Corona Varient Sakal
सप्तरंग

कोरोना २०२२ मध्ये शांत होईल!

आयुष्याचा ‘न्यू नॉर्मल’ कधी सुरू होईल, या प्रश्नाच्या उत्तरासाठी महामारी कशी संपते, याचा इतिहास थोडक्यात बघूया. १९१८चा स्पॅनिश-फ्ल्यू पँडेमिक १९२० साली उन्हाळ्यात एकदाचा संपला.

डॉ. संग्राम पाटील, MD FRCA FFPMRCA, ग्वेनेड हॉस्पिटल, नॉर्थ वेल्स, यूके

आयुष्याचा ‘न्यू नॉर्मल’ कधी सुरू होईल, या प्रश्नाच्या उत्तरासाठी महामारी कशी संपते, याचा इतिहास थोडक्यात बघूया. १९१८चा स्पॅनिश-फ्ल्यू पँडेमिक १९२० साली उन्हाळ्यात एकदाचा संपला.

अजून किती महिने-वर्ष कोरोनाच्या नवीन लाटा येत राहतील, अजून किती नवीन म्युटेशन येत राहणार, हे जगभरातील सामान्य माणसाला पडलेले स्वाभाविक प्रश्न आहेत. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न...

आयुष्याचा ‘न्यू नॉर्मल’ कधी सुरू होईल, या प्रश्नाच्या उत्तरासाठी महामारी कशी संपते, याचा इतिहास थोडक्यात बघूया. १९१८चा स्पॅनिश-फ्ल्यू पँडेमिक १९२० साली उन्हाळ्यात एकदाचा संपला. या घटनेला आज शंभर वर्षे लोटली असली, तरी फ्ल्यू व्हायरस मात्र आजही आपल्यासोबतच राहतोय. जवळजवळ प्रत्येक व्यक्तीस वर्ष-दोन वर्षातून एकदा तरी या व्हायरसचे संक्रमण होते. बहुतांश लोक यातून सहज बाहेर पडतात. दर वर्षी फ्ल्यूने तीन-चार कोटी लोक जगभर आजारी होतात, त्यातील जवळपास पाचेक लाख लोक दगावतात. यात मुख्यत्वे लहान मुलं आणि वृद्धांचा समावेश असतो. हा धोका कमी करण्यासाठी दर वर्षी लहान मुलं आणि वृद्धांना फ्ल्यूचे लसीकरण केले जाते. इतरांना फ्ल्यूने फारसा त्रास होत नाही. फ्ल्यूसाठी ना लॉकडाऊन करावं लागत, ना कुणी क्वारंटाईन होत!

१९१८ मध्ये पक्ष्यांमधून मानवात संक्रमण पसरल्याने फ्ल्यूचा वणवा पेटला होता. या पँडेमिकच्या पहिल्या लाटेत जगभर मोठी जीवितहानी झाली. वैद्यकीय शास्त्रज्ञ शोध अभ्यासाला लागले. त्यातच दुसरी लाट १९१९च्या सुरुवातीला येऊन ठेपली. दुसऱ्या लाटेनेही अनेक जीव घेतले. तिसरी लाट २०२० मध्ये आली आणि त्यानंतर जगाचे ‘न्यू नॉर्मल’ सुरू झाले होते. फ्ल्यू पँडेमिकने जगभरात पाच कोटी लोकांचा बळी घेतला. या मृत्यूमध्ये एक-दोन कोटी लोक भारतातील होते, असा अंदाज आहे. हा आकडा त्यावेळच्या भारतीय लोकसंख्येच्या ५ टक्के एवढा मोठा होता. हा पँडेमिक कशामुळे आला, हे मानवाला कळायच्या आधीच पँडेमिक संपला होता. फ्ल्यूवरील संशोधन मात्र गेली १०० वर्षे सुरूच आहे.

गेल्या काही वर्षांत मानवाला फ्ल्यूबद्दल बरीच शास्त्रीय माहिती मिळाली आहे. १९१८ च्या विषाणूच्याच पुढच्या पिढ्यांनी आजवर मोठे फ्ल्यू पँडेमिक घडवून आणलेत. फ्ल्यूच्या दुसऱ्या पिढीने १९५७-५८ साली पँडेमिकमध्ये २० लाख लोकांचा जीव घेतला. तिसऱ्या पिढीतील फ्ल्यू व्हायरसने १९६८-६९ च्या पँडेमिकमध्ये १० लाख लोक जगभर मारले. २००९ च्या स्वाईन फ्ल्यूने संपूर्ण जगाला धारेवर धरले होते. हा स्वाईन फ्ल्यू म्हणजे १९१८च्या फ्ल्यूची चौथी पिढीच म्हणावी लागेल.

कोरोनाची वाटचाल

विषाणूचं अस्तित्वच मुळात संक्रमण करून माणसाच्या शरीरात प्रसार आणि प्रजनन होण्यावर अवलंबून असतं. कोरोनाचे विषाणूदेखील मानवास व इतर प्राण्यांस संक्रमण करत आले आहेत. मानवात साधी सर्दी-खोकला देणारे चार प्रकारचे कोरोना व्हायरस अस्तित्वात आहेत; पण गेल्या काही वर्षांत कोरोना व्हायरसने एसएआरएस (२००२-०३), एमईआरएस (२०१२) आणि २०१९ साली सुरू झालेला एसएआरएस-Cov २ हे जलद गतीने संक्रमित होणारे व गंभीर आजार निर्माण करणारे पँडेमिक ठरले. डिसेंबर २०१९ ला सुरू झालेला सध्याचा कोरोनाचा पँडेमिक अजूनही संपलेला नाही. मूलतः पक्षी किंवा जंगली प्राण्यांमध्ये शांततेने वास्तव्य करणाऱ्या या कोरोना व्हायरसच्या काही प्रकारांनी मानवी जगतात चुकून प्रवेश करून (स्पिल-ओव्हर) मानवास आजार दिला (zoonosis). या घटना तशा नवीन नाहीत. असे स्पिल-ओव्हर होणे मानवी जीवनाइतकेच पुरातन आहे. एखादा जंगली (वाइल्ड) व्हायरस स्वतःमध्ये असे काही बदल घडवतो (म्युटेशन) ज्याने व्हायरसला मानवात संक्रमण करणे सोपे जाते. अशा परिस्थितीत महामारीचा धोका उभा राहतो. १९१८चा फ्ल्यू पक्षांमधून; तर २०१९चा कोरोना वटवाघळांमधून मानवापर्यंत पोहोचला असावा, असे मानले जाते.

आज दोन वर्षे लोटली, तरी कोरोना पँडेमिक जगभर तिसरी, चौथी तर काही ठिकाणी पाचवी लाट निर्माण करतोय. ओमिक्रॉनच्या आगमनाने सामान्य माणूस जास्तच वैतागलेला दिसतोय. सोशल मीडियावर आणि वैयक्तिक संवादातून सामान्य लोकांमध्ये असा सूर उमटतोय की, ‘२०२० लॉकडाऊनमध्ये गेलं. २०२१ मध्ये डेल्टा आणि त्यातून उद्भवलेल्या मृत्यूचं तांडव आम्ही पहिलं. आता २०२२ मध्ये तरी कोरोना पँडेमिक जाणार आहे की नाही? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला कोरोनाचा आतापर्यंतचा प्रवास बघणे गरजेचे आहे.

एसएआरएस -Cov २ मुळे चीनच्या वुहानमध्ये सर्वप्रथम मानवी संक्रमण झाल्याची नोंद झाली. हा होता मूळ वाईल्ड व्हायरस. हा दररोज बदलत असताना (म्युटेशन) त्याचे आजवर हजारो कुटुंबीय जन्माला आले आहेत; पण यातल्या सगळ्याच म्युटंट नातेवाईकांनी आपल्याला धोका निर्माण केलेला नाही. यातले जे काळजीचे असू शकतात किंवा आहेत त्यांना विषाणू शास्त्रज्ञ व्हीओसी-व्हेरियंट ऑफ कन्सर्न, व्हीओआय-व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट, व्हीयूएम-व्हेरियंट अंडर मॉनिटरिंग अशा वेगवेगळ्या नावाने अभ्यास करत आहेत. व्हीओसी हे मानवी आरोग्यास घातक असल्याच्या तीनपैकी एका तरी कसोटीवर पास झालेले असतात. सध्या या यादीत साऊथ आफ्रिकेत पूर्वी सापडलेला बीटा, ब्राझीलमधला गॅमा, भारतात आढळलेला डेल्टा आणि सध्याचा साऊथ आफ्रिकेतला ओमिक्रॉन व्हेरियंट आहेत.

शास्त्रज्ञांनी ज्या लशी जगभर विकसित केल्या, त्यातल्या जवळजवळ सर्वच मूळ वुहान व्हेरियंटच्या विरोधात टेस्ट केलेल्या आहेत. तसे असले तरी त्या लशी अल्फा (केंट, ब्रिटन), बीटा आणि आतापर्यंतचा सगळ्यात घातक असा ‘मास्टर-पीस’ डेल्टा या सगळ्याविरोधात अत्यंत प्रभावीपणे संरक्षण देत होत्या. सहा महिने लोटल्यानंतर तिसरा बुस्टर डोस देण्याचं काम अनेक पश्चिमी देशांनी सुरू केलेलं होतं. आणि त्यातच मागच्याच महिन्यात ओमिक्रॉनचा अवतार कोरोनाने जन्माला घालून जगाची पुन्हा डोकेदुखी वाढवली. व्हीओसीच्या तीन निकषांचा विचार करता ओमिक्रॉन दोन निकषांवर पास झालाय. हे निकष म्हणजे- तो अत्यंत जलद गतीने पसरतोय आणि त्याने मानवी प्रतिकारशक्तीवर (इम्युन एस्केप) मात करण्यात बऱ्याच अंशी यश मिळवलंय. तिसऱ्या निकषावर मात्र ओमिक्रॉन फेल होताना दिसतोय. त्यापासून उद्‌भवणारा आजार हा पूर्वीच्या डेल्टापेक्षा जास्त गंभीर नाही. सुरुवातीच्या अहवालांनुसार ही ओमिक्रॉनची आपल्यासाठी जमेची बाजू म्हणता येईल. हा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास २०२२ मध्ये ही मोठी हॅप्पी न्यूज असण्याची दाट शक्यता आहे. ते कसे हे पुढे बघू.

बळी तो कान पिळी

एखादा पँडेमिक कसा संपू शकतो, हे समजण्यासाठी व्हायरसचा एखादा व्हेरियंट डॉमिनंट कसा होतो हे बघावे लागेल. विषाणू हे फक्त यजमानाच्या शरीरातच स्वतःच्या प्रतिकृती (कॉपीज) निर्माण करून आपलं अस्तित्व टिकवू शकतात. हे अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना सतत धडपड करावी लागते. सर्वप्रथम त्यांना माणसाच्या इम्युनिटीशी लढा द्यावा लागतो. माणूस आपल्या शरीरात अँटीबॉडी आणि टी-सेल (पांढऱ्या पेशी) निर्माण करून विषाणूला नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतात. अँटीबॉडी या तत्काळ हल्ला करण्यासाठी असतात, तर टी-सेल या दीर्घकाळ प्रतिकारशक्ती टिकवून ठेवतात (मेमरी). विषाणूच्या संक्रमणानंतर काही महिन्यांत अँटीबॉडी नाहीशा होतात; मात्र पुन्हा त्याच किंवा तत्सम विषाणूचा हल्ला झाल्यास शरीरातील मेमरी जागृत होऊन पुन्हा इम्युनिटी सक्रिय केली जाते. विषाणूला सतत संक्रमण करत राहायचे असेल, तर त्यांना सतत स्वतःला बदलत राहावे लागते. या म्युटेशन प्रक्रियेत केवळ उपयुक्त म्युटेशन असलेले म्युटंट व्हेरियंट टिकाव धरून राहू शकतात. इतर व्हेरिएंट हद्दपार केले जातात. जसे डेल्टा व्हेरियंटने अल्फा, बीटा या सगळ्यांना हद्दपार केले होते.

कुठला व्हेरिएंट दीर्घकाळ मानवी समाजात तग धरून राहील, यासाठी साधारणतः तीन निकष आहेत. तो व्हेरिएंट इतर अस्तित्वात असलेल्या आणि मूळ व्हेरिएंटपेक्षा जलद गतीने प्रसारित झाला पाहिजे. याचा अर्थ नवीन व्हेरिएंट मानवी शरीरात जलद आणि सहजरीत्या घुसला पाहिजे. शरीरात प्रवेश केल्यावर त्याने पटापट आपल्या स्वतःच्या कॉपीज छापल्या पाहिजेत. असे करताना या व्हेरिएंटला दोन अडचणी येऊ शकतात- पहिली ही की माणसाच्या इम्युनिटीने जर मोठा प्रतिकार केला, तर व्हायरस जास्त टिकू आणि पसरू शकत नाही. दुसरी अडचण अशी की व्हायरस जर माणसाला गंभीर आजारी करत असेल, तर अनेक लोक गंभीर होऊन मरतील. अशा परिस्थितीतही व्हायरस जास्त पसरू शकणार नाही. याउलट, जर इम्युनिटीचा हल्ला सौम्य झाला आणि माणसाच्या शरीरात सौम्य आजार निर्माण केला, तर यजमान संक्रमण होऊनदेखील चालत फिरत राहील आणि आपल्या शरीराद्वारे व्हायरस सगळीकडे पसरवत राहील. ही परिस्थिती माणूस आणि व्हायरस या दोहोंसाठी win -win अशी होऊन ते दीर्घकाळ गुण्यागोविंदाने समांतर आयुष्य जगू शकतात.

फ्ल्यूच्या बाबतीत नेमकं हेच झालंय. फ्ल्यू पँडेमिक सुरू झाला तेव्हा नवनवीन लाटा जशा सुरू होत, तसा सुरुवातीला लोकांना गंभीर आजार झाल्याच्या नोंदी आहेत. काही महिने लोटल्यावर लोक गंभीर होणे आणि मृत्युमुखी पडणे, याचं प्रमाण कमी होई आणि लाट संपत असे. तिसऱ्या लाटेनंतर (१९२०) फ्ल्यू विषाणू कधीही सोडून गेला नाही; पण त्याच्या बदललेल्या अवताराने मानवी इम्युनिटीसोबत जणू एक लॉन्ग टर्म करार केला आणि फ्ल्यू आणि मानव यांचं सहजीवन सुरू झालं. म्युटेशनच्या प्रक्रियेत हा ‘राईट बॅलन्स’ असलेला व्हायरस व्हेरिएंट निर्माण झाला की तो त्याआधीचे अस्तित्वात असलेले सर्व व्हेरिएंट हद्दपार करतो, स्वतः जलद गतीने सर्वव्यापी होतो; मात्र माणसाला गंभीर इजा करत नाही. अशा रीतीने पँडेमिक संपतो; मात्र व्हायरस एंडेमिक होतो. पुढे या व्हायरसच्या पुढच्या पिढ्यांतील काही वंशजांमुळे अधूनमधून पँडेमिक उद्‌भवत राहतात. याखेरीज, दरवर्षी हंगामाप्रमाणे व्हायरसमुळे संक्रमणे वाढून लोक आजारी होतात; परंतु एकदंरीत जनजीवन सुरळीत सुरू राहते.

ओमिक्रॉन व्हेरिएंटचे येणाऱ्या काळात काय होऊ शकते?

ओमिक्रॉनपासून यापुढे जास्त घातक असे व्हेरिएंट निर्माण होऊ शकतात का? की ओमिक्रॉन हा या पँडेमिकचा शेवटचा अवतार ठरेल? याचं सरळ उत्तर देणं अवघड असलं, तरी ढोबळ मानाने काही शक्यता वर्तविणे सोपे आहे. सध्याची साऊथ आफ्रिका आणि इतर काही देशांमधून आलेली ओमिक्रॉनची आकडेवारी असे दर्शवत आहे की, या विषाणूमुळे संक्रमणाचा वेग हा आजपर्यंतच्या कुठल्याही कोरोना व्हेरिएंटपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. या विषाणूने नैसर्गिक आणि लसीकरणातून मिळालेल्या इम्युनिटीला काहीसा शह दिलाय. त्यामुळेच लसीकरण झालेले आणि पूर्वी कोविडचे संक्रमण झालेले अशा सगळ्यांना या व्हेरिएंटचे संक्रमण होत आहे; परंतु हे संक्रमण बहुतांश लोकांना लक्षणविरहित, सौम्य प्रतीचे आणि कमी काळासाठी होते आहे. याचा अर्थ असा, की ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये आपल्या यजमानाला जास्त त्रास न देता दीर्घकाळ सहजीवन जगता येईल, यासाठी आवश्यक असलेले म्युटेशन तयार झालेले दिसताहेत. येत्या काही आठवड्यांत ही स्थिती अशीच राहिल्यास ओमिक्रॉन जगभर सुसाट वेगाने पसरेल आणि त्याच वेगाने लाट ओसरेलदेखील. यातून बहुसंख्य लोकांना इम्युनिटी विकसित होईल आणि पँडेमिक संपेल.

ओमिक्रॉननंतरही वेगवेगळे व्हेरिएंट मात्र नियमित येत राहतील. जनजीवन त्याने फारसे विचलित होणार नाही. ‘न्यू नॉर्मल’ला सुरुवात होईल; मात्र ओमिक्रॉनमुळे लोक आजारी पडणारच नाहीत किंवा मृत्युमुखी पडणारच नाहीत, असे अजिबात नाही. जीवित आणि आरोग्याची हानी करण्याची क्षमता जशी फ्ल्यू व्हायरसमध्ये आहे, तशी ओमिक्रॉनमध्येदेखील नक्की आहे. सुरुवातीचे काही आठवडे, महिने तर ती नक्कीच आपल्याला जगभर दिसून येईल.

ओमिक्रॉनपासून अधिकचे घातक व्हेरिएंट तयार होणे हीदेखील शक्यता नाकारता येत नाही; परंतु एखादा व्हेरिएंट जेवढा घातक तेवढा त्याचा प्रसार कमी व्यापक असेल. या नियमाने ओमिक्रॉन जर येत्या काही महिन्यांत जगभर पसरला आणि मुख्य व्हेरिएंट (डॉमिनंट) बनून राहिला, तर पँडेमिक संपण्याच्या दिशेने ही नक्कीच एक चांगली बाब होऊ शकते.

तोपर्यंत आपण काय करावे?

ओमिक्रॉनमुळे अथवा भविष्यातील दुसऱ्या एखाद्या व्हेरिएंटमुळे पँडेमिक संपेल. पँडेमिक संपण्याची अवस्था येईपर्यंत आपल्याला काही बाबी गंभीरपणे पाळणे आवश्यक आहे. आपण स्वतः कितीही सशक्त असलो, तरी समाजातील, घरातील इतरांसाठी कोविड संबंधित आचारसंहिता पाळणे आपल्याला आवश्यक आहे. लसीकरणाचा परिणाम ओमिक्रॉनमध्ये कमी झालेला असला, तरी नगण्य मुळीच झालेला नाही. लसीकरण हे जगभर ओमिक्रॉनच्या लाटेतही उपयुक्तच आहे, असा साऊथ आफ्रिकेतून आलेला प्राथमिक अहवाल सांगतोय. याशिवाय, सुरुवातीच्या प्रायोगिक चाचण्यांनी लशीचा तिसरा डोस (बुस्टर) हा ओमिक्रॉनविरोधात अधिकचं संरक्षण देत असल्याचं स्पष्ट केलंय. त्यामुळे लसीकरण हेच आपलं कोरोना विरोधातील लढाईचं प्रमुख शस्त्र असणार आहे. पँडेमिक संपल्यावरही काही अति-धोक्याच्या गटातील लोकांना फ्ल्यूप्रमाणेच कोविड लसीकरण करत राहावे लागेल, असेच सध्या चित्र आहे. आणि दुर्दैवाने ओमिक्रॉन किंवा त्यानंतरच्या एखाद्या व्हेरिएंटमुळे पँडेमिक लांबलाच तर अजून काही काळ हा लढा सुरू ठेवण्याशिवाय गत्यंतर नसेल; पण ओमिक्रॉन हा शत्रू न ठरता मित्र ठरावा, अशी अपेक्षा करूयात.

(लेखक इंग्लंडमधील ग्वेनेड हॉस्पिटलच्या डिपार्टमेंट ऑफ अनेस्थेशिया ॲण्ड क्रिटिकल केअर विभागात सल्लागार आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT