Sahitya Sammelan Sakal
सप्तरंग

विश्‍वात्मक ध्येयवाद जोपासावा !

महाराष्ट्रासह देशात व परदेशात मराठी वाचकांची व मराठी प्रेमींची कोटी-कोटी संख्या असून ते विविध जाती-धर्मांचे नागरिक आहेत.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. श्रीपाल सबनीस saptrang@esakal.com

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वय आता शंभरीच्या घरात आलंय. तेव्हा शंभरीचं शहाणपण संमेलनांच्या आयोजनात, प्रत्यक्ष कार्यक्रम पत्रिकेत स्वयंसिद्ध असण्याची अपेक्षा चुकीची ठरू नये; पण वादाच्या शापातून साहित्य संमेलनाची मुक्तता अद्याप तरी झालेली दिसत नाही. महामंडळ आणि संयोजन समितीचा अर्थपूर्ण संवाद बऱ्याच वेळा नसल्यामुळे उद्‌घाटक व पाहुण्यांच्या संबंधाने वाद करण्याची संधी उपटसुंभ व्यक्तींना मिळते. साहित्याचे अखिल भारतीय संमेलन ही राष्ट्रीय पुण्याची पेरणी असल्याने कलावंत, समीक्षक, विचारवंत, प्रतिभावंत यांनाच उद्‌घाटकाचा मान सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. राजकीय नेते या पदावर सन्मानीत करण्याची अनुयायांची स्पर्धा साहित्यनिष्ठेऐवजी पक्षाच्या निष्ठेतून प्रसिद्ध झालीय. बरेच राजकीय नेते लिहून आणलेले भाषण स्वतःचं म्हणून सादर करीत असल्याची चर्चा महाराष्ट्रात चर्चा. साहित्य-संस्कृती हे सत्यकेंद्री विषय आहेत. तेव्हा खोटेपणाचा राजकीय रंग या संदर्भाने बाद ठरावा. अर्थात राजकीय नेत्यांचा विटाळ साहित्य-संस्कृतीच्या कारभाऱ्यांनी मानण्याचे कारण नाही. त्यांचा योग्य तो सहभाग पाहुणे म्हणून किंवा योग्य कार्यक्रमात जरूर करावा ! अखिल भारतीय मंच राजकारणाच्या क्षुद्र स्वार्थासाठी वापरण्याबाबत जागरूकता महत्त्वाची !

महाराष्ट्रासह देशात व परदेशात मराठी वाचकांची व मराठी प्रेमींची कोटी-कोटी संख्या असून ते विविध जाती-धर्मांचे नागरिक आहेत. भटके, विमुक्त, आदिवासींसह, मुस्लीम, ख्रिश्‍चन प्रतिभा आता मराठी भाषेतून सकस व नावीन्यपूर्ण अनुभूतीचे अस्सल वाङ्‌मय जन्माला घालत आहेत.

या सर्व प्रवाहांना अखिल भारतीय संमेलनांच्या कार्यक्रम पत्रिकेत आलटून पालटून स्थान देण्याची गरज आहे अन्यथा वेगळेपणाची भावना व भूमिका जन्म घेऊन मराठी संस्कृतीचे दुभंगलेपण वाढत जाईल. समाजातील सर्व भेदभाव मिटवून एकसंध संस्कृती निर्मिण्याचे ऐतिहासिक आव्हान साहित्य क्षेत्रातील सर्व घटकांसमोर उभे आहे आणि साहित्याशिवाय संस्कृतीची एकात्मता सिद्ध करणे कठीण आहे. म्हणूनच सर्व धर्म व समाजघटकांना मध्यवर्ती प्रवाहात संधी देऊन सन्मान करणे काळाची गरज आहे.

विद्रोही साहित्य संमेलनाची समांतर वास्तवता दुर्लक्षित न करता विवेकावर आधारित सर्वसमावेशक भूमिका अखिल भारतीय साहित्य संमेलन समित्या नियोजनात सिद्ध व्हावी ! विद्रोहाचे राज्य निर्णायक मानूनसुद्धा सततचा व अविवेकी विद्रोह घातक ठरतो. म्हणून विवेकपूर्ण सूत्रावर साहित्य - संस्कृतीच्या फेरतपासणीचे विषय परिसंवादातून ठेवता येतील. त्यामुळे विद्रोही चळवळीचे महत्त्व आणि प्रयोजन संपुष्टात येईल. संत आणि महापुरुष विद्रोहीच होते. प्रमाण कमी-अधिक असेल ! त्यांना आजवर अखिल भारतीय साहित्य संमेलनांत सन्मान प्राप्त झालाय. तरीही परंपरा आणि नवता यांचा मेळ घालून मराठी संस्कृतीच्या एकात्म व उज्वल भविष्यासाठी संयोजन समिती व महामंडळ जागरूक हवे !

समाजात शहाण्याप्रमाणे बेवकूफ लोकांचा भरणा असतोच ! तेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या व शक्तीच्या दबावाला बळी पडून संयोजन समितीने राज्यघटनेला सुसंगत विधायक निर्णय बदलण्याची गरज नाही. त्यामुळे सांस्कृतिक सत्य पेरणाऱ्या साहित्यविश्‍वाची अप्रतिष्ठा होऊन स्वार्थी व अज्ञानी संकुचित प्रवृत्ती माजून समाजाचे नुकसान होते.

मराठी मानदंडाची बेरीज

मराठी भाषा व संस्कृतीच्या पुण्याईमध्ये सर्व जात-धर्मीय मानदंडात्मक कर्तृत्वाचे योगदान बेरजेत एकात्म झालेय. म्हणूनच ज्ञानेश्‍वर - चोखा - शेख महमदांची मराठी, महानुभाव, सुफी संतांची मराठी, रानडे - फुले - आगरकर आणि आंबेडकर - दिब्रिटो ते अण्णाभाऊ साठेंसह हमीद दलवाईंची मराठी सर्वांसाठी सांस्कृतिक ठेवा आहे. या बहुसांस्कृतिक मराठी प्रवाहांचे एकात्म प्रतिबिंब मराठी साहित्य संमेलनात स्पष्टपणे व्यक्त व्हावे ! त्याशिवाय भारतीय संस्कृतीचे समर्थ नेतृत्व मराठीप्रेमींना करता येणार नाही. मराठी राजकीय व सांस्कृतिक मानदंड देशाच्या वाटचालीत ऐतिहासिकदृष्ट्या निर्णायक ठरलेत. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाचा ठसा भारताच्या नकाशावर उमटलाय. मराठी संत व महापुरुष विश्‍वात्मक झालेत. या संचिताचे मूल्यभान सतत सर्वांनी ठेवणे महाराष्ट्र व देशाच्या हिताचे ठरते.

धर्म-राजकारण-समाजकारण

मराठी साहित्य संमेलन साधेपणाने व्हावे की श्रीमंतीच्या थाटामाटात व्हावे ? मराठी भाषा व संस्कृती सर्वार्थाने श्रीमंत आहे. तेव्हा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा सोहळा दरिद्री नसावा ! पण श्रीमंतीचा माज आणि संपत्तीचा बडेजाव सांगणारा नसावा. कलात्मक सौंदर्याची श्रीमंती, वैचारिक समृद्धता, रूचकर मराठी जेवणाचा उंची स्वाद, वारकऱ्यांचा सच्चेपणा आणि मराठी मातीचे वैभव सिद्ध करणारा असा हा सोहळा असावा !

बालसाहित्यासह विज्ञान, पर्यावरण आणि इतिहास, युद्ध, विश्‍वशांतीच्या संकल्पनासुद्धा अधूनमधून कार्यक्रमाच्या नियोजनात घेतल्या जाव्यात. नव्या प्रतिभांना मुक्त संधी देऊन जुन्या जाणत्यांचा सन्मान करावा. साहित्य संमेलन हे दरवर्षाचे नवे-नवे सांस्कृतिक संवाद पर्व ठरावे. राजकारण, धर्मकारण, समाजकारण या सर्व क्षेत्रातील नव्या-जुन्या विकृतीना, भ्रष्ट प्रवृत्तीसह मूठमाती देऊन शुद्धीकरणाची भूमिका संमेलनाच्या कारभाऱ्यांनी जाणीवपूर्वक स्वीकारावी. तोच नेमका भाग इतर राष्ट्रीय कार्यक्रमांच्या तुलनेत अधोरेखित होईल. जे आहे ते ठीक; पण त्यात समाधान नसावे ! समग्र परिवर्तन मानवाच्या सर्वांगीण दुःखमुक्तीचा ध्येयवाद मराठी साहित्य संमेलनाची अधिकृत भूमिका म्हणून रुजावी.

(लेखक ज्येष्ठ समीक्षक व साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AUS Test: भारतीय संघ ऑस्ट्रेलियात ४-० असं जिंकूच शकत नाही...! सुनील गावस्करांनी दिला मोलाचा सल्ला

Dharashiv Vidhan sabha election : धाराशिवमधल्या चारही मतदारसंघांमध्ये बंडखोरी टाळण्यात महायुती अन् महाविकास आघाडीला यश; लढत स्पष्ट

Hingoli Assembly : हिंगोली जिल्ह्यात कसं आहे राजकीय गणित? कुणाविरुद्ध कोण लढणार?

"म्हणूनच मराठी अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये कामवाली बाईचं काम दिलं जातं" ; तृप्ती खामकरने सांगितलं कटू सत्य

Zip and go sadi : झिप अँड गो साडी; नवीन फॅशन ट्रेंड जो आपला लूक बनवतो स्टायलिश

SCROLL FOR NEXT