make Positive Mindset esakal
सप्तरंग

पंख सकारात्मकतेचे : प्रचंड गुंतागुंतीच्या प्रसंगातून सहज सुटका

सकाळ डिजिटल टीम

लेखक : डॉ. हेमंत ओस्तवाल

शेअर मार्केटमध्ये (Share market) गुंतवणूक करणे (Investment) आणि पैसे कमविण्यासाठी खूप अनुभव लागतो, अभ्यास लागतो. तो नसताना एखाद्या यशाने हुरळून जात पुन्हा गुंतवणूक आणि तोटा भरून काढण्याच्या खोट्या आशेने पुन्हा कर्ज, अशा विचित्र अवस्थेत कर्जबाजारी होण्याशिवाय पर्याय राहात नाही, हे आपण मागील भागात पाहिले. आता या कमी काळात मोठा पैसा कमविण्याच्या नादात संपूर्ण कुटुंबच उद्‌ध्वस्त होण्याची वेळ कशी येऊ शकते आणि त्यातून सकारात्मक मार्ग कसा काढायला हवा, हे पाहू या. (Easily get rid of huge compilation saptarang Marathi Article by Dr hemant ostwal Nashik News)

अंकुर एफएनओ म्हणजेच फ्यूचर अॅन्ड ऑप्शन्स खेळायला लागला. हा शेअर मार्केटमधील झटपट पैसे कमविण्याचा आणि गमविण्याचादेखील प्रकार आहे. यामध्ये शेअर मार्केटमधील जबरदस्त अनुभव, अभ्यास असलेला कसलेला, जोरदार हिंमत असलेला खेळाडू लागतो. अंकुर हा खूपच नवशिक्या, अपरिपक्व होता. शेवटी भल्याभल्या, कसलेल्या, खेळाडूंचे जे कधी कधी हाल होतात तेच अंकुरचे झाले.

अंकुरला शेअर मार्केटमध्ये तब्बल पाच लाखांहून जास्त तोटा झाला. तो जबरदस्त निराश झाला होता; पण पुन्हा एकदा शेअर मार्केटमध्ये मोठी खेळी खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि इथेही दुर्दैवाने त्याची पाठ सोडली नाही. पाच लाखांचा तोटा भरून काढण्यासाठी खेळली गेलेली खेळी, अजून नऊ लाखांचा तोटा करून गेली. म्हणजे एकूण चौदा लाखांचा तोटा झाला. आता मात्र अंकुर उरलीसुरली सर्व हिंमत हरला होता. अंकुरने त्याला जसे जमेल तसे झालेले कर्ज फेडण्यासाठी वाट्टेल त्या व्याजाने पैसे घेण्यासाठी प्रयत्न सुरू केला. अंकुर खूपच टेन्शनमध्ये आला. त्याची ही अवस्था बघून निशिकांतने त्याला मदत करायचे ठरविले. मग दोघांनी मिळून निशिकांतच्या वडिलांची स्कॉर्पिओ गहाण ठेवायचे ठरविले. मुंबईमध्ये हे शक्य नसल्याने त्यांनी नाशिकमध्ये काही मित्रांच्या मदतीने वाहने गहाण ठेवून घेणारा व त्या बदल्यात व्याजाने पैसे देणारा गाठला.

खरेतर हा संपूर्णतः बेकायदा व्यवहार होता. त्या माणसाने नव्या करकरीत, बारा लाखांच्या स्कॉर्पिओवर फक्त पाच लाख रुपये दिले, तेही पाच रुपये शेकडा व्याजाने. देतानाच पहिल्या महिन्याचे व्याजाचे पंचवीस हजार रुपये काढून घेतले. अजूनही अंकुर पूर्णपणे पैशांच्या तणावातच होता. आत्ताशी गोळाबेरीज ही फक्त साडेसात-आठ लाखांची झाली होती. दिवसेंदिवस शेअर मार्केटच्या त्या ऑफिसकडून दबाव वाढतच होता. दुश्मनावरही येऊ नये अशी बिकट परिस्थिती अंकुरवर नको त्या वयात, नको त्या वेळी उद्‌भवलेली होती. परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत हाताबाहेर गेली होती.

