Musician Sahir and Roshan sakal
सप्तरंग

रोशन आणि साहिर

‘बरसात की रात’ हा रोशन या संगीतकाराचा त्याच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड. हा पहिला चित्रपट हिट व्हायला त्याला ११ वर्ष लागली. या सिनेमात त्याने आपल्या संगीताला व्यावसायिक वळण दिलं.

द्वारकानाथ संझगिरी (dsanzgiri@hotmail.com)

‘बरसात की रात’ हा रोशन या संगीतकाराचा त्याच्या कारकीर्दीतला मैलाचा दगड. हा पहिला चित्रपट हिट व्हायला त्याला ११ वर्ष लागली. या सिनेमात त्याने आपल्या संगीताला व्यावसायिक वळण दिलं. रफी त्याचा प्रमुख पुरुषी आवाज झाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची आणि साहिर लुधियानवीची भागीदारी सुरू झाली.

पुढे सांगीतिकदृष्ट्या जे त्याचे चित्रपट गाजले, त्यातले, चित्रलेखा, ताजमहाल, दिल ही तो हैं, वगैरे चित्रपट त्याने साहिरबरोबर केले. साहिरबरोबर काम करणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्याचा अहंकार आकाशाएवढा होता. तो सर्वश्रेष्ठ गीतकार होता यात वादच नाही.

मी जर गीतकार झालो असतो, तर मला साहिरसारखं लिहायला आवडलं असतं. बर्मनदादांमुळे त्याचं हिंदी चित्रपटात बस्तान बसलं. पुढे बर्मनदादांपेक्षा एक रुपया त्याला अधिक हवा होता. त्याचं कुणाशीच पटलं नाही. ना ओपीशी, ना नौशादशी. त्याला फिकीर नव्हती कारण त्याच्या शायरीचं नाणं खणखणीत वाजत होतं.

तो एन दत्ता, रवी, खय्याम यांच्याबरोबर जास्त काम करत असे. कधीतरी एकदा मदन मोहन. प्यासा नंतर त्याने बर्मनदादांबरोबर काम केलं नाही. त्यामुळे त्याचे शब्द तोलामोलाच्या संगीतात कधी नहाले नाहीत. रोशनच्या रूपाने तो साहिरला सापडला. त्याच्या वजनदार शब्दांना तोलामोलाचे कपडे रोशनने चढवले, म्हणून ते शब्द हृदयाला भिडले.

‘बरसात की रात’ मध्ये ओलेत्या मधुबालाचं वर्णन जे साहिर करतो तसे फक्त कालिदास करू शकला असता. ते सौंदर्य वर्णन करणारे शब्द मनाला भिडतात कारण ते संगीताच्या जंजाळात हरवत नाहीत.उलट संगीताच्या गोड लहरीवर बसून ते हृदयात प्रवेश करतात. भिजावं तर मधुबलाने, त्यावर लिहावं तर साहिरने आणि त्याला संगीत द्यावं ते रोशनने.

साहिर जेव्हा लिहितो,

‘सूर्ख आंचल को दबाकर जो नीचोडा उसने

दिल पे जलता हुआ एक तीरसा छोडा उसने.'

तो तीर थेट आपल्या हृदयात घुसतो. तो मारत नाही. गुदगुल्या करतो. तिचं सौंदर्य आपल्या मनात शिल्पासारखं ठसवलं साहिरने. हिंदी चित्रपटाने पावसात अनेक नट्यांना भिजवलं. अनेकांनी त्यावर लिहिलं. पण साहिर - रोशनचं, 'जिंदगीभर नही भूलेगी वो बरसात की रात' या गाण्याच्या मैलभर परिसरात येणारं दुसरं गाणं नाही. त्यातल्या कव्वाल्या तर एकापेक्षा एक अप्रतिम.

रोशन हे कव्वालीचे मास्टर होते. हिंदी चित्रपटाच्या पडद्यावर जितक्या कव्वाली पेश झाल्या त्यातली सम्राज्ञी म्हणजे, 'ये इश्क इश्क है'. १६ कडव्यांची ही कव्वाली आहे. मन्ना डे, आशा, सुधा मल्होत्रा, एस. डी. बातिष आणि रफी यांनी ती गायली आहे. काय लिहिली आहे साहिरने! माशाल्ला! आधी ती उर्दूची शान दाखवते. मग हिंदीची आणि हिंदू-मुस्लीम संस्कृतीतील प्रतीकं घेऊन येते.

उदा ‘अल्ला औंर का फर्मान है इश्क

यांनी हदिस इश्क है कुरान इश्क है

गौतम औंर मसीहा का

अरमान इश्क है

आणि मग पुढे म्हणतो

खाक को बुत औंर बुत को

खुदा करता है इश्क

इंतहा ये हैं की बंदे को खुदा करता है इश्क.’

आणि मधुबाला सर्व बंधन तोडून जेव्हा कव्वालीसाठी येते, तेव्हा

साहिर लिहितो...

जब जब कृष्णकी बन्सी बाजी

निकली राधा सजके

ग्यान अग्यानके खयाल भुलाये

लोक लाज को त्यजके

रोशनने कव्वालीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याची बायको इरा म्हणाली होती, 'एवढी मोठी कव्वाली ऐकणार कोण?' रोशननं तिला सांगितलं, ‘ये कव्वाली सुनकर लोग चिराग लेकर रोशन को धुंडने आयेंगे.’ ‘दिलं ही तो है’ मध्ये अशीच एक बहारदार कव्वाली आशा भोसले यांनी गायली. लता मंगेशकर यांचं ते आशाचं लाडकं गाणं.

‘निगाहे मिलाने को जी चाहता है’

म्हाताऱ्याच्या वेशातल्या राज कपूरवर नूतन प्रेम व्यक्त करते. यमन कल्याण रागाच्या सुरावटीमध्ये गुंफलेली ही साडेसहा मिनिटांची कव्वाली आहे. नूतन आणि आशाताईंनी ही कव्वाली कुठल्या कुठे नेऊन ठेवली आहे. कव्वाली गाताना दमछाक व्हायची शक्यता असते. या कव्वालीमध्ये नखरेल आवाजाची कसरत आहे. सरगम गाताना नूतनचे ओठ पाहा. कुठेही चुकत नाही. ती गाणं शिकली होती. कव्वाली हा दोन संघांमधला सामना असतोच असं नाही. कव्वाली ही प्रेम व्यक्त करण्यासाठी सुद्धा वापरली जाते.

साहिरने या सिनेमात लिहिलेली आणखीन दोन गाणी खास होती.

एक, 'तुम अगर मुझ को न चाहो तो कोई बात नहीं' आणि दुसरं, 'लागा चुनरीमे दाग छुपाऊ कैसे'

पहिल्या गाण्यात प्रेम व्यक्त करायची एक वेगळीच कल्पना आहे. ती साहिरलाच सुचू शकते. तो प्रेयसीला सांगतो, की मी तुला आवडलो नाही तरी चालेल. पण तुला दुसरा कुणी आवडता कामा नये. ( म्हणजे माझी तुझ्यावर प्रेम करायची संधी अबाधित राहते.)

दुसरं आहे ते नृत्यगीत आहे. तो भैरवी राग आहे. त्यात हिंदुस्तानी परंपरेशी संबंधित सरगम आणि तराणा प्रकारचं गायन, तानाची सरबत्ती आहे. पण ते साहिरने अर्थपूर्ण लिहिलं आहे.

उपदेश आणि प्रेमभावना ह्याचं मिश्रण त्यात आहे.

त्यातल्या ओळी पाहा.

कोरी चुनरिया आत्मा मोरी

मैंल है मायाजाल.

वो दुनिया मेरे बाबुलका घर

ये दुनिया ससुराल

जाके बाबुलसे नजरें मिलाऊ

कैसें, घर जाऊ कैसें.

तिला म्हणायचं आहे, की ही दुनिया म्हणजे मी जिथे जन्म घेतलाय, ते माझे सासर आहे आणि जिथून मी आले म्हणजे देवाची दुनिया, ते माझं माहेर आहे. माझा आत्मा निष्कलंक आहे. पण भौतिक सुखांची ही दुनिया माझ्याकडून पाप घडवते म्हणून मला प्रश्न पडलाय की माहेरी जाऊन माझा चेहरा कसा दाखवू?

प्रेमगीतातून कसा उपदेश करता येतो, त्याला कसा साहित्यिक दर्जा देता येतो, हे साहिरने दाखवून दिलंय. कबीराच्या एका दोह्यातून साहिरला ह्या गाण्याची स्फूर्ती मिळाली होती. पण साहिर आणि रोशन ह्या जोडीने शब्द आणि संगीताची जी मैफील सजवली ती कान, हृदय, मन सर्व तृप्त करून गेली.

ताजमहाल सिनेमातील प्रेमगीतं, त्या प्रेमाच्या प्रतीकाला साजेशी होती. त्यातली सर्वच गाणी मन काबीज करणारी आहेत. 'जो वादा किया वो निभाना पडेगा' हे गाणं सर्वांत गाजलं. पण नायिकेच्या अंगावरून मोरपीस फिरवणारं गाणं म्हणजे,

'पॉव छू लेने दो, फुलोंको इनायत होगी'

हे गाणं नुसतं ऐकलं तरी जाणवतं की कुणीतरी रूपगर्विता फुलांना हलकासा स्पर्श करत चाललीये. पण चित्रपट पाहताना जाणवतं, की एक अकाली प्रौढ झालेली सुंदरी फुलावरून चालते आहे आणि सुरवातीपासून प्रौढ वाटणारा प्रियकर तिला सांगतोय...

'पॉव छू लेने दो, फुलोंको इनायत होगी

वरना हमको ही नहीं इनको भी शिकायत होगी'

एके काळची अत्यंत सुंदर ‘अनारकली’ ‘ताजमहल’ मध्ये जवळपास दहा वर्षांनी प्रौढ वाटते. प्रेमनाथबरोबर संसार केल्यावर ती कायम नुकत्याच फुललेल्या गुलाबासारखी टवटवीत दिसेल ही अपेक्षा चुकीची होती, आणि बरोबर प्रदीप कुमार. यालाचच म्हणतात सुंदर गाणं, सुंदर भावना वाया जाणं.

रोशनला उर्दू काव्याचं ज्ञान चांगलं होतं. कारण काही काळ तो लखनौला होता. तिथे अस्सल मुस्लीम संस्कृतीशी त्याचा संबंध आला. त्यामुळे, ऐतिहासिक सिनेमा असो किंवा मुस्लीम सामाजिक, किंवा एखाद्या साहित्यकृतीवरचा, त्याला संगीत देण्यात रोशनचा हातखंडा होता. विविध प्रकारच्या काव्याला संगीत देताना काय बदल करायला हवा त्याची जाण रोशनला होती. म्हणून नझम, गझल, मुजरा, कव्वाली ह्या प्रकारात त्यानं दादागिरी केली.

साहिर-रोशन द्वयीचा सर्वोत्तम चित्रपट म्हणजे ‘चित्रलेखा’. किदार शर्माने स्वतःच्या सिनेमाचा हा रिमेक केला. ते स्वतः गीतकार होते पण त्यांनी गाणी लिहायला साहिरला सांगितलं. हा मास्टरस्ट्रोक होता. साहिरने गाणी हिंदीत लिहिली. त्यात उर्दू शब्द जवळजवळ नाहीत. आणि भारतीय तत्त्वज्ञानातील नेहमी परलोकाकडे नजर ठेवण्याच्या वृत्तीवर कठोर टीका केली.

'संसार से भागे फिरते हो

भगवान को तुम क्या पाओगे,

इस लोग को भी अपना ना सके,

उस लोग से भी पछताओगे'

तो पुढे लिहितो...

ये पाप है क्या

ये पुण्य है क्या

रेतोपर धर्म की मोहरे है

हर युग मे बदलते धरमो को

कैसे आदर्श बनाओगे"

सतारीचे तुकडे पेरलेला एक मस्त ठेका आहे. जो कानाला गोड लागतो आणि शब्द त्यात हरवत नाहीत.

रोशनची ही खासियत होती.

काही माणसं मृत्यूच्या बाबतीत नशीबवान असतात. १६ नोव्हेंबर १९६७ ला, निर्माता हरी वालीयाकडे पार्टी होती. एक कोपरा रोशननी पकडला, खुर्ची पकडली, आनंदात मद्य घेत असताना ओठावर हसू होतं आणि अचानक खुर्चीत कोसळला. आयुष्याचं गाणं अचानक संपलं.

साहिरचा मृत्यू सुद्धा अचानक झाला. त्याचा मित्र, डॉक्टर कपूरकडे तो पत्ते खेळत होता. अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि गेला. 'रहे ना रहे हम' हे रोशनचं गाणं, लिहिलंय मजरुह सुलतानपुरी याने. पण त्या गीतातली भावना, रोशन आणि साहिर या दोघांच्या बाबतीत सारखीच जाणवते.

आम्ही या जगात असू किंवा नसू पण प्रेमाच्या बागेत कळी बनून, वारा बनून आमचा सुगंध दरवळत राहील.

(उत्तरार्ध)

(सदराचे लेखक क्रीडा आणि चित्रपट क्षेत्राचे अभ्यासक असून या दोन्ही विषयांवरची त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT