‘‘ए मूर्खा! दिसतं का?’’
‘‘ए अक्कल शून्य... हॅलो! दिसतं म्हणूनच मी असा उभाय हे तुला दिसतंय का?’’
‘‘जास्तीच जीभ चालतीये तुझी. तुझी जीभ आणि शरीर आवर जरा. मुलींपासून दोन हात लांबच राहावं शिकवलं नाही का कोणी?’’
‘‘ए बाई! उगीच वूमन कार्ड खेळू नकोस. मी ऑलरेडी इथं उभा होतो, तू नंतर आत आली आहेस. उगीच तमाशा! उलट तुझ्यामुळं मला इथं अवघडून उभा राहावं लागतंय. तुला काय जातंय बोलायला!"
बऱ्यापैकी भरलेल्या बसमधलं हे संभाषण आहे, हे एव्हाना लक्षात आलंच असेल. शाळेत आणि कॉलेजपासूनच बुडाखाली सायकल किंवा मोटरसायकल असल्यानं अतिप्रचंड कमी बसप्रवास सारंगनं केला होता. १८ किलोमीटर लांब प्रवास होता अजून. ऑक्टोबर हीट सुरू होती आणि इतक्या लांब बाईकवर कुठं जायचं म्हणून सारंगनं कधीनवं ते बस केली आणि त्या गर्दीत, घामाच्या धारांमध्ये ह्या बाईसाहेब येऊन डोकं खायला लागल्या. पोपटी हिरव्या रंगाचा टॉप, जीन्स, त्यावर एक अर्ध रिकामी पाठीवर सॅक, बस मध्ये घामट झालेला चेहरा आणि थोडेसे विस्कटलेले केस आणि जीन्सच्या खिशात पैसे, हेडफोन्स आणि मोबाईल कोंबलेला अशी भार्गवी त्यात त्याच्या नशिबात आणि बसमध्ये आली होती.
‘‘हं हं! आला मोठा... !’’ ती पुटपुटली.
‘‘चला तिकीट बोला.. ’’
कंडक्टर वाट काढत आला.
‘‘शेवटचा स्टॉप!’’
दोघंही एकाच वेळी बोललो.
दोघांनीही मनातल्या मनात कपाळाला हात मारला. इतकं भांडण झाल्यावर हा योगायोग दोघांनाही नको होता.
‘‘एकत्र आहात का?’’
‘‘अज्जीबात नाही!’’
सारंगनं कंडक्टरला विनाविलंब उत्तर दिलं.
गर्दीतला दोघांचा प्रवास सुरू राहिला.
अजून ४-५ स्टॉप्स गेले आणि एका सीटवरून एक बाई उतरल्या. जागा रिकामी होतीये हे पाहून ते दोघंही त्या सीटच्या दिशेनं बसायला गेले. परत तेच. आता कोण बसणार? सारंगनं जागा सोडली.
‘‘बसा बसा! नाहीतर परत म्हणाल मुलीला बसू दिलं नाही निर्दयी पुरुषाने वगैरे...’’
त्यानं न बसता टोमणा मारला.
ती खडूस लुक देऊन बसली.
तीन-एक स्टॉपनंतर त्यालाही बसायला एक जागा मिळाली आणि त्याचा राग हळूहळू निवळला. ४०-५० मिनिटांनी शेवटचा स्टॉप आला. सारंगनं उतरायची घाई केली नाही. बाईसाहेब घाईत पटकन उतरून पुढच्या दरानं उतरल्या. बस रिकामी होत असताना सारंग उरलेल्या प्रवाश्यांबरोबर उतरायला लागला आणि तेव्हाच ती मुलगी ज्या सीटवर बसली होती तिथं त्याला पांढरे हेडफोन्स पडलेले दिसले. त्यानं पाहत्याक्षणी ओळखलं की हे तर तेच हेडफोन्स होते जे त्या मुलीनं तिच्या जिन्सच्या खिशात कोंबले होते. लांब एका कॉर्नरला फोन करताना एक पोपट दिसला. म्हणजे पोपटी रंगाची व्यक्तिरेखा दिसली. सारंगनं त्या व्यक्तिरेखेला ओळखलं आणि त्या दिशेनं चालायला लागला.
‘‘काय अगं! मी येऊन थांबली आहे इथं! १० मिनिटं काय १० मिनिटं? लगेच ये!’’ ती फोनवर कोणाशीतरी भांडत होती. तिनं कचकन फोन ठेवला आणि शेजारी सारंग उभा
‘‘काये?’’
‘‘गाणी ऐकायला आवडतात का?’’
‘‘हां?? एक्सक्यूझ मीsss!’’
‘‘यू आर एक्सक्युज्ड! गाणी ऐकत जा. चांगलीवाली. त्यानं डोकं आणि मन शांत राहातं.’’
‘‘थँक यू फॉर द ॲडवाईस, पण मी बघीन मला ऐकायची असतील तेव्हा माझं माझं."
‘‘तेच तुला हवं तेव्हा तुझं तुझं ऐकायला हे लागेल बहुदा...’’
सारंगनं हेडफोन्स तिच्यासमोर धरले.
तिनं त्याकडं पाहिलं, मग पटकन तिच्या जिन्सच्या खिशांमध्ये हात लावून चेक केलं.
‘‘अरे देवा!!! कुठं होते?" असं म्हणून तिनं त्याच्या हातातून हेडफोन्स घेतले.
‘‘तू बसलेलीस त्याच सीटवर.’’
‘‘प्च! बावळटच आहे मी. बरं झालं तिथंच नाही राहिले किंवा अजून कोणी घेऊन नाही गेलं. माझी रात्रं विदाऊट हेडफोन्स गेलीच नसती.’’
‘‘आणि तू मला मूर्ख म्हणालीस नाही का?’’
तिनं एकदम त्याच्याकडं अर्ध शरमेने पाहिलं.
‘असो असो,’’ तो म्हणाला.‘‘सॉरी.’’ ते ऐकून सारंग जाताजाता मागे वळून एक स्माईल देत त्याच्या वाटेला गेला.
जमलेल्या मित्र मैत्रिणींबरोबर गप्पा धिंगाणा करून झाल्यावर परत असंच बस पकडून तो येत होता. येताना मिळालेली बस अर्धी रिकामीच होती आणि त्याच्यासोबत ३ मैत्रिणी होत्या. निवांत बसून ते रात्रीच्या आठ वाजताचं शहर खिडकीतून बघत होतो. सारंगनं कानात हेडफोन्स टाकले. शेजारी एक मैत्रीण बसली होती आणि ती सुद्धा कानात हेडफोन्स लावून गाणी ऐकत अशीच खिडकीतून बाहेर बघत होती. सारंगला नकळत दुपारच्या प्रवासाची आठवण येऊन गालात हसू आलं.
ना तुम जानो ना हम...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.