Pocketmoney sakal
सप्तरंग

‘पॉकेटमनी’तून व्यवहारज्ञानाकडे

गेल्या चौदा ते पंधरा वर्षांपासून माझ्या वैद्यकीय प्रॅक्टिसमधून लहान मुलांना टीव्ही व मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे.

डॉ. समीर दलवाई

अनेक पालक मुलांना दैनंदिन खर्चासाठी पॉकेटमनी देत असतात, पण तो नेमका कसा वापरायचा, कुठे वापरायचा, हे शिकवणंदेखील फार गरजेचं आहे. पॉकेटमनीचं योग्य नियोजन करणं मुलांना सांगायला हवं, ते यातूनच उद्यासाठी लागणारं आर्थिक आणि व्यावहारिक ज्ञान शिकणार आहेत, हे पालकांनी लक्षात ठेवावं.

गेल्या चौदा ते पंधरा वर्षांपासून माझ्या वैद्यकीय प्रॅक्टिसमधून लहान मुलांना टीव्ही व मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बऱ्याचदा मुलं पालकांचं ऐकत नाहीत आणि टीव्ही किंवा मोबाईल घेण्यासाठी हट्ट करतात. आपणच मुलांना समजवावे, अशी विनंतीदेखील पालक करतात. मुलांना परावृत्त करत असताना, मुलं हा माझ्या आईचा किंवा वडिलांचा टीव्ही किंवा मोबाईल आहे, असं सांगतात. त्यांचं हे ऐकून पालकदेखील विनोद म्हणून हसतात. खरं तर हा विनोद नव्हे, हे वास्तव आहे. कारण मुलं जे सांगतात ते खरं असतं. त्यांच्याकडे असणारी एखादी वस्तू किंवा संपत्ती ही आपल्या आई-वडिलांची असते आणि जी आई-वडिलांची वस्तू आहे, ती माझी आहे, हे त्याला पक्कं ठाऊक असतं. म्हणूनच तो अशा प्रकारची उत्तरे देत असतो. मुलाने असं म्हटल्यानंतर त्यावर नेमकं काय उत्तर द्यावं, मुलाला कसं समजवावं हे पालकांना कळत नाही. त्यामुळे ते डॉक्टरांनाच गळ घालतात.

एकंदरीत या प्रकारामागे मोठे कटुसत्य लपले आहे. मुलं जेव्हा एखादी गोष्ट मागतात, हट्ट धरतात, पालक ती लाडाने पुरवतात; पण हे करताना ही खरंच गरज आहे का, की केवळ लक्झरी आणि उधळपट्टी आहे, याचा विचार आपण कधीच करत नाही. शक्यतो पालकांना आपल्या मुलांचे हट्ट पुरवावे असे वाटते. एखादी गोष्ट आपल्याला लहानपणी मिळाली नव्हती, ती आपल्या मुलांना मिळायला हवी असं अनेकदा पालकांना वाटतं. आता मी चांगलं कमावतो, आर्थिक सुबत्ता आहे तर माझ्या मुलांची मागणी मी का पूर्ण करू नये, असा विचार बऱ्याचदा पालक करतात. हे आपलं कर्तव्य असल्याचंदेखील पालक समजतात आणि यातून मला आनंद मिळतो, असेही बरेच पालक सांगतात.

बरेच पालक नोकरी करत असतात, कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात. आपल्या मुलांना ते आवश्यक तेवढा वेळ देऊ शकत नसतात. याची कुठेतरी अपराधी भावना त्यांच्या मनामध्ये असते. म्हणून ते आपल्या मुलाचा हट्ट पुरवून याकडे जास्त लक्ष देतात. त्यामुळे ते मुलांचं ऐकतात. त्यांना घेऊन स्वतः शॉपिंगला जातात आणि मुलांचा हट्ट पुरवून त्याला कसं खूश ठेवता येईल, याचा प्रयत्नही करतात. पण याचा मुलांवर नेमका काय परिणाम होतो, याचा आपण कधीही विचार करत नाही.

बऱ्याचदा मुलं एखाद्या गोष्टीसाठी पालकांच्या मागे लागतात, एखादी गोष्ट किंवा वस्तू आपल्या मित्राकडे आहे; पण माझ्याकडे नाही असं पालकांना वारंवार सांगून ती वस्तू मिळवण्यासाठी आकांडतांडव करतात. मात्र पालकांनी ही अडचण किंवा समस्या न समजता एक मोठी संधी आहे, असं समजावं. कारण याच वेळी मुलांना काय योग्य आणि काय अयोग्य हे सांगता येणं शक्‍य असतं किंवा एखादी गोष्ट नेमकी का घ्यायची, ती गरजेची आहे का, किंवा ती वस्तू विकत घेणं शक्य आहे का, याबाबतीत मुलांशी चर्चा करण्याची संधी मिळू शकते. मात्र अशावेळी मुलांना कुशलतेने, सामंजस्याने आणि अगदी शांतपणे समजावण्याची गरज असते. मात्र आपण फारसे प्रयत्न न करता मुलाने मागितलेली एखादी वस्तू आपण त्याला तत्काळ देऊन टाकतो. याचा वाईट परिणाम मुलांच्या मनावर किंवा सवयींवर होतो. आपण जो हट्ट करतो, आपण जी वस्तू बघतो ती आपल्याला मिळतेच असा समज मुलांचा होतो. ही समस्या केवळ श्रीमंत घरांमध्येच आहे असं नाही, तर जिथे उधार किंवा कर्ज घेऊन जगण्याची धडपड सुरू असते अशा घरांमध्येदेखील कर्ज घेऊन मुलांना लॅपटॉप किंवा आयफोन देऊन त्यांचे हट्ट पुरवले जातात.

असे वारंवार घडल्याने मुलांचा असा समज होतो की, माझी इच्छा होते किंवा मला जी वस्तू हवी असते ती मिळतेच. किंबहुना मी मिळवतोच. अशाने आपल्या मनात आलेला एखादा विचार हा पूर्ण झालाच पाहिजे, हवी असलेली एखादी वस्तू मिळायलाच हवी, अशा सवयी मुलांना जडतात. काहीही झाले तरी मला हवी असलेली वस्तू मिळणारच, ती मिळायलाच हवी आणि ती मिळते अशी समज मुलांची होऊ लागते. मात्र पुढे एखादी गोष्ट आपल्या मनाच्या किंवा विचाराच्या विरोधात झाली तर ती कशी स्वीकारायची किंवा ती कशी पटवायची याचा विचार करण्याची शक्तीच मुलांकडे राहत नाही. एखाद्या प्रसंगी आपण मुलांशी कसे वागलो यातूनच अशा प्रकारच्या गोष्टी तयार होत असतात.

कोणत्याही प्रकरणांमध्ये कसं वागावं किंवा कसं नियंत्रण मिळवावं, या गोष्टी आपण मुलांना कधीही शिकवत नाही. म्हणूनच वाटलं तसं केलं किंवा आपल्याला जसं वाटतं तसं पालकांनी करावं असा विचार मुलांच्या मनामध्ये रुजत जातो. पुढेदेखील केवळ पालकांचीच नाही तर इतर कुणाशीही ते अशाच अपेक्षेने वागतात, म्हणून मुलांना स्वतःवर, स्वतःच्या मनावर किंवा स्वतःच्या विचारांवर कशाप्रकारे स्व-नियंत्रण ठेवायचं हे शिकवणं गरजेचं आहे.

यामध्ये दोन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे वेळ आणि दुसरी म्हणजे पैसा. या दोन्ही गोष्टींचं महत्त्व, त्यांचा वापर याबाबत मुलांना सजग करणं फार गरजेचं आहे. यामध्येही पैशांपेक्षा वेळ महत्त्वाची आहे, हे पालकांनी समजून घ्यावं. कारण पैसा कमावता येतो, गेलेला पैसा परत मिळवता येतो. असेल तर वाढवता येतो. ती संधी आपल्या हातात राहाते. मात्र वेळेबाबत हा नियम लागू नाही. आपल्या हातात असलेल्या वेळेचा योग्य विनियोग करणे गरजेचं असतं. कारण गेलेली वेळ कधीही परत येत नाही. त्यामुळे अगदी लहान वयातच किंबहुना मुलं पाच-सहा वर्षांची असतानाच त्यांना वेळेचं महत्त्व, वेळेचं नियोजन आणि वेळेवर आवश्यक असताना नियंत्रण कसं मिळवायचं हे शिकवणं फार गरजेचं आहे.

माझ्याकडे अनेक पालक मुलांना घेऊन येतात. त्यातील बहुतेक मुलं ही मला अमुक प्रकारचे महागडे बूट हवेत किंवा अमुक प्रकारचे ब्रँडचे कपडे हवेत, ते मला मिळून द्याच, अशा प्रकारचा हट्ट धरत असतात. पण आपल्या मुलांचे हट्ट आपण पुरवू शकत नाही, असा समज करून पालक स्वतःला दोषी समजत असल्याचेही मी बघितले आहे. अनेक मुलं माझ्याकडे तक्रार करतात की, आम्हाला जी वस्तू हवी आहे ती पालक देत नाहीत. यावेळी मी मुलांना उलटा प्रश्न विचारतो की, ज्या पैशांतून वस्तू खरेदी करायची आहे तो पैसा कुणाचा आहे? तुझा आहे की वडिलांचा आहे? जी वस्तू तू वडिलांकडे किंवा पालकांकडे मागत आहेस, ती वस्तू कुणाची आहे? असा प्रश्न मी नेहमी मुलांना विचारतो. त्याने घेतलेली एखादी वस्तू ही त्यांच्या मालकीची आहे, त्याच्यामुळे त्यांनी ती वस्तू कशी वापरायची, कोणाला द्यायची की देऊ नये, हे ठरवण्याचा अधिकार पालकांचा आहे, असं मी मुलांना सांगतो. जेव्हा तू कमवायला लागशील, एखादी वस्तू विकत घेशील तेव्हा तू त्या वस्तूवर, पैशांवर अधिकार सांगू शकतोस. तिचा वापर कसा करायचा हे तू ठरवू शकतोस.

मुलांना प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण कसं करावं, हे शिकवणं फार गरजेचं आहे. अनेक पालक आपल्या मुलांना दैनंदिन खर्चासाठी एक रक्कम ज्याला आपण पॉकेटमनी म्हणतो देत असतात. पण हा पॉकेटमनी नेमका कसा वापरायचा? कुठे वापरायचा? याचं ज्ञानदेखील देणं फार गरजेचं आहे. याच पॉकेटमनीमधून मुलांना जी वस्तू हवी आहे ती घ्यायला शिकवणं, पॉकेटमनीचं योग्य नियोजन करणं मुलांना सांगायला हवं, ते यातूनच उद्यासाठी लागणारं आर्थिक आणि व्यावहारिक ज्ञान शिकणार आहेत, हे पालकांनी लक्षात ठेवावं. आपल्याला पॉकेटमनी म्हणून जो पैसा दिलेला आहे, त्यातूनच आपल्याला हव्या असलेल्या वस्तू घ्यायच्या आहेत किंवा जी रक्कम शिल्लक आहे, त्याच रकमेतून पुढचा दैनंदिन खर्च चालवायचा आहे, ही शिकवण मुलांना देणं फार गरजेचं आहे. यातून मुलं जी शिकतात ती भविष्यामध्ये व्यवहारी ठरतात. त्यांना पुढे आयुष्यात वाटचाल करताना कधीही मागे वळून बघण्याची गरज उरत नाही किंवा गोंधळाची स्थिती उद्भवत नाही. लहान मुलांना पैसे हे पालकांकडून मिळत असतात. त्यामुळे ते पालकांना आणि त्यांच्या पैशाला गृहीत धरतात. हवा तसा, नको त्या ठिकाणी वारेमाप उधळतात. त्यांना त्या पैशांबाबत किंवा खर्चाबाबत कोणत्याही प्रकारची काळजी नसते. त्यामुळे मुलांना त्यांचा स्वतःचा जमा-खर्च लिहिण्याची सवय लावायला हवी. यासाठी त्यांना खर्चाला पैसे द्यावेत आणि यातूनच तुझ्या तू गरजा भागव, असं सांगायला हवं.

कोणतीही नवीन गोष्ट सुरू करताना ती शिकवावी लागते. पालकांनी मुलांना बसवून जमा-खर्चाचा अभ्यास, त्याच्यामागील तंत्र नीट समजवून सांगावं. त्याला शिकवावं. कदाचित मुलांना सुरुवातीला ही गोष्ट शिकण्यात अडचणी येतील. त्यांना नेमका जमा-खर्च कसा लिहायचा हे समजणार नाही. त्यांना काही प्रमाणात त्रास होऊ शकतो, मात्र या व्यवहारी विज्ञानाची योग्य माहिती मुलांना देणं गरजेचं आहे. त्यांना दिलेला पैसा किती महत्त्वाचा आहे, हे त्यांना सांगावं लागेल. त्यांना व्यवहारिक ज्ञान शिकवणं फार गरजेचं आहे. आता जर पैसे संपले तर तुला थेट पुढच्या महिन्यातच मिळतील हे पालकांनी आपल्या मुलांना ठासून सांगायला हवं. या सवयीतून मुलं शिकतील, ती खरी शिकवण असेल. त्यातूनच त्यांचा बौद्धिक विकासही होईल.

samyrdalwai@gmail.com

(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, मुलांच्या विकास आणि वर्तनाचे अभ्यासक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT