India and Pakistan Sakal
सप्तरंग

रक्ताळलेली रेषा

पुढच्या एक-दोन दिवसांत भारत आणि पाकिस्तान आपापला स्वातंत्र्यदिन जवळपास सारख्याच पद्धतीनं साजरा करतील.

डॉ. यशवंत थोरात

पुढच्या एक-दोन दिवसांत भारत आणि पाकिस्तान आपापला स्वातंत्र्यदिन जवळपास सारख्याच पद्धतीनं साजरा करतील : शालेय मुलं राष्ट्रगीत गातील; वृत्तपत्रं लेख छापतील, राजकारणी लोक भाषणं देतील आणि सैनिक शक्तिप्रदर्शन करतील.

दुसऱ्या पातळीवर, दोन्ही देश शांततेत; पण तितक्याच कृत्रिमपणे आत्मपरीक्षणाचा सोपस्कार पार पडतील...आतल्या कप्प्यातून जुन्या आठवणी काढल्या जातील...त्यांवरची धूळ झटकली जाईल...फाळणीच्या घटनेबद्दल खंत वाटत असल्याचा उसना आव आणला जाईल...आणि पुन्हा त्या आठवणी वर्षभरासाठी विस्मरणात जातील...समोरच्यानं केलेल्या वाईट कृत्यांची दोन्ही देश उजळणी करतील.

मात्र, आपल्याकडून केला गेलेला अत्याचार आठवणार नाहीत. फाळणीतून घ्यायच्या धड्यांकडे दोन्ही देश दुर्लक्ष करतील. कारण, तेव्हाच्या वेदना समजून घेणं आणि त्या दूर करणं याला कुणाचंच प्राधान्य नाही. हा सोपस्कार पुढल्याही वर्षी पार पाडला जाईल.

ब्रिटिश राजवट संपली; कारण, दुसऱ्या महायुद्धानंतर भारतावर हुकमत ठेवण्याची ब्रिटनची इच्छा किंवा पत राहिली नव्हती. तीनशे वर्षांनंतरदेखील ते सन्मानपूर्वक निघून गेले नाहीत. जाता जाता एका हृदयाचं विभाजन त्यांनी दोन स्वतंत्र राष्ट्रांत केलं : हिंदुबहुल भारत आणि मुस्लिमबहुल पाकिस्तान. सरकारनं सर सेरिल रॅडक्लिफ या ब्रिटिश वकिलावर सीमारेषा आखण्याची जबाबदारी सोपवली होती.

रॅडक्लिफनं भारतीय भूमीवर पूर्वी कधीही पाऊल ठेवलं नव्हतं आणि देशाच्या सामाजिक-राजकीय संस्कृतीची त्याला कसलीच कल्पना नव्हती. त्याहून वाईट म्हणजे, एका विचित्र गृहीतकाचा आधार घेऊन एक अशक्य गोष्ट करण्यास त्याला सांगितलं गेलं होतं : ‘ज्या त्या धर्माच्या लोकांची बहुसंख्या धरून भारत-पाकिस्तानमधील सीमारेषा आखा...फक्त पाच आठवड्यात!’ असं केल्यानं दोन्ही देश शांतपणे स्वतंत्र होतील अशी ब्रिटिशांची धारणा होती.

दुसऱ्या शब्दांत, हे अवघड काम सोपवण्यात आलेला माणूस त्यासाठी पूर्णतः अयोग्य होता. तरी रॅडक्लिफनं आपलं काम १२ ऑगस्टपर्यंतच संपवलं; परंतु विरोधाच्या भीतीपोटी ‘रॅडक्लिफ लाइन’ची घोषणा स्वातंत्र्यदिनाच्या दोन दिवसांनंतर, १७ ऑगस्ट रोजी केली गेली.

आणि त्यानंतर लगेचच मानवी इतिहासातील सर्वात मोठं स्थलांतर सुरू झालं. लाखो मुसलमान पाकिस्तानात गेले; तितकेच हिंदू आणि शीख तिकडून इकडे यायला निघाले. काही काळासाठी वेडेपणानं विवेकावर ताबा मिळवला आणि हजारो वर्षं एकत्र राहणारे वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकमेकांवर तुटून पडले.

पंजाब आणि बंगालमध्ये उसळलेल्या धार्मिक हिंसाचारानं जाळपोळ, हत्या, अपहरण, जबरदस्तीनं धर्मांतर आणि लैंगिक अत्याचाराचं रूप धारण केलं. हिंसाचारानं कळस गाठलेला असताना महात्मा गांधीजींनी जानेवारी १९४८ मध्ये शहाणपणाची पुनर्स्थापना व्हावी आणि एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या समुदायांमधील सूडाची भावना शमावी म्हणून दिल्लीत आपलं शेवटचं उपोषण सुरू केलं. मात्र, ३० जानेवारीच्या संध्याकाळी त्यांची हत्या झाली. त्यानंतर हिंसा थांबली नसली तरी तिचं प्रमाण कमी होऊ लागलं.

फाळणीमुळे किती लोक स्थलांतरित झाले याविषयी वेगवेगळे अंदाज केले गेले आहेत; परंतु साधारणपणे दोन्हीकडच्या एक कोटीपेक्षा जास्त लोकांनी आपलं घरदार सोडून सीमारेषा ओलांडली. दहा ते वीस लाख लोकांना जीव गमावावा लागला आणि एक लाखाहून अधिक महिलांना बलात्कार, विटंबना अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं. स्थलांतर करावं लागलेल्यांना ही किंमत मोजावी लागली. दुसरी किंमत म्हणजे, नव्यानं जन्मलेल्या दोन राष्ट्रांत आपापसातील वैर आणि द्वेषाची आठवण गेली पंचाहत्तर वर्षं तशीच आहे.

सीमारेषा आखल्याच्या दुसऱ्याच दिवशी रॅडक्लिफ भारत सोडून गेला आणि या देशात पुन्हा कधीच आला नाही. दोन्हीकडच्या लोकांच्या मृत्यूची बातमी कळली तेव्हा तो इतका दुःखी झाला की, आपल्या कामाचे पैसे घेण्यास त्यानं नकार दिला आणि इंग्लंडच्या ग्रामीण भागातील एका शांत ठिकाणी जाऊन राहिला.

सन १९७६ मध्ये ब्रिटनमधील ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांना दिलेल्या एका मुलाखतीत त्यानं सांगितलं, ‘मी लाहोर हे शहर भारताला जवळपास दिलंच होतं; पण पाकिस्तानच्या वाट्याला एकही मोठं शहर येणार नाही हे कळल्यावर तो निर्णय मागं घेतला...’ त्यानं असाही खुलासा केला, ‘माझ्याकडे वेळ इतका कमी होता की, मी याहून चांगलं काम करू शकलो नाही; परंतु, दोन-तीन वर्षं मिळाली असती तर त्यात सुधारणा केली असती.

‘फाळणी का झाली? तिला जबाबदार कोण? ती टाळता आली असती का? तिच्यातून काही धडे घेतले गेलेत का? आणि त्या धड्यांकडे दुर्लक्ष केलं तर भविष्यातील पिढ्यांना कोणती किंमत मोजावी लागेल...? या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं, फाळणी का झाली हे वेगवेगळ्या तऱ्हेनं सांगितलं गेलंय.

पाकिस्तानची भूमिका आहे की, ती ऐतिहासिक गरज होती आणि पाकिस्तानी राष्ट्र हे भारतीय उपखंडातील मुस्लिमांना सभोवतीच्या हिंदू लोकांपासून वेगळा असा समुदाय म्हणून राहण्याच्या इच्छेचा अपरिहार्य परिणाम होता. दुसरीकडे, भारतीय इतिहासकार ‘द्विराष्ट्र सिद्धान्त’ खोडून काढतात आणि फाळणी हा ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या धोरणाचा परिणाम होता; ज्याद्वारे त्यांनी हिंदूंना मुस्लिमांविरुद्ध कपटीपणे खेळवलं, अशी मांडणी करतात.

या दोन्ही भूमिकांपासून अंतर राखत तत्कालीन ब्रिटिश इतिहासकारांनी असा तर्क मांडला की, फाळणीच्या वेळी झालेला रक्तपात त्यांच्यामुळे घडलेला नसून हिंदू-मुस्लिमांमधील ऐतिहासिक वैमनस्याचा आणि मतभेदांचा तो परिणाम होता.

फाळणी का झाली या मुद्द्याला जोडूनच प्रश्न येतो की, तिला जबाबदार कोण? भारतीय लोक याबाबतीत महंमद अली जीना यांच्याकडे बोट दाखवतात. पाकिस्तानी लोकांना ते मान्य नाही. त्यांच्यासाठी जीना हे राष्ट्रपिता आहेत आणि म्हणूनच निंदेच्या पलीकडे आहेत.

भारतीयांच्या दृष्टीनं जीना हे देशाच्या फाळणीच्या प्रक्रियेला वेग देणारे मुस्लिम लीगचे नेते आहेत. या मुद्द्यावर भावना इतक्या तीव्र आहेत की, कुणी याबाबतीतले बारकावे मांडले तर या ना त्या बाजूनं विरोध होतो ही बाब जसवंतसिंग यांना - त्यांची भाजपमधून हकालपट्टी झाल्यानंतर - कळून चुकली होती.

मागं वळून पाहताना असं दिसतं की, सुरुवातीच्या काळात जीना मवाळ विचारांचे होते; परंतु मार्च १९४० पर्यंत त्यांची ठाम धारणा झाली की, मुसलमान हा एक ‘समुदाय’ नसून एक ‘राष्ट्र’ आहे आणि याच आधारावर वेगळ्या मातृभूमीच्या मागणीच्या दिशेनं त्यांनी आपल्या ‘मुस्लिम लीग’ला वळवलं. पण एकटे तेच ‘खलपुरुष’ होते का?

अलीकडच्या काळातल्या विद्वानांचं मत आहे की, ब्रिटिश व्हाईसरॉय, लॉर्ड लुईस माउंटबॅटन हेही फाळणीसाठी जबाबदार आहेत. ‘शेमफुल फ्लाइट : द लास्ट इयर्स ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया’ या एका महत्त्वाच्या पुस्तकात, इतिहासकार सर स्टॅनले वोल्पर्ट लिहितात : ‘त्या काळातील सर्व महत्त्वाच्या लोकांपैकी माउंटबॅटनइतकी शोचनीय, तसंच प्रमुख भूमिका दुसऱ्या कुणीही बजावली नाही.’

सत्तेच्या ‘रक्तरंजित’ हस्तांतरणाची कल्पना ब्रिटिशांनी केली नव्हती हे कदाचित खरं असेल; परंतु पिढ्यान् पिढ्या नाळ जुळलेल्या भूमीतून जेव्हा लोकांना बळजबरीनं हाकलून दिलं जाईल तेव्हा त्यांच्यातील आदिम सांप्रदायिक भावना आणि त्यासोबतच हिंसाचार उसळेल याचा अंदाज बांधण्यात ते नक्कीच अपयशी ठरले. आणि, प्रत्यक्षात जेव्हा हिंसाचार घडला तेव्हा तो, सुनियोजित योजनेचा भाग म्हणून आटोक्यात आणण्यातही ते अयशस्वी झाले. यासाठीदेखील त्यांना जबाबदार धरलंच पाहिजे.

कधी कधी प्रश्न विचारला जातो की, इतक्या निर्दयी हत्याकांडानंतर त्या तीन प्रमुख घटकांना जे हवं होतं ते मिळालं का? याचं उत्तर आहे ‘नाही’. पूर्व पंजाब आणि पश्चिम बंगालचा बराचसा भाग हातातून गेल्यानंतर जीनांना तुकडे पडलेला, अस्ताव्यस्त झालेला पाकिस्तान स्वीकारणं भाग पाडलं गेलं; जे त्यांनी आधी नाकारलं होतं.

काँग्रेसनं ब्रिटिश साम्राज्यापासून मुक्तता मिळवली; पण ‘देशाची एकता आणि अखंडता’ या आपल्या राष्ट्रवादी सिद्धान्ताच्या सर्वात मूलभूत तत्त्वाशी तडजोड करून आणि दुभंगलेला भारत स्वीकारण्याची किंमत मोजून. आणि, वसाहतवादी ब्रिटिश देश सोडून गेले; पण आपलं कर्तव्य पार न पडल्याचा कलंक सोबत घेऊन. इतिहासातून धडे शिकून राष्ट्रं प्रगती करतात, असं म्हणतात.

फाळणीचा प्राथमिक धडा असा होता की, फूट पाडणारं राजकारण, जातीय द्वेष आणि राजकीय फायद्यासाठी धार्मिक ओळखीचा वापर याचे परिणाम विनाशकारी आणि हिंसक होतात. दोन्ही बाजूंनी हा धडा आत्मसात केला आहे का असा प्रश्न विचारला जातो. कारण, जातीय तणाव आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणाचा या भूमीला सतत त्रास चालूच आहे आणि नेत्यांनी निवडणुकीतील फायद्यासाठी जातीय भावनांचा वापर केल्याची उदाहरणं प्रसारमाध्यमं भडकपणे दाखवतच आहेत. परिणामी, दोन्ही देशांतला दुरावा वाढतच चालला आहे.

भूतकाळात घडून गेलेल्या घटना टाळणं किंवा फाळणीच्या जखमा भरून काढणं हे आव्हानात्मक असलं तरी अशक्य नाही; जर दोन्ही देशांनी तोडगा काढण्याच्या भावनेनं एकत्र काम करण्याची तयार दाखवली तर. यासाठी, सामायिक इतिहासाची कबुली, दोन्हीकडील लोकांत थेट संपर्क येईल अशा कार्यक्रमांना प्रोत्साहन आणि कला-क्रीडाक्षेत्रात सहकार्यासाठी व्यासपीठ अशा गोष्टी करणं आवश्यक आहे.

जेणेकरून धर्मापलीकडच्या समान ओळखीची भावना दोन्हीकडे वाढेल. राष्ट्रांनी हेही लक्षात ठेवायला हवं की, जोवर एकमेकांच्या जवळ ते पोहोचत नाहीत तोवर परस्परवैमनस्य संपूर्ण प्रदेशालाच धोक्यात आणू शकतं.

वास्तव हे आहे की, सध्या सुरू असलेले सीमावाद, सीमेपल्याडचा दहशतवाद आणि परस्पर-अविश्वासामुळे निर्माण झालेली अण्वस्त्रांची स्पर्धा यांमुळे जागतिक पातळीवरील संघर्षाचाही धोका वाढू शकतो. शांततापूर्ण आणि स्थिर दक्षिण आशिया हा केवळ भारत आणि पाकिस्तानच्याच नव्हे तर, संपूर्ण जगाच्या हिताचा आहे.

इतिहासातून शिकण्याचीच नव्हे तर, त्याकडे मानवी दृष्टिकोनातून पाहण्याची वेळ आता आली आहे, ज्याचं वर्णन सआदत हसन मंटो यांच्या ‘तोबा टेकसिंग’ या प्रसिद्ध लघुकथेत आलेलं आहे. त्या काळचा आघाडीचा लेखक मंटो फाळणीनंतर लाहोरच्या मनोरुग्णालयातील वेड्यांच्या देवाण-घेवाणीचं वर्णन करतो.

कथा काल्पनिक असली तरी, लाहोर आणि अमृतसरमधील वेड्यांच्या इस्पितळातील रुग्णांची देवाण-घेवाण प्रत्यक्षात १९५० मध्ये झाली होती. कथेचं मुख्य पात्र असलेल्या बिशनसिंगच्या आत्मशोधाचा वेदनादायक संघर्ष फाळणीतील लाखो निर्वासितांनी सहन केलेल्या विस्थापित अवस्थेचं प्रतीक आहे. त्याच्या दु:खात निर्वासितांच्या भोगांचं प्रतिबिंब आहे.

मनोरुग्णालय हे सबंध भारतीय उपखंडाचं प्रतिरूप आहे; त्यातल्या रहिवाशांचा वेडेपणा म्हणजे चार भिंतींच्या पलीकडे चाललेल्या फाळणीदरम्यानच्या हिंसाचाराच्या वेडेपणाचं प्रतीक आहे. कथा पुढं सरकत जाते तसं वाचकांच्या लक्षात येतं की, वेड्यांच्या इस्पितळातले रहिवासी खरं तर बाहेरच्या जगातील लोकांपेक्षा आणि त्यांना नियंत्रित करणाऱ्या राजकारण्यांपेक्षा अधिक समजूतदार आहेत.

त्या काळाचे उपखंडातील सर्वात संवेदनशील कवी फ़ैज़ अहमद फ़ैज़ यांनी आपल्या आत्म्यातला काळोख पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी ‘सुबह-ए-आझादी’ या कवितेत पुढील शब्दांत मांडला:

ये दाग़ दाग़ उजाला, ये शब-गज़ीदा सहर

वो इंतिज़ार था जिस का, ये वो सहर तो नहीं

(हा डागाळलेला प्रकाश, सूर्यास्तासम भासणारा सूर्योदय

ज्या पहाटेची प्रतीक्षा होती, ती ही पहाट नव्हेच)

फ़ैज़ यांचा मी प्रशंसक आहे. त्यांची व्यथा मला समजते; थोड्याफार प्रमाणात मी स्वतः ती अनुभवलेली आहे. तरीदेखील माझा विश्वास आहे की, रात्र कितीही काळोखी असो, अंधकाराचं आवरण कितीही दाट असो, शेवटी आशा सोडली तर मग हातात काहीच उरत नाही... काहीच नाही! आणि, म्हणूनच कालिदासानं पहाटेबद्दलच्या त्याच्या कवितेत म्हटल्यानुसार, पुढं जाण्याचा एकमेव मार्ग आहे तो असा :

आजच्या दिवसाकडे पाहा...

तेच जीवन आणि जीवनाचं जीवन आहे

गतकाल हे फक्त एक स्वप्न आहे

आणि उद्याचा दिवस फक्त एक मानचित्र!

चांगल्या रीतीनं जगलेला ‘आज’

नंतर गतकालाचं आनंदी स्वप्न होईल

आणि उद्या येणारा प्रत्येक दिवस हे आशादायी चित्र असेल

म्हणून ‘आज’कडे चांगल्या दृष्टीनं पाहा

हेच असेल आजच्या पहाटेला नमन!

(सदराचे लेखक ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ, तसंच अर्थशास्त्र-इतिहास-राजकीय घडामोडी या विषयांचे अभ्यासक-संशोधक आहेत.)

(अनुवाद : डॉ. रघुनाथ कडाकणे)

(raghunathkadakane@gmail.com)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT