gurudatta actor sakal
सप्तरंग

प्यासा : पिढ्यान्‌पिढ्याचं गारुड

गुरुदत्तचा ‘प्यासा’ मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये पाहिला, तेव्हा तो नीट आत्मसात करायची क्षमता माझ्यात नव्हती. एक तर नुकतीच प्रेयसी झालेल्या मुलीबरोबर पाहिला.

द्वारकानाथ संझगिरी dsanzgiri@hotmail.com

गुरुदत्तचा ‘प्यासा’ मी पहिल्यांदा कॉलेजमध्ये पाहिला, तेव्हा तो नीट आत्मसात करायची क्षमता माझ्यात नव्हती. एक तर नुकतीच प्रेयसी झालेल्या मुलीबरोबर पाहिला. रोमान्सचे ते सुगंधी दिवस. त्यामुळे निराशाजनक प्रेम, शेवटी अंगावर लक्तर घेऊन येणारा नकारात्मक गुरुदत्त आवडला नाही. खरंतर, ‘जब प्यार किसीसे होता हैं ’ वगैरे देव आनंद सिनेमा पाहायचे ते दिवस होते.

नंतर सिनेमा पाहण्यात अधिक प्रगल्भ झालो. त्या सिनेमातील सौंदर्य, खोली अधिक उलगडत गेली. तो सिनेमा पडद्यावरचं काव्य वाटायला लागला. आणि गुरुदत्त बघता बघता माझ्यासाठी गारुड झाला. अजून प्यासा पाहायची प्यास कमी झालेली नाही. टाइम मॅगझिनने काढलेल्या १९२३ पासूनच्या १०० चित्रपटांत प्यासा आहे.

प्यासापूर्वी गुरुदत्तने गुन्हेगारी छापाचे पलायनवादी सिनेमा काढले आणि अचानक प्यासाबरोबर जागतिक दर्जावर उडी घेतली. मग कागज के फुल, साहिब बीबी और गुलाम काढून, एक वेगळंच अढळपद मिळवलं.

प्यासा ही म्हटलं तर एका कवीची कहाणी आहे. प्रतिभावंत कवी, पण धडपडत्या काळात ना भाऊ विचारतात, ना मित्र, ना प्रकाशक! त्याची प्रेयसी सुद्धा त्याला सोडून जाते. पण तो अपघातात मेलाय कळल्यावर, त्यांना तो महान कवी झाल्याचा साक्षात्कार होतो. मग त्याचं पुस्तक छापून त्याचा उदोउदो होतो. त्यावर पैसे छापले जातात.

त्याच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला तो जिवंत होऊन येतो. पण मग जगाचा स्वार्थीपणा पाहून आपण तोच कवी असल्याचं नाकारतो. मग तुडवला जातो. त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी एक वेश्‍या त्याला ओळखते, तो तिच्याबरोबर त्याचं स्वतःच एक नवीन जग वसवायला निघून जातो.

अशी ही कथा. पण या कथेला जे इतर पदर आहेत, ज्या व्यक्तिरेखा विकसित केल्या आहेत, त्यामुळे हा सिनेमा महान बनतो. ही कथा गुरुदत्तच्या खूप वर्ष डोक्यात होती. आधी त्याचा नायक चित्रकार होता. साहिर लुधियानवीच्या कविता वाचल्यावर त्याला नायकाला कवी करावसं वाटलं. दुसरं म्हणजे, अब्रार अल्वीसारखा लेखक त्याच्या आयुष्यात आल्यावर त्याला प्यासा करावसा वाटला.

प्यासात दोन ठळक स्त्री व्यक्तिरेखा आहेत. एक मीनाची, दुसरी गुलाबोची. मीना ही सुशिक्षित, उच्चभ्रू, विजयवर (हीरो गुरुदत्त) कॉलेजमध्ये प्रेम करणारी. पण आयुष्यात स्थैर्य मिळण्यासाठी घोष या श्रीमंत माणसाशी लग्न करणारी. पूर्ण व्यवहारी. असं म्हणतात, की 'फिल्म इंडिया' मॅगझिनचे सर्वेसर्वा बाबूराव पटेल यांच्या मेव्हणीत गुरुदत्तने मीना शोधली. गुरुदत्त तिच्या प्रेमात पडला पण तो तिच्याकडून नाकारला गेला. गुरुदत्त किती महान दिग्दर्शक होता ह्याचं एक मी उदाहरण देतो. कमीत कमी प्रसंगांतून तो कथा वेगात पुढे न्यायचा.

गुरुदत्तने हे मीनाचं कॅरॅक्टर, तिचा संशयी नवरा, गुरुदत्तचं तिच्यावरचं प्रेम, हे कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात फक्त चार शॉट्समध्ये दाखवलंय. दिग्दर्शनाचा, एडिटिंग आणि कॅमेरा वर्कचा तो अफलातून नमुना आहे.

सिनेमा पाहिलाय ? हा शॉट आठवतो का पाहा.

तो एक दर्दभरी गझल ऐकवतो त्या वेळी मीनाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू, रेहमानला आलेला संशय आणि रेहमानचं विजयला (गुरुदत्त) गाठणं हे फक्त तो चार शॉट्समध्ये दाखवतो. बरं मीनाची (माला सिन्हा) व्यक्तिरेखा तो कुठेच खलनायकी करत नाही. पण तिचं व्यवहारी रूप तो छोट्या छोट्या शॉट्समधून फार छान दाखवतो. ती त्याला सोडून घोषबाबूशी लग्न का करते ? त्यामागचा तिचा व्यवहारवाद गुरुदत्तने फार सुंदर दाखवलाय.

गुरुदत्तने एक गाणं प्यासात टाकलंय. ''हम आपकी आँखो में इस दिल को बसा दे तो'' या एका गाण्यातून तो कथा पुढे नेतो. गुरुदत्तला सिनेमात गाणं टाकणं अजिबात आवडायचं नाही. 'कानून' सिनेमा बी.आर. चोप्रानी गाण्याशिवाय बनवला. गुरुदत्तला ही गोष्ट ग्रेट वाटली आणि आवडली. तो वहिदाकडे या गोष्टीचं कौतुक करायचा.

गुरुदत्त म्हणायचा ‘‘गाणं कितीही चांगलं असलं, संगीत कितीही चांगलं असलं, तरी कथानकाचा ओघ थांबतो.’’ पण प्यासातलं वर उल्लेखिलेलं गाणं काय त्याचं कुठलंच गाणं कथानक थांबवत नाही.

उलट कथानकाला पुढे घेऊन जातं. गाण्याच्या टेकिंगच्या बाबतीत तीन माणसं बाप होती. एक राज कपूर, दुसरा विजय आनंद, तिसरा गुरुदत्त. असो, ''प्यासा''त गुरुदत्तने जे दुसरं कॅरॅक्टर डेव्हलप केलंय, ते गुलाबो वेश्येचं. वेश्या ही समाजाच्या दृष्टीने मादी. घृणास्पद, पददलित. पण तिचं मन ''मीना''सारख्या तथाकथित सुसंस्कृत स्त्रीपेक्षा मोठं असतं.

हे तो त्या गुलाबोच्या व्यक्तिरेखेतून दाखवतो. जगात पददलित हे तुडवण्यासाठीच असतात हे तत्त्वज्ञान गुरुदत्तच्या मनात पक्कं होतं. ''प्यासा''च्या सुरवातीलाच एक शॉट असा आहे, की गुरुदत्त बागेत त्याची गझल गुणगुणत पडलेला असतो, इतक्यात एक भुंगा बेफिकिरीने चालणाऱ्या माणसाच्या बुटाखाली चिरडताना दाखवला आहे. पददलितांना मुक्तपणे जगायचा अधिकार नसतो, हे गुरुदत्तला दाखवायचं होतं.

‘प्यासा’त या गुलाबो वेश्येच्या मागे पोलिस लागतात असा शॉट आहे. गुरुदत्त तिला पोलिसांपासून वाचवण्यासाठी ती आपली बायको आहे, असं पोलिसांना सांगतो. तिला तो मुळात आवडतच असतो. तो मात्र तिला फारसा ओळखत नसतो. पण पोलिसांपासून वाचवण्यासाठी विजय (गुरुदत्त) तिला बायकोचा दर्जा देतो, तेव्हा ती पटकन डोक्यावरून पदर घेते. एक क्षणभराचा शॉट, पण गुरुदत्त त्यातून बरंच काही दाखवून देतो.

तिने गुरुदत्तला मनोमनी नवरा मानलं आहे, हे ती दाखवते. म्हणून ती पदर घेते. गुरुदत्त तिथून निघून जातो आणि मग ती त्याच्या मागे जाते. पार्श्वभूमीवर गाणं सुरू होतं, ते राधाचं गाणं आहे.

आज सजना मोहे अंग लगालो जन्म सफल हो जाये.

या गाण्याच्या वेळचे वहिदाच्या चेहऱ्यावरचे भाव आठवा. तन आणि मनाने तिला गुरुदत्तशी एकरूप व्हायचं आहे. त्याच्याशी एकरूप होण्यासाठी तिचं आसुसणं, ती जगलीये. तिचा हा फक्त दुसरा सिनेमा होता. गीता दत्तच्या या गाण्याची चाल बर्मनदादांना सुचत नव्हती. त्यांची बायको मीराने ती सुचवली.

स्त्रियांमधल्या दोन प्रवृत्ती दाखवताना 'प्यासा'तील सर्वांत महत्त्वाचा शॉट आहे, जेव्हा विजय मेलाय हे गृहीत धरून त्याच्या कवितेचं पुस्तक व्हावं या इच्छेने गुलाबो रेहमानकडे जाते तो शॉट. गुलाबो ही वेश्या असूनही पैशाचा विचार करत नाही. तिची वृत्ती एखाद्या कुलीन स्त्रीची असावी तशी असते.

