dr vaishali deshmukh write article in saptarang 
सप्तरंग

गटाची शक्ती (डॉ. वैशाली देशमुख)

डॉ. वैशाली देशमुख vrdesh06@gmail.com

शाळांमध्येही गटबाजी आणि झुंडशाही असतेच. एखादं मूल त्या गटाच्या काहीसं बाहेर असेल, विचारांनी, वागणुकीनं किंवा बुद्धिमत्तेनं, तेव्हा इतर लोक त्याच्याविरुद्ध एकत्र येण्याची शक्‍यता वाढते. शिवाय शाळांमध्ये "पिअर प्रेशर'ही असतं. अनेक व्यसनं, बऱ्यावाईट सवयी या मित्रांच्या गटाच्या दबावातून सुरू होतात असं दिसून आलंय. अशा परिस्थितीत एखादं मूल कसं वागेल, यावरून ते या झुंडशाहीत कितपत तग धरेल हे ठरतं. समविचारी असे काही मित्र-मैत्रिणी हेरून ठेवले, तर याच मनोवृत्तीचा आपल्या फायद्यासाठीही वापर करता येतो. गटाच्या शक्तिमान प्रवाहात असहायपणे फरफटत जायचं नाही; पण त्या सामर्थ्याचा आपल्या हितासाठी वापर करून घ्यायचा हे मात्र जमायला हवं!

एका शाळेत वर्षाच्या मध्येच एक नवीन मुलगा आला. वर्गातल्या काही टग्या मुलांनी त्याला चिडवायचं ठरवलं. वर्ग सुरू असताना मुलांनी त्याच्या बुटांच्या लेसेस बांधून ठेवल्या. सरांनी प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्यासाठी तो जेव्हा उभा राहिला, तेव्हा अडखळून पडला. अख्खा वर्ग त्याला हसला. नंतर मात्र त्यातल्या निम्म्या तरी मुलांना वाटलं, की आपण उगीच हसलो; पण त्यावेळी ते सगळ्यांबरोबर वाहवत गेले. गटाबरोबर वाहवत जाणं असं आणि इतकं सहज होतं. बरेचदा त्यात काही वावगं वाटतही नाही.

माणूस एकटा असतो तेव्हा जसा असतो तसा तो दुकटा-तिकटा झाला, की राहत नाही. तो बदलतो, काहीतरी वेगळाच बनतो. अनेक प्रयोगांमधून हे सिद्ध झालंय की गर्दीचं मानसशास्त्र वेगळं असतं. लीड्‌स नावाच्या युनिव्हर्सिटीनं केलेल्या एका प्रयोगात एका मोठ्या हॉलमध्ये काही लोकांना फिरायला सांगितलं, कोणत्याही सूचना न देता. आणि अगदी थोड्या लोकांना फिरण्याचा विशिष्ट मार्ग सांगितला. कुणीही एकमेकांशी शब्द किंवा खाणाखुणा यापैकी कुठल्याही प्रकारे संपर्क ठेवायचा नव्हता. काही वेळानं असं दिसून आलं, की ज्या पाच टक्के लोकांना मार्ग सांगितलेला होता, त्यांच्या मागं इतर सर्व लोक हळूहळू जायला लागले होते. म्हणजे जी व्यक्ती आत्मविश्वासानं पुढं जात असते, तिच्या मागं लोक जायला लागतात, ती बरोबर असो वा नसो. स्वत: विचार करणं सोडून देतात.

अनेक कार्यक्रमांत आपण केवळ सगळे वाजवतायत म्हणून किती यांत्रिकपणे टाळ्या वाजवत असतो! एखाद्या रॉक कॉन्सर्टची गोष्ट घ्या. प्रचंड गर्दी, धुंदावणारं संगीत, बेहोष वातावरण असतं. बेभान होऊन नाचणारे, उड्या मारणारे, ओरडणारे कितीतरी रसिक दिसतात. ही सगळी धुंदी संसर्गजन्य असते. एखादा एकटा माणूस असं काही करेल का? आणि गर्दीत नसते तर सगळ्यांनी याच पद्धतीनं आपला आनंद व्यक्त केला असता का? रस्त्यावरची टगेगिरीसुद्धा गर्दीत जास्त खुलते. त्यात लोकांना एकप्रकारची बिनचेहऱ्याची सुरक्षितता वाटते. नाक्‍या-नाक्‍यावर उभं राहून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींवर शेरे मारणारी टोळकी जागोजाग दिसतात. छेडछाड, दादागिरी, रॅगिंग यांच्याविरोधात कितीही कायदे केले, तरी या घटना घडतातच. ही मेंढरासारखी वृत्ती आपण विशिष्ट ठोकताळे बनवण्यातही वापरतो. सौंदर्याच्या, लैंगिकतेच्या संकल्पना लोकांच्या मताधिक्‍यावरच तर ठरतात, मग ती डाएटिंगची फॅड्‌स असोत, की सर्वाधिक पसंतीची शरीररचना असो. जे पुस्तक बेस्ट सेलर आहे, असं कळतं ते आपण लगेच विकत घेतो. सगळ्यांना आवडलंय ना, मग चांगलंच असणार असा विचार त्यामागं असतो. तीच गोष्ट दैनंदिन वापराच्या उत्पादनांची. जी गोष्ट अधिक लोकप्रिय ती अधिक चांगली, अधिक महत्त्वाची, अधिक उपयुक्त.... सणावारांच्या दिवसांत दुकानांमध्ये प्रचंड गर्दी दिसते, रांगा लागलेल्या असतात. कारण तिथं सेल लागलेला असतो. लगेच लोकांच्या झुंडीच्या झुंडी खरेदीसाठी गर्दी करतात.
इतर काय करतायत, काय अनुभवतायत यावरून धडा घेणं; त्यांचा कित्ता गिरवणं काही नेहमीच चुकीचं नसतं. कारण प्रत्येक गोष्ट स्वत: अनुभव घेऊन पाहायची म्हटलं तर महागात पडेल. प्रत्येकानं ठरवलं, की कुणी काही का म्हणेना, ड्रग्ज घेतल्यावर कसं वाटतं ते मला अनुभवायचंय, तर कितीतरी जणांना व्यसन लागेल. समूहाच्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि माहितीचा उपयोग होतो आणि त्यामुळं कितीतरी वेळ वाचतो, दुर्घटना टळतात; पण प्रत्येक परिस्थिती वेगळी असते आणि याचं तारतम्य गेलं, तर परिणाम गंभीर होतात.

रस्त्यात एखादा अपघात झालेला असतो, माणूस जखमी होऊन विव्हळत असतो. बघे लोक फक्त बघत असतात, किंवा सेल्फी घेत असतात किंवा त्याचं लाइव्ह रेकॉर्डिंग करत असतात. मदतीला मात्र कुणी पुढं सरसावत नाही. एकप्रकारची भीषण तटस्थता त्यांच्यात दिसून येते आणि एखाद्या संसर्गजन्य रोगासारखी ती इतरांमध्ये पसरत जाते. तसंच काहीसं चित्र दिसतं दंगलींमध्ये. प्रत्येक दगड फेकणारा माणूस वाईटच असतो किंवा त्याला ते करायचं असतं असं नाही; पण कुणीतरी पहिला दगड उचलण्याचा अवकाश, की मागचापुढचा विचार न करता सगळे त्यात सामील होतात.
गर्दीत माणूस स्वत:ला विसरून जातो. स्वत:चे विचार मागं टाकतो आणि गर्दीचं व्यक्तिमत्त्व परिधान करतो. गर्दीतली एक बिनचेहऱ्याची व्यक्ती बनून, झुंड करेल ते करणं जास्त सोपं वाटायला लागतं. त्यात एक प्रकारचा उन्मादही वाटू लागतो. तो उन्माद चढतो. नेहमी पाळला जाणारा संयम, नेहमीचे नियम सहज पायदळी तुडवले जातात. "काय फरक पडतो, त्यात काय,' अशा बेफिकीर विचारांनी स्वत:चं समाधान केलं जातं. "इतर कुणी काही करत नाहीये नं, मग आपणच कशाला पंचाईत करा,' असा विचार येतो. शिवाय "फक्त आपल्या न करण्यामुळं काही बिघडलं नाही, इतरही लोक होतेच की तिथं,' असा दिलासा सद्‌सद्विवेकबुद्धी स्वत:ला देते आणि सुटकेचा नि:श्वास टाकते. फारसा विचार न करता समूहाचं असं अनुकरण करणं नेहमी नकारात्मक परिस्थितीतच होतं असं नाही, तर चांगल्या बाबतीतही होतं. म्हणजे स्वच्छता अभियान, दुष्काळातल्या लोकांना मदत, भूजलपातळी वाढवण्यासाठी केलेलं श्रमदान अशा नि:स्वार्थी सामाजिक कामांमध्ये उत्साहानं काम करणारे गट कितीतरी दिसतात.

मुलांच्या संगोपनातही ही संकल्पना कळत-नकळतपणे पाळली जाते. इथं प्रवाहाविरुद्ध जाणं फारच भीतीदायक वाटतं. कारण तसं केलं तर जबाबदारी आली. शिवाय तो प्रयोग फसला, तर दूषणं मिळतात. त्यामुळं पालकत्वाचे घासून गुळगुळीत झालेले फॉर्म्युले वापरण्यावर आपला भर असतो. उदाहरणार्थ, एखादा कोचिंग क्‍लास पॉप्युलर झाला, की सगळ्यांना त्याच क्‍लासला ऍडमिशन घ्यायची असते. मग आपल्या मुलाची शैक्षणिक गुणवत्ता, त्याचं ध्येय, समजून घेण्याची कुवत हे लक्षात न घेता त्या आकर्षक आणि पॉवरफुल गटाचं अनुकरण केलं जातं. आयआयटीसाठीच्या क्‍लासेसना जाणाऱ्या मुलांची संख्या आणि प्रत्यक्ष प्रवेश मिळालेल्या मुलांची संख्या यातली तफावत पहिली, की हे लक्षात येतं.

शाळेत जाणारी मुलं काहीवेळा घरी येऊन पालकांकडे तक्रार करतात ः ""अहो बाबा, सगळेच दंगा करत होते आणि खडूचे तुकडे करून एकमेकांना मारत होते; पण टीचरनी शिक्षा मात्र फक्त मलाच केली. याला काय अर्थ आहे?'' जणू काही सगळे करत होते, म्हणून ती गोष्ट बरोबर होती, शिक्षा करण्यालायक नव्हती असं वाटतं मुलाला. आणि गर्दीत आपण ते करत होतो म्हणजे आपोआपच शिक्षेपासून आपल्याला सुटका मिळणार होती अशी त्याची अपेक्षा, नव्हे खात्री असते. म्हणजे शाळांमध्ये पण असतेच की ही गटबाजी आणि झुंडशाही. आपापले शाळेचे दिवस आठवून पहिले, तर आठवतील प्रसंग. जेव्हाजेव्हा एखादं मूल त्या गटाच्या काहीसं बाहेर असेल, विचारांनी, वागणुकीनं किंवा बुद्धिमत्तेनं, तेव्हा इतर लोक त्याच्याविरुद्ध एकत्र येण्याची शक्‍यता वाढते. मग ते शाळेत नवीन आलेलं मूल असो, की अतिहुशार किंवा अतिशय सुमार बुद्धिमत्तेचं मूल असो. शिवाय शाळांमध्ये असतं "पिअर प्रेशर.' त्याचे बरे-वाईट असे दोन्ही परिणाम होतात. अनेक व्यसनं, बऱ्यावाईट सवयी या मित्रांच्या गटाच्या दबावातून सुरू होतात असं दिसून आलंय. अशा परिस्थितीत एखादं मूल कसं वागेल, यावरून ते या झुंडशाहीत कितपत तग धरेल हे ठरतं. समविचारी असे काही मित्र-मैत्रिणी हेरून ठेवले, तर याच मनोवृत्तीचा आपल्या फायद्यासाठीही वापर करता येतो. सगळ्यांनी मिळून एखाद्या नकोशा गोष्टीला नकार देणं सोपं जातं, त्या नकाराला जरा जोर येतो. दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध एक प्रकारचं संरक्षक कवच मिळतं. समोरच्या गटालाही अंदाज येतो आणि तो माघार घेतो.

There is strength in numbers! गटाच्या या शक्तिमान प्रवाहात असहायपणे फरफटत जायचं नाही; पण त्या सामर्थ्याचा आपल्या हितासाठी वापर करून घ्यायचा हे मात्र जमायला हवं, मुलांना काय किंवा पालकांना काय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT