pune  sakal
सप्तरंग

...त्याच्यासारखा दुसरा नाही !

ज्ञानाची, विनोदाची ऊब घेत बसायचं. मी एकदाच उलटा प्रकार पाहिलाय.

द्वारकानाथ संझगिरी

वासू परांजपेच्या पार्थिवाचं दर्शन घेताना, मन घट्ट करूनही मनाचा बांध फुटला. आयुष्यात पहिल्यांदा मी शांत वासू पाहत होतो. नाहीतर कालपरवापर्यंत, वासू म्हणजे ऊर्जा, वासू म्हणजे हास्याचा गडगडाट हेच समीकरण होतं. त्याच क्षणी जाणवलं, आमची मैफल पोरकी झाली. आमच्या मैफलीचा ‘भीमसेन’ निघून गेला. वासूच्या मैफिलीत आमच्याकडे, श्रोत्यांची भूमिका असायची, किंवा एक चमचा तूप टाकून अग्नी प्रज्वलित करण्याची. त्यानंतर ज्ञानाची, विनोदाची ऊब घेत बसायचं.

मी एकदाच उलटा प्रकार पाहिलाय. माझे संगीततज्ञ मित्र कै माधव मोहोळकरांना घेऊन वासुकडे गेलो होतो तेंव्हा!. विषय होता लता मंगेशकर आणि गाणी. तेंव्हा दीर्घ काळ, मोहोळकर बोलत होते आणि वासू ऐकत होता. पुजारा चौफेर फटके मारतोय आणि रोहित शर्मा शांतपणे बचाव करतोय असं दृश्य होतं. जी माणसं मोठेपणाचा हिशोब धावा आणि विकेट्स मध्ये मोजतात, त्यांना वासूचं मोठेपण कधी कळणार नाही. त्याचं मोठेपण भारतीय क्रिकेटच्या पिढ्या घडविण्यात होतं. सुनील गावस्कर , दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर, सनथ जयसूर्या , रोशन महानामा करत करत, थेट, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ पर्यंत.! ह्या सर्व खेळाडूंवर त्याने कधी ना कधी संस्कार केले आहेत.

जे फार वरचं क्रिकेट खेळले नाहीत, पण मुंबईची मैदानं गाजवली आहेत असे किती तरी खेळाडू! शेकड्यात मोजावे लागतील.! म्हणून वासू गेल्यावर आता चाळिशीत असणारे अनेक, वासूच्या अंत्यदर्शनाला आले होते. देशभरातल्या खेळाडूंच्या दुःखद भावनांचा सडा त्या दिवशी जतिन परांजपेच्या व्हॉट्स अॅपवर पडला. माझ्यासाठी तर क्रिकेटच्या ज्ञानाचा एक दरवाजा खाडकन बंद झाला. वसंत अमलाडी आणि वासू कडून मी बरंच शिकलो. वसंत अमलाडी तर वासूचे गुरू. साधारण १९८० मध्ये माझी आणि वासूची ओळख झाली. मग पुढे मैत्री. ‘सर’ पासून नुसता ‘वासू’ हा प्रवास किती पटकन झाला ते कळलंच नाही. वासू वयाचं अंतर सहज ओलांडत असे.

माधव मंत्रीना सर्व माधवराव म्हणत. वासू थेट माधव म्हणायचा. एखाया निर्जन बेटावर ठेऊन, देवाने मला, विचारलं असतं, "तुला क्रिकेटवर गप्पा मारायला कोण हवंय? " तर, हृदयाचा ठोका पडायच्या आत मी वासू म्हटलं असतं.

डॉन ब्रॅडमन ह्यांचे किस्से ऐकण्यासाठी तुला कोण हवंय? स्वतः डॉन ब्रॅडमन की वासू ? मी ह्याचं उत्तरही देवाला वासू असं दिलं असतं. त्या किश्श्यांना लागणारा चविष्ट मसाला फक्त वासूकडे होता. बडोद्यात, किशनचंद नावाचा कसोटीपटू होता. तो ब्रॅडमन विरुध्द खेळला होता. वासू तिथे गेला की वासू किशनचंदला ब्रॅडमन वरून छळायचा. तो बोलण्याच्या बाबतीत तिथला वासू होता. त्याला वासूने विचारलं,‘विजय हजारे किती मोठे फलंदाज होते?’. त्याने वासूला सांगितलं,‘ गावस्कर ह्याला जितके पैसे मिळतात तेव्हढे त्यांना मिळाले असते, तर ते कधी बाद झाले नसते.’ वासूची सांगायची पद्धतही अशीच तिरकस.

