समलैंगिकता आणि समलैंगिक व्यक्ती, याबाबत आजही भारतीय समाजात खुलेपणानं चर्चा केली जात नाही. काही प्रमाणात याबाबत जागरूकता निर्माण झाली असली, तरी समलैंगिकतेला एखादा आजार किंवा विकृती समजणाऱ्या व्यक्तींची संख्याही बरीच आहे. परिणामी समलैंगिक व्यक्तींना त्यांच्याच कुटुंबात स्वीकारलं जात नाही, त्यांची लैंगिक ओळख दडवून इतरांसारखं आयुष्य जगण्यास भाग पाडलं जातं.
मात्र याचा परिणाम त्या व्यक्तीवर तर होतोच, शिवाय त्या व्यक्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या सर्वांवरच होतो. समलैंगिकतेचा खुलेपणाने स्वीकार न करण्याची मानसिकता अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी होण्यास कारणीभूत ठरू शकते. हेच भीषण वास्तव प्रत्ययकारी पद्धतीनं मांडणारी ‘दुभंगलेलं जीवन’ ही कादंबरी.
अनुराधा या तरुणीचं लग्न तिचे आई-वडील काहीशा घाईघाईत शरद या तरुणाशी लावून देतात. पण शरद हा समलैंगिक असल्याचं आणि त्याचे त्यांच्या मित्राशी समलैंगिक संबंध असल्याचं अनुराधाला लग्नानंतर काहीच दिवसांत कळतं. या अनपेक्षित आघाताने ती मानसिकदृष्ट्या खचते, शारीरिकदृष्ट्याही खंगत जाते; अखेर अकाली तिचा मृत्यू होतो.
त्यांची मुलगी सुचिता लहान वयातच पोरकी होते. आई-वडिलांच्या आयुष्यातील वादळामुळं तिचं बालपण तर कोमेजून जातंच, मात्र प्रेमविवाह असून देखील सासरी पुढं आयुष्यभर वडिलांवरचा हा ‘ठपका’ वागवावा लागतो. त्यातून तिचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं. दुसरीकडे या आघाताचे पडसाद अनुराधाचे आई-वडील आणि तिच्या भावंडांवरही उमटतात.
अनुराधाची बहीण शलाका हे कादंबरीतील मध्यवर्ती पात्र. शलाका ही स्वतंत्र विचारांची, रूढी परंपरा झुगारून आपल्या नवी वाट शोधणारी, एकल पालकत्व स्वीकारणारी धाडसी स्त्री. कादंबरीत अनेकदा शलाकाच्या तोंडून सबाणे व्यक्त होतात. केवळ या पात्रांच्या आयुष्यातील प्रसंगच नव्हे, तर त्या पात्रांच्या मानसिकतेचा आणि त्यामागील कारणांचा वेध घेण्याचा प्रयत्न सबाणे यांनी केला आहे.
समलैंगिकतेमागील नैसर्गिकता मान्य न करण्यामुळे होणारे भीषण परिणाम, हा मुद्दा कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. मात्र त्यासह विवाहसंस्था, लिव्ह इन रिलेशनशिप, एकल पालकत्व, समलैंगिक व्यक्तींच्या गरजा आदी विविध विषयांना सबाणे यांनी स्पर्श केला आहे.
कादंबरीत अनेक प्रसंगात सबाणे यांनी धाडसीपणानं आणि थेटपणे विषयाची मांडणी केली आहे. मात्र हे संतुलित पद्धतीनं मांडण्याची किमया त्यांनी साधली आहे. कादंबरीचा शेवटही सकारात्मक असला, तरी आदर्शवादी नाही. गंभीर विषय मांडतानाही ओघवती भाषा आणि सुरेख गुंफण, यांमुळं कादंबरी एकदा हातात घेतल्यावर पूर्ण केल्याशिवाय राहवत नाही. दुर्लक्षित विषयावरील ही एक महत्त्वपूर्ण कादंबरी आहे.
पुस्तकाचं नाव : दुभंगलेलं जीवन
लेखिका : अरुणा सबाणे
प्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे
(संपर्क ०२०-२४४८०६८६ )
पृष्ठं : २६० मूल्य : ३९५ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.