‘तुमसा नही देखा’ हा शम्मी कपूरचा चित्रपट १९५७ मध्ये आला आणि ‘प्रिन्स’ साधारणतः १९७० च्या आसपास. या कालखंडात शम्मीनं चित्रपटक्षेत्रात दादागिरी केली. शम्मीचे चित्रपट हे कलात्मक मुळीच नव्हते. त्यातून काही सामाजिक संदेश समाजाला किंवा देशाला मिळाला असं कधी घडलं नाही. ‘एंटरटेन्मेंट...एंटरटेन्मेंट...एंटरटेन्मेंट!’ हाच त्याच्या चित्रपटांचा आत्मा होता. शम्मीचा चित्रपट हा फक्त त्याचाच चित्रपट असायचा. छेडछाड करायला कुणी नायिका हवी असायची म्हणून त्यात नायिका असायची.
नायिकेला कुणापासून तरी सोडवायला हवं म्हणून खलनायक असायचा; पण प्रकाशझोत असायचा तो फक्त शम्मीवर.
त्या काळात नाचणारा हीरो नव्हता, त्यामुळे तरुण पिढीला शम्मी आवडायचा. खरं तर शम्मीचं गाणं आणि नाच यात फक्त एक धूसर रेष होती. नाच वेगळा आणि गाणं वेगळं असं फारसं नव्हतच. तो नाचता नाचता गाणं म्हणायचा. त्याला छोटी जागा द्या, त्यात तो नाचत गायचा. ‘कश्मीर की कली’ मध्ये तो बोटीत असतो. तो तिथं उभा राहतो. नाचतो. पडतो. काहीही करतो...पण जे करतो ते भावतं.
शम्मीच्या अंगप्रत्यंगात नाच होता, लय होती. त्याला नाचाकडे ओढलं नर्गिसनं. तो किस्सा रंजक आहे : ‘बरसात’च्या शूटिंगच्या वेळी राज कपूर आणि नर्गिस हे एकमेकांच्या प्रेमात पडले. राज कपूरचं अर्थातच त्या वेळी लग्न झालेलं होतं. त्याच्या पुढच्या चित्रपटाची तयारी सुरू होती. त्या चित्रपटासाठी त्याला नर्गिसच नायिका म्हणून हवी होती; पण त्या दोघांच्या प्रेमप्रकरणामुळे नर्गिसच्या घरून विरोध होता. एकदा नर्गिस खूप चिंतेत बसलेली असताना शम्मी तिथं आला. त्या वेळी तो शाळकरी वयाचा होता. त्यानं नर्गिसला धीर दिला आणि ‘काळजी करू नकोस...तुला घरून परवानगी मिळेल,’ अशी तिची समजूत घातली.
नर्गिस म्हणाली : ‘‘जर परवानगी मिळाली तर मी तुला एक चुंबन देईन.’
त्यानंतर काही काळ गेला. ‘बरसात’ हिट झाला आणि त्या चित्रपटाच्या यशाकडे पाहून नर्गिसला राज कपूरबरोबर काम करायची परवानगी मिळाली. एव्हाना, शम्मी पौगंडावस्थेतून तारुण्यात आला होता. तो नर्गिसकडे आपलं बक्षीस मागायला गेला. नर्गिस त्याला म्हणाली : ‘‘तू आता पुरुष झाला आहेस. मी तुला चुंबन देऊ शकत नाही. दुसरं काहीतरी माग.’
त्यांनं ग्रामोफोन मागितला. नर्गिसनं ग्रामोफोनबरोबरच त्याला इंग्लिश गाण्यांच्या काही रेकॉर्डस् घेऊन दिल्या. शम्मी त्या रेकॉर्डस् लावून त्यावर नाचण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्या नाचाची सुरुवात अशी झाली. आजच्या नटांचा नाच हा जास्त ‘शास्त्रशुद्ध’ असतो. कारण, आता नाच शिकवला जातो. शम्मीच्या काळात नाच अशा प्रकारे शिकवला जात नसे. मात्र, शम्मीला नाच शिकायची इच्छा होती. सन १९५० मध्ये दादरला प्रीतम हॉटेलमध्ये प्रीतम कोहली नाच शिकवत असत. त्या वेळी प्रीतम तासाला वीस रुपये घ्यायचे. शम्मी त्यांच्याकडे जाऊन टॅंगो आणि इतर पाश्चिमात्य नाच शिकला.
चित्रपटात शम्मीच्या नाचाची कोरिओग्राफी बरेच दिग्दर्शक त्याच्यावरच सोपवत असत. तो नाचताना पुढं काय करणार हे कुणालाच ठाऊक नसायचं. दिग्दर्शक कॅमेरामनला सांगायचा : ‘‘तू शम्मीला फक्त फॉलो कर. त्याला काय नाचायचंय आणि त्याला जे करायचंय ते करू दे.’
नाचताना तो आळोखेपिळोखे द्यायचा, शरीराचा कुठलाही भाग कसाही वाकवयाचा, नायिकेचे हात पिरगाळायचा. बऱ्याचदा त्याची बोटं नायिकेच्या दंडात रुतायची. मात्र ‘तीसरी मंझील’सारख्या चित्रपटातल्या गाण्याची संधी मिळाली की तो सोनं करायचा. हेलननंही त्याच्या नाचाचं कौतुक केलंय. ‘ओ हसीना’च्या वेळेला काय नाचलाय तो! किंवा ‘अय्यय्या सुक्कू सुक्कू’ हा ‘जंगली’तला नाच पाहा.
हेलनसमोर तो कमी पडत नाही. ‘आ जा, आ जा, मै हूँ प्यार तेरा’ तर अफलातूनच. हेलनच्या पदन्यासाशी त्यानं जुळवून घेतलं; पण तरीही त्याला कधी कधी न्यूनगंड यायचा. त्याला दुसऱ्याचं यश सहन होत नसे. ‘प्रोफेसर’ या चित्रपटानंतर कल्पना त्याच्यावर वैतागली होती. बेला बोस ही अभिनेत्री त्याच्यापेक्षा चांगलं नाचायची. एकदा ती नाचत असताना शम्मीनं तिला अडवलं आणि विचारलं : ‘‘सध्या तुझं कुणाबरोबर लफडं आहे?’’ तिची नाचावरची एकाग्रता कमी करण्यासाठी त्यानं असं म्हटलं होतं. हे असले डावपेच म्हणजे अगदी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूप्रमाणेच की!
शम्मीला संगीताची चांगली जाण होती. त्याच्या आईनं संगीत शिकण्यासाठी एक शिक्षक नियुक्त केले होते. काही दिवसांनी ती कंटाळली. तिनं शम्मीला त्यांच्यापुढे बसवलं. शम्मी गाणं शिकत गेला. ते संगीतशिक्षक होते जगन्नाथ प्रसाद. त्यांनी सैगल, मुकेश यांना गाणं शिकवलं होतं!
शम्मीचे खास दोस्त म्हणजे ‘पृथ्वी थिएटर’मध्ये संगीत देणारे शंकर आणि जयकिशन. त्यांच्यामुळे शम्मीला लॅटिन अमेरिकन संगीत आवडायला लागलं. त्याचा संगीताचा सेन्स चांगला होता. ‘इव्हिनिंग इन पॅरिस’ मधलं हेलिकॉप्टरला लटकत शम्मीनं म्हटलेलं गाणं तुम्हाला आठवतं? : ‘आसमान से आया फरिश्ता?’ या गाण्याच्या वेळी हेलिकॉप्टरचा आवाज एवढा मोठा येत होता की, शम्मीला गाण्याचे शब्द ऐकू येत नव्हते. शक्ती सामंता यांनी ओठांच्या हालचाली करून शब्द काय आहेत ते लांबूनच सांगितलं; पण ते गाणं ऐकताना तसं अजिबात जाणवत नाही.
‘तीसरी मंझील’च्या वेळी शम्मीला शंकर-जयकिशन संगीतकार म्हणून हवे होते. त्याचा राहुलदेव बर्मन (पंचम) यांच्यावर विश्वास नव्हता; पण निर्माता नासीर हुसेन हे पंचमला सोडायला तयार नव्हते. शेवटी, पंचमनं एक चाल तयार केली. ती शम्मीला ऐकवली. शम्मी म्हणाला : ‘‘ही चाल तू अमुक अमुक पाश्चात्त्य गाण्यावरून उचलली आहेस!’’ आणि, त्यानं ते गाणं म्हणून दाखवलं. असं दोनदा-तीनदा झालं. शेवटी पंचम रडकुंडीला आला. त्यानं एक नवीन चाल ऐकवली. शम्मी त्या चालीवर नाचायला लागला. ते गाणं होतं : ‘दीवाना मुझ सा नही इस अंबर के नीचे...’
आणि पंचम पास झाला!
शम्मीनं स्टाईलवर आधारित अभिनय केला. देव आनंदप्रमाणे त्यानं डोक्यावर वेगवेगळ्या टोप्या मिरवल्या. तो आयुष्यात सरळ कधी चालला नाही. त्याला विनोदी भूमिका करताना तोंड वेडंवाकडं करायची सवय होती.
शम्मी चांगला फलंदाज कधी होऊ शकला नसता. चांगल्या फलंदाजाला डोकं स्थिर ठेवावं लागतं. त्याला ते कधी जमलं नाही. तो डोकं वेगवेगळ्या कोनांतून फिरवायचा. मध्येच हात डोक्याजवळ असा काही न्यायचा की, त्याचं डोकं दुखतंय, असं वाटायचं!
त्याला वेशांतर करायची भरपूर इच्छा असायची. मात्र, गंभीर प्रसंगांतही तो चांगला वाटला. ‘विधाता’मध्ये तो दिलीपकुमारच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला. ‘ब्रह्मचारी’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा आणि ‘विधाता’साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार त्याला मिळाला.
शम्मीला काही बाबतींत प्रचंड अहंकार होता. टॉपवर असताना बरेच नायक नव्या नायिकेबरोबर चित्रपट करणं कमीपणाचं मानत. शम्मीची धारणा वेगळी होती. तो म्हणायचा : ‘‘माझा चित्रपट माझ्यामुळे चालतो. त्याचा नटी वगैरेशी संबंध काय? माझे खांदे चित्रपट वाहायला मजबूत आहेत! किती अभिनेत्रींनी त्यांचा पहिला चित्रपट शम्मीबरोबर केला आहे, ते पाहा : १. चाँद उस्मानी, २. रागिणी, ३. आशा पारेख, ४. सायराबानो. ५, शर्मिला टागोर, ६. कल्पना.
पत्नी गीताबाली वारल्यावर तो मुमताजशी लग्न करणार होता. ती तेव्हा होती १८ वर्षांची व शम्मी होता ३७ वर्षांचा.
देव आनंदप्रमाणे शम्मीला आपलं शरीर जपणं जमलं नाही. तो जाड होत गेला. शक्ती सामंता यांच्या ‘जाने-अनजाने’त काम करताना तो इतका जाड होत गेला की, प्रसंगाची कंटिन्युटी राहीना. त्याचं आणि लीना चंदावरकरचं प्रेम जरठ-बाला प्रेम वाटायला लागलं. मात्र, शम्मीनं एका बाबतीत स्वतःचा ‘देव आनंद’ होऊ दिला नाही. तो तसा वेळीच थांबला. त्यानं एके ठिकाणी म्हटलं आहे : ‘‘माझं फूटवर्क पूर्वीसारखं होत नाही, हे ‘प्रिन्स’ या चित्रपटाच्या वेळी मला जाणवलं.’’
नंतर तो सहाय्यक भूमिकांकडे वळला. ‘मनोरंजन’ आणि ‘बंडलबाज’ हे दोन चित्रपट त्यानं दिग्दर्शित केले आणि तो थांबला. एका गुरूंच्या सहवासामुळे त्यानं दारू सोडली. तो सात्त्विक झाला. त्याला नव्या गोष्टींचा ध्यास होता.
भारतात इंटरनेट वापरणाऱ्या पहिल्या काही व्यक्तींमध्ये तो होता. ‘इंटरनेट यूजर्स असोसिएशन’चा तो अध्यक्ष होता. त्याला उंची गोष्टींची आवड होती. सन १९५० मध्ये त्यानं पहिला चित्रपट साईन केल्यावर Buick Convertible ही गाडी घेतली. ती तो ताशी ९० मैल या वेगानं पळवायचा. तो मलबार हिलवर राहायचा. मोठमोठ्या हॉटेलांत जायचा. पत्नी गीता बाली हिच्याकडे एकेकाळी ५०० तोळे सोनं होतं! शम्मी राजासारखा जगला आणि राजासारखा गेला...
(लेखक हे चित्रपट आणि क्रीडाक्षेत्राचे अभ्यासक असून, त्यांची या विषयांवरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.