chimnaji patil and yashwant thorat sakal
सप्तरंग

संवाद : आजोबांशी? स्वत:शी?

आज माझ्या वयाची पंचाहत्तर वर्षं ओलांडल्यानंतर जेव्हा मी आजोबांशी तुलना करतो तेव्हा, आपण कुठं तरी कमी पडलो आहोत, असं मला जाणवत राहतं. असं का व्हावं कळत नाही.

डॉ. यशवंत थोरात

आज माझ्या वयाची पंचाहत्तर वर्षं ओलांडल्यानंतर जेव्हा मी आजोबांशी तुलना करतो तेव्हा, आपण कुठं तरी कमी पडलो आहोत, असं मला जाणवत राहतं. असं का व्हावं कळत नाही. माती तीच; मग फरक का? त्यांची जीवनदृष्टी आणि मूल्यं आमच्या पिढीपेक्षा उच्च की मनात होतं ते साध्य करण्यासाठी त्यांनी केलेली मेहनत जास्त? साधेपणा इतरांहून निराळा की शिस्त कमालीची? लोक म्हणतात, ते ‘वेगळे’ होते. मी सहमत आहे; पण त्यांनी जे साध्य केलं त्यासाठी नव्हे तर, आपल्यातला जो अंश ते माझ्यात ठेवून गेले त्याबद्दल.

सर्वात जुनी आठवण : एक वयस्कर व्यक्ती - वयस्कर; वृद्ध नव्हे... ते कसे होते? तर सतर्क, तोलून-मापून बोलणारे, धीरगंभीर. आजी लवकर वारल्यानं आजोबा कोल्हापुरातल्या घरात राहायचे आणि तिथून गावाकडची वडिलोपार्जित शेती सांभाळायचे. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा हुकूम सगेसोयरे, गाव, तालुका आणि त्याही पुढं चालायचा. सगळी अपत्यं कर्तबगार. कुणी पोलीसदलात तर कुणी लष्करात उच्च पदावर; पण त्यांच्यासमोर मात्र त्यांची ही मुलं ‘परेडवर’ असल्यासारखी गप्प उभी आहेत असं लहानपणी मला वाटायचं. लहान मुलांच्या बाबतीत मात्र ते अपवाद होते.

दर उन्हाळ्यात त्यांची मुलं-मुली आपल्या कुटुंबीयांसह वडिलार्जित घरी एकत्र यायची आणि गावाकडचे लांबचे नातेवाईकही जमा व्हायचे. महिनाभर मौजमजा चालायची. घर आनंदानं भरून जायचं. जेवणाच्या बाबतीत त्यांचा नियम कडक होता : ठरल्या वेळी सर्वांनी जेवणाला हजर राहायचं म्हणजे राहायचं. दुपारचे बरोबर बारा आणि रात्रीचे आठ वाजले की त्यांचा आवाज वरच्या मजल्यावरून खालपर्यंत ऐकू येई - ‘श्रीहरी, श्रीहरी, श्रीहरी... ’ आजही त्या पायऱ्यांवरून जेवणाच्या खोलीत जात असताना त्यांचा तो नामघोष कानी पडतो.

माझे वडील लष्करात असल्यामुळे जिथ त्यांचं पोस्टिंग असेल तिथं आम्हाला जावं लागे. माझं बालपण उत्तर भारतात गेलं आणि म्हणून तिकडच्या भाषा अधिक मुखात बसल्या. शालेय शिक्षणानं मला दख्खनपासून राजस्थानच्या वाळवंटात नेलं. परिणामी, महाराष्ट्र आणि दख्खनच्या संस्कृतीपासून मी दूर गेलो. शाळा उच्चभ्रू - ‘मेयो’ - ही भारताच्या तत्कालीन वास्तवापासून दूर होती. एका आभासमय जगात राहून राजघराण्यातील मुलं तिथं शिकत असत. मी पाटील; राजघराण्यातला नव्हे. मात्र, तिथल्या वातावरणामुळे आपण मूळचे कोण याचा विसर पडला; पण नशीब, तो काही काळापुरताच राहिला.

लहानपणापासून मनात एक शल्य होतं : कोल्हापूर माझ्या वडिलांचं आणि पूर्वजांचं गाव. माझी चुलतभावंडं तिथंच जन्मली-वाढली असल्यानं कोल्हापूरच्या प्रथा-परंपरांशी एकरूप झाली; पण मी तिथं फारसा नसल्यानं, त्या काळात कोल्हापूरशी समरस होऊ शकलो नाही.

त्यामुळे सगळ्यांमध्ये मी वेगळा, कुणीतरी बाहेरचा वाटायचो. शेकोटीचा धूर, कणसांचा हुरडा, झुणका-भाकरीची चव किंवा रांगड्या कोल्हापुरी भाषेचा तडका या गोष्टींपासून वंचितच राहिलो.

त्या काळाच्या शिरस्त्यानुसार, मी दर काही दिवसांनी आजोबांना पत्र लिहून माझी खुशाली कळवत असे. आजोबाही उलटपत्र लिहून मार्गदर्शन करत असत. साधारण साठ वर्षं उलटल्यानंतर जुनी कागदपत्रं हाताळताना, आजोबांना मी वेळोवेळी लिहिलेली पत्रं माझ्या भाचीला सापडली. बालसुलभ गमतीजमती वगैरे त्या पत्रांत नव्हत्याच. फार तोलून-मापून लिहिलेली पत्रं होती ती.

आजोबांनी पाठवलेली उत्तरं शिस्तशीर मार्गदर्शनानं भरलेली असायची. आज ती पत्रं माझ्याकडे नाहीत; पण कोल्हापूरहून त्यांनी आठवणीनं पाठवलेले पायरी-आंबे, पेरू यांची चव आजही मनात तशीच आहे. कोल्हापुरात फारसा राहिलो नसल्यानं माझे-त्यांचे संबंध सुरुवातीला तसे औपचारिकच होते. एक आदर्श, गुणवंत माणूस म्हणून त्यांची ओळख व्हायला खूप वर्षं जावी लागली. आणि, तशी ओळख पटली तेव्हा ते नव्वदीपार पोहोचले होते. शरीर थकलं होतं; पण मन आणि बुद्धी अजूनही पूर्वीइतकीच तल्लख होती.

‘तत्त्वज्ञान’ विषय घेऊन मी कला शाखेतून पदवीचं शिक्षण घेत होतो. एकदा मी सहजच आजोबांना विचारलं : ‘‘देव आहे का?’’ त्यांचं उत्तर वास्तववादी होतं. म्हणाले, ‘‘पूर्वी मला वाटायचं की ‘देव आहे’; परंतु आता मी खात्रीनं सांगू शकत नाही. माझं वय बघता तो लवकरच कळेल असं वाटतं!! कसंय भैय्या, देवाचं अस्तित्व उलगडून दाखवणं सोपं नाही. इतरांचं सांगू शकत नाही; पण कर्मकांडाच्या मार्गानं त्याच्यापर्यंत पोहोचता येईल असं वाटत नाही.’’

लगेचच मी म्हणालो, ‘‘बरोबर आहे, आजोबा. देवावर माझाही विश्वास नाही.’’ ताबडतोब त्यांनी फटकारलं : ‘‘तत्त्वज्ञान विषय घेतलास म्हणून तुला असं बोलण्याचा अधिकार पोहोचत नाही. आधी अभ्यास कर, नीट समजून घे, आत्मसात कर, आचरणात आण, अनुभव घे आणि मग बोल. तोवर नको.’’

आपल्या मनाला रुचेल, बुद्धीला पटेल, तेच आचरणात आणायचं हा त्यांचा स्वभाव त्यांनी आयुष्यभर जपला.

एकदा प्रवासात असताना मी म्हणालो : ‘‘आजोबा, मी विचार करत होतो : तुमचा जन्म १८५७ च्या बंडानंतर झाला; ते संपलं. मग राणी व्हिक्टोरिया गादीवर आली आणि मरण पावली. दोन महायुद्धं आली आणि गेली. गांधीजी झाले, स्वातंत्र्य मिळालं. नेहरू वारले; पण तुम्ही मात्र अजून हयात आहात. मागं वळून बघताना तुम्हाला काय वाटतं?’’

थोडा वेळ ते विचारात पडले आणि मग म्हणाले : ‘‘चेहरे बदलतात; कधी कधी जागाही बदलते; पण मानवी स्वभाव तोच राहतो. स्वतःला सुधारण्याची, तसंच भोवतीची परिस्थिती सातत्यानं सुधारण्याची संधी माणसाला मिळत असताना ते करण्यात तो कमी का पडतो हेच मला अजून समजलेलं नाही. बरोबर काय ते माहीत असूनही माणूस चुकीची निवड करतो का? तुझ्या आयुष्यात मात्र तुझ्या धारणा आणि तुझं आचरण यात अंतर पडणार नाही एवढं बघ म्हणजे झालं.’’

त्यांना काय म्हणायचं होतं हे तेव्हा माझ्या ध्यानात आलं नव्हतं; पण आता येतंय!

रिझर्व्ह बँकेच्या चेन्नईतल्या स्टाफ कॉलेजमध्ये मी प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून प्रशिक्षण घेत असताना माझी आणि उषाची ओळख झाली. तीही त्या वेळी तिथंच प्रशिक्षण घेत होती. हळूहळू आमची मनं एकमेकांत गुंतली. आम्ही लग्न करायचं ठरवलं. आम्ही फक्त वेगवेगळ्या राज्यांतलेच नव्हे तर वेगवेगळ्या जातींचेही होतो. मी महाराष्ट्राचा आणि ती तामिळनाडूची. त्या वेळची सामाजिक परिस्थिती आणि आमच्या घरातलं वातावरण पाहता आमच्या लग्नाला पाठिंबा मिळण्याची शक्यताच नव्हती. त्यात आजोबांची संमती मिळवणं हे सर्वात अवघड काम होतं.

त्यांच्या तरुणपणी ते कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराजांच्या ‘बहुजन समाज चळवळी’त काम करत होते. मराठ्यांना ब्राह्मणांच्या वर्चस्वातून मुक्त करणं आणि शिक्षण, तसंच धार्मिक कर्मकांडं यामधली ब्राह्मणांची मक्तेदारी संपवणं हे त्या चळवळीचं उद्दिष्ट होतं. त्यामुळे आपलाच नातू आंतरजातीय विवाह करतो आहे ही गोष्ट त्यांच्या पचनी पडणार नाही असं अनेकांना, खासकरून माझ्या वडिलांना, वाटत होतं; पण जेव्हा उषाच्या कुटुंबातील मंडळी पहिल्यांदा कोल्हापूरला आली तेव्हा कोल्हापुरी साफा बांधून रेल्वेस्टेशनवर ते स्वतः हजर होते. काही दिवसांनी मी त्यांना विचारलं : ‘‘ब्राह्मणांकडून झालेला अन्याय विसरून, त्यांच्याकडून झालेला मनावरचा आघात बाजूला ठेवून, स्वागतासाठी स्टेशनवर तुम्ही कसं काय येऊ शकलात?’’ त्यांनी दिलेलं उत्तर भविष्यवेधी होतं : ‘कुणाचं लक्ष वेधण्यासाठी मी कोणती गोष्ट करत नाही, ध्यानात ठेव.

आणि, तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं तर बहुजनांना चांगल्या शिक्षणाच्या संधी मिळाव्यात म्हणून करावा लागलेला संघर्ष मोठा कठीण होता; पण ती मागणी न्याय्य आणि रास्त असल्यामुळे शेवटी बहुजन समाजाचा विजय झाला. आम्ही एका सामाजिक ध्येयासाठी लढलो आणि काही व्यक्तींचा त्यात संबंध असला तरी शेवटी कुणाहीबद्दल पुसटशीही कटुता राहिली नाही. समन्यायी समाज उभा करायचा असेल तर त्यात सर्वांचाच सहभाग हवा आणि त्याकरिता झाल्या-गेल्या गोष्टी विसरून सर्वांनीच एकमेकांना माफ केलं पाहिजे. छत्रपती शिवाजीमहाराजांचं आपण आजही नाव घेतो ते त्यांच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळेच. पुढं जाण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. तुमच्या पिढीनं सर्व जाती-धर्मांच्या समुदायांमधली दरी मिटवली पाहिजे.’’

महाराष्ट्राच्या अशिक्षित आणि अविकसित अशा ग्रामीण भागातून बाहेर पडून ते कृषी-अर्थतज्ज्ञ बनले; विस्कॉन्सिन विद्यापीठाकडून डॉक्टरेट मिळवणारे पहिले व्यक्ती ठरले; ‘इम्पिरिअल अॅग्रीकल्चर सर्व्हिस’मध्ये रुजू झाले; कृषी-संचालक बनले आणि पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे - जी राज्यातील त्या प्रकारची एकमेव संस्था होती - पहिले भारतीय प्राचार्य बनले. नंतर कोल्हापूर संस्थानच्या रिजन्सी कौन्सिलमध्ये शिक्षणमंत्री म्हणूनही ते नियुक्त झाले. त्यांच्या सगळ्या नातवंडांनीही चांगलं नाव कमावलं. काहीजण उच्च पदावर नोकरीला लागले, काही लष्करात गेले, काही वैद्यकीय व्यवसायात, तर काही उद्योगांत शिरले. आपापल्या क्षेत्रात ते यशस्वीही झाले; पण त्या सगळ्यांमधला शेतकऱ्याचा मूळ पिंड हळूहळू लोप पावला.

मी रिझर्व्ह बँकेत काम सुरू केलं. ते काम सन्मानाचं असलं तरी तिथं माझं मन रमत नव्हतं. फायलींच्या जंजाळातून बाहेर पडावं...लोकांमध्ये मिसळावं...त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात...असं मनात वाटायचं; पण संधी मिळतच नव्हती. कदाचित देव असेल आणि सर्वांच्या प्रार्थना ऐकून घेऊन त्या पूर्ण करत असेल अशी माझ्या मनातली भाबडी भावना एके दिवशी फळाला आली. एके दिवशी तत्कालीन ‘कृषी पत विभागा’त माझी नियुक्ती झाली. त्यानंतरची माझी सगळी कारकिर्द ग्रामीण क्षेत्रातच राहिली. सहकारी संस्था, प्रादेशिक ग्रामीण बँका, प्राधान्यक्षेत्रातील कर्जं, ‘शेतकऱ्यांसाठी मॅक्रोपॉलिसी सुविधा’ आणि शेवटी नाबार्ड...अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला मिळालं. हे सारं कसं घडलं मला माहीत नाही. बरोबर की चूक तेही ठाऊक नाही; पण ग्रामीण क्षेत्राशी बांधिलकी आणि ग्रामीण शिक्षणाविषयीचं प्रेम ही माझ्या आजोबांकडून मला मिळालेली देणगी आहे असा माझा विश्वास आहे.

जेव्हा मी त्यांचं आत्मचरित्र (माझ्या आठवणी : पांडुरंग चिमणाजी पाटील) वाचलं तेव्हा त्यांच्या आठवणी माझ्या करिअरला कलाटणी देणाऱ्या ठरल्या. स्वत:ची वेगळी ओळख व्हायला लागली. पब्लिक स्कूलच्या शिस्तीत वावरणाऱ्या मनात स्वत:चा शोध घेणारा एक माणूस दडलेला आहे असं वाटलं. आपण कुठून आलो आणि आपल्याला कुठं जायचं आहे, भविष्याचा कसा वेध घ्यायचा आहे हे आजोबांच्या आत्मचरित्रातून उमगलं. माझ्या पूर्वजांचा वारसा उलगडला आणि त्या काळातल्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रांत घडलेल्या बऱ्याच गोष्टी समजल्या. आजोबांचं चरित्र म्हणजे मनुष्यानं आपलं आयुष्य आत्मसन्मानपूर्वक कसं जगावं याचं अनुभवकथन करणारी ‘ज्ञानेश्वरी’ आहे!

त्यांचे काही शोधनिबंध आणि संशोधनपर लेख वाचल्यानंतर एकीकडे अतिशय तर्कशुद्ध असलेला माणूस दुसरीकडे तितकाच भावनिक, हळव्या मनाचा कसा काय होता याचा उलगडा आजही मला होत नाही. सन १९४० मध्ये त्यांनी कोल्हापूर राज्यातील जमिनींचा सर्व्हे केला होता. त्याच्या आधारे संमिश्र पिकं घेण्याची शिफारस केली होती. शेतीतली जोखीम कमी करण्यासाठी इतर जोडव्यवसाय केले पाहिजेत, असंही त्यांनी सुचवलं होतं. पुढच्या काळात दरडोई शेतीचं क्षेत्र हळूहळू कमी होणार असून त्यावर मात करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे असंही ते सर्वांना समजावत असत. हाडाचे शेतकरी होते ते.

ते नेहमी म्हणायचे, शेती हा आंतरिक आनंद देणारा; पण सर्वाधिक धोका असलेला व्यवसाय आहे. तुम्ही शेतीसाठी केलेला खर्च, तुमचे कष्ट आणि मिळणारा मोबदला यांचं गणित शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाशी कधीच जुळत नाही. शेतकऱ्यानं कितीही कष्ट केले तरी पाऊस, पिकांवरची रोगराई, त्या त्या वेळचा बाजारभाव, मधल्या दलालांची नफेखोरी अशा अनेक गोष्टींचा फटका त्याला नेहमीच बसतो.

ग्रामीण शेतकऱ्यांच्या शोषणाचे ते कठोर विरोधक होते; पण ऊठ-सूट रडत बसणाऱ्यांतलेही ते नव्हते. शेतकरी समजून घेणं म्हणजे कायम त्याच्यासाठी अश्रू ढाळणे नव्हे. ‘शेतकऱ्यांचं कौशल्य कसं वाढवता येईल याचा अधिकाधिक विचार केला पाहिजे,’ असं ते म्हणत असत.

त्यासाठी शेतकऱ्यांना अधिकाधिक व्यवहारज्ञान, कृषिशिक्षण ते देत असत. असं केल्यानं आडते आणि व्यापारी यांच्याशी व्यवहार करताना शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचा योग्य मोबदला मिळेल अशी त्यांना खात्री वाटत होती.

आज ते हयात असते तर, आजकाल शिक्षणाचा प्रसार झाल्याचं त्यांनी मान्य केलं असतं; पण त्याची गुणवत्ता चांगली आणि समाजोपयोगी आहे हे कदापि मान्य केलं नसतं. ते म्हणायचे, ‘एक काळ असा येईल, ज्या वेळी भारतीय समाजात नक्कीच संघर्ष निर्माण होईल. हा संघर्ष जातींचा किंवा आर्थिक विषमतेचा नसेल तर शहरी आणि ग्रामीण भागाला मिळणाऱ्या असमतोल संधींवरून व सवलतींवरून झालेला असेल...’

आज ते हयात असते तर त्यांनी सरकारला सुनावलं असतं, ‘जोपर्यंत सत्तेला ग्रामीण आणि शहरी भागातील तफावतीची जाणीव होणार नाही, तिच्या परिणामांची कल्पना येणार नाही आणि जोपर्यंत तीवर उपाय शोधले जाणार नाहीत, तोपर्यंत शेतकरी असंतुष्टच राहील. परिणामी, ग्रामीण आणि शहरी भागांत समान संधी मिळण्यासाठी आणि सर्व बाबतींत समता निर्माण होण्यासाठी आंदोलनं होतच राहतील.’

हे लगेच होणार नाही कदाचित; पण एक ना एक दिवस नक्की होईल, असं भाकीत त्यांनी नक्कीच केलं असतं. ग्रामीण तरुणाईचा ‘मराठा क्रांती मोर्चा’ ही त्याची सुरुवात आहे.

‘जीवन गौरव पुरस्कार’ ही आजकालची फॅशन आहे. काही महिन्यांपूर्वी शाहूवाडी इथं मी अशाच एका कार्यक्रमाला उपस्थित होतो. हा माझाच तालुका! माझी ओळख करून देताना मी मिळवलेल्या यशाचा वक्त्यानं उल्लेख केला. माझ्यासाठी तो प्रकार इतका कंटाळवाणा होता की, तो वक्ता पुढं काय काय बोलतोय याकडे माझं चित्त राहिलं नाही; पण शेवटी अचानक त्यानं माझं लक्ष वेधून घेतलं : ‘आपल्या आयुष्यात डॉ. यशवंत थोरात यांनीदेखील त्यांच्या आजोबांसारखीच शेतकऱ्यांविषयीची कणव, ग्रामीण शिक्षणाबद्दलची बांधिलकी दाखवलेली आहे. आणि त्यातून डॉ. पी. सी. पाटील यांचं कार्य पुढं नेत त्यांचा सच्चा नातू असल्याचं सिद्ध केलेलं आहे. यासाठीच त्यांना हा ‘जीवन गौरव पुरस्कार’ दिला जात आहे.’

माझे वडील सैनिक होते आणि मीही सैनिकच होईन अशी अपेक्षा केली जात असे; पण मी माझ्या मनाचं ऐकलं. पुरस्कार स्वीकारण्यासाठी उभा राहिलो तेव्हा का कुणास ठाऊक माझे डोळे पाणावले. कदाचित मी माझ्या मूळ ठिकाणी पोहोचलो होतो, म्हणून असेल...

(अनुवाद: डॉ. रघुनाथ कडाकणे)

raghunathkadakane@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

दारूच्या नशेतच कपूर परिवाराला पहिल्यांदा भेटली संजय कपूरची बायको ; म्हणाली "ड्रिंक्स करताना त्याने प्रपोज केलं"

SCROLL FOR NEXT