१९८३ मध्ये अहमदाबाद कसोटीत, पावणे तीनशेच्या आसपास धावा जिंकायला हव्या असताना, कीर्ती आझाद मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. कुणी तरी वासूला चिडून म्हटलं, ‘काय शॉट खेळला’?

वासूच उत्तर होतं, ‘तुला त्याचा डावपेच कळला नाही. तो चेंडू स्टेडियम बाहेर मारून जिंकायला लागणाऱ्या धावा धावून काढणार होता".

एकदा एक मुंबईचा खेळाडू पॉइंटला क्षेत्ररक्षण करत होता. फलंदाजाने स्क्वेअर कट मारली. त्याने बॉल सोडला. वासूने त्याला विचारलं, " काय झालं? "

तो म्हणाला, ‘चेंडू, जवळ आल्यावर वळला.’

वासू त्याला म्हणाला, ‘क्रिकेटच्या जन्मापासून चेंडू असा वळतो. तुझी चुकी नाही" त्याच्या एका अशा किश्श्याला मी साक्षी होतो. एक मोठा खेळाडू, बाद होऊन आला आणि मी आणि वासू बसलो होतो तिथे येऊन बसला. वासूने त्याला विचारलं

‘काय झालं?’

तो म्हणाला ,‘चांगला आऊट स्विंगर आला.’

वासू पापणी लवायच्या आत म्हणाला, ‘बॉलरने आऊट स्विंगर टाकायचा नाही?

अरे क्रिकेट मध्ये आऊट स्विंगर नसता तर लेन हटन ह्याने २ लाख पस्तीस हजार चाळीस धावा केल्या असत्या".

वासूची टोलेबाजी अशी असायची. तो पंचगिरी करायचा.

करमणूक करता करता तो ज्ञान वाटायचा.

मोठे खेळाडू त्याच्या सल्ल्यावर विचार करत. १९८३ मध्ये वेस्ट इंडिजच्या चार आग ओकणाऱ्या गोलंदाजीवर फक्त बचाव हा उपाय नाही. किती वेळ बचाव करणार? एक गेला की दुसरा येतो, तू आक्रमण कर असं सुनील गावस्करला त्याने सांगितलं, सुनीलने ते मानलं असावं . दिल्लीला पुढच्या कसोटीत सुनीलने वेस्टइंडिज विरूद्ध ८१ चेंडूत शतक झळकावलं. वासू त्याला १९८४ मध्ये ऑस्ट्रेलिया मधल्या, " बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेच्या वेळी म्हणाला " लेग स्पिनर शिवराम कृष्णला घे. तो तुला जिंकून देईल". सुनीलने ऐकलं आणि सुनील जिंकला.

ज्यांच्यावर त्याने प्रेम केलं, ते भरभरून केलं. अजित वाडेकरला तो जित्या म्हणायचा. अजितने युनिव्हर्सिटी स्पर्धेत, ३२४ धावा केल्या, तेंव्हा वासू बरोबर त्याने भागीदारी केली. वासूने स्वतः शतक ठोकलं पण मला सांगायचा, " अरे सोड रे माझे शंभर, अजितने काय बॅटिंग केलीय.! २२ यार्डावरून मी त्याचे फटके एन्जॉय करत होतो. तंत्राच्या भानगडीत पडला नसता तर जित्याने कसोटीत खूप धावा केल्या असत्या."

असूया ही गोष्ट त्याच्या स्वभावात नव्हती. सचिनची पाहिली रणजी खेळी आम्ही प्रेसबॉक्स मधून एकत्र बसून पाहिलीय.

एका कागदावर प्रत्येक चेंडुबद्दल त्याने लिहिलं होतं. सचिनची चूक झाली की ह्याचा ठोका चुकत असे. मी करंटा, त्याने मला दिलेला तो कागद मी हरवला. सचिन पुढे एका मालिकेत थोडा बचावात्मक झाला,तेंव्हा तो मला म्हणाला, " सचिन भेटेल तेंव्हा माझा निरोप दे. पेशंस, परसिवियरन्स, वगैरे गोष्टी, ज्यांच्याकडे फटके नसतात त्यांच्यासाठी असतात. ज्यांच्याकडे फटके आहेत त्यांनी फटके खेळायचे असतात." मी सचिनला सांगितल्यावर सचिन केवढा हसला होता.

वासू दादर युनियनचा, त्याची दैवतं, विजय मांजरेकर आणि सुभाष गुप्ते शिवाजी पार्कची. एकमेकांविरुद्ध खेळताना दुष्मनी, बाहेर भक्ती.! विजय मांजरेकर बरोबर भांडून, वासू संजय मांजरेकरला दादर युनियन मध्ये घेऊन आला. त्याच्यावर अधिक चांगले क्रिकेट संस्कार व्हावे म्हणून. वासूने जरी कुणाला चिमटा काढला, तरी त्याचा वळ उठत नसे. एकदा संघातून वगळल्यावर, श्रीकांत एका ज्योतिषाला हात दाखवत होता. श्रीकांत त्या ज्योतिषाला म्हणाला, " माझ्या हातावर फार कमी रेषा आहेत. त्यामुळे मला काळजी करायचं कारण नाही."

वासू तात्काळ त्याला म्हणाला, " तुला काळजी नसेल रे, पण तू बॅट फिरवल्यावर, उरलेला संघ काळजीत पडतो."

श्रीकांतने त्या ज्योतिषाला म्हटलं, " मला कळत नाही मी पुन्हा का सिलेक्ट होत नाही?"

पुन्हा ज्योतिषाने उत्तर द्यायच्या आत वासू म्हणाला, " त्याची काळजी सोड. तू मुळात कसा निवडला गेला हे आम्हाला कळत नाही".

दुसरा कुणीही असता तर श्रीकांत चिडला असता. वासू क्रिकेटच्या इतिहासात शिरला, की प्रत्येक देशाच्या इतिहासातून फिरवून आणायचा. काही किश्श्यांवर वासूने सांगितला म्हणून मी विश्वास ठेवलाय. एरवी नसता ठेवला.

हा किस्सा पहा." एकदा, काउंटी सामन्यात, लेन हटनला स्टॅथमने पाहिलाच हाफ व्हॉली टाकला. हटन पंचाकडे गेला आणि म्हणाला,

" ही खेळपट्टी २१ यार्ड आहे २२ नाही"

पंच म्हणाला," कशावरून?"

हटन म्हणाला, " स्टॅथम पाहिला चेंडू सुद्धा हाफ व्हॉली टाकू शकत नाही"

आणि ती खेळपट्टी २१यार्ड निघाली.

वासू सोडून कुणालाही, मी " ए फूट ए फेकू नको" म्हटलं असतं. वासूच्या जाण्याने, मी, आपण सर्वांनी काय गमावले आहे ह्याची कल्पना येईल. परवा वासूच्या निधनानंतर मला एक किस्सा आठवला. वासूची आई गेल्यावर, दिलीप वेंगसरकर त्याला भेटायला गेला होता. त्याने वासूला विचारलं" काय झालं आईला"? वासूने काय उत्तर दिलं असेल? वासू म्हणाला," परवा तू मुद्दस्सर नझरला जो शॉट खेळलास ना तो पाहून तिने हाय खाल्ली" त्या दुःखात सुद्धा त्याने विनोद करणं सोडलं नाही.

कदाचित वर गेल्यावर त्याच्या लाडक्या जित्याने,( अजित वाडेकर) त्याला विचारलं असेल, " काय झालं वासू ?"

वासू नक्की म्हणाला असेल, " लीडसला भारताला ७८ धावात खोललेलं पहिलं आणि ठरवलं बस झालं डोळे मिटण्याची वेळ झालीय."

वासू हा देवाचा डिझायनर आयटेम होता. त्याच्या सारखा दुसरा नाही.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT