teacher sakal
सप्तरंग

जें जें आचरितो श्रेष्ठ

आपली ओंजळ भरभरून वाहते, तरी त्या करुणामय मेघाच्या वर्षावात खंड पडत नाही. कारण हातचं राखून देणं ही त्याची वृत्तीच नसते.

डॉ. आनंद नाडकर्णी

मानसिक स्वास्थ्य हा माझा प्रांत. हा विषय शिकवणं हा माझा आवडता छंद. सुदैवानं आमच्या आय.पी.एच. संस्थेच्या (इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) अनेकविध प्रकल्पांमुळं माझी ही हौस पूर्ण होत असते. छत्रपती संभाजीनगरच्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांबरोबर ऑनलाइन सत्र सुरू होतं.

शिक्षक ते संवर्धक अर्थात Teacher to Mentor. नवीन कौशल्य शिकवतो तो प्रशिक्षक (Tutor), माहिती आणि ज्ञान देणारा तो शिक्षक (Teacher) आणि जीवनमूल्यं अर्थात शहाणपण देतो तो संवर्धक. संवर्धक त्याच्या वागण्यातून, कृतीतून, बोलण्यातून आपल्यावर संस्कार करत असतो.

आपली ओंजळ भरभरून वाहते, तरी त्या करुणामय मेघाच्या वर्षावात खंड पडत नाही. कारण हातचं राखून देणं ही त्याची वृत्तीच नसते. विद्यार्थ्याला कधीही न जाणवणारे गुण हा मेंटॉर व्यवस्थितपणे उमजून घेतो. माझ्या वाट्याला विविध क्षेत्रातले इतके संवर्धक आले, की त्या एका कारणासाठी मी स्वतःला नशीबवान समजावं. कला क्षेत्रातले माझे असे एक गुरू होते डॉ. अशोक रानडे.

रानडे सरांची आणि माझी ओळख झाली ती आमच्या ‘भरतशास्त्र’ ह्या नाट्यविषयक मासिकाच्या ग्रुपमुळं. मी त्यांच्याकडं लेख मागायला गेलो तेव्हा आमचा म्होरक्या, विनायक पडवळ माझ्याबरोबर होता. मुंबईच्या टोकावरच्या एनसीपीएच्या ऑफिसात रानडे सर होते. संगीत हा काही माझा प्रांत नव्हता. पण संगीत ही काही प्रांतशाही नव्हेच. तो तर सुंदर जगण्यासाठीचा एक संस्कृतिसिद्ध मार्ग. मी तेव्हा वैद्यकीय शाखेचा विद्यार्थी होतो.

आम्हाला विशेषांक काढायचा होता ‘लोककला’ ह्या विषयावर. लोकसंगीत या विषयावर सर इतकं छान बोलले. त्यांची विचार करायची पद्धत खणखणीत असल्यामुळं त्यांचं बोलणं सुस्पष्ट असायचं. पहिल्या भेटीपासूनच आमचं जमलं. सरांच्या पत्नी म्हणजे, दीदी होत्या आकाशवाणीवर निर्मिती विभागात. त्यांचीही ओळख झाली. शास्त्र आणि कला यांचा संगीतामधला मेळ कसा ओळखायचा हे मला सरांकडून शिकायला मिळालं.

जुन्नर नावाच्या छोट्या गावात (त्या वेळी हे गाव छोटं होतं.) एक लोककला परिषद होती. आम्हा सर्व प्रतिनिधींसाठी एक बस केली होती. सरांचा साधेपणा प्रवासात अनुभवत होतो. त्या परिषदेच्या दोन दिवसांमध्ये एका संध्याकाळी डॉ. रा.चिं. ढेरे आणि रानडे सर यांच्या गप्पा ऐकायचा सुवर्णयोग आला. संवर्धकांचे संस्कार एखाद्या विशिष्ट विषयाच्या आरपार जाणारे असतात. आपण फक्त ते शोषून घ्यायचे.

काही वर्षांनंतर एकदा सर मला म्हणाले, “मास्टर दीनानाथांची जन्मशताब्दी येते आहे. ती साजरी करायची आहे गोव्यामध्ये. तू एक शोधनिबंध वाचणार आहेस. त्यांचं व्यक्तिमत्त्व आणि त्यांची गायनशैली यावर तीस ते चाळीस मिनिटाचं सादरीकरण आहे.”

मी एकाच वेळी, दडपणाखाली आलो तसाच प्रचंड खूशसुद्धा झालो. सरांनी माझ्यावर विश्वास टाकला ह्याचा आनंद आणि हे आपण निभावणार कसं याची चिंता. एखाद्या कार्यक्रमाची, प्रकल्पाची आखणी कशी करावी याची एक पद्धत मी सरांकडून शिकत होतो. लावणीवरचा कार्यक्रम असू दे की उपशास्त्रीय संगीताचा. त्यातला थिअरीचा भाग ते बुद्धीनं विंचरून काढत. मग संगीताच्या भागातील सहयोगी कलाकारांच्या सादरीकरणाचं एक ‘डिझाइन’ तयार करत आणि त्यानंतर काटेकोरपणे तालमी घेत.

मीही मास्टर दीनानाथांवर असलेली पुस्तकं गोळा केली. समकालिनांची चरित्रं, आत्मचरित्रं मिळवली. काही नोंदी सरांनी दिल्या. दीनानाथांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये भावनांचे चढउतार, त्यांचे या व्यक्तीच्या आयुष्यातील घटना-दृष्टिकोनांशी असलेले संबंध आणि या साऱ्याचा त्यांच्या गायनशैलीवर झालेला परिणाम अशी मांडणी होती. त्यांची जुनी रेकॉर्डिंग मी ऐकली.

परंतु गायकीचे वैशिष्ट्य प्रत्यक्ष अनुभवायला हवे. पद्मजा फेणाणी माझी जुनी मैत्रीण. तिला फोन केला. तिच्या घरी गेलो. मी बोलत होतो. ती गात होती. तिचे पती म्हणाले, “तुम्ही दोघे हाच कार्यक्रम करा स्टेजवर” आता मला दीनानाथांचा स्वभाव, कर्तृत्व जाणवायलाच नव्हे तर दिसायला लागलं होतं.

घाटातल्या प्रवासात मोटरच्या प्रकाशझोतात, मध्यरात्री समोर येऊन बसलेल्या वाघानं समोरून जाणं यासारख्या नाट्यपूर्ण प्रसंगामागची वृत्ती कळायला लागली होती.

यथावकाश हे सादरीकरण गोव्यामध्ये मंगेशीच्या परिसरातच झालं. रानडे सर आणि दामूकाका केंकरे हे सोबतचे वक्ते. कमी बोलणारे पण मिश्कील दामूकाका म्हणजे माझा मित्र विजयचे वडील. तो आमच्या गटात असायचा. गोव्याच्या त्या वास्तव्यामध्ये मी रानडे सरांचे संघटन कौशल्य अनुभवले. “गाण्याचा कान घडायला लागला की शिस्त आणि समाधान एकत्र नांदायला लागतात,” हे त्यांचं एक वाक्य मी अजून धरून ठेवलं आहे.

हा ‘गाण्याचा कान’ म्हणजे आपल्या जगण्याला अर्थ देणारं कोणतंही ध्येय आहे. सरांनी दिलेलं ते शहाणपण आजवर सोबत आहे. या संवर्धकांचं वैशिष्ट्य हे असतं, की त्यांच्या सहज वागण्यामधून आपल्याला शिकवण मिळत जाते. त्यांना एखादे तत्त्व ‘ठासून’ सांगावंच लागतं असं नाही.

तर संभाजीनगरातील या साऱ्या प्राध्यापकांसोबत चर्चा सुरू असताना आठवण झाली, डॉ. विजय आजगावकर या माझ्या सरांची, ज्यांना आम्ही सारेच आबा म्हणतो. सर होते मधुमेहतज्ज्ञ. त्यामुळे औषधोपचाराइतकंच महत्त्व आहारातील समतोलाला. सरांच्या क्लिनिकमध्ये, वेगवेगळ्या आकाराच्या वाट्यांची एक टीमच असायची. घराघरातली वाटी वेगवेगळी असते. तसेच चमचेही होते.

आणि कार्डबोर्डाची वर्तुळं असायची वेगवेगळ्या परिघांची. त्यामुळं घरातला फुलका, घडीची पोळी, भक्कम भाकरी ह्या साऱ्यांचं आकारमान बरोबर कळायचं. सरांसाठी हे अगदी सहज होतं. पण आम्हा विद्यार्थ्यांसाठी हा एक ‘संस्कार’ होता. समोरच्या पेशंटच्या परिस्थितीचा किती बारकाईने अभ्यास करत होते आबा.

प्राध्यापकांबरोबर ही चर्चा सुरू होती तेव्हा प्रश्न आला. “आमच्या मागे इतकी कामे लावली जातात की वेळच उरत नाही... मेंटॉरिंगसाठी... शिक्षक ह्या भूमिकेतच आम्ही इतके थकून जातो.”

“कारण तुम्ही ह्या भूमिकेला ‘वेगळे’ करून पाहत आहात... शहाणपणा सहजपणे शिकवून जाणारा शिक्षक, त्याचवेळी त्या त्या विषयाचं ज्ञान देत असतोच... अद्ययावत माहिती सुद्धा पोहोचवत असतोच. पण एक गोष्ट महत्त्वाची. व्यक्ती म्हणून आपले तणाव नियोजन जर योग्य नसेल, तर आपल्याला mentor होणे शक्यच होत नाही.’ मी म्हणालो.

“नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये, ‘काउन्सिलिंग’ आणि ‘मेंटॉरिंग’ वेगळे का केले आहे हे आता कळले.” एक प्राध्यापक म्हणाल्या.

महाविद्यालयाच्या परिसरामध्ये जोडलेल्या प्रत्येकाला त्याच्या तणावनियोजनासाठी केलेले समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग... आणि असलेली गुणवत्ता फुलवण्यासाठी, सुप्त क्षमता जागृत करण्यासाठी आणि अर्थपूर्ण जगण्याला सामोरे जाण्यासाठीचे संस्कार म्हणजे मेंटॉरिंग. त्यातून तयार होत असतो वारसा. आपण सारे, अचिव्हमेंट्स म्हणजे विक्रमी यशाला महत्त्व देतो. पण ते यश घडवणं, पसरवणं, टिकवणं यासाठी लागतो तो वारसा.

रानडे सर संगीतातले, आजगावकर सर वैद्यक क्षेत्रातले. नाटकाच्या क्षेत्रातले विजय बोंद्रे सर, शिक्षण क्षेत्रातले माझे मुरलीधर गोडे सर, चित्रकलेतला माझा बाबा अनिल अवचट, कवितेमधले संस्कार देऊन गेलेले सुरेश भट, वाड् मयातल्या माझ्या गुरू सरोजिनी वैद्य आणि पुष्पाताई भावे.

किती नावं घेऊ, एक वटवृक्ष हा संस्कारांचा आणि त्यांनी दिलेला प्रकाश, त्या त्या कप्प्यातला नव्हे तर अवघ्या आयुष्याला प्रकाशमान करणारा. त्यात भर घालू या साहित्यातून भेटलेल्या विनोबा, टिळक, विवेकानंद, गांधीजी, सुभाषचंद्र, ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारख्या नेत्यांची. अशीच नावं प्रत्येक क्षेत्रातील!

आणि अचानक लख्ख कळतं की माझ्या, म्हणजेच प्रत्येक व्यक्तीच्या माध्यमातून अवघ्या मानवतेचा वारसा व्यक्त होत असतो. अपार कृतज्ञतेनं मन भरून आलं. हा वारसा नम्रतेनं पुढं न्यायचा. माणसं येतात आणि जातात. पण संस्कार वाहून न्यायचे तर त्या परागकणांना वाहून नेण्याची जबाबदारी सर्वांची असते.

भगवद्‍गीतेच्या तिसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘जें जें आचरितो श्रेष्ठ तें तें चि दुसरे जन’ वडील, अनुभवी, श्रेष्ठ, शहाण्या लोकांचा धडा घेऊनच इतर लोक वागत असतात. तर माउली म्हणतात,

‘एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्मु ठेवती। तेंचि येर अनुष्ठिती। सामान्य सकळ।।

वारसा घ्यायचा आणि स्वतःच्या शहाणकणांची भर घालून पुढे न्यायचा हे आपल्या सगळ्यांचेच परमकर्तव्य नाही का?

(लेखक हे विख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, नाटककार, संगीतकार, कवी, चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला

Women’s Health Tips : गर्भाशयाचा आजार असेल तर शरीरात दिसतात ही लक्षणं, अनेक महिला करतात दुर्लक्ष

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

SCROLL FOR NEXT