निशिकांतच्या वडिलांना जणू देवाने ही घटना प्रवीणला सांगण्याची सुबुद्धी दिली आणि हा संपूर्ण घटनाक्रम प्रवीण आणि श्रद्धाला अशारीतीने माहीत पडला. संपूर्ण घर शॉकमध्ये गेले. कोणालाही काहीही सुचत नव्हते. मग सुरू झाले या सगळ्या संकटातून सावरण्याचे प्रयत्न. अगदी पुढच्या आठ दिवसांतच त्यांनी स्कॉर्पिओचे कर्ज वगळता अंकुरच्या सर्व प्रकारच्या कर्जांची परतफेडसुद्धा करून टाकली. श्रद्धाने त्यासाठी तिचे सोने बँकेत गहाण टाकले आणि आता खरी लढाई सुरू झाली ती स्कॉर्पिओसाठी. श्रद्धा आणि प्रवीणला आपल्या अंकुरच्या हातून जे घडले त्याबद्दल खूप वाईट वाटत होते. परंतु तो क्षण सकारात्मकतेने स्वीकारून ते पूर्ण कामाला लागले होते. ते स्कॉर्पिओ गहाण ठेवून घेणाऱ्या एजंटकडे गेले. त्याने जो व्याजाचा हिशेब काढला होता तो आणि प्रवीणच्या हिशेबात जवळपास पन्नास हजारांचा फरक होता.

खरेतर प्रवीण आणि श्रद्धाचा हिशेब अगदीच बरोबर होता. खूपच जास्त असलेल्या व्याजालाही शेवटी प्रवीण आणि श्रद्धा अंकुरला वाचविण्यासाठी तयार झाले. ‘गाडी द्या आणि पैसे घ्या’, असे त्याला सांगितले. मात्र समोरचा सराईत गुंड असल्याने त्याला काही तयार होईना आणि गाडीही दाखवेना. या सगळ्या भानगडीमध्ये महिना निघून गेला. शेवटी त्याचे व्याजाचे पैसे देऊन टाकले आणि मूळ रकमेसाठी गाडी परत देण्याचे ठरले आणि मग हळूच तो कबूल झाला, की त्याने ती गाडी नाशिक रोडच्या एका एजंटकडे सहा लाख रुपये घेऊन गहाण ठेवलेली आहे.

आता अजूनच एक नवीन भानगड समोर आली होती. प्रवीण आणि श्रद्धा कामाला लागले. नाशिक रोडचा एजंट शोधून काढला. तो तर नाशिकवाल्यापेक्षाही मोठा सराईत गुंड निघाला आणि खरी पंचाईत तर अजून पुढेच होती; ती म्हणजे, त्याचे व्याजाचे पैसे आणि त्याने नाशिकवाल्या व्यापाऱ्याला दिलेले सहा लाख रुपये. पुन्हा तीच भानगड. गाडीचा पत्ता नाही. मोठ्या मिनतवारीने त्याचेदेखील व्याजाचे पैसे देऊन गाडी मिळाल्यावर बाकीचे पैसे देऊ, असे सांगून त्याला तयार केले. प्रकरण तेवढ्यावरच संपत नव्हते. तर या कलाकाराने ती गाडी पुढे लष्करातील एका जवानाला साडेसात लाख रुपये व्याजाने घेऊन त्याच्याकडे सुपूर्द केलेली होती. आता मात्र कुठेतरी आतून प्रवीण आणि श्रद्धा यांची हिंमत तुटायला लागली होती. हे सगळे होता होता दोन महिने होऊन गेले होते. लष्करातील त्या जवानाला देवळाली कॅम्प येथे शोधून काढून भेटल्यानंतर उरलीसुरली सर्व हिंमत प्रवीण आणि श्रद्धा घालवून बसले. कारणही तसेच होते. या जवानाने कोल्हापूरच्या एका राजकारणी अधिक पहिलवान अधिक गुंड अशा माणसाकडे आठ लाखांना स्कॉर्पिओ गहाण ठेवली होती.

प्रवीण आणि श्रद्धाला सार्थपणे भीती वाटत होती, की रमाकांत देशमुखांची स्कॉर्पिओ गुन्ह्यांमध्ये वापरली तर जाणार नाही ना? वापरली गेली तर अंकुरला जेल होईल, याची चिंता त्यांना आता सतवायला लागली होती. शेवटी हिंमत करून प्रवीणने अंकुर आणि एजंटसोबत कोल्हापूरला गेले. पहिले तर ते सद्‌गृहस्थ ताकाला तूर काही लागू देईनात. कोणीही गर्भगळीत होईल इतक्या भयानक धमक्या प्रवीणला फोनवर मिळाल्या. प्रवीण आणि श्रद्धाच्या आठ-दहा दिवसांच्या अखंड प्रयत्नांनंतर, कित्येक फोन कॉल्सनंतर, प्रचंड मनधरणीनंतर, खूप जास्त गयावया केल्यानंतर यश आले. यश आले; परंतु तेही कसे, तर जी स्कॉर्पिओ त्याने आठ लाख देऊन गहाण ठेवून घेतली होती ती स्कॉर्पिओ परत देण्याकरिता दहा लाख रुपये अधिक पाच रुपये शेकडा व्याजाचे असे ७० हजार रुपये घेऊन, तीन दिवसांनी कोल्हापूरला सकाळी सातची भेटायची वेळ दिली. ठरलेल्या वेळेअगोदर प्रवीण आणि अंकुर पोचले होते.

तरीही समोरच्याचा पत्ता नव्हता. आठपासून त्याला फोन करायला सुरवात केली. सायंकाळचे सात वाजले तरीही तो आला नाही. शेवटी समोरचा मोबाईल बंद झाला. तेथेच त्यांना दिवसभरात बरीच माहिती त्या गृहस्थाबद्दल मिळाली. खासकरून गुन्हेगारी पार्श्वभूमीची. त्याच्यावर असलेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये, साडेतीन मर्डरचे गुन्हेदेखील समोरच्यावर नोंदविले होते, ही माहितीदेखील त्यांना मिळाली. प्रवीण आणि अंकुर दोघांनाही तेथे खूप रडायला आले. भरपूर रडले आणि अत्यंत दुःखी-कष्टी, निराश मनाने रात्रभर प्रवास करून सकाळी सकाळी नाशिकला पोचले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री माझी आणि प्रवीणची भेट झाली होती आणि याच भेटीत प्रवीणने मला संपूर्ण कुटुंबासहित आत्महत्या करावीशी वाटते, असे सांगितले होते.

प्रवीण काय, प्रवीणच्या जागी कोणीही असते तरीही कदाचित असेच वाटले असते. कारण कितीही पैसा खर्च करूनदेखील त्यांना आलेला प्रॉब्लेम सोडवायचा मार्ग दिसत नव्हता. शेवटी संपूर्ण कुटुंबाच्या आत्महत्येपर्यंत पोचली होती. मी वर सांगितल्याप्रमाणे प्रवीणला वचन दिले होते २४ तासांच्या आत त्याचा प्रॉब्लेम सोडवेन. येथे कामाला आली अर्थातच फक्त सकारात्मकता, सकारात्मकता आणि सकारात्मकता...

या सर्व गोष्टींचा मी पूर्णपणे सकारात्मकतेने विचार केला आणि हे प्रकरण मला अत्यंत सोपे वाटायला लागले. डोक्यात ‘प्लॅन ऑफ ॲक्शन’ तयार झाला आणि मी सकाळी सकाळी कामाला लागलो. सुदैवाने सगळीकडेच असलेले संबंध कामाला आले. त्या वेळचे सरकारवाडा पोलिस ठाण्याचे ज्येष्ठ पोलिस निरीक्षक माझे अत्यंत घनिष्ठ मित्र होते. त्यांना फोन केला. त्यांच्या भेटीची वेळ मागितली. त्यांनी ताबडतोब मीच तुमच्याकडे सुयश हॉस्पिटलला येतो, असे सांगत अर्ध्या तासाच्या आत माझे हे मित्र हॉस्पिटलला आलेदेखील. संपूर्ण घटनाक्रम त्यांना सांगितला आणि त्याबरोबरच माझ्या डोक्यातील ‘प्लॅन ऑफ ॲक्शन’देखील सांगितला. त्यांनादेखील तो पटला आणि त्याचप्रमाणे कार्यवाही करू या, असे त्यांनी सांगितले. आम्ही असे ठरविले होते, की सगळ्यात पहिले अंकुर आणि प्रवीण यांच्याकडून एक तक्रार अर्ज सरकारवाडा पोलिस ठाण्याला द्यायचा.

त्यात आपण गहाण ठेवून घेणाऱ्या पहिल्या व्यक्तीच्या नावे तक्रार दाखल करायची. त्यात कोणत्या तारखेपासून स्कॉर्पिओ त्यांच्याकडे दिली होती याचा उल्लेख करावयाचा, म्हणजेच ती स्कॉर्पिओ त्यादरम्यान देशमुखांकडे, निशिकांतकडे, अंकुरकडे नव्हती हे रेकॉर्डवर येणार होते. म्हणजेच त्यांची स्कॉर्पिओ कुठल्याही गुन्ह्यात वापरली गेली असती तरीही अंकुर, देशमुख सर्वच सुरक्षित राहिले असते. तसेच आमच्या तोंडी बोलण्यामध्ये एक प्लॅन ठरला होता. नाशिकवाला, नाशिक रोडवाला आणि कोल्हापूरवाला ही सर्व मंडळी गुन्हेगारी पार्श्वभूमीची असल्याने किती प्रतिसाद देतील याबद्दल साशंकता होती;

परंतु देवळाली कॅम्पचा लष्करातील जवान हा त्याची सरकारी नोकरी वाचविण्याकरिता १०० टक्के प्रयत्न करेल, अशी आम्हाला खात्री होती. असेही मूळ काम त्याचेच होते. शेवटी कोल्हापूरला स्कॉर्पिओ त्यानेच गहाण ठेवली होती. मग पुढच्या कामाला आमचे मित्र पोलिस निरीक्षक लागले. प्रवीण, अंकुरचा तक्रार अर्ज ताबडतोब दाखल केला आणि पोलिस गाडी लगोलग नाशिकवाल्या पहिल्या गहाण ठेवून घेणाऱ्या व्यक्तीला घ्यायला रवानादेखील झाली. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोक किती निगरगट्ट असतात याची प्रचीती त्या दिवशी आली. साधी सरळ भाषा त्याला कळलीच नाही. त्याला कळली ती पोलिसांची थर्ड डिग्री कला आणि मग पोपटासारखा बोलायला लागला. त्याचा जबाब ताबडतोब लिहून घेतला. त्याआधारे दोन नंबरचा नाशिक रोडवाला उचलून आणला, त्यालाही थर्ड डिग्रीच लागली. त्याचाही जबाब लिहून घेतला आणि लगोलग उचलून आणला लष्करातील जवान.

त्याला या गोष्टीचे गांभीर्य लक्षात आणून दिले आणि यामुळे त्याची लष्करातील नोकरी कशी धोक्यात येऊ शकते हे सकारात्मकतेने विश्वासात घेऊन समजावून सांगितले. सुदैवाने ही गोष्ट त्याच्या डोक्यात बसली आणि तोही कामाला लागला. त्याला पोलिसांनी मुदत दिली, की २४ तासांच्या आत त्याने स्कॉर्पिओ परत आणून दिली तर त्याच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करणार नाही. सुदैवाने त्याला सीरिअसनेस आल्यामुळे तो कामाला लागला आणि आमचा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. २४ तासांच्या ऐवजी ३६ तासांनी स्कॉर्पिओ एकदाची परत नाशिकमध्ये आली. स्कॉर्पिओ लगोलग देशमुखांच्या ताब्यातदेखील प्रवीण आणि अंकुरच्या दाखल केलेल्या तक्रार अर्जाच्या प्रतीसह दिली, जेणेकरून त्यांना भविष्यात कुठलीही अडचण येऊ नये. नाशिकच्या पहिल्या व्यापाऱ्याने कबुलीजबाब देताच अंकुर, देशमुख सुरक्षित झाले होते. कारण या जबाबाने हे सिद्ध होत होते, की अमुक अमुक तारखेपासून स्कॉर्पिओ या व्यापाऱ्याच्या ताब्यात होती. मग ती गुन्हेगारी पार्श्वभूमीकरिता वापरली जावो की अजून कुठल्या! सोबत माझे वचनही पूर्ण झाले होते.

ही सर्व गोष्ट वाचल्यानंतर आपणा सर्वांच्या लक्षात येईल, की कुठलीही गोष्ट सकारात्मकतेने समजावून घेऊन सकारात्मकतेने सोडविण्याचा प्रयत्न केला तर अशक्य काहीच नाही. घडलेली घटना अत्यंत भयानक होती, यात कुठलीही शंका नाही. परंतु जेव्हा तीच भयानक घटना सकारात्मकतेने सोडवायला घेतली आणि त्यामुळे ती चुटकीसरशी सुटलीदेखील. त्यामुळे कदाचित एक संपूर्ण कुटुंब आत्महत्या करणार होते ते वाचले. सर्वांचा जीव वाचला. ही कहाणी येथे संपत नाही. अंकुरला अचानक श्रीमंत व्हावे असे का वाटले? का त्याला जेवढ्या जास्त पैशांची निकड वाटली? हा अजूनच इंटरेस्टिंग विषय आहे, तो आपण नक्कीच पुढच्या भागांमध्ये बघू या.
(लेखक नाशिकमधील सुयश या प्रथितयश हॉस्पिटलचे संचालक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT