडगूळकरांच्या साहित्यावर पीएच.डी. केलेले प्राचार्य डॉ. श्रीपाद जोशी यांच्याकडूनही जतविषयी ऐकणं म्हणजे आपली गावं किती वैभवशाली आणि संदर्भसंपन्न होती, याचा वारंवार प्रत्यय घेणं!

याशिवाय बिळूरचे गुरुबसवेश्वर स्वामी, शिवलिंगप्पा अक्का, श्री सयाजी बागडेबाबा, श्री महाकारसिद्ध, व्हसपेठचे दावल मलिक, डोण येथील बिसल सिद्धेश्वर, संत चिनगीबाबा, बगदादहून करजगीत आलेले सूफी संत हजरत जुन्नैदी, डफळापूरचं ग्रामदैवत बुवानंद, संख येथील भवानी मंदिर, बोबलादचं कुंतीदेवी मंदिर, सोरडीचे समाधगिरी महाराज अशी या परिसरात अनेक श्रद्धास्थानं आहेत.

राजस्थान ते जत संस्थान असा डफळे घराण्याचा वैभवशाली इतिहास चर्चिला जातो, तो प्रकाशित होण्याची गरज आहे. राजे अमृतराव, राजे रामराव, सांगलीचे पहिले खासदार श्रीमंत विजयसिंहराजे, श्रीमंत अनिलराजे, उमराणीची डफळे संस्थानची स्वतंत्र राजगादी यांसह हे तपशील इतिहाससमृद्ध आहेत. श्रीमंत विजयासिंहराजे यांनी तर पायलट आणि एक प्रवासी बसेल असं छोटं विमान ब्रिटिशांकडून खरेदी केलं होतं. त्यांनी स्वतःही प्रशिक्षण घेतलं होतं. विजापूर, कोल्हापूर पुण्याला ते या विमानाने जात. जतमधल्या विमानतळाला आजही ‘विमान ग्राउंड’ म्हणून ओळखलं जातं. याशिवाय आनंद ग्राउंडचा उल्लेखही विशेष आहे. असा हा सांगली जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका तितकाच मोठा इतिहास बाळगून आहे - भविष्याकडे नजर लावून!

(सदराचे लेखक पत्रकार असून, शिक्षणक्षेत्रातील घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या वाटेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT