Summer Placement sakal
सप्तरंग

मेरे दिल, मेरे मुसाफिर

‘समर प्लेसमेंट’साठी वेगवेगळ्या कॉलेजमधून आलेल्या तरुण मुला-मुलींचा तो ग्रुप होता. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना चहासाठी घरी बोलावलं. ‘अध्यक्षां’नी स्वतः आमंत्रण दिल्यामुळे ते हरखून गेले होते.

डॉ. यशवंत थोरात

‘समर प्लेसमेंट’साठी वेगवेगळ्या कॉलेजमधून आलेल्या तरुण मुला-मुलींचा तो ग्रुप होता. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना चहासाठी घरी बोलावलं. ‘अध्यक्षां’नी स्वतः आमंत्रण दिल्यामुळे ते हरखून गेले होते.

नोकरीत असताना त्यांची-माझी भेट झाली.

‘समर प्लेसमेंट’साठी वेगवेगळ्या कॉलेजमधून आलेल्या तरुण मुला-मुलींचा तो ग्रुप होता. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना चहासाठी घरी बोलावलं. ‘अध्यक्षां’नी स्वतः आमंत्रण दिल्यामुळे ते हरखून गेले होते. सुरुवातीला मोकळे व्हायला ते तयार नव्हते; पण चहा-बिस्किटं येताच बोलू लागले आणि जगातल्या तमाम तरुणांप्रमाणे नंतर ते थांबेचनात. 

संध्याकाळ होत आली तशी ग्रुपमधली बराच वेळ गप्प असणारी एक मुलगी संकोचत पुढं आली आणि तिनं काजूकतलीचं बॉक्स माझ्या हातावर ठेवलं.

‘हे काय?’ मी विचारलं.

‘लग्न ठरलंय,’ ती म्हणाली.

‘कुणी ठरवलं?’ मी गमतीनं विचारलं, ‘‘तुझं तू ठरवलंस आणि आई-वडिलांनी संमती दिली की याच्या उलट?’

ती लाजून म्हणाली : ‘आई-वडिलांनीच ठरवलं. वधू-वर मंडळामार्फत.’

तिचा सूर असा होता की, प्रेमविवाहापेक्षा पारंपरिक विवाहच जास्त प्रतिष्ठित असतो.

‘बरं, मला सांग, तो ‘लकी’ मुलगा काय करतो?’

‘मेकॅनिकल इंजिनिअर आहे. पुण्यात एका स्थानिक बिल्डरबरोबर काम करतो.’

तिच्या लग्नाची बातमी कळताच ग्रुपमध्ये खळबळ सुरू झाली आणि अभिनंदन करण्यासाठी सारे तिच्या भोवती गोळा झाले.

एकजण म्हणाला : ‘अर्पिता, मागच्याच आठवड्यात तुला साडी घ्यायची होती म्हणून मी तुझ्याबरोबर आलो होतो. तेव्हा एक साडी निवडायला तू तीन तास घालवून मला वैताग दिला होतास. आणि आता म्हणतेयस, कुंडलीसारख्या बाष्कळ गोष्टीच्या भरवशावर एका अनोळखी मुलाची आयुष्यभराची जोडीदार व्हायला तू तयार आहेस?’

असा उलटसुलट प्रतिक्रियांचा भडिमार सुरू झाला. शेवटी त्यातली सगळ्यात हुशार असलेली निधी मला म्हणाली : ‘तुम्हाला काय वाटतं, सर? जीवनसाथी निवडणं हा आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय नाही का? आणि तसं असेल तर, इतका व्यक्तिगत निर्णय दुसरे लोक - अगदी आपले जवळचे नातेवाईकसुद्धा –- कसा काय घेऊ शकतात? आई-वडिलांनी जमवलेली लग्नं कदाचित सोईची असतीलही; पण ती योग्य असतीलच याची काय खात्री?’

‘खात्रीनं सांगता येणार नाही,’’ मी म्हणालो : ‘‘लग्नाची व्याख्या काहीही असो आणि ते कसंही जमलेलं असो, शेवटी ती एक लॉटरी असते. स्वतः जुळवलं तर तुमचं प्रेम हे त्यामागचं ‘कारण’ आहे असं गृहीत धरलेलं असतं आणि आई-वडिलांनी घडवून आणलं तरी प्रेम हा अपेक्षित ‘परिणाम’ मानला जात असतो. पहिल्या प्रकारात जबाबदारी तुमची असते आणि दुसऱ्यात मात्र काही कमी-जास्त झालंच तर तुम्ही दुसऱ्याला दोष देऊ शकता. यशापयशाची शक्यता मात्र दोन्ही प्रकारांत सारखी असते. चर्चा सुरूच राहिली...माझं मन खूप दशकं मागं ‘स्टाफ कॉलेज’मध्ये गेलं, जिथं आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. नोकरीत रुजू झाल्या झाल्या आम्हाला ट्रेनिंगसाठी तिथं पाठवलेलं होतं. आणि, कोर्स पूर्ण व्हायच्या आतच आम्ही लग्नाच्या निर्णयापर्यंत आलो होतो आणि पुढचं वैवाहिक आयुष्य एकमेकांबरोबर घालवण्याची उत्सुकतेनं वाट पाहत होतो...इतक्यात, माझं विचारचक्र तोडत निधीनं विचारलं : ‘सर, तुमचं आणि मॅडमचं लग्न होऊन किती वर्षं झाली?’

‘जवळपास पस्तीस,’’ मी उत्तरलो.

‘अरे व्वा! आणि तुमच्या सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य काय?’

‘तारेवरची कसरत आणि मानसशास्त्रातली पीएच.डी’ असं उत्तर माझ्या ओठांवर आलं होतं; परंतु तो प्रसंग विवाह या विषयावरचा ग्रंथ मांडण्याचा नव्हता, म्हणून ‘प्रेम’ असं एका शब्दात मी उत्तर दिलं. त्यांनी माना डोलवल्या. मला काजूकतली देणारी मुलगी आनंदानं हसली. उत्तर योग्य होतं.

अभावितपणे मी विचारलं : ‘तुला तो मुलगा आवडतो?’

‘त्याच्यावर मी मनापासून प्रेम करते,’ तिनं सरळ उत्तर दिलं.

मी द्रवलो. ‘पुढचं सगळं नीट होईल’ अशा आश्वासनाची तिला गरज असल्याचं तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होतं.

‘तुझ्या पालकांनी सारासार विचार करूनच त्याची निवड केली असणार. आता एकमेकांना आनंद देणं तुमच्यावर आहे. त्यासाठी देव तुला साथ देवो हीच माझी प्रार्थना,’ मी म्हणालो.

तिचे डोळे पाणावले आणि फुललेल्या चेहऱ्यानं आशीर्वादासाठी ती खाली वाकली. ती गेल्यानंतरही तिच्या चेहऱ्यावरचं तेज माझ्या मनात ठसून राहिलं...पण का कुणास ठाऊक, भीतीही वाटली. पुढं ती सुखात राहील असा अंदाज मी कशाच्या आधारावर लावला? तसं करण्याचा मला अधिकार तरी काय? आणि काही विपरीत...? अचानक घाबरून मी वर आकाशाकडे पाहिलं आणि म्हटलं : ‘देवा, हे जग चालवण्याचंच काम तू नीट करतोयस की नाही या मुद्द्यावर आपला वाद सुरूच आहे; पण काही काळासाठी तो बाजूला ठेव आणि एवढ्यापुरती कृपा कर आणि या मुलीच्या वाट्याला सुख दे.’

त्यानं माझं ऐकलं की नाही माहीत नाही; पण मला बरं वाटलं. त्यानंतर मुंबईच्या ‘किताबखाना’मध्ये एक स्त्री मला येऊन धडकेपर्यंत जवळपास चोवीस वर्षं मी तिला विसरून गेलो.

‘मॅडम, माफ करा,’ मी म्हणालो.

‘ठीक आहे,’’ असं म्हणून ती पुढं गेली. बुकशॉपमधला ‘नॉनफिक्शन’ विभाग मी धुंडाळत होतो. इतक्यात कुणीतरी मला हलकेच स्पर्श केला आणि म्हणालं : ‘सर!’ वळून पाहतो तर तीच स्त्री.

चेहऱ्यावर हसू.

‘मला नाही ओळखलंत?’ मी आक्रसून गेलो. नावांच्या आणि चेहऱ्यांच्या बाबतीत माझी स्मरणशक्ती भयंकर आहे. त्यामुळं ‘मला ओळखलं नाही का?’च्या संकटात मी खूपदा सापडलोय.

‘सर, मी अर्पिता. आमच्या ग्रुपला तुम्ही चहासाठी घरी बोलावलं होतं. त्यात मीही होते. तुमच्या संस्थेत ‘समर प्लेसमेंट’साठी आलो होतो, आठवतं?’ तेव्हा कुठं माझ्या ध्यानात आलं.

‘इतकी वर्षं तू कुठं होतीस?’ मी विचारलं

‘अशीच इकडे-तिकडे,’ ती उत्तरली. ज्या तऱ्हेनं तिनं उत्तर दिलं त्यावरून कुठं तरी काहीतरी बिनसल्याचं जाणवलं.

‘ठीक आहेस ना?’ मी विचारलं.

तिनं स्मित केलं आणि म्हणाली : ‘‘ऑफ कोर्स! पण कहाणी मोठी आहे सर...मला सांगायलाही आणि तुम्हाला ऐकायलाही वेळ लागेल. येते. मॅडमना आवर्जून नमस्कार सांगा.’’

मीही निरोप घेणारच होतो; पण का कुणास ठाऊक, थांबलो.

‘जेवणाची वेळ झालीय. जेवायला जाऊ या का एकत्रच?’’

‘रॉयल बॉम्बे यॉट क्लब’च्या डायनिंग हॉलमध्ये आम्ही बसलो. जेवणाची ऑर्डर दिली आणि मग मी तिला म्हणालो : ‘आता तुझी मोठी कहाणी सांग!’

चोवीस वर्षांपूर्वी तुमच्या घरी आलेली व्यक्ती मी नाहीय. वाक्य आश्चर्यकारक होतं. तिच्यावर एक नजर टाकली - एक मध्यमवयीन बाई - ऐटदार कपडे घातलेली. चेहऱ्यावर मात्र काळजी, सतत चुळबुळ, दोन्ही तळहातांची घट्ट गुंफण. तणावग्रस्त. नक्कीच, चोवीस वर्षांपूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी खाली वाकलेली ती अर्पिता ही नव्हती.

‘मोठी कहाणी थोडक्यात सांगायची म्हणजे, मी विभक्त झालेय. नवऱ्यानं मला सोडलेलं नाही; मीच त्याला सोडलं. त्याचं काय झालं माहीत नाही. माझी मुलं दूर गेली आहेत. त्यांनी आत्महत्या केली असं म्हणतात...मी एकटी आहे. एकटी.’’

एकदम शांतता पसरली. मग तीच म्हणाली : ‘‘काही गोष्टी मनात कायमच्या घर करून जातात - जसा तो तुम्ही दिलेला आशीर्वाद. आयुष्यातला एक उजळलेला क्षण होता तो; परफेक्ट. म्हणूनच, नंतर जेव्हा चहूबाजूंनी काळोखानं वेढलं तेव्हा त्या आशीर्वादानं विश्वास दिला की, कुठं तरी आशेचा किरण असणारच. म्हणूनच मी पुनःपुन्हा तुमचा विचार करत होते.

‘गोष्टी इतक्या कशा काय बिघडत गेल्या?’

‘प्रश्न चांगला आहे,’ ती म्हणाली : ‘‘पण ते देवालाच माहीत किंवा कदाचित त्यालादेखील माहीत नसेल! किंवा, जर तो अस्तित्वातच नसेल तर ती मानवी चूक म्हणावी लागेल; पण त्यानं काय फरक पडतो?’’

‘काही नाही,’ मी म्हणालो.

‘जाऊ द्या. आपली आज भेट झाली याचा मला आनंद आहे. आयुष्यात जे घडलं ते मला तुम्ही वगळता इतर कुणालाही सांगायचं नव्हतं. कारण, तुमच्याइतका वाईट ज्योतिषी दुसरा सापडणार नाही!’’ ती हसली.

‘मग सांग’ मी हळुवारपणे म्हणालो.

‘आयआयएम’मध्ये वर्गात पहिली आले आणि एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या ‘सेल्स आणि मार्केटिंग’ विभागात जॉईन होण्यासाठी निमंत्रण आलं. नंतर लगेचच आमचं लग्न झालं. एकत्र राहत होतो, आनंदी होतो आणि काही काळ प्रत्येक दिवस सप्तरंगी होता - घरीही आणि ऑफिसातही. त्या कामाची माझ्यात नैसर्गिक क्षमता होती. मी आणि माझ्या टीमला जे प्रॉडक्ट्स हाताळायला दिले होते त्यांनी दुसऱ्याच वर्षी सर्व विक्रम मोडले. कंपनीनं ओळखलं की त्यांच्याकडे एक हुकमी एक्का आहे आणि खरं सांगायचं म्हणजे, त्यांनी केलेलं कौतुक जरा माझ्या डोक्यातच गेलं. मला प्रमोशन्स मिळत गेली.

‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’मध्ये एका कोर्ससाठी मला पाठवलं गेलं आणि भावी लीडर्ससाठीच्या प्रतिष्ठित ‘जलद मार्गा’वर माझी वाटचाल सुरू झाली. रोहितचा मोठा आधार होता आणि प्रत्येक टप्प्यावर त्यानं प्रोत्साहन दिलं. लवकरच जुळ्या मुलांचे - प्रार्थना आणि प्रल्हाद - आम्ही पालक झालो - आणि अशा रीतीनं आमचा सुखाचा प्याला पूर्ण भरून गेला. मग कोरोना आला. अर्थव्यवस्था मंदावली. बांधकामं ठप्प झाली. रोहितची फर्म बंद पडली. त्याची नोकरी तर गेलीच; पण भविष्यात ती मिळण्याची आशाही संपली. दुसरीकडे, अन्नाचा आणि पेयांचा बाजार मात्र तेजीत आला.

मी ऑफिसच्या कामात गुंतत गेले आणि बघता बघता आमच्यातलं अंतर वाढत गेलं. तिथून पुढं एखाद्या नाटकाचं कथानक उलगडत जावं तसं सगळं घडलं. रोहित दारू प्यायला लागला - कदाचित वैतागामुळे असेल किंवा प्रसंगाला तोंड देण्याची क्षमता नसल्यामुळे असेल...वर्षभरात तो दारूच्या पूर्ण आहारी गेला. पुष्कळ विनवणी केली, तज्ज्ञांचा सल्ला घेतला, दारू सोडवणाऱ्या संस्थांकडे गेलो...पण सगळं व्यर्थ. तशी मी हार मानणारी नाही. माझ्यावर अवलंबून राहिल्यामुळे त्याचा आत्मविश्वास कमी होतोय हे लक्षात येताच मी त्याला, कमी पगाराची का असेना; पण नोकरी मिळवून देण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, त्यानंच नकार दिला. काही महिन्यांनंतर शेजाऱ्याच्या बायकोबरोबर तो सापडला आणि उलट माझ्यावरच भडकला. मुलांसमोर त्यानं मला पट्ट्यानं बेदम मारलं.

आयुष्यात अनेक गोष्टी मी विसरून गेले, सर... पण एकमेकांना कवटाळून बसलेली माझी लेकरं...भीती, धक्का आणि अविश्वासानं थिजलेले त्यांचे ते चेहरे मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. नंतर माझ्याच चारित्र्यावर शिंतोडे उडवत त्यानं माझ्या बॉसला पत्र पाठवलं.

कुणाला पटलं नाही. मी हकीकत एमडी साहेबांना सांगितली. त्यांनी ती कॉर्पोरेट ऑफिसमध्ये मांडली आणि विशेष म्हणजे माझी आणि मुलांची काळजी घेऊ शकेन एवढा पगार देऊन त्यांनी मला परदेशातल्या पोस्टिंगची ऑफर दिली. त्या सायंकाळी प्रार्थना आणि प्रल्हाद यांना हे सांगत असताना रोहितनं ऐकलं. मग नुसती आदळआपट आणि मारहाण. त्या रात्री मला मुंबईतल्या एका मोठ्या रुग्णालयात दाखल करावं लागलं. तिथं आठवडाभर होते. तिथं असताना सगळ्या गोष्टींचा विचार केला, कंपनीची परदेशात जाण्याची ऑफर स्वीकारली. हळूच मुलांना घेऊन विमानतळावर आणायची व्यवस्था केली. तिथं पोहोचल्यावर पाहते तर, कंपनीचे सगळे कर्मचारी रांगेत उभे. आमच्या मॅनेजिंग डायरेक्टरनी थरथरत्या हातानं एक चिट्ठी दिली. तिच्यात लिहिलं होतं :

‘मा, आम्ही देवाकडे जात आहोत. त्यानं तुझ्यावर माया करावी म्हणून. आम्ही परत येतोय. अगदी लवकरच. तू वाट पाहा..

- प्रार्थना आणि प्रल्हाद.’

त्यानंतर मी वेडीपिशी झाले, असं लोक म्हणतात. मुलांच्या अंत्यसंस्काराला गेले नाही. जाऊ कशी? त्यांनीच तर मला सांगितलं होतं ना - ‘लवकरच परत येतोय, वाट पाहा.’ म्हणून मी वाट पाहत राहिले; आजही वाट पाहतेय.’’

चोवीस वर्षांपूर्वी अर्पितानं जसं मोठ्या निष्पाप डोळ्यांनी माझ्याकडे पाहिलं होतं तसंच आताही तिनं माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं : ‘‘सर, मी बरोबर केलं ना?’’

विषय बदलावा म्हणून मी विचारलं : ‘‘आता कुठं काम करतेस?’’ त्यावर प्रश्नार्थक नजरेनं तिनं माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली : ‘‘अर्थात्, त्याच कंपनीत. त्यांनी मला वाऱ्यावर सोडून दिलं नाही. ‘विचलित’ लोकांसाठीच्या संस्थेत त्यांनी मला पाठवलं आणि हळूहळू मला पूर्वपदावर आणलं. ठीक झाल्यानंतर त्यांनी मला पुन्हा रुजू करून घेतलं आणि आता मी प्रमुख ‘कर्मचारी सल्लागार’ आहे.

एकटी राहते. आनंदी नाही; पण दु:खीही नाही. तगून राहिलेय. परिस्थितीला तोंड द्यायला शिकलेय.

ती जायला उठली.

‘थोरात सर, जेवणासाठी धन्यवाद. खरंच, जे काही घडलं ते फक्त तुमच्याशी शेअर करायचं म्हणून मी इतकी वर्षं वाट पाहत होते – कारण प्रार्थना आणि प्रल्हाद परत येण्याची वाट बघत राहून मी योग्य तेच करतेय हे तुम्हीच समजून घ्याल म्हणून.’

ती गेली. मी बराच वेळ टेबलापाशी बसून राहिलो. आणि मग संतापानं देवाला उद्देशून म्हणालो : ‘माझ्यावर एक छोटासा उपकार कर,’ असं चोवीस वर्षांपूर्वी मी म्हणालो होतो...जीवनाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या त्या मुलीच्या वाट्याला आनंद येऊ दे. पुढं तिच्या आयुष्यात काय वाढून ठेवलंय याची कल्पना नसल्यानं मी ‘तिच्यावर कृपा कर’ असं म्हणालो होतो. माझी विनवणी तू झिडकारलीस आणि त्या विनवणीला केराची टोपली दाखवलीस; पण यात तुझा विजय झाला असं समजू नकोस. कारण, माणूस कितीही पिचला, भरडला गेला आणि तू कितीही शक्तिमान असलास तरी मूळ मानवी स्वभाव हा अजिंक्य आहे आणि हेच सत्य आहे. आणि, तू स्वतःदेखील त्याला हरवू शकत नाहीस; कारण, तुझीच निर्मिती असलेला माणूसही तूच आहेस...तू जिंकला नाहीस. अर्पिता जिंकली. तू कधीही जिंकू शकत नाहीस. फक्त माणूसच रक्ताळलेल्या पायांनी आपल्या परिस्थितीवर मात करून नियतीला बदलू शकतो.

गर रगो में जोशे बहार है, तो बना के छोडेंगे आशियाँ

बस! यही है ना बर्क-ए-खंदजन, तो हजार बार गिरा करे

मात करण्याची इच्छाशक्ती असेल तर माझी बाग मी नक्की फुलवीन.

तू जाळून तिला नष्ट करणार असशील, तर एकदा कशाला,

हजारदा कर!

अनुवाद: डॉ. रघुनाथ कडाकणे

(raghunathkadakane@gmail.com)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Manifesto: विषय बदलले नाहीत, प्रश्न तेच.. आता आम्ही करू; असं म्हणत राज ठाकरेंचा जाहीरनामा प्रसिद्ध, काय आहे खास?

IND vs AUS: ऋषभ पंतच्या बॉलिंगवर जसप्रीत बुमराहची फटकेबाजी! पाहा हा BCCI ने पोस्ट केलेला स्पेशल Video

१० पैकी १०! Mumbai Indians च्या वेगवान गोलंदाजाने डावात दहा बळी टिपले, Ranji Trophy त ३९ वर्षानंतर असे घडले

Devendra Fadnavis: ''मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही'', देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; तावडेंच्या भूमिकेनंतर स्पष्टच बोलले

Memorable Trip Ideas: लग्नाआधीची तुमची ट्रीप स्मरणीय करायची आहे? मग 'असे' नियोजन करून पहा

SCROLL FOR NEXT