तिला फक्त पुस्तक छापलं जावं असं वाटत असते. त्या उलट तथाकथित ''कुलीन'' मीना नेहमीच वेश्यावृत्ती दाखवते. ती रेहमानबरोबर लग्न करते पैशासाठी आणि सातत्याने ती गुलाबोच्या वेश्यावृत्तीचा पाणउतारा करत असते.

'प्यासा'मध्ये गुरुदत्तने वेश्येबद्दल वाटणारी सहानुभूती व्यक्त केलीय. त्याला स्वतःला वेश्येबद्दल सहानुभूती होतीच. हैदराबादमध्ये एकदा तो कोठीवर गाणं ऐकायला गेला होता. तिथं कोठीवर एक श्रीमंत माणूस एका नाचणाऱ्या मुलीवर दहा-दहाच्या नोटा उधळत होता, (१९५५ चे दहा रुपये). ती गरोदर होती. तिला सातवा महिना लागला होता. तरी ती फक्त पैशासाठी नाचत होती.

गुरुदत्तने चिडून तिला अडीच हजार रुपये दिले आणि सांगितलं, निदान मूल होईपर्यंत तरी नाचू नकोस. तिथून परतल्यावर अब्रार अल्वीने गुरुदत्तला सांगितलं, 'तुला' जिन्हे नाझ हैं हिंदपर वो कहा हैं' हे गाणं दाखवायचं आहे नं? मग वेश्येला मूल आहे, ते आजारी आहे आणि तरी तिला पैशासाठी नाचणं भाग पाडलं जातं हे दाखवू या." गुरुदत्तला ते पटलं आणि त्याने प्यासात तसा अत्यंत हृदयद्रावक असा शॉट घेतला.

त्या शॉटनंतर गुरुदत्त त्या वेश्येच्या घरातून बाहेर पडतो आणि मग त्याला जे विदारक दृश्य दिसते ते तो त्या गाण्यातून मांडतो.

अर्थात साहिरची कविता तिथे आहे ती त्याने आधी लिहिली होती. ते काही सिनेमासाठी लिहिलेलं गाणं नाही. पण त्याने जे पिक्चरायझेशन केलंय, ते इतकं जिवंत केलंय की तो जे पाहतो त्याप्रमाणे त्याला कविता स्फुरत जाते, असं वाटते.

बरं तो गाणं गात नाहीए. तो गाणं गुणगुणतोय असा इफेक्ट त्याने ठेवलाय. या ''जिन्हे नाझ हैं हिंदपर वो कहा हैं ' या गाण्याला चाल लावतानाही बर्मनदांना मनासारखी चाल सुचत नव्हती.

ते जी चाल तयार करत होते, ती गुरुदत्तला पसंत पडत नव्हती. बर्मनदांच्या ''जेट'' बंगल्याच्या रेकॉर्डिंगरूममध्ये हा प्रकार सुरू होता. शेवटी बर्मनदांनी ब्रेक घ्यायचा ठरवलं आणि वर घरी जाताना त्यांनी हातातले नोटेशन्सचे कागद रागात फेकले. ते बरोबर हजारासिंगच्या इलेक्ट्रिक गिटारवर पडले. त्यातून एक वेगळाच ध्वनी बाहेर आला. त्यांनी हजारासिंगला सांगितलं मला हेच हवंय. आणि तिथल्या तिथे गाणं तयार झालं.

ह्या गाण्यात एक ओळ आहे. ती अशी.

'ये बिबी भी हैं बहेन भी और माॅ भी !' साहिर त्याच्या तारुण्यात लाहोरला असताना जेव्हा हिरामंडी ह्या वेश्‍यावस्तीत फिरायचा, तेव्हा त्याला ही कविता सुचली होती. मलाही लाहोरला तोच अनुभव आला पण २००४ मध्ये. म्हणजे ६० वर्षांत लाहोर बदललं नव्हतं.

एका हॉटेलात मी आणि माझा मित्र प्रशांत पवार लाहोरच्या हिरामंडीत गेलो होतो. त्या हॉटेलात उत्कृष्ट पेंटिंग्ज होती. एक चित्र असं होतं, की एक पुरुष लहान मुलाला खांद्यावर घेऊन उभा आहे. एक स्त्री एका पुरुषाचा हात धरून त्या मुलापासून दूर जाते आहे. ती सतत मागे वळून पाहत आहे. हृदय हेलावणारे चित्र होतं. त्या हॉटेलचा मालक पेंटर होता. त्याला मी त्या चित्राबद्दल विचारलं. तो म्हणाला, "तो पुरुष मी आहे. ती स्त्री माझी बहीण आहे. ते मूल माझ्या बहिणीचे आहे. ती एका गिऱ्हाइकाबरोबर जातेय." मी थंड पडलो. मग तो मला भानावर आणत म्हणाला, "माझी आई, बहीण आणि बायको वेश्या होत्या."

मला साहिर आठवला. प्यासा आठवला. सत्य किती भयानक असतं. (पूर्वार्ध)

(लेखक चित्रपट आणि क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक असून त्यांची या विषयावरची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT