VIVO IPL Saptarang
सप्तरंग

फिर भी दिल है हिंदुस्तानी!

आयपीएल पुन्हा ‘विवो आयपीएल’ झाली. सहा महिन्यांपूर्वी ज्या वेळी ती अरबी आखातात खेळवली गेली त्या वेळी ती ‘ड्रीम ११ आयपीएल’ होती.

द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

आयपीएल पुन्हा ‘विवो आयपीएल’ झाली. सहा महिन्यांपूर्वी ज्या वेळी ती अरबी आखातात खेळवली गेली त्या वेळी ती ‘ड्रीम ११ आयपीएल’ होती. ती ‘ड्रीम ११ आयपीएल’ व्हायचं कारण होतं ते म्हणजे, उत्तर सीमेवर गलवान खोऱ्यातलं चीनविरुद्धचं युद्ध आणि त्यात धारातीर्थी पडलेले २० भारतीय जवान! अचानक लोकभावना चीनविरुद्ध तीव्र झाल्या. चिनी वस्तूंवरच्या बहिष्काराचे व्हॉट्सॲप मेसेजेस फिरायला लागले. चिनी ॲप्सवर बंदी आली. त्यामुळे ‘विवो आयपीएल’नं स्वतःच काढता पाय घेतला किंवा त्यांना काढता पाय घ्यायला सांगितलं गेलं बहुदा. तोटा सहन करून त्या वेळी बीसीसीआयनं ‘ड्रीम ११’ ला बोहल्यावर चढवलं. आता ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपलं. ‘विवो’चं कुंकू आयपीएलनं पुन्हा ठसठशीतपणे लावलं आहे. सहा महिन्यांत चीन पुन्हा आपला मित्र झाला का?

आयपीएलसंदर्भात चिनी ‘विवो’बद्दल राष्ट्रप्रेमी व्हॉट्सॲप आता फिरताना काही दिसत नाहीयेत, की आयपीएलसाठी वेगळी पॉलिसी आहे? माझ्या असं लक्षात येतंय की, जिथं प्रचंड पैसा आहे त्या कुठल्याही गोष्टीच्या सीमारेषेवर येऊन सर्व भावना थांबतात. देशप्रेमाच्या व्याख्या बदलतात.

आमचा गीतकार शैलेंद्र पूर्वी लिहून गेलाय :

दुनिया की गाडी का पहिया

तू चोर, तूही सिपहिया

राजों का राजा रुपैया

तेरी धूम हर कहीं

तुझ सा यार कोई नहीं

अगदी खरंय!

‘विवो’ला स्पॉन्सरशिप दिल्याबद्दल मला राग नाही. आयपीएलवर तर मुळीच नाही. मला राग दांभिकपणाचा आहे. आपल्याकडे सगळ्यांसाठी एकच धोरण नाही. धोरणं सोईप्रमाणे बदलली जातात आणि शेवटी ती पैशाच्या पायाशी येऊन लोळण घेतात. आपल्याला आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडू चालत नाहीत. का? कारण, पाकिस्तान आपला शत्रू आहे; पण चीन शत्रू असूनही चीनची स्पॉन्सरशिप मात्र चालते.

हे आजचंच नाहीये. हे अनेक वर्षांपासून असंच सुरू आहे. एक उदाहरण देतो. एखाद्या खेळाडूनं पूर्वी ‘पेप्सी’ची किंवा कोकची जाहिरात केली तर त्याच्यावर टीका व्हायची. का? कारण, ‘पेप्सी’, ‘कोक’ या गोष्टी लहान मुलांसाठी योग्य नाहीत. आणि जेव्हा समाजातील एखादी मोठी, मान्यवर व्यक्ती या गोष्टींची जाहिरात करते तेव्हा मुलांना ती पेये प्यावीशी वाटतात! पण माझा असा प्रश्न आहे की, आयपीएलला ‘पेप्सी’नं स्पॉन्सरशिप दिली होती त्या वेळी या विषयावर कुणी बोललं नाही. त्या वेळी त्याचा परिणाम आपल्या मुलांवर होईल असं वाटलं नाही का?

मी यालाच दुटप्पीपणा म्हणतो. आता मी तुम्हाला आयपीएलचं गणित समजावून सांगतो. आपल्याकडे जेव्हा आयपीएल सुरू झालं तेव्हा ‘डीएलएफ’ हे आयपीएलचे स्पॉन्सर होते आणि पाच वर्षांसाठी त्यांनी २०० कोटी रुपये दिले होते. पुढच्या पाच वर्षांसाठी ‘पेप्सी’नं ३९४ कोटींचा करार केला होता. म्हणजे जवळजवळ दुप्पट मोठा करार ‘पेप्सी’नं आयपीएलबरोबर केला. सन २०१४ मध्ये मॅच फिक्सिंगचा बभ्रा झाल्यावर ‘मॅच फिक्सिंगचे डाग आपल्या लौकिकावर नकोत’ अशी भूमिका ‘पेप्सी’नं घेतली आणि पाठ फिरवली. त्यानंतर ‘विवो’ आलं. त्या दोन वर्षांसाठी ‘विवो’नं १००-१०० कोटी म्हणजे २०० कोटी दिले आणि मग सन २०१८ मध्ये ‘विवो’बरोबर एक मोठा करार झाला. त्या करारानुसार आज आयपीएलला जवळपास प्रत्येक वर्षाला ४३८ कोटी मिळतात आणि त्यांच्या करारामध्ये एक अटही अशी आहे की, ‘स्पॉन्सर हा मधूनच बाहेर पडू शकत नाही, त्याला जर समजा वाटलं की त्या वर्षी त्याला स्पॉन्सरशिप द्यायची नाहीये, तर तो आपले हक्क दुसऱ्याला त्याच किमतीत किंवा त्यापेक्षा जास्त किमतीत विकू शकतो. मात्र, तो बाहेर पडू शकत नाही.’ असं असताना गेल्या वर्षी ‘विवो’ बाहेर पडली आणि असं दाखवलं गेलं की तिनं ते हक्क ‘ड्रीम ११’ ला दिले आहेत. म्हणजे हा देखावा केला गेला.

आज असं झालंय की गेल्या आयपीएलमध्ये फक्त २०० कोटीच आयपीएलला स्पॉन्सरकडून मिळाले, म्हणजे २०० कोटींचा तोटा होता आणि याचा अर्थ असा होतो की, ती जी कसर आहे ती पुढच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये विवो कंपनी भरून काढणार आहे. आता जर ‘विवो’ला, ती चिनी आहे म्हणून आयपीएलनं काढलं, तर आयपीएल बंद पडू शकते. कारण, आयपीएलला चटकन स्पॉन्सर कुठून मिळाला असता? म्हणजे ज्या वेळी प्रश्न पैशाचा येतो त्या वेळी देशप्रेमाची सगळी तत्त्वं बाजूला ठेवली जातात.

‘विवो’च्या बाबतीत काहीजण समर्थन करतात की, ती चिनी कंपनी असेल; पण ती भारतात वसलेली आहे. ‘विवो’चे जे मोबाईल्स आहेत ते भारतात तयार होतात, त्यामुळे हजारो भारतीयांना नोकऱ्या मिळाल्या वगैरे वगैरे. हे सगळं मान्य आहे; पण जर तुम्ही मूळ तत्त्वावर गेलात तर एकच गोष्ट लक्षात येते व ती ही की, ती कंपनी चिनी आहे, तिचा फायदा चिनी कंपनीला होतो आणि ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे.

माझं वैयक्तिक मत म्हणाल तर, जसा राजकारणात कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र कुणीही नसतो आणि शत्रू आणि मित्र किती वेगात बदलतात हे गेल्या चार-पाच वर्षांमध्ये आपण सातत्यानं पाहतोय, त्याच धर्तीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा कुणी तुमचा कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसावा. दुसरी गोष्ट अशी आहे की, आर्थिक जगात तुम्हाला ते शत्रुत्व बाळगणं कठीण असतं. तुम्ही पाकिस्तानविरुद्ध शत्रुत्व बाळगू शकता. कारण, पाकिस्तान हा देशच भिकेला लागलेला आहे, पाकिस्तानवर तुम्ही अवलंबून नाही; पण तसं आपण चीनबद्दल म्हणू शकत नाही. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपले आर्थिक व्यवहार हे चीनशी होतच राहतात आणि कितीही झालं तरी ते टाळता येत नाहीत. ही जागतिक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आणि आता स्वीकारली पाहिजे. ती स्वीकारूनच देशप्रेमाच्या व्याख्या ठरवायला पाहिजेत आणि जर मग तुम्ही देशप्रेमाची व्याख्या तौलनिक बुद्धीनं ठरवणार असाल तर ती ‘विवो’ला एक आणि दुसऱ्या मालाला, ॲप्सला एक, अशी असता कामा नये. त्यामुळे उद्या दिवाळीत इलेक्ट्रिक माळ किंवा दुसरं काही विकत घेताना तुम्ही कुणाला ‘या चिनी वस्तू तुम्ही घेऊ नका, कारण चीन आपला शत्रू आहे,’ असं सांगितलं तर त्या वेळी एक लक्षात ठेवा की, तुम्ही जी ‘विवो आयपीएल’ बघितली होती आणि जिचा आनंद लुटला होता, तीमध्ये ‘विवो’चाही मोठा हातभार होता. त्या लहान लहान विक्रेत्यांना त्रास देऊन नाडणं आणि चिनी माल विकू नका म्हणून सांगणं सोप असतं; पण आयपीएलला तसं सांगणं शक्य नसतं.

पुन्हा एकदा मी शैलेंद्रकडे वळतो आणि शैलेंद्रनं ‘श्री ४२०’ या सिनेमात जे सांगितलंय तेच काहीसा बदल करून सांगतो. तुम्ही आयपीएल टीव्हीवर पाहताना हे गुणगुणू शकता!

मेरा टीव्ही है जापानी

आयपीएल स्पॉन्सर है चीनी

हाथ में व्हिस्की स्कॉटलंडस्तानी

फिर भी दिल है हिंदुस्तानी...

दिल हिंदुस्थानी असणं सर्वात महत्त्वाचं आहे!

(सदराचे लेखक ज्येष्ठ क्रीडापत्रकार-लेखक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT