क्लिनिकमध्ये व बाहेर पालकांशी चर्चा करत असताना काही गोष्टी वारंवार समोर येत असतात. आमचं मूल खूप रागीट आहे, त्याचे कोणासोबतच पटत नाही.
मुलांच्या भावना, मुलांचे विचार कसे घडत असतात हे कळणं खूप गरजेचं असतं. त्यात जर आई-वडीलच त्या मामांसोबत, काकांसोबत नीट वागत नसतील, तर मुलांना त्या व्यक्तीबद्दल विश्वास निर्माण व्हायला जास्त वेळ लागतो. मुलं आपले अवलोकन करत असतात. आपण कसा विचार करतो, याकडे त्यांचं लक्ष असतं. आपण लगेच टोकाची भूमिका घेतो का, आपण निष्पक्ष असतो का, याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे.
क्लिनिकमध्ये व बाहेर पालकांशी चर्चा करत असताना काही गोष्टी वारंवार समोर येत असतात. आमचं मूल खूप रागीट आहे, त्याचे कोणासोबतच पटत नाही. तो कोणालाच समजूत घेत नाही, अगदी माझ्यासोबतही त्याचे पटत नाही. भावंडांसोबतही तो जुळवून घेत नाही. त्याचे बाहेरही कोणी मित्र नाहीत. कुणाच्या घरी जात नाही. हळूहळू एकलकोंडाच होत आहे. तो आणि त्याचा मोबाईल, तो आणि त्याची पुस्तकं, तो आणि त्याचा अभ्यास याच गोष्टींमध्ये तो अडकून पडला आहे. कोणाशी जमवून घ्यायचं नाही, जुळवून घ्यायचं नाही.
प्रत्येक मुलाला आम्ही जेव्हा बघतो तेव्हा सुरुवातीला मुलं कोणालाच ओळखत नसतात; पण नंतर रोज आई आणि वडील त्याची काळजी घेतात. त्याला हे माझे आहेत, मला हे संरक्षण देणारे आहेत, ही भावना त्याच्या मनात निर्माण होते. त्यांच्यासोबत हे माझे, आपले असे विचार येतात. हळूहळू मुलांचा मेंदू वाढत जातो. त्याला कळायला लागते, की हे जे माझ्या आई-वडिलांसारखे दिसणारे आहेत किंवा मला रोज-रोज भेटणारे आहेत आणि त्याहून जास्त माझी काळजी घेणारे, मला संरक्षण देणारे, मला अन्न देणारे आहेत आणि म्हणून ते माझे आहेत.
अचानक आठ ते नऊ महिन्यांत मुलाच्या हे लक्षात येतं की, कोणीतरी आपल्या घरात आलेलं आहे. हा आपल्यापैकी नाही, हा बाहेरचा आहे. म्हणजे अचानक मूल बाहेरच्या अनोळखी व्यक्तीला बघून रडायला लागतं. त्याच्या पूर्वी ते कधीच रडत नाही. कारण ते आपलं कोण आणि बाहेरचं कोण, यातला भाव उमगलेला नसतो. वय हळूहळू वाढत जातं, समज वाढत जाते तेव्हा आपले आणि बाहेरचे ही समज येते. काही दिवसांनंतर तीच व्यक्ती नेहमी-नेहमी आपल्या घरात येते. ती व्यक्ती नुकसान पोहोचवत नाही, हे समजू लागल्यानंतर मूल त्या व्यक्तीवर हळूहळू विश्वास ठेवायला लागते.
हा आपलेपणा अगदी खोलवर मनुष्याच्या मनात रुजलेला असतो; पण हा विश्वास जागेपर्यंत, ही समज येईपर्यंत नवीन दिसणारी व्यक्तीदेखील आपल्याला त्रास देणारी नसेल हे समजण्यासाठी आई-वडिलांचे प्रोत्साहन लागते. हा काका आहे, ही काकी आहे, ही मामी आहे, हा मामा आहे, मीही त्यांच्याशी बोलते, ते माझ्याशीही चांगले वागतात, हे बघूनबघूनच मुलाचा विश्वास वाढू लागतो. जर आई-वडिलांचा त्यांच्यावर विश्वास असेल तर मुलांचाही विश्वास बसतो. या सर्व बाबींमध्ये आई-वडिलांचा खूप वाटा असतो.
मुलांच्या भावना, मुलांचे विचार कसे घडत असतात हे कळणं खूप गरजेचं असतं. त्यात जर आई-वडीलच त्या मामांसोबत, काकांसोबत नीट वागत नसतील, तर मुलांना त्या व्यक्तीबद्दल विश्वास निर्माण व्हायला जास्त वेळ लागतो. या सर्व गोष्टींचा मनुष्यजीवनात खूप वाटा आहे. आपले गाव, आपले शहर, आपले राज्य आणि राष्ट्रांचीदेखील मनुष्याने सीमारेखा घालून आपण आपल्याला वेगवेगळ्या चौकटीत बसवत असतो. आपले आणि परके ही परिभाषा आणखी मजबूत बनवतो. एकदा का हे आपले आणि हे परके ही परिभाषा मजबूत झाली की, विश्वास न ठेवणे, संशय असणे, त्याच संशयातून द्वेष, त्रागा या गोष्टींत बदल व्हायला जास्त वेळ लागत नाही. कारण त्याचा पाया आहे विश्वास नसणं. त्या द्वेषाचे मूळ कारण आहे, की आपल्याला या मंडळींसोबत राहायला, भेटायला, त्यांच्या गोष्टी बघायला, शिकायला, ते असं का वागतात, ते असं का बोलतात, त्यांच्या पद्धती, त्यांची संस्कृती काय आहे हे कधीही तटस्थ राहून बघण्याची संधीच मिळाली नाही. ही संधीच मिळाली नसल्याकारणाने द्वेष वाढत जातो. ज्यांना आपण परके समजतो त्यांच्याबद्दल निष्पक्ष राहून विचार करत नाही.
हजारो वर्षांपूर्वी आपल्याला जे मनात प्रशिक्षण दिलं गेलं, त्या प्रकारे आपण वागत असतो. त्या प्रकारे आम्ही आणि तुम्ही, आपले आणि परके याच भूमिकेत आपला एक ढाचा तयार झालेला असतो. म्हणून तो जर बदलायचा असेल, व्यापक करायचा असेल तर त्याचे संस्कार दिले पाहिजे. हादेखील एक संस्काराचा भाग आहे. याचा अर्थ बरोबर आणि चूक, हे शिकवू नये का? अर्थात शिकवायला हवे; पण त्यासोबत बरोबर आणि चूक हे ठरवत असताना किती टोकाची भूमिका घ्यावी, यावर आपले नियंत्रण असले पाहिजे. ते नियंत्रण ठेवण्यासाठी आपली विचार करण्याची क्षमता मजबूत असली पाहिजे.
मुलं आपले अवलोकन करत असतात. आपण वागणं मुलं बघत असतात. आपण कसा विचार करतो, याकडे त्यांचं लक्ष असतं. आपण लगेच टोकाची भूमिका घेतो का, आपण निष्पक्ष असतो का, त्या घटनेची चौकशी करून त्याबद्दल व्यापक दोन्ही बाजूने विचार करून आपण एका निर्णयावर येतो का, याकडे आपले लक्ष असलं पाहिजे. आपण जसं करतो, तसंच मुलांना करायची सवय लागेल. त्याचप्रमाणे मुलं एखादी गोष्ट करतात, त्यानंतर त्यांचं कोणाशी तरी भांडण होतं, वाद होतो, तंटा होतो. आपल्याकडे आल्यानंतर त्यांचं म्हणणं आधी शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. त्यानंतर त्याला उपदेश देण्यापेक्षा- असे कर, तसे कर असं सांगण्यापेक्षा- आपल्या आयुष्यातील गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजेत. फक्त तंटा झाला असेल, तेव्हाच त्यांना या गोष्टी न सांगता एरवीही सांगितल्या तरी चालतील. तू असंच कर, तसंच कर असं सांगण्यापेक्षा, ये तुला एक गंमत सांगतो. एकदा ना लहानपणी माझा मित्र होता. मी त्या वेळेस असं वागलो. त्यानंतर आमची पुन्हा मैत्री झाली. अशी उदाहरणं आपण मुलांना गोष्टी स्वरूपात सांगितल्या पाहिजेत. असे केल्याने मुलं टोकाची भूमिका घेणार नाहीत.
samyrdalwai@gmail.com
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.