Responsibility Sakal
सप्तरंग

जबाबदारीची जाणीव

मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात असं प्रत्येक पालकाला वाटतं, पण त्यांच्यातील वाईट सवयींसाठीही अप्रत्यक्षपणे आपणच जबाबदार असतो.

डॉ. समीर दलवाई

मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात असं प्रत्येक पालकाला वाटतं, पण त्यांच्यातील वाईट सवयींसाठीही अप्रत्यक्षपणे आपणच जबाबदार असतो.

मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात असं प्रत्येक पालकाला वाटतं, पण त्यांच्यातील वाईट सवयींसाठीही अप्रत्यक्षपणे आपणच जबाबदार असतो. त्यांच्या वाईट सवयी बदलायच्या असतील तर सवलती आणि प्रेम यातला फरक आपण मुलांना जेवढं लवकर समजावून देऊ तेवढं चांगलं.

माझ्याकडे वसईहून एक कुटुंब आपल्या मुलाला घेऊन येतं. ते मूल १२ वर्षांचं आहे. अगदी मस्तीखोर, चंचल, धावपळ करणारं, आगाऊपणाने बोलणारं... अशा तक्रारी बऱ्याच वर्षापासून येत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ते माझ्याकडे समुपदेशनासाठी येत आहेत. दर महिन्याला मी पालकांना भेटतो. त्याच्या आईने एक नवीन चिंता सांगितली. तो वडिलांच्या दुचाकीची चावी घेतो आणि वेगाने गाडी चालवतो. त्यांच्या परिसरातील लोकांनी तिला सांगितलं की तुमचा मुलगा वेगाने गाडी चालवतो आणि तो अपघात होता होता वाचला.

मुलाला विचारलं, तुझं वय काय? तो म्हणाला १२. पुढचा प्रश्‍न, गाडी चालवायला परवाना लागतो, हे तुला माहीत आहे? तो म्हणाला ‘हो.’ पुढे विचारलं, सरकार १८ वर्षांच्या वरच गाडी चालवण्याचा परवाना का देतं? तो म्हणाला, कदाचित १८ वर्षांपर्यंत आपण व्यवस्थित गाडी चालवायला शिकतो किंवा चालवू शकतो. मी त्याला म्हणालो, तुझं वय १२ आहे. म्हणजेच तू व्यवस्थित गाडी चालवण्यास पात्र नाहीस आणि तरीही तू गाडी चालवतोस. तुझा अपघात झाला किंवा तुझ्यामुळे समोरच्याला दुखापत झाली तर तुला कसं वाटेल? मूल शांत झालं. त्याला म्हणालो, तू आणि तुझा भाऊ रस्त्याने चालत आहात आणि समोरून एका १२ वर्षांच्या मुलाने गाडी चालवत आणून तुम्हाला धडक दिली तर तुला त्या व्यक्तीबद्दल कसं वाटेल? ते मूल म्हणालं, ठीक आहे मी नाही चालवणार गाडी; पण बाबाच किल्ली देतात.

मी त्याच्या आई-वडिलांना भेटलो आणि सांगितलं की, बऱ्याच वेळेला आपल्याला मुलांशी बोलायला किंवा त्यांचं ऐकून घ्यायला वेळ नसतो. अशावेळी आपण त्यांचं ऐकून न घेताच त्यांच्या गोष्टी मान्य करतो आणि त्यांना देतो. त्याची आई म्हणाली, डॉक्टर तो मुलगा त्याच्या बाबांच्या सारखा मागे लागत असतो चावी द्या, चावी द्या म्हणून. मी त्यांना म्हणालो, तुम्हाला नवीन नियमावली माहीत आहे का? जर चालवणारा व्यक्ती १८ वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल आणि त्याचा अपघात झाला किंवा त्याच्यामुळे दुसऱ्याला दुखापत झाली तर गाडी ज्याच्या नावावर आहे त्याला अटक होऊ शकते. कारण, लहान मुलांच्या कायद्याप्रमाणे आपण त्यांना  अटक करू शकत नाही. त्यांना सुधारगृहात पाठवले जाते. त्या गाडीचा योग्य वापर व्हावा, ही ती गाडी ज्याच्या नावावर आहे त्याची जबाबदारी असते. याच्यावर त्याची आई अक्षरशः रडायला लागली. म्हणाली आमच्या बाजूलाही एक २०-२१ वर्षांचा मुलगा आहे. त्यालाही अशाच एका १२-१३ वर्षांच्या मुलाच्या दुचाकीने धडक दिली आणि तो आठ-नऊ वर्षें झाली कोमामध्ये आहे. हे त्याला माहीत आहे; पण तरीही तो कोणाचं ऐकत नाही.  गावी गेलो तरी त्याचे आजी-आजोबा तो बोलेल तसं वागतात. म्हणून त्याची सवय आणखी बिघडते आणि त्याला जबाबदारीची जाणीव होत नाही. आमची इच्छा आहे की त्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव व्हावी.

याच दरम्यान परवा संध्याकाळी एक वडील आपल्या १५ वर्षांच्या मुलीला घेऊन आले. जे गेले तीन वर्षें माझ्या सहवासात आहेत. या मुलीची गोष्टी अशी आहे की, काही गोष्टी घडून तिचे आई-वडील एकमेकांपासून वेगळे झाले आणि आई घर सोडून निघून गेली. ही मुलगी तिचे वडील आणि आजीसोबत मुंबईला राहते. तिला सुरुवातीला आईची आठवण आली की खूप त्रास व्हायचा. गोड बोलणारी, चुळबुळ करणारी अशी कोवळ्या वयातली ती मुलगी होती. त्यानंतर तिचं समुपदेशन करून तिच्या बाबांचं आणि आजीचं समुपदेशन करून तिला रुळावर आणलं. पण कोविड काळात जेव्हा लॉकडाऊन लागलं आणि सर्व बंद झालं, शाळा बंद झाल्या, घरातून बाहेर जाणं बंद झालं, त्यात प्रचंड प्रमाणात टीव्ही बघणं, मोबाईल वापरणं, या सर्व गोष्टी वाढल्या आणि त्यामुळे ती अजूनही रात्री तीन-तीन वाजेपर्यंत जागी राहते. त्यातून मग आजीला छळणं, वेळेवर न झोपणं, सकाळी उशिरा उठणं, आंघोळ न करणं, ब्रश न करणं, असा तिचा दिनक्रम सुरू झाला. शेवटी तिच्या बाबांनी कंटाळून तिला पनवेलजवळच्या एका हॉस्टेलमध्ये टाकलं. तिलाही हास्टेलमध्ये राहायला जायची इच्छा होती. दर शनिवारी- रविवारी स्पेशल परवानगी काढून तिचे बाबा तिला भेटायला जात. तिच्याकडे माझा नंबर होता. आठ दिवसांनी तिचा मला फोन आला की, मला इकडे राहायचं नाही. मला बाबांची, आजीची आठवण येतेय. मी तिला समजावलं की, बाळा आता फक्त आठ दिवसच झाले आहेत. हळूहळू तुला सवय होईल तिथे राहायची, पण दर चार दिवसांनी तिचा मला फोन यायचा की बाबांना मला इथून घेऊन जायला सांगा. मला इथे राहायचं नाही.

मी तिला म्हणालो, तुला तिथे काय त्रास आहे? ती म्हणाली, मला इथे राहायचं नाही, कारण इथे टीव्ही बघू देत नाहीत. इथे मोबाईल नाही म्हणून मला इथे नाही राहायचं. तिचे बाबा जेव्हा हॉस्टेलला तिला भेटायला गेले तेव्हा वॉर्डनने त्यांना सांगितलं की, तुमची मुलगी मुद्दाम इतरांना छळते. मुद्दाम चिमटे काढते आणि तीन-चार मुलांना जाऊन आय लव्ह यू असं बोलते. अर्थात ती हे सर्व मुद्दाम करत होती. कारण तिला तिथे राहायचं नव्हतं. तिला तिथून घरी पाठवण्यात यावं म्हणून ती हे सर्व करत होती. या सर्व गोष्टी तिने घरी असताना कधीच केल्या नव्हत्या. तिचे बाबा तिला म्हणाले की, इथे आपण एक वर्षाचे पैसे भरले आहेत. एक वर्ष तरी इथे राहा. तेव्हा ती ‘तुमचे पैसे गटारात गेले तरी चालतील’ अशा शब्दांत तिच्या बाबांना म्हणाली. शेवटी तिला तिचे बाबा दोन-तीन महिन्यांनी घरी घेऊन आले.

मी त्यांना थोड्या दिवसांनी विचारलं की, घरी कसं चालू आहे? तेव्हा तिचे बाबा म्हणाले, ती घरी आणूनही अजिबात चांगलं वागत नाही. कधीही उठते, आंघोळ व्यवस्थित करत नाही. आळस करते. आंघोळ करताना साबण तसाच अंगाला ठेवते आणि बाहेर येते. तिला सांगावं लागतं की तुझ्या अंगाला वास येतोय. तरीही ती ऐकत नाही. फक्त शिकवणीला गेली की अभ्यास करते आणि इतर वेळेला आजीच्या खोलीत जाऊन टीव्ही बघत बसते. आजीचा मोबाईल वापरते. कारण, बाबाने तिचा मोबाईल काढून घेतला आहे.

मी त्या मुलीला विचारलं की, हे सर्व जे तू करतेस त्याचे पैसे कोण भरतं? तर ती म्हणाली बाबा. त्यांना हे पैसे कुठून मिळतात? तर ती मला म्हणाली कामावर जाऊन, मेहनत करून. तू काय मेहनत करतेस? ती म्हणाली काही नाही. घरी दोन-तीन माणसं आहेत काम करायला. तर मी मेहनत का करावी, असं म्हणाली. मी तिच्या बाबांना सांगितलं, की तुमची मुलगी मोठी आहे, समर्थ आहे, ती तिचं सर्व करू शकते. तीनपैकी दोन नोकरांना काढून टाका. तिला म्हणालो की, बाबा तुझ्यासाठी एवढं करतात, तर तू बाबांना सकाळचा नाश्ताही बनवून नाही देऊ शकत का? तर ती म्हणाली, बाबा कधीच नाश्ता नाही करत. मी म्हणालो, बाबा तुम्ही दोघे उद्यापासून व्यवस्थित नाश्ता करायला लागा. ती मला म्हणाली, मीही नाश्ता करत नाही, दूध पिते आणि अभ्यासाला बसते. मी म्हणालो, या वयात एवढासा नाश्ता करणं योग्य नाही. तिला म्हणालो, सकाळी आठला उठ. ती मला म्हणाली, अरे आठला... एवढ्या पहाटे उठायची गरज काय? मी म्हणालो, तुझ्या घरी सकाळी जो पेपर टाकणारा येतो तो सकाळी सातला येत असेल आणि पाचला उठत असेल. हे तो का करतो तर पैसे मिळवण्यासाठी. तिला मी सांगितलं की, तुला जर या सर्व सुखसोयींची गरज वाटते, तर तुला लवकर उठून सर्व गोष्टी कराव्या लागतील. तिचे वडील मला म्हणाले की, हिला जबाबदारीची अजिबात जाणीव नाही. त्यांना सांगितलं की, आपण त्यांना ज्या वस्तू देतो त्यामध्ये काही मर्यादा ठेवल्या पाहिजेत. जेव्हा प्रेम करण्याची गोष्ट येते ते अमर्यादित असलं पाहिजे, पण जेव्हा वस्तू येतात तेव्हा त्यांना कुठेतरी मर्यादा आल्याच पाहिजेत.

जेव्हा आपण घरी टीव्हीचा रिमोट मुलाच्या हातात देतो तेव्हा त्याला ही जाणीव नसते की बाबांनी मेहनत करून पैशाने हा टीव्ही आणला आहे. त्याला फक्त एवढंच माहीत असतं की हा टीव्हीचा रिमोट आहे आणि मी जसा चालवेन त्याप्रमाणे तो चालणार आहे. मोबाईलचंही तसंच आहे. त्याचप्रमाणे घरात कधी जेवतो, कधी जेवत नाही. याबाबत कोणीही मर्यादा लावत नाही. या सर्व सुख सवलतींसाठी कष्ट करावे लागतात, याची जाणीव मर्यादा आणल्याशिवाय मुलांना कळत नाही.

मी पालकांना सतत सांगतो की, मुलांचं एक वेळापत्रक तयार करा. त्यात मुलाने कोणत्यावेळी काय केलं पाहिजे, त्याचे नियोजन करा. मुलांच्या ज्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, त्या वेळापत्रकात लिहा. शिवाय, त्यांना आवडणाऱ्या गोष्टी आणि जबाबदाऱ्या आहेत त्या वेळापत्रकात लिहा. त्यात दहा वर्षांच्या वरची मुलं असतील तर त्यांचा सहभाग किंवा त्यांचं मत घेऊन वेळापत्रक तयार करा. कारण, तुम्ही लादलेलं वेळापत्रक ते मान्य करतीलच असं नाही. त्याहून जास्त गरजेचं आहे, रोज संध्याकाळी त्यांच्यासोबत बसून ते वेळापत्रक पाळलं जात आहे की नाही व त्यातल्या अडचणी याची विचारपूस केली पाहिजे. जर पाळलं जात नसेल तर त्यांना नकारात्मक गोष्टी नं बोलता त्या अडचणी दूर करून ते कसं पाळलं जाईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे की, मूल एक दोन गोष्टींसाठी खोटं बोलले तरीही.... कारण, नकारात्मक बोलल्याने मुलं ते अजिबात पाळणार नाहीत. त्यासाठी पॉईंट्स देणं ही संकल्पना ठेवली पाहिजे. अगदी आपल्या क्रेडिट कार्डवर असते तशी. चांगली कामं केली की सकारात्मक आणि चुकीची कामं केली की नकारात्मक पॉईंट्स. या सर्व गोष्टींची आठवड्याला बेरीज झाली पाहिजे. कोणतीही वस्तू विकत घेताना ही अमुक गोष्ट घ्यायची असेल तर तुला एवढे पॉईंट्स लागतील, असं ठरवून त्याला सांगितलं पाहिजे, म्हणजे मूल हे सकारात्मक पॉईंट्स मिळवण्याकडे जास्त लक्ष देईल. या प्रकारचं सकस वातावरण निर्माण केल्यावर मुलाला आपल्या जबाबदारीची जाणीव हळूहळू होण्यास मदत होते. सवलती आणि प्रेम यातला फरक आपण मुलांना जेवढं लवकर समजावून देऊ तेवढं चांगलं.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT